Monday, June 17, 2024

काय आहे मुंबई महापालिकेचा 'वातावरणीय अर्थसंकल्प २०२४-२५ अहवाल' ?

मुंबईतील प्रदूषण करण्यासाठी पालिका प्रशासनाने गेल्यावर्षी कृती आराखडा तयार केला होता. या कृती आराखड्यातील कृती आणि शिफारशीची अंमलबजावणी करण्यासाठी पालिकेच्या पर्यावरण विभागाने पहिला वातावरणीय अर्थसंकल्प तयार केला आहे. यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्यावतीने पहिला 'वातावरणीय अर्थसंकल्प २०२४-२५ अहवाल'चे  प्रकाशन अतिरिक्त महापालिका मा. आयुक्त (शहर) श्रीमती  अश्विनी जोशी यांनी मुंबई महापालिका मुख्यालयात केले. मुंबई महापालिकेच्या वतीने केल्या जाणाऱ्या कामांमध्ये, तसेच प्रकल्पांमध्ये पर्यावरणपूरकता यावी, यादृष्टीने मुंबई महापालिकेने वातावर्णीय अर्थसंकल्पात नियोजन केले आहे.  वातावरणीय अर्थसंकल्प अहवाल सादर करणारे मुंबई हे जागतिक स्तरावरील चौथे शहर ठरले आहे. 

मुंबईतील वातावरणातील बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी महापालिकेच्या वतीने अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.  मुंबई महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या, मलनिःसारण प्रकल्प, मलनिःसारण प्रचालन, पाणीपुरवठा प्रकल्प आणि घनकचरा व्यवस्थापन विभागातील स्वच्छता यांचा पर्यावरणाशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध येतो. या विभागामार्फत हाती घेतले जाणारे प्रकल्प किंवा राबवल्या जाणाऱ्या पर्यावरणपूरक उपक्रमांना प्रोत्साहन आणि प्राधान्य देणे हा या अर्थसंकल्पामागील प्रमुख उद्देश आहे, या अहवालात मुंबई वातावरण कृती आराखड्याचाही समावेश आहे. यामध्ये वातावरणविषयक लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. वातावर्णीय अर्थसंकल्पात  महापालिकेने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये भांडवली खर्चासाठी ३१ हजार ७७४ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यापैकी अंदाजे १० हजार २२४ कोटी २४ लाख रुपये म्हणजेच ३२.१८ टक्के रकमेची तरतूद या अहवालातील मुंबई वातावरण कृती आराखड्यासाठी आहे,. 

अर्थसंकल्पाची प्रक्रिया

  • वातावरणाशी संबंधित असलेल्या मुंबई महापालिकेच्या २० विभागांसोबत सल्लामसलत करून अर्थसंकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे.

  • मुंबई वातावरण कृती आराखड्यामध्ये ऊर्जा आणि इमारती, एकात्मिक गतिशीलता, शाश्वत कचरा व्यवस्थापन, शहरी हरित आणि जैवविविधता, वायू गुणवत्ता आणि शहरीपूर, जल संसाधन व्यवस्थापन या क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे.


सी-४० शहरे या उपक्रमात मुंबई

वातावरणीय अर्थसंकल्प तयार करण्याबाबात जागतिक स्तरावर हाती घेण्यात आलेल्या सी-४० शहरे या उपक्रमांत मुंबईही एक भाग आहे. यापूर्वी ऑस्लो, लंडन आणि न्यूयॉर्क या शहरातील प्रशासनांकडून असा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. आता अशा प्रकारचा अहवाल प्रकाशित करणारे मुंबई हे जागतिक स्तरावरील चौथे शहर बनले आहे. मुंबई महापालिकेने मार्च २०२२मध्ये मुंबई वातावरण कृती आराखडा प्रकाशित केला आहे. हा आराखडा मुंबईतील हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करणे आणि शहरांच्या वातावरण बदलातून येणाऱ्या जोखमींचे अधिक प्रभावी व्यवस्थापन करणे, पॅरिस कराराची उद्दिष्टे साध्य करणे यासाठी दिशादर्शक मानला जातो.

अहवालाचे महत्त्व

  • वातावरणीय अर्थसंकल्प अहवालाच्या माध्यमातून मुंबईशी निगडीत पर्यावरणपूरक धोरणे, कृती आदींना मुख्य प्रवाहात आणण्यास मदत होईल. तसेच यामुळे वातावरणपूरक उपक्रमांची अंमलबजावणी, मूल्यमापन,संनियंत्रण अधिक सक्षम करता येणार आहे.

  • शास्त्रीय पद्धतीने उत्सर्जन कमी करण्याचा आणि वातावरणीय लवचिकता सुधारण्याच्या दृष्टीने मुंबईसाठी हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.


वातावरणीय अर्थसंकल्पात काही महत्त्वाच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.  क्लायमेट ॲक्शन प्लॅनमधील नोंदीनुसार, गेल्या काही वर्षांपासून मुंबईत अतिवृष्टीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मुंबईतील ३५ टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या ही पालिकेने पूरप्रवण म्हणून नोंदविलेल्या ठिकाणांच्या २५० मीटर अंतराच्या आत राहते. शिवाय हवेतील पीएम २.५ आणि पीएम १० या धूलिकणांचे वाढते प्रमाण विविध उपाययोजनांद्वारे कमी करणे आवश्यक आहे. नायट्रोजन डायऑक्साइड हा मुंबईतील एक प्रमुख प्रदूषक आहे. मात्र, २०१९ पर्यंत सल्फर डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड आणि अमोनियाची सरासरी पातळी वाढत आहे.

मुंबईतील २८७ ठिकाणे ही भूस्खलनप्रवण आहेत, त्यापैकी २०९ ठिकाणे ही अस्थिर बांधकामे व सामाजिकदृष्ट्या असुरक्षित असलेल्या वस्त्यांमधील आहेत. या विविध प्रमुख जोखमीपासून मुंबईला सुरक्षित ठेवण्यासाठी क्लायमेट अॅक्शन प्लॅन पालिकेकडून राबविण्यात येणार असून, हा अर्थसंकल्प याचा एक महत्त्वाचा भाग आहे. अॅक्शन प्लॅननुसार मुंबईसाठी २०३० पर्यंत २७ टक्के आणि२०५० पर्यंत ७२ टक्के उत्सर्जन कमीहोईल, असे लक्ष्य निश्चित केले आहे.

अर्थसंकल्पाच्या मदतीने टप्प्याटप्प्याने हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करणे आणि 'एमकॅप'ची प्रगती मोजण्यासाठी वातावरण परिणाम विश्लेषण बळकट करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे.

हा 'वातावरणीय अर्थसंकल्प अहवाल २०२४-२५' ची सविस्तर माहिती https://mcap.mcgm.gov.in/ या  संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

No comments:

Post a Comment

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...