Thursday, June 6, 2024

आपत्तींशी दोन हात करण्यासाठी आम्ही सज्ज !

पावसामुळे कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांपर्यंत तात्काळ मदत पोहोचवता यावी, यादृष्टीने  नगरविकास विभागाशी संबंधित राज्यातील विविध यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. आपत्तीमुळे गंभीर स्थिती निर्माण न व्हावी याकरीता संपर्क क्रमांक जाहीर केले आहेत. संस्थांनी आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी व्युव्हरचना आखली आहे.  त्या व्युव्हरचनेविषयी -  

मुंबई महानगर पालिका : मुंबई  महापालिकेचा आपत्कालीन व्यवस्थापन विभाग सज्ज झाला आहे. विविध उपाय आणि मदत देण्यासाठी तयारी ठेवली आहे. बचाव पथके, हेल्पलाइन क्रमांक, सीसीटीव्ही प्रणाली यंत्रणा तयार झाले आहेत.  मुंबई पोलिसांमार्फत बसवलेल्या ५ हजार सीसीटीव्हीचे प्रक्षेपण पाहण्यासाठी व्हिडीओ वॉल आणि एकूण दहा हजार सीसीटीव्ही प्रस्तावित असून त्यापैकी अनेकांची कामे पूर्ण होत आली आहेत. त्यामुळे अधिकाधिक सीसीटीव्हींची मदत यंदाच्या पावसाळ्यात मिळणार आहे. मुंबईतील सखल भाग, वाहतूक या सर्वांवर सीसीटीव्हींची नजर असेल.

पावसाळ्यात मोठ्या भरतीच्या दिवशी समुद्रात बुडण्यासारख्या घटना घडू नयेत, यासाठी सहा जीवरक्षक, अग्निशमन दल जवान, पोलिस पेट्रोलिंग वाहने तैनात असतील. अग्निशमन दलाकडून सहा रेस्क्यू बोट, ४२ लाइफ जॅकेट्स आदी तयार असतील. कुलाबा, वरळी, मालाड, मानखुर्द आणि घाटकोपर येथे नौदलाची पाच पूर बचाव पथके तयार ठेवली आहेत. आणीबाणी प्रसंगी मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या तीन तुकड्या अंधेरी क्रीडा संकुल येथे तैनात आहेत, तर लष्कराचे १०० कर्मचारी, जवान तैनात असतील.

अचूक माहिती मिळणार

शहर व उपनगरांत होत असलेल्या पावसाचा प्रत्येक १५ मिनिटांचा अद्ययावत अहवाल आणि कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त हवामान अंदाजासह अन्य मदत ही स्वयंचालित पर्जन्यमापन केंद्राद्वारे होते. मुंबईत सध्या पालिकेकडून उभारलेली ६० केंद्र आहेत. आणखी ६० केंद्र उभारण्याचे काम गेल्या वर्षीपासून हाती घेतले होते. ते काम पूर्ण झाले असून यंदाच्या पावसाळ्यात जास्तीत जास्त आणि अचूक माहिती महापालिकेमार्फत मिळणार आहे.

धोकादायक ठिकाणांची रेकी

मुंबई अग्निशमन दल, नौदल, लष्कर आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाचे अधिकारी, जवान पूर संभाव्य ठिकाण, संभाव्य भूसख्खलनाच्या ठिकाणांची आणि मोडकळीस आलेल्या इमारतींची रेकी करतील.

उपाययोजना अशा

भूस्खलनाची शक्यता असणाऱ्या एल या कुर्ला, एन विभाग या घाटकोपर आणि भांडुप एस प्रभागाकरिता  १ जूनपासून  राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या दोन तुकड्यांचे तीन तुकड्यांमध्ये विभाजन करण्यात आलेआहे. या ठिकाणच्या स्थानिकांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर माहितीफलक लावण्यात येत आहेत.

हॉटलाइन्स तयार

चार हॉटलाइन्सद्वारे मुख्य आपत्कालिन व्यवस्थापन कक्ष, संबंधित सहायक पोलिस आयुक्त, अग्निशमन केंद्र आणि आपत्ती व्यवस्थापन संस्थेतील पर्यायी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधता येईल. डिझास्टर मॅनेजमेंट मुंबई महापालिका अॅप, संकेतस्थळ, एक्स हॅण्डल, मोबाइल चॅटबॉट क्रमांक- ८९९९२२८९९९ ही सुरू करण्यात आला आहे.   पोलिस, मेट्रो, एमएमआरडीए, एमआरआयडीसी, रेल्वे, हवामान खाते, एनडीआरएफ, नौदल अन्य यंत्रणांशी समन्वय साधत मुंबई महानगरपालिका पावसाळ्यातील आपतींचा सामना करणार आहे. 

ठाणे महापालिका : ठाणे महापालिका क्षेत्रात येणाऱ्या संभाव्य पूर आणि पाणी साठण्याच्या घटना यांची आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि संबंधित यंत्रणा यांना आगावू सूचना देणाऱ्या सहा सेन्सर्सच्या देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण झाली आहेत. परिणामी ठाणे महापालिकेला संभाव्य आपत्तीचे व्यवस्थापन अत्यंत प्रभावीपणे करणे शक्य होणार आहे.

ठाणा कॉलेज, वृंदावन पंपिंग स्टेशन, साकेत पाइपलाइन, मुंब्रा स्मशानभूमी, हिरानंदानी इस्टेट आणि गायमुख वॉटरफ्रंट या सहा ठिकाणी हे स्वयंचलित सेंसर्स काही वर्षांपासून कार्यरत आहेत.  पावसाचे प्रमाण जास्त असल्यास त्यांची सूचना या सेन्सर्सच्या माध्यमातून स्मार्ट सिटीच्या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये सूचना दिली जाते. त्यानुसार, मग संबंधित विभाग, प्रभाग समिती, व्यवस्थापन विभाग यांना तातडीने संदेश पाठवले जातात. त्यामुळे, पूरस्थिती, पाणी साठणे आदींचा सामना करणे यंत्रणेला शक्य होते. अतिवृष्टीच्या काळात सखल भागात साठणारे पाणी, भरतीच्या काळात असताना पावसाच्या पाण्याला खाडीत जाण्यापासून होणारा अडथळा, महापालिका क्षेत्रातील पर्जन्य जल वाहिन्यांचे जाळे, नाल्यातील कचऱ्याचा उपद्रव आदींमुळे वेगवेगळ्या भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. काही प्रसंगात जीवितहानी होण्याचीही भीती असते. या सर्व स्थितीचा अभ्यास करून ही पूरसदृश स्थिती कशी हाताळायची, त्यावर नियंत्रण कसे मिळवायचे याचा कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. 

नवी मुंबई महानगरपालिका : पावसाळ्यात कोणतीही आपत्ती घडू नये यासाठी सर्व प्राधिकरणांनी दक्ष राहावे. परस्पर समन्वय ठेवून काम करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे. शहरात भरतीच्या काळात १४ ठिकाणी पाणी साचू शकते. अशा ठिकाणी पाणी उपसा पंप उपलब्ध करून पावसाळापूर्व सुरू असलेल्या कामांवर त्रयस्थपणे परीक्षण करावे, असेही आदेश आयुक्तांनी दिले आहेत. 

आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक शिंदे यांनी आयोजित केली होती. या बैठकीत शहरातील पावसाळापूर्व कामांचा आढावा घेतला. बाजार समिती प्रशासनाने गटारे व नाल्यांची साफसफाई करावी. भाजीपाला, फळांच्या कचऱ्याची पावसाळ्यात योग्य विल्हेवाट लावावी. रेल्वे प्लॅटफॉर्म, रुळांच्या बाजूला असलेल्या नाल्यांची साफसफाई करण्यात यावी. रेल्वे हद्दीतील होर्डिंग्जचे संरक्षणात्मक लेखा परीक्षण तत्काळ करण्यात यावे. एमआयडीसीतील नालेसफाईच्या कामांवर विशेष लक्ष द्यावे, असे आदेश त्यांनी दिले.


सिडको (नवी मुंबई) : अतिवृष्टीमध्ये उद्भवलेल्या आपत्तीवर मात करण्यासाठी सिडको महामंडळाने सालाबादाप्रमाणे नागरिकांच्या मदतीसाठी आपत्कालीन नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. जून ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये २४ तास या नियंत्रण कक्षातून रहिवाशांना मदत केली जाणार  आहे.  सिडको महामंडळाने पनवेल महापालिका क्षेत्रातील खारघर, कळंबोली, नवीन पनवेल, नावडे, काळुंद्रे, तळोजा, कामोठे या वसाहतींचे हस्तांतरण झाल्याने या वसाहतींना वगळून इतर

सिडको वसाहतींमधील नागरिकांसाठी सिडकोचे हे आपत्कालीन नियंत्रण कक्ष मदत करेल, असेही स्पष्ट केले आहे. सीबीडी बेलापूर येथील सिडको भवनच्या तळ मजल्यावरून आपत्कालीन नियंत्रण कक्षाचे काम सुरू राहणार आहे. सिडको मंडळाने दिलेल्या माहितीनुसार कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांसोबत शनिवार, रविवार तसेच सुट्टीच्या दिवशीही २४ तास हे कक्ष कार्यरत असतील. या कक्षामार्फत आपत्कालीन स्थितीत अभियांत्रिकी विभाग, आरोग्य विभाग, अग्निशमन विभाग, सुरक्षा विभाग, उद्यान विभाग व इतर महत्त्वाच्या विभागांचे कर्मचारी २४ तास रहिवाशांच्या संपर्कात असतील..

आपत्तीवेळी नागरिकांनी हे करावे 

नागरिकांनी आपत्तीवेळी सिडकोच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.नागरिक दूरध्वनी किंवा व्हॉट्सअॅप क्रमांकावर तसेच ई- मेलद्वारे नियंत्रण कक्षासोबत संपर्क साधून त्यांच्या तक्रारी  नोंदवू शकतील.

दूरध्वनी क्रमांक : ०२२- ६७९१८३८३/८३८४/८३८५, ०२२-२७५६२९९९

व्हॉट्सअॅप क्रमांक : ८६५५६८३२३८

फॅक्स क्रमांक : ०२२- ६७९१८१९९

ई-मेल : eoc@cidcoindia.com

मुंबई मेट्रो : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत (एमएमआरडीए) महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कंपनीकडून (एमएमएमओसीडब्ल्यू) मेट्रो २ अ व मेट्रो ७, ही संयुक्त मेट्रो सेवा चालवली जाते. गुंदवली ते अंधेरी पश्चिम मार्गे आरे, दहिसर, मालाड, ओशिवरा अशी आहे. या मार्गाला पावसाळ्यात फटका बसू नये यासाठी प्रशासनाने तयारी केली असून त्यात 'ॲनिमोमीटर'चा वापर केला जाणार आहे. मान्सून दरम्यान हवेच्या वेगाचे निरीक्षण करून मेट्रो कार्यान्वयनाचे अचूक नियोजन करण्याच्या दृष्टीने मुंबई मेट्रो मार्ग २ अ आणि ७ च्या दहा मेट्रो स्थानकांवर ‘ॲनिमोमीटर' बसविले आहे. हे ॲनिमोमीटर'  वाऱ्याचा वेग अचूकपणे मोजत असल्याने 'रिअल- टाइम' देखरेख करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत. ॲनिमोमीटर'कडून येणारी माहिती नियंत्रण कक्षाशी जोडलेली असेल. मुंबई मेट्रोच्या प्रवाशांची सुरक्षितता अबाधित राखण्याच्या अनुषंगाने 'एमएमएम ओसीडब्ल्यू' ने प्रत्येक मेट्रो स्थानकावर ६४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. हे कॅमेरे फलाट, स्थानकाखालील रस्ता आणि तिकीट सभागृह यासारख्या भागात आहेत. या कॅमेरांच्या मध्यामातून सुरक्षा नियंत्रण कक्षाद्वारे चोवीस तास पाळत ठेवण्यात येत आहे. याच अंतर्गत पावसाळी नियंत्रण कक्षात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मेट्रोची अखंडित सेवा सुनिश्चित करण्यासाठी आणि प्रतिकूल हवामानामुळे उद्भवणारे कोणतेही धोके कमी करण्यासाठी मेट्रोचा कुशल  टीम २४ तास तीन पाळीत कार्यरत राहणार आहे.

मुंबईतील रस्ते कायमचे खड्डेमुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेने सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण हाती घेतले आहे. त्यादृष्टीने अनेक ठिकाणी कामेही सुरू असली तरी सर्व रस्ते काँक्रिटचे होण्यासाठी दोन वर्षे लागणार आहेत. यंदाच्या पावसाळ्यात रस्त्यांवर पडणारे खड्डे शोधण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही 'पॉटहोल ट्रॅकिंग सिस्टम'ची या ॲपची मदत घेतली जाणार आहे. ही यंत्रणा १ जून पासून सुरू झाली असून ती  ३१ ऑक्टोबरपर्यंत कार्यरत असणार आहे. नागरिकांना खड्ड्यांचे फोटो काढून ॲपवर त्याची तक्रार नोंदवता येणार आहे. पालिकेची विभागीय कार्यालये त्याची लागलीच दखल घेऊन ते बुजवण्याचा प्रयत्न करणार आहेत. 

अशी नोंदवा तक्रार

नागरिकांना खड्यांचे फोटो काढून त्याची तक्रार पॉटहोल ट्रॅकिंग सिस्टम  मोबाइल ॲपवर ठिकाणासह नोंदवता येते. या तक्रारीचे नोटिफिकेशन संबंधित वॉर्डातील रस्ते अभियंत्यांना मिळते. या ॲपमध्ये सर्व विभागीय अभियंत्यांची माहिती त्यांच्या विभागीय हद्दीनुसार फीड केलेली आहे. त्यामुळे नोंदवलेली तक्रार संबंधित अभियंत्यालाच प्राप्त होते. तर, तक्रारदाराला आपल्या तक्रारीवर काय कार्यवाही झाली याची माहितीही मिळते. अभियंते खड्डे बुजविल्यावर त्याचा फोटो काढून तक्रार निकाली काढल्याची माहितीही याॲपवर देतील.

वसई-विरार महानगर पालिका : वसई-विरार हद्दीतील काही ठिकाणी गटारांवर झाकणे नसल्यामुळे पावसाळ्यात अपघात होण्याचा धोका असून अशा नादुरुस्त किंवा झाकणे नसलेल्या गटारांची माहिती देण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. यासाठी पालिकेने व्हॉट्सअप क्रमांक जाहीर केला असून पालिकेच्या vvcmc.in  या  संकेत स्थळावरदेखील याबाबत तक्रार नोंदविता येणार आहे. तर प्रभाग समितीनिहाय अभियंत्यांच्या व्हॉट्सॲपवरदेखील छायाचित्रासह तक्रार दाखल करता येणार असून यासाठी पालिकेने अभियंत्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक जाहीर केले आहेत.

तक्रार नोंदवण्यासाठी प्रभाग  समिती व्हॉट्सॲप क्रमांक

  • सचिन तांडेल  -  ९८९००१८८७८  (प्रभाग समिती ए, बी, सी, ई, एफ)
  • सुरेश शिंगाणे - ९८९२३७४६२९ ( प्रभाग समिती डी, जी, एच, आय) 
  • ए : स्मित गांधी - ७७१९०५०८८८
  • बी : दुर्गेश भाटकर ९८२३५३२४८५
  • सी :  सिद्धार्थ पाटील - ९१५८२०५५५६
  • डी : सचिन नामधरे - ८६६८५०५१५७
  • इ :  सुनित आयरे - ८९८३९७५०३२
  • एफ : परेश पाटील - ९६०७३६६६६०
  • जी :  वरूण गव्हाणकर - ९८५०१९६३२२
  • एच : अंकीत पाटील - ९७६६६८५०४२
  • आय : अनिकेत मोहिते - ८८०६७७८९६७

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) : मान्सूनच्या पार्श्वभूमीवर पावसाळ्यात येणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी एमएमआरडीएने पूर्ण तयारी केली आहे. एमएमआरडीएआपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन केला असून १ जूनपासून तो २४ तास कार्यरत राहणार आहे. तसेच पावसाळ्यात उद्भवणारी परिस्थिती हाताळण्यासाठी विविध मेट्रो प्रकल्पस्थळी १९ आपत्कालीन प्रतिसाद दलाच्या माध्यमातून सुमारे ३०० पेक्षा अधिक अभियंते आणि कामगार तैनात करण्यात आले आहेत.

एमएमआरडीएच्या मार्गिकांसह, सांताक्रूझ - चेंबूर लिंक रोड, ऐरोली-काटाई नाका बोगदा व उन्नत रस्ता प्रकल्प, शिवडी-वरळी कनेक्टर, छेडानगर जंक्शन सुधारणा प्रकल्प, सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना त्यासोबतच एमयूआयपी आणि ओएआरडीएस अंतर्गत विविध रस्ते आणि पुलांची कामे केली जात आहेत. प्रत्येक मेट्रो प्रकल्पस्थळी १ अभियंता व १० मजुरांची टीम अशा विविध मेट्रोस्थळी १९ आपत्कालीन प्रतिसाद दलाच्या माध्यमातून सुमारे ३०० पेक्षा अधिक अभियंते आणि कामगार तैनात केले आहेत. त्यासोबतच १८ आपत्कालीन केंद्र, १८ देखभाल वाहने, १७ अॅम्ब्युलन्सही २४ तास उपलब्ध असणार आहेत.

येथे संपर्क साधा : या कक्षाच्या माध्यमातून विविध यंत्रणांशी समन्वय साधला जाणार असून हा कक्ष १ जून ते १५ ऑक्टोबर या कालावधीत कार्यरत राहील. तक्रारींसाठी नागरिकांना ०२२-२६५९१२४१, ०२२-२६५९४१७६, ८६५७४०२०९० आणि १८००२२८८०१ या टोल फ्री हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधता येईल.

अटल सेतूवर देखरेख : 'अटल सेतूसाठी १ अभियंता, १० मजुरांचे आपत्कालीन प्रतिसाद दल स्थापन केले आहे. या सेतूवर गाड्यांद्वारे होणारी तेल गळती किंवा इतर निसरड्या पदार्थांसारख्या संभाव्य स्लिप आणि ट्रीप धोक्यांचे निवारण करण्यासाठी पुलावर वेळोवेळी गस्त घालण्यात येणार आहे.

नागपूर महानगर पालिका : पावसाळ्यात अतिवृष्टीनंतर नागरिकांना तत्काळ मदतकार्य मिळावे, या दृष्टीने नागपूर महापालिकेने  'आपदामित्र' संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला आहे.  शहरात ही संकल्पना राबविण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे निर्देश नागपूर महापालिकेचे आयुक्त डॉ.अभिजित चौधरी यांनी दिले.  'आपदामित्र' संकल्पना  राबविताना नेमक्या कोणत्या उपाययोजना राबविल्या पाहिजेत यावरही डॉ.अभिजित चौधरी यांनी मार्गदर्शन केले.  'पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या अतिवृष्टीमुळे स्थितीत नागरिकापर्यंत यंत्रणा तत्काळ पोहचावी यासाठी झोन पातळीवर आपदामित्रांची नेमणूक करावी. त्यांच्याकडून तत्काळमाहिती घेऊन नागरिकांना मदत कशी मिळू शकेल, यासाठी प्रयत्न व्हावेत',असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. तसेच जुन्या झालेल्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट लवकरात लवकर करून घ्यावे, धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून त्यांना नोटीस देण्यात यावी, वारंवार पाणी साचणाऱ्या ठिकाणी तत्काळ पाण्याचा निचरा होईल अशा आवश्यक त्यासर्व उपाययोजना आखून त्याची अंमलबजावणी करण्यास सांगितले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडतात. त्यामुळे पाणी वाहून जावे, यासाठी नाल्यांची, चेंबरची सफाई तातडीने पूर्ण करून घ्यावी. जीर्ण झालेल्या इमारतींना धोका असतो. ज्या इमारती धोकादायक आहेत, त्यांची यादी तयार करून त्यांची पाहणी करावी, असे त्यांनी सुचविले. जी झाडे कोसळू शकतात, अशा झाडांसंदर्भात तातडीने सर्वेक्षण करावे, पावसाळ्यापूर्वी रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविण्यात यावे. लवकरात लवकर जुन्या झालेल्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे, धोक्याचे पूल, रस्त्यांची डागडुजी करून घ्यावी, या सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या. कुठलीही विपरीत परिस्थिती उद्भवल्यास २४ तास सेवा देण्यासाठी नियंत्रण कक्षात पुरेसे मनुष्यबळ तैनात करावे, झोन स्तरावरून येणाऱ्या तक्रारींची नोंद करावी, नदी-नाल्यांच्यापाण्याची पातळी वाढल्यास सतर्कतेचा व धोक्याचा इशारा त्वरित देण्यात यावा, असेही निर्देश आयुक्तांनी दिले.

नाशिक महानगरपालिका : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला असून, पावसाळ्यात संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी नाशिक महापालिका सज्ज झाली आहे. महापालिका मुख्यालयासह सहाही विभागीय कार्यालयांमध्ये आपत्कालिन कक्ष स्थापन करण्यात आला असून, २४ तास हा कक्ष कार्यान्वित राहणार असल्याने कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केला आहे. महापालिका मुख्यालयासह विभागीय कार्यालयांमध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना व आपत्ती व्यवस्थापन कक्ष विभागीय महसूल कार्यालय व पुढे राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संलग्न करण्यात आला आहे. या कक्षासाठी २४ तास कर्मचारी वर्ग तैनात राहणार आहे. ३१ मे पर्यंत शहरातील रस्त्यांची खोदाची कामे बंद करण्याचे आदेश देण्यात आले असून रस्ते दुरूस्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात धोकेदायक घरे, वाडे कोसळून जीवित व वित्त हानी होण्याचा धोका असल्याने धोकादायक वाडे, घरांचा भाग उतरवून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दूषित पाणीपुरवठा टाळणे, काझी गढी मिळकत धारकांना नोटिसा बजावणे, रुग्णवाहिका शववाहिका तयार ठेवणे, रुग्णालयांमध्ये पुरेसा औषध साठा उपलब्ध करून देणे आदी महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आपत्ती व्यवस्थापन आराखड्यातील ठळक बाबी अशा…

  • पावसाळी पाण्याचा निचरा करणे.
  • खराब रस्ते दुरुस्ती व पाइपलाइन गटारींची दुरुस्ती करणे.
  • धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याची पातळी नियंत्रित ठेवणे.
  • फुटलेल्या जलवाहिन्या दुरुस्त करणे.
  • 24 तास आपत्कालीन पथके सज्ज ठेवणे.
  • मॅन होल बंद करणे, ड्रेनेज चोकअप काढणे.
  • बाधित भागातील वीस पुरवठा बंद करणे.
  • महापालिकेचे धोकादायक विद्युत पोल हटविणे.
  • पूर ओसरल्यानंतर रस्त्यावरील व नदी काठावरील वाहून आलेला कचरा हटविणे.
  • बाधित व्यक्तींची ओळख पटविणे.
  • साथीचे रोग पसरू नये यासाठी औषध फवारणी करणे.
  • रस्त्यावर पडलेले झाड त्वरित उचलणे.
  • बाधित ठिकाणी नागरिकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे.
  • चेंगराचेंगरी व अफवांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करणे.

पनवेल महानगरपालिका :  पनवेलमध्ये पावसाळ्यात आपत्ती आल्यास सरकारी विभागांचे आपसातामधील समन्वय असावे तसेच मागील वर्षी आपत्ती व्यवस्थापनातील त्रुटी यावेळी उद्भवल्यास त्यावर कोणत्या प्रकारे मात करता येईल यासाठी नूकतीच पनवेल महापालिकेच्या मुख्यालयात पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांच्या नेतृत्वाखाली सरकारी विविध विभागांची समन्वय बैठक पार पडली. या बैठकीत अवैध व धोकादायक फलकांवरील कारवाईकडे अनेकांनी लक्ष वेधले.

या बैठकीत पालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतीमधील रहिवाशांना स्थलांतरीत करताना पोलिस विभागाने सहकार्य करावे असा मुद्दा मांडण्यात आला. महापालिका हद्दीतील जिल्हा परिषदेच्या अतिधोकादायक शाळा निष्कासित करणे व दुरूस्तीयोग्य शाळांची दुरूस्ती करण्याबाबत गटविकास अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले. पनवेल येथील बसआगारामधील उभारण्यात आलेल्या फलकांचे स्ट्रक्चरल ऑडीट करून महापालिकेस सादर करण्याची सूचना आयुक्तांनी केली. तसेच आगारातील खड्डे बुजवणे, बस आगाराशेजारील बेकायदा फलकांवर संयुक्त कारवाईस सहकार्य करण्याची सूचना एसटी महामंडळ विभागास करण्यात आली. अतिवृष्टीत खारघर येथील पांडवकडा परिसर पर्यटकांसाठी धोकादायक ठरतो. त्यामुळे पांडवकड्यापर्यंतच्या प्रवेशव्दार नागरिकांसाठी बंद ठेऊन तेथे जनजागृतीसाठी फलक लावण्याची सूचना यावेळी बांधकाम विभागाला करण्यात आली. आपत्तीवेळी पोलिस विभागानेही महापालिकेला सहकार्य करावे अशी विनंती आयुक्त डॉ. रसाळ यांनी केली. कळंबोली वसाहत सिडको मंडळाने खोल बांधल्याने तेथे भरती आणि अतिवृष्टी एकाच वेळी होत असताना पूरस्थिती वसाहतीमध्ये निर्माण होते. अशावेळी वसाहतीमधील साचलेले पाणी उपसा करण्यासाठी लावलेले मोटारपंप सूरु असणे, उद्दचंन प्रकल्पातील मोटार सूरु असणे गरजेचे असल्याचे मत मांडण्यात आले.

अद्याप शहरातील उद्दचंन प्रकल्प सिडकोने हस्तांतरीत न केल्याने हा मुद्दा या बैठकीत चर्चेत आला. त्यामुळे बंद पंपाची दुरूस्ती करून ते वेळीच वापरता यावे अशी तरतूद करण्याची सूचना आयुक्तांनी केली. पावसाळ्यात ठिकठिकाणचे जनरेटर वेळीच वापरता येतील असे ठेवावेत, अखंडीत विज व्यवस्था महावितरण कंपनीने पुरवठा करावा असेही सांगण्यात आले. सिडको वसाहती हद्दीतील नाले, गटारांची साफसफाई वेळीत पुर्ण करण्याच्या सूचना यावेळी आयुक्तांनी अधिका-यांना दिल्या. पनवेल शहराचा पाणी पुरवठा करणारे जलशुद्धीकरण केंद्र बसआगाराशेजारी आहे. तेथील विजपुरवठा अखंडीत ठेवण्यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना यावेळी कऱण्यात आल्या. अतिधोकादायक इमारतींमधील विज पुरवठा खंडित करणे,  धोकदायक विजेचे खांब व विज वाहिन्या हटविणे, नाल्यामधून टाकण्यात आलेल्या केबल अन्य ठिकाणी स्थलांतरीत करणे, वाढलेल्या झाडांच्या फांद्यामुळे विज पुरवठ्याला त्रास होत असल्याने झाडांची छाटणी करावी अशी अनेक कामे करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. पावसाळ्यात राष्ट्रीय महामार्गावर पथदिवे सूरु ठेवणे, राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवावे असेही निर्देश यावेळी देण्यात आले. पालिका हद्दीतील धोकादायक वृक्ष, फांद्यांची छाटणी पावसाळ्यापूर्वी करण्याच्या सूचना पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागास देण्यात आली. रस्त्यांची कामे , पाईप लाईन, विज वाहिन्यांची कामे करण्यासाठी वर्क ऑर्डर वाहतूक विभागाला देण्याबाबत महापालिकेच्या संबधित विभागास आयुक्तांनी सूचना दिल्या. पावसाळ्यामध्ये साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी धुर फवारणी व जंतुनाशके फवारणी यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना आयुक्तांनी पालिकेच्या वैद्यकिय आरोग्य विभागास दिल्या. थोड्या पावसातही महामार्ग ते काळुंद्रे गावापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साचते त्यामुळे त्याठिकाणी पाईप टाकून पाण्याचा निचरा कऱण्याची सूचना आयुक्तांनी पालिकेच्या मलनिस्सारण विभागास केली.

सर्व वॉर्ड अधिकाऱ्यांनी त्यांच्या गाडीतील माईक, बॅटरी ,सायरन व इतर आपत्कालीन परिस्थितीत लागणारे साहित्य, यंत्रे, वाहने हे सुस्थितीत असल्याची खात्री करून घेण्याबाबत सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना  आयुक्तांकडून सांगण्यात आले.  गाढी नदी, काळुंद्रे नदी परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास तेथील नागरीकांना इतर ठिकाणी निवा-याची सोय करण्यासाठी ट्रान्झिट कॅम्प उभारण्याबाबत बांधकाम विभागास आयुक्तांनी सूचना दिल्या.

अशाप्रकारे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाचा आरखडा विविध संस्थांनी तयार केला आहे. त्यानुसार यंत्रणा प्रत्यक्ष कृती करण्यासाठी सज्ज  झाल्या आहेत.



Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 


No comments:

Post a Comment

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...