Thursday, June 6, 2024

महापालिकांच्या शाळांचे दहावीच्या परीक्षेत लक्षवेधी यश

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल लागला. या निकालात कोकण विभागाने बाझी मारली असली तरी महाराष्ट्रातील महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांनी लक्षवेधी यश संपादन केले आहे. राज्यातील महापालिकांच्या  ७० पेक्षा जास्त शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींचे प्रमाण अधिक आहे. 

मुंबई : मुंबई  महानगरपालिकेच्या  ७९ शाळांचा शाळांचा १० वीच्या   परीक्षेचा निकाल ९१.५६ टक्के निकाल लागला. यात कुलाबा पालिका माध्यमिक शाळेमधील आयुष रामदास जाधव या विद्यार्थ्याने ९७.४० टक्के गुण मिळवून पालिकेच्या सर्व शाळांत प्रथम येण्याचा मान पटकावला. मुंबई पालिकेच्या २४८ माध्यमिक शाळांमधून एकूण १६ हजार १४० विद्यार्थी दहावीच्या परिक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १४ हजार ७७८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून सरासरी निकाल ९१.५६ टक्के इतका लागला आहे.

यासह ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविलेले ६३ विद्यार्थी आहेत.  द्वितीय क्रमांक खेरवाडी मुंबई पब्लिक स्कूल माध्यमिक शाळेचा वरुण चौरसिया या विद्यार्थ्याने मिळविला असून,त्याला ९७.२० टक्के गुण प्राप्त झाले आहेत. तिसरा क्रमांक याच शाळेचा आदित्य वानखेडे या विद्यार्थ्याने मिळविला असून त्याला ९६ टक्के गुण प्राप्त झाले आहेत. दरम्यान, सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या मुख्याध्यापक, शिक्षकांचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. राजेश कंकाळ आणि शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्री. राजू तडवी, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे मा. आयुक्त डॉ.  भूषण गगराणी, आणि मा. उपआयुक्त (शिक्षण) श्रीमती चंदा जाधव यांनी अभिनंदन केले. 

'मिशन मेरिट पुस्तिके'चे यश : महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने यंदा दहावीचा निकाल वृद्धीसाठी नियोजन करून विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली. प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी अत्यंत सोप्या व मोजक्या आशयावर आधारित 'मिशन मेरिट पुस्तिके' ची निर्मिती करून त्याचे वितरण केले. या पुस्तिका  आणि त्यातील प्रश्न विद्यार्थ्यांकडून सोडवून घेतले. प्रश्न सोडविण्याचा विद्यार्थ्यांना अधिकाधिक सराव व्हावा, यासाठी डिसेंबर २०२२ पासून (विद्यार्थी नववीत असतानाच ) दहावी परीक्षेच्या धर्तीवर शालेय स्तरावर पाच सराव प्रश्नपत्रिका पाहून व पाच सराव प्रश्नपत्रिका न पाहता अशा एकूण दहा सराव प्रश्नपत्रिका सोडवून घेण्यात आल्या. सर्व शाळांना अभ्यासक्रमाचे वार्षिक नियोजन देण्यात आले होते. तसेच अधिकाऱ्यांना शाळा दत्तक देऊन मार्गदर्शनही करण्यात आले. मुलांच्या प्रगतीची माहिती घेण्यासाठी वेळोवेळी दत्तक अधिकारी व मुख्याध्यापकांच्या सभा घेण्यात आल्या. शिक्षकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. ज्या शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता होती, त्याठिकाणी तासिका तत्त्वावर शिक्षकांची नेमणूक करण्यात आली. पर्यवेक्षणीय अधिकाऱ्यांनी शाळांना भेटी देऊन वेळोवेळी शिक्षकांना, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यंदा  ७९ शाळांचा १०० टक्के निकाल!

मुंबई महापालिका शाळांचा दहावीचा विचार करता मार्च २०२० मध्ये ९३.२५ टक्के, मार्च २०२१ मध्ये १०० टक्के, मार्च - २०२२ मध्ये ९७.१० टक्के, मार्च २०२३ मध्ये ८४.७७ टक्के व यावर्षी मार्च २०२४ मध्ये ९१.५६ टक्के निकाल लागला आहे.  गेल्यावर्षी ८० शाळांचा १०० टक्के निकाल लागला. यावर्षी मार्च २०२४ मध्ये ७९ शाळांचा १०० टक्के निकाल लागला आहे.

६३ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण

गेल्यावर्षी ९० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ५३ होती. यंदा त्यामध्ये दहा विद्यार्थ्यांची वाढ होऊन ही संख्या ६३ झाली आहे.

ठाणे : दहावीच्या परीक्षेतील ठाणे महापालिकेच्या २२ माध्यमिक शाळांचा निकाल ८३.८४ टक्के लागला आहे. गेल्यावर्षी  हे प्रमाण ७०.५७ टक्के एवढे असून  एका शाळेचा निकाल १०० टक्के लागला होता. यावर्षी महापालिकेच्या तीन माध्यमिक शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.  ठाणे महापालिकेच्या शाळांमधून यंदा १,५२३ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेस बसले होते. त्यापैकी १,२७७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुंब्रा येथील कौसामधील शाळा क्रमांक १२ ही मराठी माध्यमाची शाळा, सावरकरनगर येथील शाळा क्रमांक १९ ही उर्दू माध्यमाची शाळा, तसेच, सावरकरनगर येथील शाळा क्रमांक १६ या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा निकाल १०० टक्के  लागला. महापालिकेच्या आठ शाळांचा निकाल ९० टक्क्यांपेक्षा जास्त लागला. मराठी माध्यमाचा एकूण निकाल ७३.४० टक्के लागला  मानपाडा आणि घोलाईनगर येथील रात्र शाळांचे एकूण १७ पैकी १३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उर्दू माध्यमाचा (०४ शाळा ) निकाल ९१.४४ टक्के, इंग्रजी माध्यमाचा ( ०४ शाळा) निकाल ९६.९६ टक्के आणि हिंदी माध्यमाचा ( ०१ शाळा) निकाल ८७.५० टक्के लागला आहे.

नवी मुंबई : इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेत नवी मुंबई महानगरपालीकेच्या शाळांचा निकाल लक्षवेधी लागला आहे. यंदा दहावीच्या परीक्षेत नवी मुंबई महापालिकेच्या एकूण २३ माध्यमिक शाळांमधून २८१२ विद्यार्थी  बसले होते. त्यापैकी २६७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण सरासरी निकाल ९३.६१ टक्के एवढा लागला आहे. शाळा क्रमांक ११६, सानपाडा, शाळा क्रमांक ११८, पावणेगांव, शाळा क्रमांक १२२, कोपरखैरणे गाव या ३ शाळांचा निकाल १०० टक्के आहे. शाळा क्र. ११६, सानपाडा येथील पूजा शिवाजी वंजारे ही विद्यार्थिनी ९४ टक्के इतके सर्वाधिक गुण मिळवून नवी मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे.

नवी मुंबई महापालिका माध्यमिक इंग्रजी शाळा क्रमांक १२०, दिवागाव या शाळेची  वैष्णवी रमेश राठोड ही विद्यार्थिनी ९३ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय नमुंमपा माध्यमिक शाळा क्र. १०४, राबाडाच्या विद्यार्थिनी निहारिका वर्मा, अर्पिता यादव तसेच नमुंमपा माध्यमिक इंग्रजी शाळा क्र. १२०, दिवागाव येथील विद्यार्थी स्वहम पीतांबर पात्रा या तिन्ही विद्यार्थ्यांनी   ९१.६० टक्के गुण संपादन करीत नवी मुंबई महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांतून संयुक्तपणे तृतीय क्रमांक मिळविला आहे. एस.एस.सी. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्य, शैक्षणिक सुविधा व शैक्षणिक दर्जा याबाबत पालकांमार्फत समाधान व्यक्त करण्यात आले आहे.

भिवंडी : दहावीच्या परीक्षेत भिवंडी पालिकेच्या दोन शाळांचा निकाल शंभर टक्के आहे.  भिवंडी पालिकेच्या एकूण ११ माध्यमिक विद्यालयातील ६८३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ५२४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये चाविंद्रा मराठी, नवीवस्ती मराठी शाळा या दोन विद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला. नवीवस्ती उर्दू माध्यमिक शाळा ९५.५८ टक्के, पद्मानगर तेलगू माध्यमिक शाळा ९२ टक्के, टेमघरपाडा मराठी व कामतघर तेलगू शाळा ८६.४८ टक्के, शांतीनगर उर्दू शाळा ८२.९१ टक्के, अवचितपाडा उर्दू शाळा ६७.८८ टक्के, नारपोली हिंदी शाळा  ६४.२८ टक्के, कामतघर मराठी शाळा  ६१.५३ टक्के, निजामपुरा उर्दू ४५.२० टक्के निकाल लागला आहे. कामतघर तेलगू विद्यालयातील साईविका अंजनेयुलू या विद्यार्थिनीने  ८७.२० टक्के गुण मिळवून सर्व मनपा शाळेतून प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक गंगाधर पुजारी याने ८४.४० टक्के गुण मिळवले तर टेमघर मराठी विद्यालयाची निशा डबलू गोडाइत, पद्मानगर तेलगू  विद्यालयाचा मडुरी राहुल रमेश व नवीवस्ती उर्दू विद्यालयाची चौधरी खुशनाज अब्दुल रहीम अशा तिघांनी ८२ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.  सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे आयुक्त अजयकुमार वैद्य यांनी अभिनंदन केले.

मीरा-भाईंदर : महाराष्ट्र बोर्डाच्या  दहावीच्या परीक्षेचा मीरा-भाईंदर महापालिकेच्या शाळांचा निकाल यावर्षी ९६.९६ टक्के लागला आहे. मीरा-भाईंदर शहरातील दहावीच्या परीक्षेला विविध शाळांतील ५५०४ मुलांनी व ५३४२ मुलींनी अशा एकूण १० हजार ८४६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५४९१ विद्यार्थी व ५३३४ विद्यार्थिनी असे एकूण १० हजार ८२५ विद्यार्थी परीक्षेला पात्र ठरले. त्यापैकी ५२७२ विद्यार्थी व ५२२४ विद्यार्थिनी असे एकूण १० हजार ४९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी मुलांची ९६.०१ व मुलींची ९७.९३ टक्के आहे. मीरा-भाईंदर शहराचा एकूण ९६.९६ टक्के निकाल लागला आहे.

छत्रपती संभाजीनगर : शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. छत्रपती संभाजीनगर  महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांनी दहावीत विशेष प्रावीण्य मिळवून यशाची परंपरा कायम ठेवली.  महापालिकेतील माध्यमिक शाळांमधील दहावी परीक्षेसाठी ८०८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. पैकी ७९२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात ७०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मनपा शाळांचा निकाल ८२.९० टक्के जाहीर झाला. यात दोन शाळांचा निकाल शंभर टक्के आहे. यात माध्यमिक शाळा मिटमिटा व माध्यमिक शाळा यशोधरा कॉलनी (उर्दू) यांचा समावेश आहे. तसेच किराडपुरा येथील उर्दू शाळेचा ९८.१४ टक्के, प्रियदर्शनी मयूरबन कॉलनीतील शाळेचा ९६.३० टक्के, नारेगाव उर्दू शाळेचा ९५ टक्के निकाल लागला आहे.

मिटमिटा येथील शाळेतील अक्षरा दत्तू सोनवणे हिने मराठी माध्यमातून ८८.७० टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकावला आहे. या बरोबरच शहाबाझार येथील शाळेतील सिद्दीकी यासीरा हिने उर्दू माध्यमातून ८४.६० टक्के गुण घेऊन उर्दू माध्यमात प्रथम क्रमांक पटकावला आहे. यासोबतच सिडको एन-७ येथील रोजी डिसूजा ८७ टक्के गुण, मिटमिटा येथील शाळेतील पायल निलेश निंबारे ८४.४० टक्के, नारेगाव उर्दू शाळेतील शेख असमा सादिक ८४ टक्के, शेख अकसा नुरेन मोहम्मद अली ८१.८० टक्के गुण घेऊन प्राविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या. यशस्वी विद्यार्थ्यांचे मा.आयुक्त जी. श्रीकांत यांनी अभिनंदन केले.

पिंपरी-चिंचवड  : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १८ माध्यमिक शाळांचा इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल ९५.५२ टक्के लागला आहे. यामध्ये २३ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. त्यांना महापालिकेकडून प्रत्येकी एक लाख रुपये देण्यात येणार आहेत.  यंदा महापालिकेचे २३ विद्यार्थी लाखाचे मानकरी बनले आहेत. दहावीच्या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवणाऱ्या मुलांना प्रोत्साहनपर रक्कम दिली जाते. ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना एक लाख रुपये देण्यात येतात. तर ८५ ते ८९.९९ टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना ५० हजार रुपये व ८० ते ८४.९९ टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना २५ हजार रुपये देण्यात येतात. 

यंदा १८ शाळांमधील २३ विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक लाख रुपये मिळणार आहेत. त्यामध्ये भोसरी माध्यमिक विद्यालयातील ५, कासारवाडी ३, संत तुकारामनगर १, पिंपळे गुरव ३, काळभोरनगर १, पिंपळे सौदागर ५, नेहरूनगर १, निगडी २, फुगेवाडी व रूपीनगर शाळा प्रत्येकी एक विद्यार्थ्याचा समावेश आहे. तसेच ८५ ते ८९.९९ टक्क्यांमध्ये ६२ विद्यार्थी आहेत. त्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये देण्यात येणार आहेत. तसेच ८० ते ८४.९९ टक्क्यांमध्ये १०६ विद्यार्थी असून, त्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये देण्यात येणार आहेत.

महापालिकेच्या १८ शाळांमध्ये चार शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. त्यामध्ये माध्यमिक विद्यालय कासारवाडी, संत तुकारामनगर, खराळवाडी व माध्यमिक विद्यालय क्रीडा प्रबोधिनी या शाळांचा समावेश आहे. तर ९० टक्क्यांच्या पुढे भोसरी माध्यमिक विद्यालय (९५.३९), पिंपळे गुरव (९५.१४), काळभोरनगर (९१.७२), पिंपळे सौदागर (९१.७७) नेहरूनगर (९४.११), केशवनगर (९६.९६), निगडी (९८.९७), फुगेवाडी (९७.५०) व लांडेवाडी माध्यमिक विद्यालय (९१.४८) यांचा समावेश आहे. तसेच सर्वांत कमी निकाल माध्यमिक विद्यालय, पिंपरीनगर (७०.८३) या शाळेचा लागला आहे.

नागपूर  : नागपूर महापालिकेच्या शाळांचा दहावी परीक्षेच्या निकाल लक्षवेधी लागला आहे.  शहरातील महापालिका शाळांचा एकूण निकालाची टक्केवारी ८७.५९ इतकी आहे. यातील आठ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. मराठी माध्यमाच्या शाळांचा निकाल ८९.३५ टक्के तर हिंदी माध्यमाचा ८१.४५, उर्दू माध्यमाचा ९८.६१ आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा निकाल ८८.६३ टक्के लागला आहे. याशिवाय, मनपाच्या आठ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला असून, अकरा शाळांचा ९० टक्क्यांच्या वर, ६ शाळांचा ७५ ते ९० टक्क्यांदरम्यान लागला आहे

नागपूर मनपाच्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या यशाबद्दल मनपाचे शिक्षणाधिकारी प्रफुल्ल कचवे यांनी कौतुक केले आहे. मनपाच्या मराठी माध्यमातून अथर्व गयनेवार याने ९५.८० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे, तर हिंदी माध्यमातून आर्यन शाह याने ८४.६० टक्के गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले आहे. उर्दू माध्यमातून शिफा परवीन मो. नाजीर अहमदने ८६.८० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर इंग्रजी माध्यमातून जारिया आली सय्यद हिने ८७.६० हिने गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. याशिवाय, दिव्यांग‍ विद्यार्थ्यांमधून धनश्री वट्टीने ८३.२० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केला. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशबद्दल त्यांचे कौतुक करीत  मा. महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी आणि अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी पुढील वाटचालीसाठी  शुभेच्छ दिल्या आहेत.

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या एकमेव राजमाता जिजाबाई गर्ल्स  हायस्कूलच्या इयत्ता १० वीचा सलग चौथ्यावर्षी १०० टक्के निकाल लागला आहे. या शाळेने दरवर्षीची १०० टक्के  निकालाची परंपरा कायम राखली आहे.  यंदाच्या निकालामध्ये विनायक महेश कुंभार ( ९४.६० % ) प्रथम, हरीप्रसाद संताजी चव्हाण (९४. ०० %)  व्दितीय, तेजस यशवंत कुंभार (९४.४०%) हे विद्यार्थी तृतीय आले आहेत.  वैष्णवी प्रसाद हैबत्ती ८९.९०% , शिवप्रसाद सागर चव्हाण  ८८. ०० % , वैष्णवी बाहासोब काटे  यांनी ८७.४७ %  गुण मिळविले आहेत.  त्याचबरोबर इतर सर्व  विद्यार्थी-विद्यार्थिंनींनी  चांगले गुण प्राप्त करून  शाळाचा १०० टक्के निकाल लावला आहे. यासाठी महानगरपालिकेच्या आयुक्त  के. मंजुलक्ष्मी, उप आयुक्त साधना पाटील व प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी शंकर यादव यांचे मार्गदर्शन लाभले.

तसेच कोल्हापूर महानगरपालिकेच्या  राजमाता जिजाबाई  गर्ल्स हायस्कूलचा निकाल १०० % लावण्यासाठी शाळेच्यामुख्याध्यापिका अंजली जाधव, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांचे योगदान लाभले. तर हे यश मिळवण्यासाठी लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिरचे मुख्याध्यापक व शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या पी एम श्री सावित्रीबाई फुले शाळेचा  इयत्ता १० वीचा निकाल ९८ टक्के लागला आहे. एकीकडे मराठी शाळेत विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा कल कमी होत असतांना बाबुपेठ येथील पी.एम.श्री. सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक व माध्यमिक मनपा शाळा याला अपवाद ठरली आहे. या शाळेत असलेली  हजारांच्यावर असलेली विद्यार्थी संख्या, शाळेची गुणवत्ता, दर्जेदार शिक्षण आणि विशेष म्हणजे इंग्रजी कॉन्व्हेंट सोडून येथे शिक्षण घेत आहेत. चंद्रपूर मनपाचे मा.आयुक्त श्री. विपीन पालीवाल यांच्या नेतृत्वात मनपा शाळेचा शैक्षणिक स्तर सातत्याने उंचावत असून मुख्याध्यापक व वर्ग शिक्षक यांच्या योगदानाने उत्कृष्ट निकाल देण्यात  पी एम श्री सावित्रीबाई फुले शाळा यशस्वी ठरली आहे.  परीक्षेत शाळेतील दिव्यांग विद्यार्थी साहिल मावलीकर यांने ७१ टक्के गुण घेऊन यश संपादन केले आहे.

शाळेत २०१४ मध्ये केवळ १०० विद्यार्थीसंख्या होती. तर आज मात्र जवळपास ११०० विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहे. कॉन्व्हेंट सोडून या शाळेत शिक्षण घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या सुध्दा काही वर्गात लक्षणीय आहे, ही शहरासाठी गौरवाची बाब आहे. शासकीय मराठी शाळेत शिक्षणाची गुणवत्ता वाढविल्यामुळे आणि महानगरपालिका प्रशासनाच्या उत्कृष्ट नियोजनामुळे शाळेने हा मैलाचा दगड पार केला आहे. 

एक जमाना होता... महापालिका शाळांच्या शिक्षणपद्धतीवर प्रश्नचिन्ह उठविले जायचे. पण आता महापालिकांच्या शाळांतील विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे प्रमाण पाहिल्यास इथेही दर्जदार शिक्षण दिले जाते; आणि विद्यार्थ्यांकडे जातीने लक्ष दिले जाते याची प्रचिती येते.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

No comments:

Post a Comment

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...