Friday, May 17, 2024

नवी मुंबई महानगरपालिकेचा मतदान जागृती अभियानात सक्रिय सहभाग

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने सर्वत्र आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. २० मे २०२४ ला पाचव्या टप्प्यातील मतदान पार पाडणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मतदानाचा पाचवा टप्पा पार पडणार आहे.  त्यासाठी नवी मुंबई महानगत पालिका अत्यंत प्रभावीपणे मतदान जागृती अभियान पार पाडत आहे. त्याची सुरुवात महापालिकेने आचारसंहितेपासूनच केली. मनपाच्या सर्व अधिकाऱ्यांनी  विभागीय पातळीवर काटेकोरपणे दक्ष रहावे व कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी, असे निर्देश नवीमुंबई  महापालिका मा. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी  दिले. नवी मुंबई महानगरपालिकेत  मतदारजागृती अभियान आढावा बैठक झाली. त्यावेळी मा. आयुक्त डॉ. कैलास शिंदे बोलत होते. 

आदर्श आचारसंहितेच्या नियामानुसार प्रचारफलकांना परवानगी देण्यात यावी. परवानगी देताना सर्वांना समान न्याय देण्यात यावा. अशाच प्रकारे प्रचारासाठी मैदाने उपलब्ध करून देण्याबाबतही समान भूमिका ठेवण्यात यावी. कोणत्याही प्रकारे विनापरवानगी होर्डिंग्ज, बॅनर्स, झेंडे लागणार नाहीत याची दक्षता घ्यावी. याचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच खासगी संस्थांच्या जाहिरातीही हटविण्यात याव्यात. उद्घाटने, शुभारंभ यांच्या कोनशिला झाकून घेण्यात याव्यात. अशा सर्व बाबींकडे नवी मुंबई महापालिकेच्या आठही विभागांतील सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी यांनी क्षेत्रीय स्तरावर स्वतः पाहणी करून गांभीर्याने लक्ष द्यावे, असे स्पष्ट निर्देश मा. आयुक्तांनी  दिले. त्याचप्रमाणे एनएमएमटीबसेस व बसस्थानके याठिकाणीही विनापरवानगी फलक लागणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. 

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढण्याच्या दृष्टीने विविध प्रसारमाध्यमांचा अधिक चांगला उपयोग करून व्यापक जनजागृती करावी, असेही निर्देश मा.आयुक्तांनी दिले. यामध्ये, विभाग कार्यालय पातळीवर मतदान जनजागृती कक्ष स्थापन करावा व या कक्षा नागरिकांना मतदानाविषयी आदी बाबींविषयी माहिती द्यावी, मतदान करण्यासाठी संपर्क साधून प्रोत्साहित करावे, असे निर्देश आयुक्तांनी दिले. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सुव्यवस्थितरीतीने पार पडणे ही आपली सर्वांची जबाबदारी असून त्याकडे काटेकोर लक्ष देण्यासोबतच निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याकडेही विशेष लक्ष देण्याचे निर्देश नमुमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आढावा बैठकीत दिले.

आपापल्या विभागीय क्षेत्रातील सोसायट्या, वसाहती, उद्योग समूह याठिकाणी भेटी देऊन मतदान करण्याविषयी जनजागृती करण्याच्या सूचना मा. आयुक्तांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या. मतदानाच्या प्रचार, प्रसिद्धीप्रमाणेच मतदान केंद्रांवर सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्यावे. ही केंद्रे निवडणूक आयोगाने सूचित केल्याप्रमाणे तळ मजल्यावर असावीत. या केंद्रावर पाणी, विद्युत, स्वच्छतागृहे, रॅम्प अशा व्यवस्थेसह प्रामुख्याने व्हिलचेअरचीही व्यवस्था असणे गरजेचे  असल्याचे  मा. आयुक्तांनी सांगितले. 

लोकसभा निवडणुकीत प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावावा यादृष्टीने क्षेत्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन रेल्वे स्टेशन, बसडेपो, मार्केट, मॉल, मार्ट्स, सिनेमागृहे, नाट्यगृहे, मंगल  कार्यालये, रुग्णालये, सभागृहे, उद्याने अशा वर्दळीच्या ठिकाणी विविध माध्यमांतून मतदानाविषयी व्यापक स्वरूपात जनजागृती करण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले. याशिवाय फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप अशा समाज माध्यमांचाही प्रभावी वापर करावा तसेच एनएमएमटी बसेसवर फलक लावून व बसेसमध्ये ऑडिओ सूचना प्रसारित करून जनजागृती करण्याचे  मा. आयुक्तांद्वारे सूचित करण्यात आले आहे..

२० मे २०२४ रोजी नवी मुंबई लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत  प्रत्येक मतदाराने मतदान करून आपला मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी स्वीप कार्यक्रमांतर्गत  नवी मुंबई महानगर पालिकेद्वारे मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे. यादृष्टीने महापालिकेच्या माध्यमातून महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रीय स्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मतदार जनजागृतीसाठी विविध माध्यमांचा वापर करताना सध्याच्या सोशल मीडियाप्रेमी युगात लोकांमध्ये असलेली सेल्फी छायाचित्र काढण्याची आवड लक्षात घेता मतदार जनजागृतीचे सेल्फी स्टँड तयार करून ते  नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयासह आठही विभाग कार्यालये तसेच ऐरोलीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, वंडर्स पार्क, निसर्गोद्यान, मनपा रुग्णालये, भावे नाटयगृह व इतर मनपा कार्यालयांमध्ये ठेवण्यात आले आहेत.

महापालिका मुख्यालयातील सेल्फी स्टँडवर नवी मुंबई महानगरपालिकेचे मा.आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सेल्फी काढून नागरिकांना २० मे २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत मतदान करण्याचे आवाहन केले आहे. लोकशाही बळकट करणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य असून त्याकरिता संविधानाने आपल्याला दिलेला मतदानाचा अधिकार हक्काने बजावावा, असा संदेश आयुक्तांनी दिला आहे.

नवी मुंबई नागरिकांनी या सेल्फी स्टँडवर आपले सेल्फी छायाचित्र काढून ते सोशल मीडियाच्या फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स, व्हॉट्सप आणि इतर लोकप्रिय समाज माध्यमांतून प्रसारित करावे आणि स्वतः मतदान करावेच व इतरांनाही मतदान करण्याविषयी सेल्फीच्या माध्यमातून प्रोत्साहित करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी या दृष्टीने स्वीप कार्यक्रमांतर्गत नवीमुंबई महापालिकेचे  मा. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार विविध प्रसार माध्यमांचा वापर केला जात आहे. यामध्ये मतदान यंत्राचे मुखवटे अर्थात शुभंकर (मॅस्कॉट्स) तयार करण्यात आले असून हे चार मॅस्कॉट्स संपूर्ण महापालिका क्षेत्रात फिरून २० मे रोजी होणाऱ्या नवी मुंबई लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याविषयी जनजागृती करत आहेत.

हिरव्या फ्लुरोसन्ट रंगात चटकन नजरेत भरणारे हे मोठ्या आकाराचे चार मॅस्कॉट्स लक्षवेधी असून या मॅस्कॉटच्या पुढील भागावर मतदान यंत्राची प्रतिकृती आहे. त्याचप्रमाणे पाठीवरील मागील भागात मतदान करण्याविषयी आवाहन करणारा फलक प्रदर्शित करण्यात आला असून त्यावर 'वोटर हेल्पलाईन' अॅपचा क्यूआर कोड नमूद करण्यात आलेला आहे.

हे मॅस्कॉट्स नागरिकांमध्ये व त्यातही मुलांमध्ये लोकप्रिय होत असून अनेकजण या मॅस्कॉटसोबत सेल्फी छायाचित्र काढून आपापल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून प्रदर्शित करीत आहेत.  महापालिका निवडणूक विभागाचे उप आयुक्त शरद पवार यांच्या नियंत्रणाखाली या मॅस्कॉट्समार्फत मतदान जनजागृती प्रचार वेळापत्रक तयार करण्यात आले असून प्रत्येक मॅस्कॉटला विभाग नेमून देण्यात आलेला आहे. संबंधित विभागांचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी यांचे मॅस्कॉट्सव्दारे जनजागृती कार्यावर लक्ष असणार आहे.

पथनाट्यांप्रमाणेच लक्ष वेधून घेणाऱ्या मॅस्कॉट्सव्दारे लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन करणाऱ्या स्वीप उपक्रमास नागरिकांची पसंती मिळताना दिसत आहे.

बेलापूर विधानसभा क्षेत्रातील १७४ शाळा व ३९ महाविद्यालयांमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेद्वारे मतदार जागृती अभियानचे विविध उपक्रम राबविण्यात आले.  विद्यार्थ्यांमार्फत त्यांचे पालक व कुटुंबीय , नातेवाइकांना लोकसभा निवडणुकीसाठी (२०२४)  मतदान करण्याविषयी आवाहन करण्याच्या अनुषंगाने चित्रकला, रांगोळी, निबंध, वक्तृत्त्व, प्रश्नमंजुषा, गायन  अशा विविध  स्पर्धात्मक  उपक्रमांप्रमाणेच  प्रभातफेऱ्या, पथनाट्ये  ह्या  जनजागृतीपर माध्यमांचा  प्रभावीपणे उपयोग करण्यात  आला.  

नवी मुंबई महानगरपालिकेने स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मतदतीने मतदार जागृती अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीत मतदान करण्याविषयी नागरिकांना आवाहन करणारे बिल्ले (बॅजेस) स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या गणवेशावर लावून, त्या माध्यमातून मतदान करण्याविषयी संदेश देण्याचा अभिनव उपक्रम नवी मुंबई महानगरपालिकेद्वारे  राबविला जात आहे. 

नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या मतदार जागृती अभियानांपैकी हे एक अभियान आहे.  त्यानुसार बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, दिघा अशा आठही विभाग कार्यालय क्षेत्रातील स्वच्छताकर्मीच्या गणवेशावर हे बिल्ले झळकत आहेत. त्यावर असलेल्या 'मी मतदान करणारच. तुम्हीदेखील आपला मतदानाचा हक्क बजावा. माझे मत माझा अधिकार' अशा मजकुरातून मतदानाविषयीचे आवाहन केले जात आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मतदान जागृती अभियान अत्यंत प्रभावीपणे राबविले. नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम (NMMT) यांच्यामार्फत बसेसमधून २० मे २०२४ रोजीच्या लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठीचा व्यापक प्रचार सूरू असून त्याच्या व्हिडिओ क्लिपलाही नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. (https://www.instagram.com/reel/C6swYWuvf8A/?igsh=MWFlZGFtc3R1Z2Npdg%3D%3D) इथे विडिओ क्लिपइन्सर्ट करणे. 

अशाप्रकारे लोकशाहीचा निवडणूकउत्सव साजरा करण्यासाठी नवीमुंबई मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. महापालिका लोकसहभागाने उत्सव साजरा करीत आहे. 


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

No comments:

Post a Comment

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...