Friday, May 17, 2024

ठाणे महापालिका क्षेत्रातील मतदान जागृती अभियान

'लोकसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४' साठी मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावे या उद्देशाने ठाणे महापालिकेने मोहीम हाती घेतली आहे. मतदान आणि मतदार जनजागृतीसाठी ठाणे महानगरपालिकेने आयुक्त श्री. सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम हाती घेतले आहेत. ठाणे महानगरपालिकेतर्फे मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.   'रन फॉर व्होट'  या नावाने भरविण्यात आलेल्या ह्या मिनी मॅरेथॉन स्पर्धेस ठाणे जिल्हा अॅथलेटिक असोसिएशन आणि ठाणे सिटीझन्स फाउंडेशन  तसेच ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाचेही सहकार्य लाभले. ह्या स्पर्धेस ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे विशेष उपस्थिती लाभली. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या  'रन फॉर व्होट' या मिनी मॅरेथॉनला ठाणेकरांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. युवकांनी मोठ्या संख्येने निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊन राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी मतदान करावे, असा संदेश या स्पर्धेद्वारे देण्यात आला. प्रत्येकाने येत्या २० मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करावे, असे आवाहन ठाणे महापालिकेचे  मा. आयुक्त श्री. सौरव राव यांनी केले. 'रन फॉर वोट' या मिनी मॅरेथॉन स्पर्धेत स्वीप पथक कर्मचाऱ्यांनी धावपटूंसोबत सहभागी होऊन मतदानाबाबत जनजागृती केली. या पथकाने धावपटूंना मतदानाची शपथ दिली. 'मी मतदान करणारच...आपणही मतदानासाठी सज्ज राहा' या आशयाचा मजकूर असलेल्या  माहितीपत्रकांचे वाटपही करण्यात आले. यावेळी ठिकठिकाणी सेल्फी पॉइंटवर तरुणांनी सेल्फी काढून मतदान जनजागृतीच्या घोषणा दिल्या. देशाच्या भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

ठाणे महापालिकेने पीडीसी इव्हेंट्सच्या साथीने विवियाना मॉल आणि कोरम मॉल येथे फ्लॅशमॉबद्वारे जागृती केली आणि मतदान करण्याबद्दल आवाहन केले. या  मतदानाचा जनजागृती अभियानात तरुणाईचा सहभाग महत्त्वाचा होता. आम्ही  मतदान करणार आहोत, आपणही न विसरता हे राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करावे, असे आवाहन  फ्लॅशमॉबमध्ये सहाभागी झालेल्या युवकांनी नागरिकांना केले. तसेच, फ्लॅशमॉबद्वारे नृत्यातून रसिकांची मनेही जिंकली.

" येत्या २० मे रोजी आपल्याकडे लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या मतदानाची टक्केवारी वाढवणे आवश्यक आहे. त्यामुळे आपण मतदानासाठी एकमेकांना प्रोत्साहन देऊया आणि मतदानाची टक्केवारी वाढवूया, असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त श्री. सौरभ राव यांनी नमो ग्रँड सेंट्रल पार्क येथे नागरिकांना केले.

महापालिका आयुक्त श्री. सौरभ राव यांनी पर्यटक आणि ठाणेकर यांच्यात सध्या चर्चेत असलेल्या, नमो ग्रँड सेंट्रल पार्कला सकाळी भेट दिली. कोलशेत येथे सुमारे २० एकरच्या सुविधा भूखंडावर ठाणे महापालिकेसाठी हे पार्क कल्पतरू डेव्हलपर्स यांनी विकसित केले आहे. या पार्कची पाहणी आयुक्त राव यांनी केली. त्यावेळी, तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांशी आयुक्त राव यांनी संवाद साधला. मतदान हे नागरिकांचे कर्तव्य आहे त्यामुळे आपण ते पार पाडले पाहिजे. त्यात हयगय नको, असे यावेळी आयुक्त  श्री. राव यांनी सांगितले.

नागरिकांनीही  आयुक्तांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच, आपापल्या गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान जागृती विषयी सुरू असलेल्या उपक्रमांची माहितीही नागरिकांनी दिली.

मतदान जनजागृतीसाठी शहरात फलक उभारणीचे नियोजन  ठाणे पालिका प्रशासनाने आखले आहे. शहरात पालिकेकडून मतदान जनजागृतीचे फलक झळकत आहेत. या फलकांवर मतदानाचे महत्त्व आणि मतदान करण्याचे आवाहन करणारे संदेश देण्यात येणार आहेत. शहरातील महत्त्वाचे चौक आणि इतर भागांत फलक लावले जाणार आहेत. या फलकांद्वारे नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रेरित केले जाणार आहे. काही दिवसांपूर्वी महापालिकेने स्वाक्षरी मोहीम राबविली. यासाठी किसननगर शाळा क्रमांक २३ मध्ये 'मी मतदानाचा हक्क बजावणार' असा फलक लावण्यात आला होता.

निवडणुकीत जास्तीत नागरिकांनी सहभागी मतदानाचा अधिकार बजावावा, यासाठी राज्यांतींल विविध शहरात नागरिकांमध्ये जनजागृती आली. ठाणे महापालिकेच्या किसननगर शाळा क्र. २३ मध्ये 'मी मतदानाचा हक्क बजावणार' असा फलक लावण्यात आला होता.  त्याद्वारे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. मा. महापालिका आयुक्त श्री. सौरभ राव यांनीही या फलकावर स्वाक्षरी करून या मोहिमेत सहभाग घेत उपस्थितांना मतदान करण्याचा संदेश दिला.

मनोरंजन क्षेत्राच्या माध्यमातूनही ठाणे महापालिकेने मतदाराला जागृती अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. ठाणे महापालिकेच्या दोन्ही नाट्यगृहात मतदानासाठी जनजागृती केली जात आहे. गडकरी रंगायतन आणि घाणेकर नाट्यगृहात प्रत्येक प्रयोगाच्या वेळी मतदानाचा संदेश दिला जात आहे. ठाणे महापालिका आयुक्त श्री.  सौरभ राव यांच्या निर्देशानुसार हा उपक्रम राबविला जात आहे.   गडकरी रंगायतनची आसन क्षमताएक हजार आहे. तेथे दररोज किमान दोन नाटकांचे प्रयोग होतात. शनिवार-रविवारी हे प्रमाण तीन प्रयोगापर्यंत जाते. तर, घाणेकर नाट्यगृहाची आसनक्षमता ११००प्रेक्षकांची आहे. येथे दररोज किमान एक प्रयोग होतो तर, शनिवार- रविवारी किमान दोन प्रयोग होतात. घाणेकर नाट्यगृहातील मिनी थिएटरमध्येही प्रयोग होतात. प्रत्येक प्रयोगाच्या आधी मतदान करण्याबद्दलचा संदेश दिला जात आहे.   या माध्यमातून प्रयोगांना येणाऱ्या हजारो रसिकांपर्यंत मतदान करण्याचा संदेश पोहोचवण्यात येत आहे. 

अशाप्रकारे ठाणे महानगरपालिका मतदार आणि मतदान जागृती अभियानास सज्ज झाली असून अत्यंत प्रभावीपणे स्वीप अंतर्गत मतदान जागृती अभियान राबवीत आहे.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

No comments:

Post a Comment

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...