Friday, May 31, 2024

आढावा पावसाळापूर्व स्वच्छता तयारीचा, नद्यांच्या पुनरुज्जीवनाचा आणि नाले सफाईचा

राज्याचे मा. मुख्यमंत्री श्री.  एकनाथ शिंदे यांनी नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. नालेसफाईची कामे नियोजित वेळेत पूर्ण करा, असे निर्देश त्यांनी यावेळी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. पावसाळा तोंडावर येऊन ठेपला आहे. पावसाळ्यात मुंबईकरांची गैरसोय होऊ नये यासाठी नालेसफाईसह खड्डेमुक्त रस्ते, मुंबईत पाणी तुंबणार नाही, याची खबरदारी घ्या. ज्या भागात पाणी साचणार नाही, त्याठिकाणच्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात येईल. मात्र ज्या ठिकाणी पाणी तुंबणार, कामात कुचराई निदर्शनास आल्यास संबंधित अधिकाऱ्यासह कंत्राटदारांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मा. मुख्यमंत्री  श्री. एकनाथ शिंदे यांनी दिला.

मुंबईतील नद्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी मिठी नदी आणि दहिसर नदीचे पुनरुज्जीवन केले जात आहे. मिठी नदी व दहिसर नदीचा पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेतला असून या प्रकल्पाच्या माध्यमातून नदीत सांडपाणी जाण्याआधी पाण्यावर प्रक्रिया करत पाणी स्वच्छ करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढीग आढळल्यास मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई ८१६९६८१६९७ या व्हॉट्सअॅप हेल्पलाइनवर तक्रार करा, असे आवाहन मा. मुख्यमंत्री  श्री.एकनाथ शिंदे यांनी केले आहे. 

मुंबईत अनेक ठिकाणी नाला रुंदीकरणाची कामे सुरू आहेत. अरुंद ठिकाणी पाणी तुंबून वसाहतींमध्ये पाणी शिरण्याचे टाळण्यासाठी  स्थानिकांनी पालिकेच्या माध्यमातून सुरू  असलेल्या कामाला सहकार्य करावे. नाला रुंदीकरणात अतिक्रमण ठरणारी  बांधकामे  हटवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी विरोध करू नये.  तसेच प्रकल्प बाधितांना मोबदला किंवा  पर्यायी निवासाची व्यवस्था करण्यात येईल असे मा. मुख्यमंत्री  श्री. एकनाथ शिंदे म्हणाले. 

दरम्यान, मान्सूनपूर्व मुंबईतील नाल्यातील  गाळ उपसा करण्याचे काम सुरू असून ते अंतिम टप्यात आहे. शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरे अशा तिन्ही कामांचा मा. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आढावा घेतला. यावेळी  वेळेत काम पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले. 

पावसाचे पाणी योग्यरीतीने वेगाने वाहून जाण्यासाठी नाल्यांचे रुंदीकरण केले जाते. अशा नाले रुंदीकरण कामांमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांचे पालिकेच्या माध्यमातून पर्यायी व्यवस्था करण्यात येईल. नाले रुंदीकरण न झाल्याने जोरदार पावसात पाण्याचा वेगाने निचरा झाला नाही, तर वसाहतींमध्ये पाणी शिरून स्थानिक पातळीवर वित्त व जीवितहानी होण्याची शक्यता असते. नाल्यातून गाळ काढण्याच्या कामांचा दर्जा वाढवल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्याचे प्रकार कमी झाले आहेत. यंदाही नाल्यातून गाळ उपसा कामामध्ये खडक लागेपर्यंत खोलीकरण करण्याच्या सूचना मा. मुख्यमंत्री  श्री. शिंदे यांनी संबंधित विभागाला दिल्या. दरम्यान, जे. के. केमिकल नाला (वडाळा), ए. टी. आय नाला (चुनाभट्टी), मिठी नदी (वांद्रे-कुर्ला संकुल), मजास नाला (जोगेश्वरी), दहिसर नदी (दहिसर पश्चिम) या ठिकाणी चाललेल्या पावसाळापूर्व  सफाईचामा. मुख्यमंत्री  श्री. शिंदे यांनी आढावा घेतला.

दरड क्षेत्रात संरक्षक जाळ्या!

दरड प्रवण क्षेत्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने यंदा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या घरांमध्ये संबंधित नागरिकांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. त्याबाबतचे निर्देश संबंधित प्राधिकरणाच्या बैठकीत देण्यात आले आहेत. तसेच दरड प्रवण क्षेत्रात संरक्षक जाळ्या लावण्याच्या सूचना केल्याचे मा. मुख्यमंत्री  श्री. शिंदे यांनी सांगितले.

रेल्वे हद्दीतील कामाचा आढावा लवकरच !

नाल्यातून गाळ काढण्याची निश्चित उद्दिष्टपूर्ती करताना आकडेवारीच्या पलीकडे जाऊन अधिकाधिक गाळ काढण्याच्या दृष्टीने एकनाथ शिंदे यांनी सूचना दिल्या. रेल्वेच्या परिसरात पावसाळापूर्व कामांचा आढावा आणि पावसाचे पाणी साचणाऱ्या ठिकाणी केलेल्या उपाययोजना पाहण्यासाठी रेल्वेसोबत संयुक्त पाहणी करण्यात येणार आहे, असेही मा. मुख्यमंत्री  श्री. शिंदे यांनी सांगितले.

सांडपाण्यावर प्रक्रिया !

मुंबईत मिठी नदी आणि दहिसर नदी याठिकाणी सुरू असलेल्या नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या माध्यमातून नद्यांचे पाणी स्वच्छ करण्यात येणार आहे. मलजल प्रक्रिया केंद्राच्या माध्यमातून नद्यांच्या स्त्रोतात सांडपाणी  मिसळण्याच्या आधीच त्या पाण्यावर प्रक्रिया करण्यात येईल. एकूण सात मलजल प्रक्रिया प्रकल्पाचे काम मुंबईत प्रगतिपथावर असल्याचेही मा. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नमूद केले.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

No comments:

Post a Comment

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...