Friday, May 31, 2024

आढावा पावसाळापूर्व स्वच्छता तयारीचा, नद्यांच्या पुनरुज्जीवनाचा आणि नाले सफाईचा

राज्याचे मा. मुख्यमंत्री श्री.  एकनाथ शिंदे यांनी नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. नालेसफाईची कामे नियोजित वेळेत पूर्ण करा, असे निर्देश त्यांनी यावेळी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. पावसाळा तोंडावर येऊन ठेपला आहे. पावसाळ्यात मुंबईकरांची गैरसोय होऊ नये यासाठी नालेसफाईसह खड्डेमुक्त रस्ते, मुंबईत पाणी तुंबणार नाही, याची खबरदारी घ्या. ज्या भागात पाणी साचणार नाही, त्याठिकाणच्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात येईल. मात्र ज्या ठिकाणी पाणी तुंबणार, कामात कुचराई निदर्शनास आल्यास संबंधित अधिकाऱ्यासह कंत्राटदारांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मा. मुख्यमंत्री  श्री. एकनाथ शिंदे यांनी दिला.

मुंबईतील नद्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी मिठी नदी आणि दहिसर नदीचे पुनरुज्जीवन केले जात आहे. मिठी नदी व दहिसर नदीचा पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेतला असून या प्रकल्पाच्या माध्यमातून नदीत सांडपाणी जाण्याआधी पाण्यावर प्रक्रिया करत पाणी स्वच्छ करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढीग आढळल्यास मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई ८१६९६८१६९७ या व्हॉट्सअॅप हेल्पलाइनवर तक्रार करा, असे आवाहन मा. मुख्यमंत्री  श्री.एकनाथ शिंदे यांनी केले आहे. 

मुंबईत अनेक ठिकाणी नाला रुंदीकरणाची कामे सुरू आहेत. अरुंद ठिकाणी पाणी तुंबून वसाहतींमध्ये पाणी शिरण्याचे टाळण्यासाठी  स्थानिकांनी पालिकेच्या माध्यमातून सुरू  असलेल्या कामाला सहकार्य करावे. नाला रुंदीकरणात अतिक्रमण ठरणारी  बांधकामे  हटवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी विरोध करू नये.  तसेच प्रकल्प बाधितांना मोबदला किंवा  पर्यायी निवासाची व्यवस्था करण्यात येईल असे मा. मुख्यमंत्री  श्री. एकनाथ शिंदे म्हणाले. 

दरम्यान, मान्सूनपूर्व मुंबईतील नाल्यातील  गाळ उपसा करण्याचे काम सुरू असून ते अंतिम टप्यात आहे. शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरे अशा तिन्ही कामांचा मा. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आढावा घेतला. यावेळी  वेळेत काम पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले. 

पावसाचे पाणी योग्यरीतीने वेगाने वाहून जाण्यासाठी नाल्यांचे रुंदीकरण केले जाते. अशा नाले रुंदीकरण कामांमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांचे पालिकेच्या माध्यमातून पर्यायी व्यवस्था करण्यात येईल. नाले रुंदीकरण न झाल्याने जोरदार पावसात पाण्याचा वेगाने निचरा झाला नाही, तर वसाहतींमध्ये पाणी शिरून स्थानिक पातळीवर वित्त व जीवितहानी होण्याची शक्यता असते. नाल्यातून गाळ काढण्याच्या कामांचा दर्जा वाढवल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्याचे प्रकार कमी झाले आहेत. यंदाही नाल्यातून गाळ उपसा कामामध्ये खडक लागेपर्यंत खोलीकरण करण्याच्या सूचना मा. मुख्यमंत्री  श्री. शिंदे यांनी संबंधित विभागाला दिल्या. दरम्यान, जे. के. केमिकल नाला (वडाळा), ए. टी. आय नाला (चुनाभट्टी), मिठी नदी (वांद्रे-कुर्ला संकुल), मजास नाला (जोगेश्वरी), दहिसर नदी (दहिसर पश्चिम) या ठिकाणी चाललेल्या पावसाळापूर्व  सफाईचामा. मुख्यमंत्री  श्री. शिंदे यांनी आढावा घेतला.

दरड क्षेत्रात संरक्षक जाळ्या!

दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने यंदा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या घरांमध्ये संबंधित नागरिकांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. त्याबाबतचे निर्देश संबंधित प्राधिकरणाच्या बैठकीत देण्यात आले आहेत. तसेच दरड प्रवण क्षेत्रात संरक्षक जाळ्या लावण्याच्या सूचना केल्याचे मा. मुख्यमंत्री  श्री. शिंदे यांनी सांगितले.

रेल्वे हद्दीतील कामाचा आढावा लवकरच !

नाल्यातून गाळ काढण्याची निश्चित उद्दिष्टपूर्ती करताना आकडेवारीच्या पलीकडे जाऊन अधिकाधिक गाळ काढण्याच्या दृष्टीने एकनाथ शिंदे यांनी सूचना दिल्या. रेल्वेच्या परिसरात पावसाळापूर्व कामांचा आढावा आणि पावसाचे पाणी साचणाऱ्या ठिकाणी केलेल्या उपाययोजना पाहण्यासाठी रेल्वेसोबत संयुक्त पाहणी करण्यात येणार आहे, असेही मा. मुख्यमंत्री  श्री. शिंदे यांनी सांगितले.

सांडपाण्यावर प्रक्रिया !

मुंबईत मिठी नदी आणि दहिसर नदी याठिकाणी सुरू असलेल्या नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या माध्यमातून नद्यांचे पाणी स्वच्छ करण्यात येणार आहे. मलजल प्रक्रिया केंद्राच्या माध्यमातून नद्यांच्या स्त्रोतात सांडपाणी  मिसळण्याच्या आधीच त्या पाण्यावर प्रक्रिया करण्यात येईल. एकूण सात मलजल प्रक्रिया प्रकल्पाचे काम मुंबईत प्रगतिपथावर असल्याचेही मा. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नमूद केले.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

'लोकसभा सार्वत्रीक निवडणूक २०२४' ची लक्षवेधी पर्यावरणपूरक हरीत मतदान केंद्र

हाराष्ट्र राज्यात 'लोकसभा सार्वत्रीक निवडणूक २०२४' चे मतदान पार पडले. अतिशय कल्पकतेने मतदान जागृती अभियान राबवीत  राज्याने विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीने लोकशाहीचा उत्सव  साजरा केला.   महाराष्ट्र राज्यात विविध स्थानिक स्वराज्य संस्थांनी राबविलेल्या मतदार जागृती अभियानाबरोबरच  पर्यावरणपूरक हरीत मतदान केंद्रही लक्षवेधी ठरलीत. 

'लोकसभा सार्वत्रीक निवडणूक २०२४'साठी लक्षवेधी असे मतदार जागृती अभियान राबवून  नवी मुंबई महानगरपालिका कौतुकास पात्र ठरली आहे. मतदानाच्या दिवशीही नवी मुंबई महापालिका चर्चेत होती. नवी मुंबई महापालिकेच्या नेरूळ विभाग कार्यालयाद्वारे नेरूळ सेक्टर-१२ येथील तेरणा विद्यालय शाळेत पर्यावरणपूर्वक मतदान केंद्र उभारण्यात आले होते. या केंद्राद्वारे मतदारांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. या केंद्राच्या माध्यमातून झाडे लावा व सिंगल यूज प्लॅस्टिकचा वापर टाळा, अशाही स्वरूपाचा संदेश देण्यात आला होता. या केंद्रात विविध झाडांच्या आकर्षक कुंड्या, फुगे, पाने फुलांचे तोरण, चालण्यासाठी हिरवे कार्पेट ही सजावटीची  रचना केली होती. मतदारांच्या स्वागतासाठी प्रवेशद्वारावर रांगोळी काढली होती. या पर्यावरणपूरक मतदान केंद्राचे सर्व मतदारांनी कौतुक केले.

कोल्हापूर शहरातील टेंबलाईवाडी मनपा शाळा येथील मतदान केंद्रावर नागरिकांचा मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.  भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेुसार टेंबलाईवाडी शाळा येथे पर्यटन स्थळे या थीम वर केंद्र तयार करण्यात आले होते.   कोल्हापूर महानरपालिका क्षेत्रातील न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल येथे निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पंचगंगा नदी, जाधववाडी मनपा शाळेत कोल्हापुरी खाद्यसंस्कृती, नेहरूनगर मनपा शाळा येथे शहीद ही थीम घेत मतदान केंद्रांची रांगोळी आणि बॅनरने  सजावट करण्यात आली होती . ही सजावट  पाहण्यासाठी नागरिकांनी एकाच गर्दी केली. पर्यायाने कोल्हापूर मनपा क्षेत्रातील मतदानाच्या टक्क्यात वाढ झाली. 

नाशिक महानगरपालिकेच्या १२४ क्रमांकाच्या मतदान केंद्रांने हरीत मतदान केंद्रही लोकप्रिय झाले. नाशिक रोडच्या हॅप्पी होम कॉलनीतील बजरंगवाडी येथे सदर हरीत मतदान  केंद्र उभारण्यात आले होते. 'प्लॅस्टिक हा पृथ्वीचा भक्ष्यक आहे. प्लॅस्टिक टाळा', 'वाहन प्रदूषण टाळण्यासाठी सायकलचा वापर करा', 'झाडे लावा, झाडे जगवा' अशा पर्यावरण रक्षणाचा संदेश देणाऱ्या  फलकांनी मतदान केंद्र सजवले होते. मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांना छोट्या रोपट्यांचेही वाटप करण्यात आले. 

 https://www.facebook.com/share/v/DwzWa21fySA3dLHU/?mibextid=oFDknk 

'लोकसभा सार्वत्रीक निवडणूक २०२४' मध्ये मतदान जागृती अभियाना बरोबरच अशी  पर्यावरणपूरक हरीत मतदान केंद्र ही लक्षवेधी ठरली.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 


Saturday, May 18, 2024

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मतदान जागृती अभियान

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी स्वीप कार्यक्रम(सिस्टेमॅटिक वोटर्स एज्युकेशन इलेक्टोरल पार्टिसिपेशन प्रोग्रॅम) अंतर्गत  पिंपरी-चिंचवड महापालिकेद्वारे  मतदान जागृती अभियान राबविण्यात आले.  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नागरिकांमध्ये मतदानाविषयी जागरूकता दोन एलईडी व्हॅनद्वारे करण्यात आली.   या व्हॅनचे उद्घाटन पिंपरी-चिंचवड मनपाचे  मा.आयुक्तडॉ.  शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. शहरातील मतदानाचा टक्का वाढावा यासाठी एलईडी व्हॅनच्या माध्यमातून चित्रफीत दाखवून जनजागृती केली गेली.  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील वर्दळीची ठिकाणे, उद्याने, रुग्णालये, सिनेमाघरे तसेच महत्त्वाच्या चौकांमध्ये या एलईडी व्हॅनद्वारे जनजागृती करण्यात आली. 

मतदान जनजागृती अभियानासाठी मोटर बाईक रॅलीचे आयोजनही केले होते. या मोटर बाइक रॅलीची सुरुवात  भक्ती-शक्ती चौक, निगडी येथून करण्यात आली. निगडी प्राधिकरण, महापालिकेचे 'अ' क्षेत्रीय कार्यालय, वाल्हेकरवाडी, आदित्य बिर्ला हॉस्पिटल, डांगे चौक, जगताप डेअरी चौक, शिवार गार्डन, कोकणे चौकातून रहाटणी चौकात, काळेवाडी रोडला, चिंचवड स्टेशन चौक, पिंपरी चिंचवड महापालिका भवन मुख्यालय या ठिकाणी मोटार बाइक रॅलीची सांगता झाली.  मतदान जागृतीचे घोषवाक्य लिहिलेले फलक हाती घेऊन मतदान जागृती करण्यात आली. 

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक विभागाने पिंपरी-चिंचवडमध्ये जनजागृतीचे अनेक उपक्रम हाती घेतले. नागरिकांनी मतदान करून हक्क बजावावा, यासाठी पिंपरी-चिंचवड पालिकेनेही जनजागृती केली.  मतदारांना मतदानाचा हक्क बजाविता यावा यासाठी महापालिका विशेष प्रयत्नशील होती   पिंपरी -चिंचवड महापालिकेतील कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी (१३ मे) सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मतदान करता यावे, यासाठी आवश्यक नियोजन करण्याचे आदेश पिंपरी-चिंचवड पालिकेचे आयुक्त  डॉ. शेखर सिंह यांच्या द्वारे देण्यात आले. 

अशाप्रकारे पिंपरी-चिंचवड महानगपालिकेने मतदान आणि मतदार जागृती अभियान राबवून राज्य तसेच देशाची लोकशाही बळकट करण्यासाठी भरीव योगदान दिले.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

मतदान जनजागृती अभियान राबविण्यात मुंबई महानगर पालिकेचा यशस्वी पुढाकार

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४साठी मुंबईत २० मे रोजी मतदान होणार आहे. या मतदानात मुंबईतून मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी मुंबई महानगर पालिकेद्वारे मतदार जनजागृती मोहीम राबविण्यात आल्या.  या मोहिमा राबविण्यापूर्वी  मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. भूषण गगराणी पालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या मतदार जनजागृती मोहिमेच्या रुपरेषेचे सादरीकरण केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केलेहोते. 

मुंबई महानगरपालिकेद्वारे सोसायटी, इमारती, झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन जनजागृती मोहीम राबविण्यात आली. पालिकेचा आरोग्य विभाग, मालमत्ता कर विभाग, अनुज्ञापन विभाग या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांद्वारे  मुंबईत ठिकठिकाणी मतदानाविषयी जनजागृती मोहिमा यशस्वीपणे राबविल्या गेल्या. 

मुंबईतून अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी मुंबई महापालिकेकडून नागरी रहिवाशी ठिकाणांबरोबरीने शैक्षणिक संस्था  आणि व्यावसायिक ठिकाणीही मतदार जागृती अभियान  राबविले गेले.   यात व्यापारी संकुले, मंडई, चित्रपटगृहे, बाजारपेठा, नाट्यगृहे, मॉल, शाळा, महाविद्यालयांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता.  

मतदान हा प्रत्येकाचा अधिकार आहे. त्यामुळे निवडणुकीत हा अधिकार प्रत्येकाने बजावणे अपेक्षित आहे. लोकसभा निवडणुकी  २०२४ च्या पार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का वाढीसाठी मुंबई महापालिकेच्या विविध उद्यानात फलक लावत मतदानाविषयी जनजागृती मोहीम घेण्यात आली. 

मुंबई महापालिकेच्या उद्यान  खात्याच्या अखत्यारित क्रीडांगणे व मनोरंजन मैदाने अशा विविध आरक्षणासाठी ११०० हून अधिक भूभाग राखीव आहेत. हा भूखंड व त्यातील सुविधा मुंबईकरांना निःशुल्कपणे उपलब्ध असून, त्यांचा नियमितपणे वापर होत असतो. विविध मनोरंजनपर व क्रीडात्मक वापरासोबत नागरिकांना जागरूक करण्यासाठी उद्यान हे एक महत्त्वाचे केंद्रबिंदू ठरत आहे. लोकसभा निवडणूक - २०२४ मध्ये मुंबईकर मतदारांना जागरूक करून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी उद्यानात पोस्टर्स,  उद्याने, बॅनर्सद्वारे जनजागृती करण्यात आली. 

मुंबईत २० मे रोजी मतदान होणार आहे. मुंबईत ९ हजार ८६२मतदान केंद्रे आहेत. त्यात शहरात २ हजार ५०९ तर उपनगरात ७ हजार ३५३ मतदान केंद्रे आहेत. मतदान केंद्रांवर मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांना भर उन्हामध्ये रांगा लावाव्या लागणार आहेत. मे महिना हा उन्हाळ्याचा महिना असल्याने या कालावधीत अधिक तापमान असण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता निवडणूक आयोगाकडून केंद्रावर येणाऱ्या नागरिकांसाठी आरोग्य सुविधा पुरविण्यात येणार आहे. मतदान केंद्रांवर आरोग्य सेवा पुरविण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाकडून मुंबई पालिकेवर सोपविण्यात आली आहे.  त्यामुळे  मुंबई महानगरपालिकेने निवडणूक केंद्रांवर आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आपला दवाखाना, आरोग्य केंद्र आणि डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला.

मुंबई महानगर पालिकेने मतदार जागृती अभियान राबवून लोकशाहीच्या उत्सवात आपला सक्रीय सहभाग नोंदविला. तसेच पालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांना मतदान जागृती अभियानात सहभागी करून उपक्रमाची लोकप्रियता वाढविली.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

पनवेल महापालिका क्षेत्रात लोकशाहीचा निवडणूक उत्सव यशस्वी साजरा

नवेल महापालिका  स्वीप कार्यक्रम(सिस्टेमॅटिक वोटर्स एज्युकेशन इलेक्टोरल पार्टिसिपेशन प्रोग्रॅम) अंतर्गत 'लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४; साठी  मतदार जनजागृतीचे विविध उपक्रम राबविले. मावळ लोकसभा मतदारसंघामधील पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये महापालिकेच्या वतीने विविध अभिनव उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये मतदान जनजागृती केली. पनवेल महापालिका आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप पथक प्रमुख शहर अभियंता संजय जगताप यांच्या सूचनेनुसार महापालिकेने लोक परंपरेतील 'वासुदेवाच्या' माध्यमातून चारही प्रभागामध्ये नागरिकांमध्ये मतदानबाबत जनजागृती सुरू केली.  'मताचं दान करा' म्हणत चारही प्रभागांमध्ये वासुदेवाकडून मतदान जनजागृती करण्यात आली. 

पनवेल महापालिका क्षेत्रातील बचत गटांमध्ये सक्रिय असणाऱ्या महिलांसह आशा स्वयंसेविकांनी 'लोकसभा निवडणुकीत मतदान करा' हा संदेश घरोघरी पोहोचविण्यासाठी सभांचे आयोजन करीत , घरोघरी जाऊन जनजागृती केली. तसेच पालिका क्षेत्रात ठिकठिकाणी फेरी काढून जनजागृती केली.

पनवेल महापालिका क्षेत्रात २१७ आशा स्वयंसेविका आहेत. तसेच पालिका क्षेत्रात ३५० महिलांचे बचतगट असून त्यातील सुमारे दीड हजार सक्रीय महिलांनी एकत्रित येऊन मतदान करा हा संदेश पालिका क्षेत्रात घरोघरी पोहचविला आहे. पनवेल पालिका क्षेत्रातील देवीचा पाडा, मुर्बी गाव, पालेखुर्द, करवले गाव, कळंबोली, लोखंडी पाडा, तक्का गाव याठिकाणी नागरिकांच्या बैठका घेण्यात आल्या. तसेच पनवेमधील ख्वाजा नगरी झोपडपट्टी येथे घरोघरी जाऊन पत्रके देऊन मतदान करण्याविषयी जनजागृती करण्यात आली.

सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४  च्या पार्श्वभूमीवर  पनवेल महापालिकेच्या लोकनेते दि.बा पाटील विद्यालय व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळा पोदी यांच्यावतीने मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रभातफेरी काढण्यात आली. या उपक्रमात शाळेच्या सर्व शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने या प्रभात फेरीमध्ये सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी "मतदार राजा जागा हो.. लोकशाहीचा धागा हो...",  "वोट देने जाना है... देश को आगे बढाना है... ", "आपल्या मताचे दान आहे लोकशाहीची शान"  अशा घोषणा देत नागरीक, व्यावसायिक, फळ, भाजी विक्रेते या मतदारांमध्ये मतदान करण्यासाठी जनजागृती केली. महापालिका शाळा क्रमांक ४ मध्ये रांगोळी  स्पर्धांच्या माध्यमातून महापालिकेद्वारे विद्यार्थ्यांच्या मदतीने  मतदार जनजागृती करण्यात आली.  पनवेल मनपा शाळा क्रमांक ८ च्यावतीने मतदानावर आधारित घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली;  तर गुजराती शाळा क्रमांक ९ मध्ये रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पना शक्तीचा वापर करून सुंदर अशी चित्रे व रांगोळ्या काढल्या. 

सुमारे २ लाख विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ‘मतदान करणे हे प्रत्येक नागरिकांचे प्रथम कर्तव्य आहे, हे कर्तव्य बजावत असताना सुजाण नागरिक म्हणून तुम्ही निवडणुकीत मतदान करा’ अशा आशयाच्या पत्रांचे वाटप पनवेल महापालिका क्षेत्रात करण्यात आले. याचबरोबर महापालिकेच्या लोकनेते दि.बा.पाटील विद्यालयामध्ये पालकसभा व व्यवस्थापन समितीच्या सभा घेऊन ‘ देशाची लोकशाही व्यवस्था मजबूत करण्यासाठी नागरिकांनी मतदान करणे गरजेचे असल्याचा’ संदेश पालकांना देण्यात आला.

आपल्या मताचे दान आहे लोकशाहीची शान... या घोषवाक्याला साजेसं मतदान आणि मतदार जागृती अभियान पनवेल महानगर पालिकेने राबविले. फक्त राबविलेच नाही तर नागरिकांनाही या मतदान जनजागृती अभियानात सहभागी करून घेतले.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

Friday, May 17, 2024

नाशिक महानगरपालिकेचा मतदान जनजागृती उत्सव

नाशिक महानगरपालिकेच्या वतीने स्वीप उपक्रम अंतर्गत विविध कार्यक्रम घेतले जात आहेत.  स्वीप उपक्रमांतर्गत नाशिक मनपाच्या सर्व विभागीय कार्यालयांमध्ये  महिलांसाठी मेहंदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. मेहंदी स्पर्धेसाठी निवडणुकीशी  निगडित विषय निश्चित करण्यात आलेत. भारत निवडणूक आयोगाचा लोगो, स्वीप लोगो, वोटर ॲप हेल्पलाईनचा लोगो आणि सक्षम ॲप लोगो  या विषयांवर मेहंदी स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी मेहंदी रेखाटली.  १८ वर्षांपुढील महिलांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. पूर्व विभागीय कार्यालय, पश्चिम विभागीय कार्यालय, पंचवटी विभागीय कार्यालय, नाशिकरोड विभागीय कार्यालय, सातपूर विभागीय कार्यालय,नवीन नाशिक विभागीय कार्यालय, सातपूर विभागीय कार्यालय या सहा विभागीय कार्यालयांमध्ये सायंकाळी  या मेहंदी स्पर्धा घेण्यात आली. 

मस्काॅटच्या माध्यमातून नाशिक महानगरपालिकेद्वारे मतदानाची जनजागृती करण्यात आली..  नाशिक शहरात होणाऱ्या विविध सार्वजनिक कार्यक्रमांच्या ठिकाणी व परिसरात मस्काॅटच्याद्वारे जनजागृती करण्यात आली.   यावेळी उपस्थित नागरीक मस्काॅटबरोबर छायाचित्र काढून आनंद घेतला. 

शहरात मतदानाची जनजागृती करणाऱ्या सेल्फी पॉईंटसची निर्मिती केली आहे. त्या सेल्फी पॉईंटस वर विद्यार्थी, पालक, शिक्षक छायाचित्र काढण्यासाठी गर्दी करीत आहेत. सेल्फी पॉईंटवर फोटो घेऊन आनंद घेतला. 

नाशिक महानगरपालिका व क्रेडाई संस्था यांच्या संयुक्त  विद्यमाने हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या चित्रकला स्पर्धेत २३५ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. "उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा",  "मी निवडणार माझा खासदार",  "माझे मत माझी जबाबदारी", "वोट कर नाशिककर"या विषयांवर सहभागी स्पर्धकांनी उत्स्फूर्त चित्रे रेखाटली. 

नाशिक महानगरपालिकेने बचत गटांच्या माध्यमातून मतदार जागृती अभियान राबविण्यासाठी महाकवी कालिदास कला मंदिरात एक कार्यक्रम आयोजीत केला होता. या कार्यक्रमात "महिला बचत गटांमध्ये  जनसंपर्काची मोठी ताकद आहे. या बचत गटांच्या  माध्यमातून सर्व स्तरावर मतदान जनजागृती करून मतदानाची टक्केवारी वाढावी यावर भर द्यावा", असे आवाहन बचतगटांच्या प्रमुखांना आणि सदस्यांना नाशिक  मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. प्रदीप चौधरी केले. मतदानासाठी भौतिक सुविधा मतदान केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आली असून त्याबाबतची माहिती देखील बचत गटातील महिलांनी सर्वश्रुत करून  मतदानाच्या टक्केवारीत वाढ करण्याच्या दृष्टीने कामकाज होईल असा विश्वास श्री. प्रदीप चौधरी यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमात पिंपळगाव बहुला येथील महिला बचत गटाने पथनाट्य सादर करून मतदान करण्याच्या करण्याचे आवाहन केले.  मतदान करण्याविषयी जनजागृती पर विविध संदेश फलक दर्शवून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मतदानाबद्दल औत्सुक्य कथन करून मतदार यादीत मतदारांनी त्यांचे नाव  कसे शोधावे याविषयी माहिती देण्यात आली. 

बचत गटांच्या  सदस्यांना आणि उपस्थितांना मतदान प्रतिज्ञा शपथ देण्यात आली. मतदानाबद्दल निमंत्रण पत्रिका तयार करणाऱ्यांचा तसेच  मतदार जनजागृती अभियानाशी निगडित रांगोळी रेखाटणाऱ्या कलाकारांचा  मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमात एन. यु. एल. एम.  विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. 

नाशिक महानगरपालिका, जिल्हाधिकारी निवडणूक कार्यालय, पोलीस आयुक्त कार्यालय, नाशिक रायडर्स कम्युनिटी, नाशिक एक्सपल्स,किंग ऑफ रोड्स,

रेडिओ सिटी, माय एफ एम यांच्या संयुक्त विद्यमाने स्वीप अंतर्गत मतदार जनजागृती व सहभाग बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले.मतदार जनजागृती रॅलीत सहभागी झालेले मराठी कलावंत किरण भालेराव यांनी या रॅलीच्या माध्यमातून नाशिककरांचे लक्ष वेधून घेतले. 

नाशिक उपनगर  मनपा शाळा परिसर,नवीन व जुनी सिंधी चाळ, साईबाबा मार्केट,उपनगर भाजी मंडई, इच्छामणी परिसर व उपनगर नाका येथे ध्वनीक्षेपकाद्वारे मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करून मतदान जनजागृती करण्यात आली. विभागातील हॅपी होम कॉलनी, रॉयल कॉलनी, गुलशन कॉलनी, सात्विक नगर व परिसर तसेच बजरंगवाडी या परिसरात मतदान जनजागृती करून स्वीप उपक्रम राबविण्यात आला. विभागातील प्रभाग क्रमांक १५ व २३ येथे घंटागाडी द्वारे ध्वनिफिती द्वारे मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली. विभागातील मातोश्री नगर,शांती पार्क, खोडदे नगर ,आगर टाकळी, खोडदे नगर, उपनगर जॉगिंग ट्रॅक, गांधीनगर भाजी बाजार ,महारुद्र जॉगिंग ट्रॅक या परिसरातील नागरिकांना प्रत्यक्ष भेटून शंभर टक्के मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.

शिखरेवाडी मैदान येथे जेष्ठ नागरिकांबरोबर मतदान करण्याबाबत प्रतिज्ञा घेण्यात आली आहे.  चेहडी गाव व परिसरात मतदार जनजागृती  रॅली काढून  नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. मुक्तिधाम मैदान मनपा शाळा क्र १२५ जॉगिंग ट्रॅक येथे जेष्ठ नागरिक मतदान जागृती मेळावा घेतला.  अंदाजे १५० नागरिक उपस्थित होते. या सर्व उपस्थितांना मतदार प्रतिज्ञा देण्यात आली.  नाशिकरोड विभागातील चेहडी पंपिंग स्टेशन येथील दत्त मंदिर येथे महिलांना मतदान जनजागृती बाबत मेळावा घेतला. 

नाशिक महानगरपालिकेने मतदानाची जनजागृती करीत लोकशाहीचा उत्सव अतिशय जल्लोषात साजरा केला.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

कोल्हापूर महानगरपालिकेची मतदान जागृती अभियानातील दमदार कामगिरी

लोकसभा सार्वत्रीक निवडणूक २०२४ साठी कोल्हापूर महानगरपालिकेने  स्वीप अंतर्गत यशस्वीरीत्या मतदार जागृती अभियान राबविले. मतदार जागृती अभियान राबविताना अतिशय नाविन्यपूर्ण प्रयोग केले. त्यापैकी एक म्हणजे भित्तिपत्रकांद्वारे मतदार जागृती. कोल्हापूर मनपाच्या बस सेवेतील बसमधून  मतदानाविषयी मतदारांमध्ये जागृती करणारी भित्तीपत्रके चिकटविण्यात आली. २ हजारांपेक्षा अधिक भित्तीपत्रके कोल्हापूर मनपाच्या बसमधून चिकटवण्यात आली. "१०० टक्के मतदान, हीच लोकशाहीची शान", "मतदान माझा हक्क, मी मागे राहणार नाही", "मतदान करा, लोकशाही बळकट करा" असा संदेश भित्ती पत्रकांमधून देण्यात आला. 

कोल्हापूर मनपाने आकाशवाणी कोल्हापूरवर पथनाट्य प्रसारित केले. कोल्हापूर मनपाच्या मनपा राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र. ११  विद्यार्थ्यांचे "मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो " हे पथनाट्य आकाशवाणी कोल्हापूर या रेडिओ केंद्रावर शुक्रवार दिनांक ३ मे २०२४ रोजी सकाळी८.१५  ते ८.३० या वेळेत प्रसारित करण्यात आले. 

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी' अधिकाधिक कोल्हापुरातील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी  कोल्हापूर महानगरपालिकेने  युद्धपातळीवर काम केले.  शेवटच्या टप्प्यातील मतदान जागृती अभियानासाठी कोल्हापूर महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व प्रभागांमध्ये  गृहभेटी द्वारे घर टू घर मतदान जनजागृती अभियान राबविले. या अभियानात  आशा सेविकांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता. 

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी' अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी  स्थानिक स्वराज्य संस्था युद्धपातळीव काम करीत आहेत. "सिस्टमॅटिक व्होटर्स एज्युकेशन ऍण्ड इलेक्‍ट्रोरल पार्टीसिपेशन" (स्वीप)  या उपक्रमातंर्गत स्थानिक स्वराज्यसंस्थांच्या शाळांनी मतदार जागृती अभियान  राबविण्यास सुरुवात केले आहे. या अभियानास विद्यार्थी आणि शिक्षकांचा चांगला सहभाग लाभत आहे. 

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी कोल्हापूर महानगरपालिका सज्ज झाली आहे. कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्राथमिक, माध्यमिक शाळांतील विद्यार्थीनींनी रांगोळी रेखाटून मतदार जागृती  अभियान आपला सहभाग नोंदवला. रांगोळीच्या माध्यमातून 'व्होट इंडिया', 'जो हैं सच्चा और इमानदार, वही हैं देश का हकदार' असे संदेश दिले.  विद्यार्थीनींनी आपल्या घराच्या परिसरात मतदान जागृती करणारी घोषवाक्य लिहून लावली आहेत. 'जागरूक मतदार लोकशाहीचा आधार', 'मतदान हा अधिकार नाही, तर कर्तव्य सुद्धा आहे' ही घोषवाक्य लक्ष वेधून घेत आहेत.   विद्यार्थ्यांनी पालकांना पात्र लिहून मतदानाचा हक्क बजावणे किती महत्त्वाचे आहे ते पटवून दिले आहे.  विद्यार्थ्यांच्या मार्फत मतदान जनजागृती बाबत शाळा परिसरात प्रभात फेरी काढण्यात आली. "सोडा सर्व काम. चला करू मतदान", "मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो", "जन मन का यहा नारा है, मतदान अधिकार हमारा है", "मतदान हा अधिकार नाही, तर कर्तव्य सुद्धा आहे" अशा घोषणा लिहिलेले फलक हाती घेत, नारे देत मतदार जागृती अभियान विद्यार्थ्यांनी प्रभात फेरीद्वारे शिक्षकांच्या साथीने राबविले. शिक्षकांद्वारे पथनाट्यांतून  मतदान जनजागृती करण्यात आली. 

अशाप्रकरे कोल्हापूर महानगरपालिकेने मतदान जागृती अभियानात दमदार कामगिरी करीत लोकशाहीचा उत्सवात जल्लोषात साजरा केला.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 



नवी मुंबई महानगरपालिकेचा मतदान जागृती अभियानात सक्रिय सहभाग

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने सर्वत्र आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. २० मे २०२४ ला पाचव्या टप्प्यातील मतदान पार पाडणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मतदानाचा पाचवा टप्पा पार पडणार आहे.  त्यासाठी नवी मुंबई महानगत पालिका अत्यंत प्रभावीपणे मतदान जागृती अभियान पार पाडत आहे. त्याची सुरुवात महापालिकेने आचारसंहितेपासूनच केली. मनपाच्या सर्व अधिकाऱ्यांनी  विभागीय पातळीवर काटेकोरपणे दक्ष रहावे व कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी, असे निर्देश नवीमुंबई  महापालिका मा. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी  दिले. नवी मुंबई महानगरपालिकेत  मतदारजागृती अभियान आढावा बैठक झाली. त्यावेळी मा. आयुक्त डॉ. कैलास शिंदे बोलत होते. 

आदर्श आचारसंहितेच्या नियामानुसार प्रचारफलकांना परवानगी देण्यात यावी. परवानगी देताना सर्वांना समान न्याय देण्यात यावा. अशाच प्रकारे प्रचारासाठी मैदाने उपलब्ध करून देण्याबाबतही समान भूमिका ठेवण्यात यावी. कोणत्याही प्रकारे विनापरवानगी होर्डिंग्ज, बॅनर्स, झेंडे लागणार नाहीत याची दक्षता घ्यावी. याचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच खासगी संस्थांच्या जाहिरातीही हटविण्यात याव्यात. उद्घाटने, शुभारंभ यांच्या कोनशिला झाकून घेण्यात याव्यात. अशा सर्व बाबींकडे नवी मुंबई महापालिकेच्या आठही विभागांतील सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी यांनी क्षेत्रीय स्तरावर स्वतः पाहणी करून गांभीर्याने लक्ष द्यावे, असे स्पष्ट निर्देश मा. आयुक्तांनी  दिले. त्याचप्रमाणे एनएमएमटीबसेस व बसस्थानके याठिकाणीही विनापरवानगी फलक लागणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. 

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढण्याच्या दृष्टीने विविध प्रसारमाध्यमांचा अधिक चांगला उपयोग करून व्यापक जनजागृती करावी, असेही निर्देश मा.आयुक्तांनी दिले. यामध्ये, विभाग कार्यालय पातळीवर मतदान जनजागृती कक्ष स्थापन करावा व या कक्षा नागरिकांना मतदानाविषयी आदी बाबींविषयी माहिती द्यावी, मतदान करण्यासाठी संपर्क साधून प्रोत्साहित करावे, असे निर्देश आयुक्तांनी दिले. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सुव्यवस्थितरीतीने पार पडणे ही आपली सर्वांची जबाबदारी असून त्याकडे काटेकोर लक्ष देण्यासोबतच निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याकडेही विशेष लक्ष देण्याचे निर्देश नमुमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आढावा बैठकीत दिले.

आपापल्या विभागीय क्षेत्रातील सोसायट्या, वसाहती, उद्योग समूह याठिकाणी भेटी देऊन मतदान करण्याविषयी जनजागृती करण्याच्या सूचना मा. आयुक्तांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या. मतदानाच्या प्रचार, प्रसिद्धीप्रमाणेच मतदान केंद्रांवर सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्यावे. ही केंद्रे निवडणूक आयोगाने सूचित केल्याप्रमाणे तळ मजल्यावर असावीत. या केंद्रावर पाणी, विद्युत, स्वच्छतागृहे, रॅम्प अशा व्यवस्थेसह प्रामुख्याने व्हिलचेअरचीही व्यवस्था असणे गरजेचे  असल्याचे  मा. आयुक्तांनी सांगितले. 

लोकसभा निवडणुकीत प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावावा यादृष्टीने क्षेत्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन रेल्वे स्टेशन, बसडेपो, मार्केट, मॉल, मार्ट्स, सिनेमागृहे, नाट्यगृहे, मंगल  कार्यालये, रुग्णालये, सभागृहे, उद्याने अशा वर्दळीच्या ठिकाणी विविध माध्यमांतून मतदानाविषयी व्यापक स्वरूपात जनजागृती करण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले. याशिवाय फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप अशा समाज माध्यमांचाही प्रभावी वापर करावा तसेच एनएमएमटी बसेसवर फलक लावून व बसेसमध्ये ऑडिओ सूचना प्रसारित करून जनजागृती करण्याचे  मा. आयुक्तांद्वारे सूचित करण्यात आले आहे..

२० मे २०२४ रोजी नवी मुंबई लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत  प्रत्येक मतदाराने मतदान करून आपला मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी स्वीप कार्यक्रमांतर्गत  नवी मुंबई महानगर पालिकेद्वारे मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे. यादृष्टीने महापालिकेच्या माध्यमातून महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रीय स्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मतदार जनजागृतीसाठी विविध माध्यमांचा वापर करताना सध्याच्या सोशल मीडियाप्रेमी युगात लोकांमध्ये असलेली सेल्फी छायाचित्र काढण्याची आवड लक्षात घेता मतदार जनजागृतीचे सेल्फी स्टँड तयार करून ते  नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयासह आठही विभाग कार्यालये तसेच ऐरोलीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, वंडर्स पार्क, निसर्गोद्यान, मनपा रुग्णालये, भावे नाटयगृह व इतर मनपा कार्यालयांमध्ये ठेवण्यात आले आहेत.

महापालिका मुख्यालयातील सेल्फी स्टँडवर नवी मुंबई महानगरपालिकेचे मा.आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सेल्फी काढून नागरिकांना २० मे २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत मतदान करण्याचे आवाहन केले आहे. लोकशाही बळकट करणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य असून त्याकरिता संविधानाने आपल्याला दिलेला मतदानाचा अधिकार हक्काने बजावावा, असा संदेश आयुक्तांनी दिला आहे.

नवी मुंबई नागरिकांनी या सेल्फी स्टँडवर आपले सेल्फी छायाचित्र काढून ते सोशल मीडियाच्या फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स, व्हॉट्सप आणि इतर लोकप्रिय समाज माध्यमांतून प्रसारित करावे आणि स्वतः मतदान करावेच व इतरांनाही मतदान करण्याविषयी सेल्फीच्या माध्यमातून प्रोत्साहित करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी या दृष्टीने स्वीप कार्यक्रमांतर्गत नवीमुंबई महापालिकेचे  मा. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार विविध प्रसार माध्यमांचा वापर केला जात आहे. यामध्ये मतदान यंत्राचे मुखवटे अर्थात शुभंकर (मॅस्कॉट्स) तयार करण्यात आले असून हे चार मॅस्कॉट्स संपूर्ण महापालिका क्षेत्रात फिरून २० मे रोजी होणाऱ्या नवी मुंबई लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याविषयी जनजागृती करत आहेत.

हिरव्या फ्लुरोसन्ट रंगात चटकन नजरेत भरणारे हे मोठ्या आकाराचे चार मॅस्कॉट्स लक्षवेधी असून या मॅस्कॉटच्या पुढील भागावर मतदान यंत्राची प्रतिकृती आहे. त्याचप्रमाणे पाठीवरील मागील भागात मतदान करण्याविषयी आवाहन करणारा फलक प्रदर्शित करण्यात आला असून त्यावर 'वोटर हेल्पलाईन' अॅपचा क्यूआर कोड नमूद करण्यात आलेला आहे.

हे मॅस्कॉट्स नागरिकांमध्ये व त्यातही मुलांमध्ये लोकप्रिय होत असून अनेकजण या मॅस्कॉटसोबत सेल्फी छायाचित्र काढून आपापल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून प्रदर्शित करीत आहेत.  महापालिका निवडणूक विभागाचे उप आयुक्त शरद पवार यांच्या नियंत्रणाखाली या मॅस्कॉट्समार्फत मतदान जनजागृती प्रचार वेळापत्रक तयार करण्यात आले असून प्रत्येक मॅस्कॉटला विभाग नेमून देण्यात आलेला आहे. संबंधित विभागांचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी यांचे मॅस्कॉट्सव्दारे जनजागृती कार्यावर लक्ष असणार आहे.

पथनाट्यांप्रमाणेच लक्ष वेधून घेणाऱ्या मॅस्कॉट्सव्दारे लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन करणाऱ्या स्वीप उपक्रमास नागरिकांची पसंती मिळताना दिसत आहे.

बेलापूर विधानसभा क्षेत्रातील १७४ शाळा व ३९ महाविद्यालयांमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेद्वारे मतदार जागृती अभियानचे विविध उपक्रम राबविण्यात आले.  विद्यार्थ्यांमार्फत त्यांचे पालक व कुटुंबीय , नातेवाइकांना लोकसभा निवडणुकीसाठी (२०२४)  मतदान करण्याविषयी आवाहन करण्याच्या अनुषंगाने चित्रकला, रांगोळी, निबंध, वक्तृत्त्व, प्रश्नमंजुषा, गायन  अशा विविध  स्पर्धात्मक  उपक्रमांप्रमाणेच  प्रभातफेऱ्या, पथनाट्ये  ह्या  जनजागृतीपर माध्यमांचा  प्रभावीपणे उपयोग करण्यात  आला.  

नवी मुंबई महानगरपालिकेने स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मतदतीने मतदार जागृती अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीत मतदान करण्याविषयी नागरिकांना आवाहन करणारे बिल्ले (बॅजेस) स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या गणवेशावर लावून, त्या माध्यमातून मतदान करण्याविषयी संदेश देण्याचा अभिनव उपक्रम नवी मुंबई महानगरपालिकेद्वारे  राबविला जात आहे. 

नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या मतदार जागृती अभियानांपैकी हे एक अभियान आहे.  त्यानुसार बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, दिघा अशा आठही विभाग कार्यालय क्षेत्रातील स्वच्छताकर्मीच्या गणवेशावर हे बिल्ले झळकत आहेत. त्यावर असलेल्या 'मी मतदान करणारच. तुम्हीदेखील आपला मतदानाचा हक्क बजावा. माझे मत माझा अधिकार' अशा मजकुरातून मतदानाविषयीचे आवाहन केले जात आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मतदान जागृती अभियान अत्यंत प्रभावीपणे राबविले. नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम (NMMT) यांच्यामार्फत बसेसमधून २० मे २०२४ रोजीच्या लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठीचा व्यापक प्रचार सूरू असून त्याच्या व्हिडिओ क्लिपलाही नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. (https://www.instagram.com/reel/C6swYWuvf8A/?igsh=MWFlZGFtc3R1Z2Npdg%3D%3D) इथे विडिओ क्लिपइन्सर्ट करणे. 

अशाप्रकारे लोकशाहीचा निवडणूकउत्सव साजरा करण्यासाठी नवीमुंबई मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. महापालिका लोकसहभागाने उत्सव साजरा करीत आहे. 


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

ठाणे महापालिका क्षेत्रातील मतदान जागृती अभियान

'लोकसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४' साठी मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावे या उद्देशाने ठाणे महापालिकेने मोहीम हाती घेतली आहे. मतदान आणि मतदार जनजागृतीसाठी ठाणे महानगरपालिकेने आयुक्त श्री. सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम हाती घेतले आहेत. ठाणे महानगरपालिकेतर्फे मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.   'रन फॉर व्होट'  या नावाने भरविण्यात आलेल्या ह्या मिनी मॅरेथॉन स्पर्धेस ठाणे जिल्हा अॅथलेटिक असोसिएशन आणि ठाणे सिटीझन्स फाउंडेशन  तसेच ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाचेही सहकार्य लाभले. ह्या स्पर्धेस ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे विशेष उपस्थिती लाभली. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या  'रन फॉर व्होट' या मिनी मॅरेथॉनला ठाणेकरांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. युवकांनी मोठ्या संख्येने निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊन राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी मतदान करावे, असा संदेश या स्पर्धेद्वारे देण्यात आला. प्रत्येकाने येत्या २० मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करावे, असे आवाहन ठाणे महापालिकेचे  मा. आयुक्त श्री. सौरव राव यांनी केले. 'रन फॉर वोट' या मिनी मॅरेथॉन स्पर्धेत स्वीप पथक कर्मचाऱ्यांनी धावपटूंसोबत सहभागी होऊन मतदानाबाबत जनजागृती केली. या पथकाने धावपटूंना मतदानाची शपथ दिली. 'मी मतदान करणारच...आपणही मतदानासाठी सज्ज राहा' या आशयाचा मजकूर असलेल्या  माहितीपत्रकांचे वाटपही करण्यात आले. यावेळी ठिकठिकाणी सेल्फी पॉइंटवर तरुणांनी सेल्फी काढून मतदान जनजागृतीच्या घोषणा दिल्या. देशाच्या भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

ठाणे महापालिकेने पीडीसी इव्हेंट्सच्या साथीने विवियाना मॉल आणि कोरम मॉल येथे फ्लॅशमॉबद्वारे जागृती केली आणि मतदान करण्याबद्दल आवाहन केले. या  मतदानाचा जनजागृती अभियानात तरुणाईचा सहभाग महत्त्वाचा होता. आम्ही  मतदान करणार आहोत, आपणही न विसरता हे राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करावे, असे आवाहन  फ्लॅशमॉबमध्ये सहाभागी झालेल्या युवकांनी नागरिकांना केले. तसेच, फ्लॅशमॉबद्वारे नृत्यातून रसिकांची मनेही जिंकली.

" येत्या २० मे रोजी आपल्याकडे लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या मतदानाची टक्केवारी वाढवणे आवश्यक आहे. त्यामुळे आपण मतदानासाठी एकमेकांना प्रोत्साहन देऊया आणि मतदानाची टक्केवारी वाढवूया, असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त श्री. सौरभ राव यांनी नमो ग्रँड सेंट्रल पार्क येथे नागरिकांना केले.

महापालिका आयुक्त श्री. सौरभ राव यांनी पर्यटक आणि ठाणेकर यांच्यात सध्या चर्चेत असलेल्या, नमो ग्रँड सेंट्रल पार्कला सकाळी भेट दिली. कोलशेत येथे सुमारे २० एकरच्या सुविधा भूखंडावर ठाणे महापालिकेसाठी हे पार्क कल्पतरू डेव्हलपर्स यांनी विकसित केले आहे. या पार्कची पाहणी आयुक्त राव यांनी केली. त्यावेळी, तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांशी आयुक्त राव यांनी संवाद साधला. मतदान हे नागरिकांचे कर्तव्य आहे त्यामुळे आपण ते पार पाडले पाहिजे. त्यात हयगय नको, असे यावेळी आयुक्त  श्री. राव यांनी सांगितले.

नागरिकांनीही  आयुक्तांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच, आपापल्या गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान जागृती विषयी सुरू असलेल्या उपक्रमांची माहितीही नागरिकांनी दिली.

मतदान जनजागृतीसाठी शहरात फलक उभारणीचे नियोजन  ठाणे पालिका प्रशासनाने आखले आहे. शहरात पालिकेकडून मतदान जनजागृतीचे फलक झळकत आहेत. या फलकांवर मतदानाचे महत्त्व आणि मतदान करण्याचे आवाहन करणारे संदेश देण्यात येणार आहेत. शहरातील महत्त्वाचे चौक आणि इतर भागांत फलक लावले जाणार आहेत. या फलकांद्वारे नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रेरित केले जाणार आहे. काही दिवसांपूर्वी महापालिकेने स्वाक्षरी मोहीम राबविली. यासाठी किसननगर शाळा क्रमांक २३ मध्ये 'मी मतदानाचा हक्क बजावणार' असा फलक लावण्यात आला होता.

निवडणुकीत जास्तीत नागरिकांनी सहभागी मतदानाचा अधिकार बजावावा, यासाठी राज्यांतींल विविध शहरात नागरिकांमध्ये जनजागृती आली. ठाणे महापालिकेच्या किसननगर शाळा क्र. २३ मध्ये 'मी मतदानाचा हक्क बजावणार' असा फलक लावण्यात आला होता.  त्याद्वारे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. मा. महापालिका आयुक्त श्री. सौरभ राव यांनीही या फलकावर स्वाक्षरी करून या मोहिमेत सहभाग घेत उपस्थितांना मतदान करण्याचा संदेश दिला.

मनोरंजन क्षेत्राच्या माध्यमातूनही ठाणे महापालिकेने मतदाराला जागृती अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. ठाणे महापालिकेच्या दोन्ही नाट्यगृहात मतदानासाठी जनजागृती केली जात आहे. गडकरी रंगायतन आणि घाणेकर नाट्यगृहात प्रत्येक प्रयोगाच्या वेळी मतदानाचा संदेश दिला जात आहे. ठाणे महापालिका आयुक्त श्री.  सौरभ राव यांच्या निर्देशानुसार हा उपक्रम राबविला जात आहे.   गडकरी रंगायतनची आसन क्षमताएक हजार आहे. तेथे दररोज किमान दोन नाटकांचे प्रयोग होतात. शनिवार-रविवारी हे प्रमाण तीन प्रयोगापर्यंत जाते. तर, घाणेकर नाट्यगृहाची आसनक्षमता ११००प्रेक्षकांची आहे. येथे दररोज किमान एक प्रयोग होतो तर, शनिवार- रविवारी किमान दोन प्रयोग होतात. घाणेकर नाट्यगृहातील मिनी थिएटरमध्येही प्रयोग होतात. प्रत्येक प्रयोगाच्या आधी मतदान करण्याबद्दलचा संदेश दिला जात आहे.   या माध्यमातून प्रयोगांना येणाऱ्या हजारो रसिकांपर्यंत मतदान करण्याचा संदेश पोहोचवण्यात येत आहे. 

अशाप्रकारे ठाणे महानगरपालिका मतदार आणि मतदान जागृती अभियानास सज्ज झाली असून अत्यंत प्रभावीपणे स्वीप अंतर्गत मतदान जागृती अभियान राबवीत आहे.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

आढावा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या मतदार जागृती अभियानाचा

सोमवार, दिनांक १३ मे २०२४ या दिवशी छत्रपती संभाजीनगर विधानसभा क्षेत्रात  'लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४'साठी चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडले.  'स्वीप' अंतर्गत 'लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४' अंतर्गत छत्रपती संभाजीनगर महापालिकाने  मतदार जागृती अभियान राबविले.  छत्रपती संभाजीनगर महापालिकेने गुढीपाडवाच्या दिवशी  शहरांतून निघणाऱ्या शोभायात्रांमधून मतदार जागृती केली. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या प्रियदर्शिनी शाळेतील विद्यार्थ्यांनी मतदार जागृतीसाठी पथनाट्य केले आणि शाळेलगतच्या वसाहतींमधून शोभायात्रा काढली. शोभायात्रेत प्रियदर्शिनी शाळेच्या विद्यार्थ्यांसह महापालिकेच्या गारखेडा व उस्मानपुरा शाळेचे विद्यार्थीही सहभागी झाले होते. 'गुढीपाडवा, मतदान वाढवा' असा संदेश विद्यार्थ्यांनी दिला. शोभायात्रेत सुमारे दोन हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. या उपक्रमांतर्गत पालक मेळावा घेण्यातआला. उस्मानपुरा शाळेच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून मतदान करण्याविषयी नागरिकांना आवाहन केले. 

छत्रपती संभाजीनगर महापालिकेने शहरातील मतदान केंद्रांना दीडशे टँकरद्वारे पाणी पुरवठा केला. सरासरी आठ लाख लिटर पाणी या केंद्रांसाठी तीन दिवसांत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून पाणी पुरवठा करण्यात आला.  महापालिका क्षेत्रातील मतदान केंद्रांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्याचे आणि मतदान केंद्रांमधील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या आदेशानुसार महापालिकेने तयारी केली. महापालिका क्षेत्रातील मतदान केंद्रांची संख्या ८५० आहे. या मतदान केंद्रांसाठी शनिवारपासून टँकरने पाणी पुरवठा केला.  शनिवार, रविवार आणि सोमवारअसे तीन दिवस मतदान केंद्रांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला. तीन दिवसात सुमारे दीडशे टँकर्सने पाणी देण्यात आले. दीडशे टँकरच्या माध्यमातून सरासरी आठ लाख लिटर पाणी देण्यात आले. मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांकडून पाण्याबद्दल तक्रार येणार नाही याची दक्षता पालिकेकडून घेण्यात आली होती.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आरोग्य विषयक उपाययोजना करण्याचे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी छत्रपती संभाजीनगर महापालिकेला कळवले. त्यानुसार पालिकेचे प्रशासक श्री.  जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी  सुक्ष्म नियोजन केले.  मतदानाच्या दिवशी वाढत्या उन्हाचा त्रास मतदारांना किंवा मतदानाच्या प्रक्रियेत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना झाल्यास त्यांच्यावर लगेचच औषधोपचार करण्याच्या दृष्टीने छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्रत्येक मतदान केंद्रासाठी आरोग्य पथक स्थापन केले. 

सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात वैद्यकीय कक्ष सुरू करण्यात आला.  २३ रुग्णवाहिकादेखील सज्ज ठेवण्यात आल्या.  त्यात महापालिकेच्या नऊ, १०८ च्या सहा आणि खासगी रुग्णालयांकडून उपलब्ध करून घेतलेल्या नऊ रुग्णवाहिकांचा समावेश होता.  मतदारांना आरोग्य विषयक कोणत्याही प्रकारचा त्रास  झाल्यास त्याला लगेचच मदत मिळेल अशी व्यवस्था करण्यात आली. 

पूर्व, पश्चिम, मध्य आणि फुलंब्री मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात वैद्यकीय कक्षदेखील तयार करण्यात आला होता.   या कक्षात दोन खाटा, ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, सलाइनची व्यवस्था करण्यात आली.  मेल्ट्रॉन रुग्णालयात पन्नास खाटांचा उष्माघात कक्ष सुरू करण्यात आला होता. 

पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) पूर्व, पश्चिम, मध्य आणि फुलंब्री मतदार संघातील मतदान केंद्रांसाठी ३११ वैद्यकीय पथके आणि २३ रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक वैद्यकीय पथकाकडे मेडिकल कीट देण्यात आले होते. मतदान केंद्रातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना किंवा मतदान करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना आरोग्यदृष्ट्या काही त्रास होऊ लागल्यास त्यांच्यावर लगेचच उपचार करण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली होती. वैद्यकीय पथकांवर नियंत्रण देण्यासाठी 'स्मार्ट सिटी' कार्यालयात कंट्रोल रुम तयार करण्यात आले होते

पालिका क्षेत्रातील मतदान केंद्रांमध्ये देखभाल दुरुस्तीची कामे  महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाकडून करून  घेण्यात आली. 

अशा प्रकारे छत्रपती संभाजीनगर महापालिकेने 'स्वीप' अंतर्गत फक्त मतदान जागृती अभियान राबविले नाही; तर ते  महापालिका क्षेत्रात प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी  मतदान केंद्रांवर उत्तम  नागरीसुविधांचीही व्यवस्था केली.



Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...