Friday, June 14, 2024

पर्यावरणाची कास धरून शहर विकसित करू !

र्यावरणपूरक शहरे अशी  बदलत्या आधुनिक शहरांची ओळख बनत आहे. ही ओळख निर्माण करण्यासाठी राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्था विविध उपक्रम राबवित आहेत. नुकत्याच झालेल्या जागतिक पर्यावरणदिनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी  निरनिराळे उपक्रम राबिविले. वृक्ष लागवड हा त्यापैकीच एक महत्त्वाचा उपक्रम, तर मुंबई महापालिकेने जाहीर केला वातावरणीय अर्थसंकल्प अहवाल, अशाच काही उपक्रमांची माहिती देणारा हा लेख

मुंबई महानगरपालिका :  जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पहिला 'वातावरणीय अर्थसंकल्प अहवाल' प्रकाशित करण्यात आला. मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येत आहे. घनकचरा  व्यवस्थापन विभाग, पर्जन्य जल वाहिनी, मलनिःसारण विभाग या विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामातून पर्यावरण संवर्धन करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी वातावरणीय कृती आराखडा निश्चित केला असून, पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या हस्ते अहवाल जाहीर करण्यात आला. यंदाच्या २०२४- २५ च्या वातावरणीय अर्थसंकल्पात ३१, ७७७.५१ कोटींच्या तरतुदींपैकी ३२.१८ टक्के म्हणजेच १०,२२४.२४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया, शाळांच्या छतावर सौर पॅनल, बांधकाम इमारतींवर एलईडी दिवे, वृक्षरोपण आदी काम करण्यात येणार आहे. तर २ हजार १६३.८ कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे.  'वातावरणीय  अर्थसंकल्प तयार करणाऱ्या १३ जागतिक शहरांपैकी मुंबई हे एक शहर आहे. वातावरणीय अर्थसंकल्प अहवाल २०२४-२५ हा https://mcap.mcgm.gov.in/ या संकेतस्थळावरून डाउनलोड करता येईल.

वातावरणीय अर्थसंकल्प अहवालातील महत्त्वाचे मुद्दे - 

  • वातावरणीय अर्थसंकल्प अहवालाच्या माध्यमातून मुंबईशी निगडित धोरण, कृती व अर्थसंकल्पीय तरतुदींमध्ये वातावरणीय वचनबद्धतांना मुख्य प्रवाहात आणण्यास मदत होईल. तसेच यामुळे वातावरणपूरक उपक्रमांची अंमलबजावणी, मूल्यमापन, संनियंत्रण अधिक सक्षम करता येईल.

  • हा अर्थसंकल्प तयार करताना वातावरणाशी संबंधित असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या २० विभागांसोबत सल्लामसलत करून वातावरणीय अर्थसंकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे.

  • मुंबई वातावरण कृती आराखड्यामध्ये ऊर्जा आणि इमारती, एकात्मिक गतिशीलता, शाश्वत कचरा व्यवस्थापन, शहरी हरित आणि जैवविविधता, वायू गुणवत्ता आणि शहरी पूर आणि जल संसाधन व्यवस्थापन या क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे.

नवी मुंबई महानगरपालिका  :  आमची जमीन, आमचे भविष्य आम्ही जनरेशन रेस्टोरेशन आहोत' या संकल्पनेनुसार  नवी मुंबईत  पर्यावरण दिन साजरा करण्यात आला . जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आपल्या शाश्वत भविष्यासाठी नवी मुंबईतील शासकीय, निमशासकीय अशासकीय कर्मचारी, सुजाण नागरिक, व्यापारी, युवक- युवती, विद्यार्थी सामाजिक सेवाभावी संस्था, महिला बचत गट आदींना किमान एक तरी वृक्षरोप लावण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, यांच्या वतीने करण्यात आले. 

वृक्ष लागवडीसाठी रोपांची आवश्यकता असल्यास, तसेच रोपे लावण्यासाठी जागेची आवश्यकता असल्यास नवी मुंबई महापालिकेकडून उपलब्ध करून देण्यात आली.  रोपांसाठी पालिकेने अधिकृत प्रतिनिधींचे संपर्क क्रमांक जाहीर केले.  पर्यावरणप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभागी व्हावे आणि सर्वांनी एकत्र येऊन आपले नवी मुंबई शहर हरित करण्यासाठी सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले होते. आयुक्तांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नवी मुंबईकर नागरिकांनी आपल्या राहत्या परिसरात रोपांची लागवड केली. 

पावसाळ्याच्या कालावधीत माझी वसुंधरा अभियानामध्ये नवीमुंबई महानगरपालिकेने दीड लाख देशी वृक्षरोपांची लागवडीचे नियोजन केले असून हे वृक्ष  जैवविविधता वाढवणारे आहेत. यात  १०० जांभूळ व २०० बांबूच्या वृक्षरोपांची लागवड  करण्यात येईल. या वृक्षलागवडीच्या उपक्रमाचा शुभारंभ ५ जून, जागतिक पर्यावरण दिनी मुंबई महानगरपालिचे मा. आयुक्त  डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.  नवी मुंबई महापालिकेच्या वतीने ज्वेल ऑफ नवी मुंबई परिसरात चाणक्य सिग्नलजवळ पूर्वेकडील बाजूस जांभूळ आणि पश्चिमेकडील बाजूस बांबूच्या वृक्षरोपांची लागवड केली.

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महापालिकेच्या वतीने आंब्याच्या कोयी संकलनाची विशेष मोहीम राबविली जात असून त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. शहरातील सोसायट्यांमधून तसेच ज्युस सेंटर्स, रेस्टॅरंट्स व हॅाटेल्स अशा ठिकाणांहून या आंब्याच्या कोयी करण्यासाठी दोन परिमंडळांसाठी स्वतंत्र वाहन तयार करण्यात आले असून कोयी संकलन मोहीम संकलित व्यापक प्रमाणात सुरू करण्यात आली आहे.

या मोहीमेत सहभागी होण्याचे सर्व प्रसार माध्यमांतून आवाहन करण्यात आले असून आयुक्तांनी आवाहन केलेली व्हिडिओ क्लिपही प्रसारित केली आहे.

महापालिकेच्या फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम या समाज माध्यमांवर तसेच व्हॉट्स अॅप संदेशांव्दारे नागरिकांकडून या अभिनव उपक्रमाचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले असून नागरिक आपल्याकडील आंब्याच्या कोयी सुकवून महानगरपालिकेकडे सुपूर्द करीत आहेत. या कोयींचा उपयोग रोपे तयार करणे, औषधें तसेच खतांसाठी केला जाणार आहे. 

ठाणे महानगरपालिका :   जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत  ठाणे महापालिकेने 'मुख्यमंत्री हरित ठाणे अभियान' हाती घेतले आहे. या अभियानात १५ ऑगस्टपर्यंत महापालिका क्षेत्रात एक लाख झाडे लावण्यात येणार आहेत. या अभियानाचा प्रारंभ जागतिक पर्यावरणदिनी  सकाळी पोखरण रस्ता क्र. ०१, कॅडबरी जंक्शन येथे महापालिका आयुक्त श्री. सौरभ राव यांनी बकुळीचे झाड लावून केला.  'मुख्यमंत्री हरित ठाणे अभियान'साठी महापालिका क्षेत्रात जागतिक पर्यावरणदिनी वृक्ष प्राधिकरण, खाजगी संस्था यांच्या माध्यमातून सुमारे ५ हजार झाडे लावून करण्यात आली. 

'मुख्यमंत्री हरित ठाणे अभियानात जास्तीत जास्त ठाणेकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यानिमित्ताने महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे. बांबू तसेच, स्थानिक प्रजातींच्या झाडांना या वृक्षारोपण अभियानात प्राधान्य दिले जात आहे.  अभियानासाठी महापालिका यासाठी विनामूल्य झाडे उपलब्ध करून देणार आहे. महापालिकेच्या जागांबरोबरच, सर्व शासकीय संस्था, निमशासकीय संस्था, शासनाचे सर्व विभाग, संरक्षण दल, खाजगी कार्यालये, गृहसंकुले, स्वयंसेवी संस्था, धर्मादाय संस्था यांनी जागा उपलब्ध करून द्यावी असे  आवाहन श्री. राव यांनी केले आहे.  संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात, तसेच वन विभागाकडे वनीकरणासाठी जागा उपलब्ध असल्यास त्यांच्या सहकार्याने महापालिका हे अभियान राबवेल. त्यात, मा. मुख्यमंत्री श्री.  एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रात बाबूंच्या लागवडीलाही प्राधान्य दिले जाणार आहे. 

या अभियानात प्रत्येक विभागाचे पालकत्व महापालिकेच्या त्या त्या विभागप्रमुखाकडे दिले जाणार आहे. या अभियानाचे संयोजन वृक्ष प्राधिकरण विभागाकडून होईल. मात्र, त्याच्यावर देखरेख ठेवणे, ठराविक काळाने झाडांच्या संगोपनाचा आढावा घेणे ही कामे विभाग प्रमुख करतील. त्यात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विभागास पुढील वर्षी जागतिक पर्यावरण दिनी गौरविण्यात येणार आहे. 

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका :  कल्याण-डोंबिवली महापलिका मोकळ्या जागांवर ट्री गार्डन संकल्पना राबविणार आहे.जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या उपस्थितीत कल्याण पश्चिमेतील रिंग रोडलगत वृक्षारोपण करण्यात आले. सध्या सर्वच जण बदलत्या तापमानाने त्रस्त असून वृक्ष लागवड करून त्याचे परिणाम कमी कसे करता येतील यासाठी प्रयत्न करत आहोत, विशेषत: शहरी भागातील हरित क्षेत्र कमी होत आहे. कल्याण, डोंबिवलीतील मोकळ्या जागांवर झाडे लावण्याची मोहीम हाती घेणार आहोत. वनविभाग, महसूल विभाग आणि महापालिकेच्या मालमत्तामध्ये मोठ्या प्रमाणात झाडेलावून ट्री गार्डन ही अनोखी संकल्पनाराबविणार असल्याचे सांगितले.जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्यसाधून कल्याण पश्चिम येथील रिंगरोड परिसरात बकुळ प्रजातीची सुमारे १००झाडे लावली आहे.

उल्हासनगर महानगरपालिका: उल्हासनगरमध्ये जागतिक पर्यावरणदिनी  महापालिका मा. आयुक्त  श्री. अजीज शेख यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

उल्हासनगर शहरातील चारही प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या या स्मशानभूमींच्या परिसरातील मोकळ्या जागेत वृक्षारोपण करण्यात आले. येणाऱ्या आगामी

काळात उल्हासनगर शहरातील स्मशानभूमीमधील कमी जागेत किमान २०० विविध प्रकारच्या प्रजातींची झाडे लावण्याचा संकल्प मा. आयुक्त अजीज शेख  यांनी सोडला. 

पनवेल महानगरपालिका : पनवेल महापालिकेच्यावतीने शहरातील ४८ विविध उद्यानांमध्ये तब्बल ११०० वृक्षांचे रोपणाचा कार्यक्रम पालिकेने जागतिका पर्यावरणदिनी हाती घेतला. पनवेल महापालिका आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांच्या हस्ते खारघर वसाहतीमधील सेक्टर-१२ मधील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फड़के उद्यानामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात पालिका आयुक्त डॉ. रसाळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की माणूस हा निसर्गाचा पुत्र आहे. पर्यावरणाचा विकास करणे म्हणजे पर्यावरणामध्ये ढवळाढवळ न करणे, निसर्ग आहे तसे त्याचे जतन करणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच महापालिकेने ११०० झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे.

पनवेल महानगरपालिकेने जागतिक पर्यावरणदिनी  केलेल्या वृक्षारोपणासाठी  वड, पिंपळ, कडूनिंब, ताम्हणफूल, नांद्रुक, आकाशनिंब, बहावा, अर्जुन, बिट्टी, अर्जुन, जांभूळ, करंज, पळस, प्राजक्त, सोनचाफा, अशोक, सप्तपर्णी, कुसूम, बकुळ, कदंब शिसव, सुबाभूळ, नारळ, सिता अशोक, शमी, आपटा या देशी प्रजातींच्या झाडांची निवड केली. एक हजारपेक्षा जास्त रोपांची लागवड करण्यात आली. 

चंद्रपूर महानगरपालिका : जागतिक पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे  वृक्षारोपण करण्यात आले. चंद्रपूर शहरातील  सरकारनगर येथील मनपाच्या आदर्श उद्यान येथे महानगरपालिका उपस्थित नागरिकांच्या हस्ते विविध प्रजातींच्या रोपट्यांची लागवड करण्यात आली.

पर्यावरणपूरक शहरे  ही ओळख निर्माण करण्यासाठी  चंद्रपूर शहर पुढे सरसावले आहे.   चंद्रपूर  महानगरपालिका शून्य कार्बन उत्सर्जनचे ध्येय गाठण्याकरीता विशेष उपाययोजना राबविण्यास सज्ज झाली आहे. चंद्रपूर शहरात शून्य कार्बन उत्सर्जनच्या उपाययोजना राबविण्यासाठी एक आढावा बैठक आयुक्त विपीन पालीवाल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत करण्यात आली होती. यात कार्बन उत्सर्जन कमी करण्यास शहरातील पथदिवे बदलुन एलइडी लाइट्सचा वापर करणे, ऊर्जेचा वापर ५० टक्क्यांवर आणणे, सौर ऊर्जेसाठी रेंट अ रूफ धोरण राबविणे, बांधकामात इको फ्रेंडली विटांचा वापर करणे,खाजगी व शासकीय इमारतींवर सोलर पॅनेल बसविणे,विजेचा वापर कमी करून सौर ऊर्जेचा वापर वाढविणे, स्वयंपाकात लाकूड कोळसा या परंपरागत इंधनांचा वापर कमी करणे इत्यादी उपाययोजना राबविण्यासंबंधी चर्चा करण्यात आली आहे.

हवामान बदलावरील बैठकीत भारताने २०७० पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य गाठण्याचा संकल्प केला आहे. या संकल्प अंमलबजावणीच्या पहिल्या टप्यात महाराष्ट्रातील मुंबई,नवी मुंबई,पनवेल,ठाणे,अमरावती,नाशिक व चंद्रपूर शहराची निवड झाली आहे.  त्यामुळे  शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य गाठण्या करीता शहरात नजीकच्या भविष्यात  चंद्रपूर महानगरपालिका विशेष उपाय योजना राबविणार आहे. 

नांदेड-वाघाळा महानगरपालिका :  चंद्रपूर महापालिकेतर्फे 'हरित नांदेड' उपक्रम सुरू झाला आहे. या उपक्रमात  २०२४ च्या मान्सूनमध्ये महापालिका व वृक्षमित्र फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने मनपा हद्दीत एकूण २५ हजार वृक्षलागवड करण्यात येणार आहे.'हरित नांदेड अभियान उपक्रमाची सुरुवात  आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते जागतिक पर्यावरणदिनी नांदेडच्या  विसावा उद्यानात प्रातिनिधीक स्वरूपात  वृक्षारोपण करून करण्यात आली. 

धुळे महानगरपालिका :   धुळे शहर व परिसरात ५ लाख वृक्ष लागवडीचा संकल्प महानगरपालिकेने सोडला आहे. यंदा जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महापालिकेमार्फत मनपा प्रांगणात वृक्ष वाढदिवस कार्यक्रम घेण्यात आला.  पावसाळा सुरू झाल्यावर लगेच वृक्ष लागवड कार्यक्रमास सुरुवात करण्यात येणार आहे. यासाठी शहरातील स्वंयसेवी व सामाजिक संस्था, नागरीक, पर्यावरणप्रेमी यांच्या माध्यमातून हरीत धुळे करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त श्रीमती अमिता दगडे-पाटील यांनी केले. 

मनपा प्रांगणासह परिसरात सुमारे ५ वर्षांपूर्वी वृक्ष लागवड करण्यात आली होती. या वृक्षांची वाढ झालेली असून त्यांचा वाढदिवस यानिमित्ताने साजरा करण्यात आला . "शहरात व परिसरात ५ लाख वृक्ष लागवडीचा संकल्प असून त्यादृष्टीने मनपामार्फत कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. नियोजनबध्द पध्दतीने वृक्ष लागवड व संगोपन कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.

केंद्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. या अभियानाचे यश म्हणजे राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे राबविले जाणारे पर्यावरणपूरक उपक्रम. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या उपक्रमात असलेला लोकसहभाग माझी वसुंधरा अभियानाची लोकप्रियता वाढवित आहे. 

मेट्रो :   कुलाबा-वांद्रे-सीप्झ इथे तयार होत असलेल्या  भूमिगत मेट्रो-३ या मार्गिकेच्या मूळ जागी काही ठिकाणी झाडांची कापणी करावी लागली होती. तर या ठिकाणी  म्हणजेच आरे ते कफ परेड या भूमिगत मेट्रो- ३ जवळ मूळ जागी दोन हजार ६०० झाडांचे रोपण होणार आहे. नुकत्याच झालेल्या जागतिक पर्यावरण दिनी ही मेट्रो मार्गिका विकसित करणाऱ्या मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) हा निर्णय घेतला आहे. तसे हमीपत्र  एमएमआरसीने उच्च न्यायालयाला पूर्वीच  सादर केलेले आहे.  मूळ जागी भूमिगत मेट्रोने वृक्षारोपण मोहिमेसाठी निवडलेल्या वृक्षांच्या प्रजातींमध्ये महोगणी, बकुळ, पिंपळ, सोनचाफा, निलमोहोर, तामण, कदंब, देशी- बदाम, आकाश- नीम, स्पाथोडिया, ताबेबुया, अम्ब्रेला-वृक्ष, सप्तपर्णी, पिंपळ, पांगारा, जंगली बदाम, चाफा यांचा समावेश आहे.

दरम्यान, 'एमएमआरसी'ने सीप्झ, एमआयडीसी, शीतलादेवी दादर, सायन्स सिद्धिविनायक, म्युझियम, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, सीएसएमटी, चर्चगेट, विधान भवन आणि कफ परेड या १३ मेट्रो स्थानकांजवळ ५०० हून अधिक झाडे आतापर्यंत लावली आहेत. निवडलेल्या झाडांमध्ये फुलांची, शोभेची, सदैव हिरवीगार सात वर्षे वयाची आणि सर्वसाधारण १५ फूट उंचीची आहेत.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

No comments:

Post a Comment

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...