Thursday, August 8, 2024

एक-मेका साहाय्य करू.. पुणे आणि कोल्हापूर मनपाच्या मदतीला मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पनवेल महानगरपालिका

गेल्या काही दिवसांपासून राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरांना अतिवृष्टीचा सामना करावा लागला. मुसळधार पावसाचा सर्वात जास्त फटका पुणे आणि कोल्हापूर शहरांना बसला.  मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पुणे आणि कोल्हापूर महानगर पालिकांनी शर्थीचे प्रयत्न केले.  पूर ओसरल्यानंतर पुणे आणि कोल्हापूरातील पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीकरिता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे यांनी राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांना मदत करण्याचे निर्देश दिले. मा.मुख्यमंत्र्यांच्या निर्देशांनुसार  मुंबई, ठाणे,  नवी मुंबई आणि पनवेल महानगरपालिका  पुरस्थितीनंतर ओढवलेली परिस्थिती हाताळण्यासाठी हिरहिरीने पुढे आल्या. मुंबई, ठाणे,  नवी मुंबई आणि पनवेल महानगरपालिकेने  पुणे आणि कोल्हापूर मनपा क्षेत्रातील पूरग्रस्तांना केलेल्या मदतीची दखल  तेथील नागरिकांप्रमाणेच तिथल्या लोकप्रतिनिधींनीही घेतली. आपल्या महानगरपालिका क्षेत्राची स्वच्छता राखतानाच इतर शहरांच्या अडचणीच्या काळात मदत करण्याचा पायंडा  मुंबई, ठाणे,  नवी मुंबई आणि पनवेल या महानगरपालिकांनी  पुन्हा एकवार घातला आहे. 

बृहन्मुंबई  महानगरपालिका :  जुलै २०२४ मध्ये कोल्हापुरात मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीनंतर तेथील जनजीवन विस्कळीत झाले होते. शहरातील पर्जन्य जलवाहिन्या वाहिन्यांच्या स्वच्छतेसाठी कोल्हापूर महानगरपालिकेचे मा. आयुक्त के. मंजूलक्ष्मी  यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांच्याशी पत्रव्यवहार केला. शहरातील स्वच्छतेसाठी दोन सक्शन कम जेटिंग विथ रिसायकलर ही यंत्रे मदतीसाठी देण्याची विनंती  मा. आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी  डॉ. गगराणी  यांनापत्राद्वारे केली.  त्याच पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मदतीचा हात पुढे केला.  कोल्हापूर महानगरपालिकेच्या विनंतीवरून पर्जन्य जलवाहिन्यांच्या स्वच्छताकामासाठी बृहन्मुंबई पालिकेचे दोन चमू मुंबईहून कोल्हापुरात दाखल झाले.  डॉ. गगराणी यांच्या आदेशानुसार बृहन्मुंबई  महानगरपालिकेच्या   पर्जन्य जलवाहिन्या विभागाने कनिष्ठ अभियंता श्री.आकाश रैनाक यांच्या नेतृत्त्वाखाली  दोन सक्शन कम जेटिंग विथ रिसायकलर संयंत्रे कोल्हापुरात रवाना केली. या चमूमध्ये प्रत्येक संयंत्रासोबत चार जणांचे मनुष्यबळ आहे. दोन्ही संयंत्रांसोबत एकूण आठजण कोल्हापुरात दाखल झाले. या चमूमध्ये वाहन चालक, तंत्रज्ञ, कामगार आदींचासमावेश आहे. कोल्हापुरात २०१९, २०२१ मध्येही पूर परिस्थिती आली असताना बृहन्मुंबई  महानगरपालिकेने अशाच प्रकारे मदतीचा हात पुढे केला होता. 

ठाणे महानगरपालिका :  पुणे महानगरपालिका क्षेत्रातील अतिवृष्टीमधील बाधित नागरिकांना मदतकार्य करण्यासाठी  मा.  मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार मा. महापालिका आयुक्त श्री.सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महापालिकेच्या ठाणे आपत्ती दलाची टीम   पहाटे पुण्याला रवाना करण्यात आली. ठाणे महापालिकेच्या वतीने पुणे येथे रवाना करण्यात आलेल्या पथकात  २  उपअभियंता (यांत्रिकी), २ सुपरवायझर, ३ तांत्रिक कर्मचारी, ४ जेटींग वाहने ४ वाहनचालक, ८ ऑपरेटर/मदतनीस, १७७ सफाई कामगार, ४ उपमुख्य स्वच्छता निरीक्षक, १२ स्वच्छता निरीक्षक, १० हवालदार, ७ वाहनचालक आदींचा समावेश होता.    त्याचबरोबर  ८० खराटे झाडू, ८० ब्रश, ८० फावडे, ८० काटे/पंजे आदी साहित्याही  आपत्ती दलाच्या टीमकडे देण्यात आले.

अतिवृष्टीमधील बाधितांना प्राथमिक औषधोपचार मिळावे यासाठीही ठाणे महापालिकेने आपत्ती दलाच्या टीम सोबत वैद्यकीय सेवेची कुमकही पाठवली. त्यात वैद्यकीय किट, पुरेसा औषधसाठा, ORS पॅकेट्स  पाणी व बिस्कीदे आदी साहित्यांचा समावेश होता. तसेच नागरिकांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी कार्डिअक ॲम्ब्युलन्स, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिता सोनावणे, १ परिचारक व १ वाहनचालक यांची सोया आपत्ती व्यवस्थापन दलात करण्यात आली होती. 

अतिवृष्टीझालेल्या परिसरात साथीचे आजार पसरू नयेत यासाठी  फायलेरियाची टीम परिवहनच्या बसमधून रवाना करण्यात आली. या चमूमध्ये ५ धूर  फवारणी मशीन्स,  दोन युटीलिटी वाहने, १ इनोव्हा वाहन आणि औषधसाठ्यांसह १० फवारणी पंपाचा समावेश होता. या   पथकासोबत २ स्वच्छता निरीक्षक, ४ वाहनचालक, १९  फायलेरिया मदतनिशी होते. पुणे अतिवृष्टीमधील बाधितांच्या मदतीसाठी ठाणे महापालिकेचे  एकूण २५७ अधिकारी कर्मचारी पुण्याला रवाना झाले. उपायुक्त श्री.जी.जी गोदेपुरे यांच्या नियंत्रणाखाली  आपत्ती दलाचे पथक रवाना करण्यात आले.

नवी मुंबई महानगरपालिका :  पुणे शहरातील अतिवृष्टीनंतर  निर्माण झालेली पूरस्थिती हाताळण्यासाठी ठाणे पुणे महापालिकेच्या मदतीला  नवी मुंबई महानगरपालिकाही धावून गेली. महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेचे मदतकार्य पथक पुण्यात रवाना झाले. नेहमीच इतरांच्या मदतीसाठी सज्ज असणा-या नवी मुंबई महानगरपालिकेच्या पथकाने सिंहगड रोड एकतानगरी परिसरात केलेल्या स्वच्छता कार्याचे तेथील लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी मनापासून कौतुक करीत आभार मानले. 

पूर परिस्थितीमुळे पुणे शहरातील अनेक भागातील रस्त्यांवर तसेच घरातही गाळ आणि कचरा मोठ्या प्रमाणात जमा झाला होता. त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होणार असल्याचे लक्षात घेत जलद स्वच्छता करणे महत्वाचे होते. या अनुषंगाने मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार, आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे यांनी लगेच महानगरपालिकेचे ११५ जणांचे पथक तयार केले.  पथकास  २ जेटींग मशिन्स व आवश्यक स्वच्छता साधनांसह  तातडीने पुण्याकडे रवाना केले.

पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत नमुंमपा मदतकार्य पथकास सिंहगड रोड परिसरातील एकतानगरी हा पूरग्रस्त भागात साफसफाई करण्याचे सूचित करण्यात आले. त्या अनुषंगाने मदत पथकाने  साफसफाई कामाचे नियोजन केले.  पथकातील २ स्वच्छता पर्यवेक्षक आणि १००  हून अधिक स्वच्छताकर्मींसह तेथील परिसरात व घरांतील स्वच्छतेत महत्वपूर्ण योगदान दिले.  परिसरात रोगराई पसरू नये म्हणून सोबत नेलेल्या जंतुनाशक पावडरचीही फवारणी करण्यात आली.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या मदत पथकाने आत्मियतेने स्वयंस्फुर्तीने काम केलेल्या कामाची प्रशंसा  सिंहगड रोड परिसराच्या माजी नगरसेविका श्रीम. मंजुषा नागपुरे आणि त्या परिसरातील नागरिकांनी केली.

पनवेल महानगरपालिका :  पुराचे पाणी ओसरल्यानंतर पुणेकरांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागला. पाण्यात वाहून आलेल्या कचऱ्यामुळे शहर विस्कळीत झाले.  पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पुणे महापालिका शर्थीचे प्रयत्न करीत आहे.  साथीचे रोग पसरण्याची भीती असल्यामुळे यंत्रणा वेगाने कामाला लागली. अशा  बिकट परिस्थितीत पनवेल महापालिकेला मदतीचाप्रस्ताव येताच मा. आयुक्त श्री.मंगेश चितळे यांनी क्षणाचाही विलंब न करता हातपुढे केला.  मनुष्यबळाची अधिक कुमक पुण्यात पाठवून स्वच्छतेचे काम सुरू केले.  पाच खासगी बसमधून पनवेल महापालिकेचे सुमारे २५० सफाई कामगार पुण्यात रवाना झाले.  स्वच्छतेचे नियोजन करण्यासाठी उपायुक्त डॉ. वैभव विधातेही कामगारांसमवेत पुण्याला रवाना झाले आहेत. या पथकात एक मुख्य आरोग्य निरीक्षक, सहा स्वच्छता निरीक्षक, १० स्वच्छता पर्यवेक्षक, २५० मनुष्यबळ, ३० जंतूनाशक फवारणी कर्मचारी आदींचा समावेश होता.  मदत गटातील कामगारांच्या सुरक्षेसाठी ३०० मास्क, ३०० हँड ग्लोव्हज, स्प्रे पंप, पाच फॉगिंग मशिन आदी साहित्यही देण्यात आले. 

हा झाला मुंबई, ठाणे,  नवी मुंबई आणि पनवेल महानगरपालिकांनी पुणे आणि कोल्हापूर शहरातील पूरग्रस्तांना केलेल्या मदतीचा आढावा. याचबरोबरीने पुणे, पिंपरी-चिंचवड आणि कोल्हापूर मनपाने शहरातील पूरस्थिती कशी हाताळली हेसुद्धा तितकेच इंटरेस्टिंग आहे. 

पुणे महानगरपालिका :  पुणे शहरात पूर परिस्थितीमुळे अनेक भागांत झालेला कचरा आणि चिखल स्वच्छता करण्यासाठी तसेच पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पुणे महानगरपालिकेतर्फे युद्धपातळीवर मोहिम हाती घेण्यात आली. पूरबाधित परिसराची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली.  महानगरपालिकेतर्फे शहरात रोगराई पसरू नये यासाठीदेखील उपायोजना करण्यात आल्या. 

शहरात २५ जुलै रोजी पहाटे मुसळधार पाऊस झाल्याने पुणे महानगरपालिका क्षेत्रातील खालील सखल भागातील साईनाथ नगर, वडगाव शेरी, शांतीनगर, इंदिरानगर, चिमागार्डन, योजना पोल्ट्री फार्म, विश्रांत सोसायटी, यशवंतनगरी, कळस, ताडीवाला रोड, पाटील इस्टेट, पुलाची वाडी, भीम नगर विसर्जन गणपती घाट, बालेवाडी, आदर्श नगर बोपोडी, कोथरूड बावधन प्रभाग क्र. १०, ११, १२, एरंडवणा, शाहू वसाहत, तपोधाम, राजपूत झोपडपट्टी स्मशानभूमी, शिवणे, उत्तमनगर माशे आळी, बाजारसमिती, इंदिरा वसाहत, भीमनगर, कोंढवे धावडे, एकता नगर, निंबज नगर, सहकारनगर, धनकवडी, कात्रज, आंबेगाव बुद्रुक, जांभूळवाडी, कोळेवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी, नदीपात्र, अष्टभुजा, आपटे घाट, टिळक पूल, ओंकारेश्वर मंदिर आतील व बाहेरील परिसर या भागात  पाणी शिरले. 

महापालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्कालिन परिस्थिती विचारात घेऊन प्रथमतः बचाव कार्याला प्राधान्य देण्यात आले. यासाठी पुणे महानगरपालिकेकडील ८ बोटी तैनात करण्यात आल्या. जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून एनडीआरएफच्या दोन तुकड्या (प्रत्येकी  ३० जवान व ४ बोटी)सैन्य दलाचा एक कॉलम (८० जवान, डॉक्टर्स, इंजिनिअर्स, २ बोटी ) असे तीन बचाव पथकही तैनात करण्यात आले.

स्थलांतरीत करण्यात आलेल्या नागरिकांसाठी तात्पुरत्या स्वरुपात २६ ठिकाणी तात्पुरती निवारा व्यवस्था करण्यात आली होती. याठिकाणी पुणे महानगरपालिका, विविध सामाजिक संस्था, मंडळे व व्यक्ती यांच्या माध्यमातून जेवण, नाष्टा इत्यादीची सोय करण्यात आली. पुणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून ६८ पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याठिकाणी वैद्यकीय मदतदेखील आवश्यकतेनुसार उपलब्ध करण्यात आली. पुणे महानगरपालिकेमार्फत २ हजार ७०० ब्लँकेट, ५ हजार चादर  आणि ७ हजार बेडशीट तसेच प्लास्टिक बादल्या पूरग्रस्तांना उपलब्ध करून देण्यात आल्या. 

मदत व बचाव कार्यामध्ये स्वयंसेवी संस्था, विविध सेवाभावी व्यक्ती, मंडळे व त्यांचे कार्यकर्ते, स्थानिक लोकप्रतिनिधी यांचादेखील सहभाग होता.  त्यांच्याकडून ७९१ स्वयंसेवक, १६ डॉक्टर, १८ हजार ५० अन्नाची पाकीटे, औषधे, २ हजार  चादर, २ हजार ७०० ब्लँकेट, ८ हजार ५९८ पाणी बाटल्या आणि एक हजार स्वच्छता कीट उपलब्ध झाले. 

बाधित परिसरात मदत कार्य सुरु करण्यात आले आहे. यासाठी बाधित परिसरातील लोकप्रतिनिधी, महापालिका आयुक्त, महानगरपालिकेचे विविध विभागाचे अधिकारी व  क्षेत्रिय अधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. लोकप्रतिनिधींच्या सूचना, स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांची मागणी इत्यादी बाबी विचारात घेऊन मदत कार्याचे नियोजन करण्यात आले आहे. पूर ओसरताच स्वच्छतेच्या कामास प्राधान्य देण्यात आले. २७ जुलै रोजी रोजी पुणे मनपामार्फत पूरबाधित परिसरात १२ मुख्य आरोग्य निरीक्षक, ६४ स्वच्छता निरीक्षक, ९८ स्वच्छता पर्यवेक्षक, ४ हजार २२७ स्वच्छता कर्मचारी, ७३ फवारणी कर्मचारी नेमण्यात आले होते.

राज्य शासनाच्या निर्देशानुसार पूरबाधित भागाची युद्धपातळीवर स्वच्छता करण्यात आली.  परिसरात रोगराई पसरू नये याचीदेखील दक्षता घेण्यात येत आहे. ९९८ किलो जंतुनाशक पावडर, १०४ स्पेर पंप,  ४२ धूर फवारणी यंत्र, ४ रिसा यक्लर, २४ डम्पर, ३ ट्रॅक्टर, ९ पाण्याचे टँकर,  १० विद्युत पंप आणि ७ जनरेटरचा स्वच्छतेच्या कामात उपयोग करण्यात आला. त्यासोबतच २० जेसीबी, ४० डीपी, ५० बीआरसी, ८ हायवा ट्रक,  ३५ जेटींग, १२१ घंटा गाडी, २९४ छोटी गाडी, १३१ कॉम्पॅक्टर, २९ बिन लिफ्टर आणि ४० टिप्परचाही उपयोग करण्यात आला. २७ जुलै रोजी एका दिवसात  २२८ टन कचरा, २६.५ टन गाळ स्वच्छ करण्यात आला. ३३.५३ टन तुटलेल्या झाडाचा कचरा उचलण्यात आला.  

श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर जि. नाशिक (दिंडोरी प्रणीत) व पुणे महानगरपालिका यांचे संयुक्त विद्यमाने विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये १६२ टन कचरा, ६४ टन गाळ स्वच्छ करण्यात आला.  झाडांची कटिंग करून २६ टन कचरा उचलण्यात आला आहे. या कामाकरिता १५ जेसीबी, ११ डीपी, २ बी.आर.सी., १५ हायवा, २४ जेटींग मशीन, ११ घंटागाडी, ७५ छोटा हत्ती, ८ कॉम्पॅक्टर, ३ बिनलिफ्टर, १० टिपर वापरण्यात आले. पुणे महानगरपालिका आणि पीएमआरडीएच्या शोध व बचाव पथकामार्फत पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या व्यक्तींचा शोधह घेतला. 

पूरग्रस्त भागातील स्वच्छताविषक कामे पूर्ण करण्यात आली असून रोगराई पसरू नये यासाठी जंतुनाशक फवारणीदेखील करण्यात आली. याकामाचे पर्यवेक्षण करण्यासाठी महापलिका आयुक्त डॉ. राजेन्द्र भोसले, अतिरिक्त महापालिका आयुक्त, महानगरपालिकेच्या विविध विभागांचे खातेप्रमुख यांच्या अंतर्गत , क्षेत्रिय व परिमंडळ स्तरावरील अधिकारी, कर्मचारी व सेवक कार्यरत आहेत. स्वच्छता विषयक व आपत्कालीन तक्रारीसाठी पुणे महानगरपालिकेतर्फे मध्यवर्ती नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून प्रत्येक क्षेत्रिय कार्यालायातदेखील नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले.  नागरिकांनी स्वच्छता विषयक मागणी तक्रारीकरिता ०२०-२५५०१२६९ व २५५०६८०० या  क्रमांकावर किंवा क्षेत्रीय कार्यालयाच्या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. भोसले यांच्याकडून करण्यात आले. 

कोल्हापूर महानगरपालिका :  शहरामध्ये सतत पडत असलेल्या पावसामुळे मुख्य रस्त्यावर खड्डे पडले. हे खड्डे तातडीने मुजविण्याचे आदेश आयुक्त  के.मंजूलक्ष्मी यांनी शहर अभियत्यांना दिले.  त्यानुसार चारही विभागीय कार्यालयांद्वारे मुरुम टाकून रस्ते पॅचवर्क करण्यात आले. विभागीय कार्यालय क्र.१ अंतर्गत देवकर पाणंद, पांडूरंग नगरी, तपोवन मेनरोड, यशवंत लॉन ते कळंबा रोड. विभागीय कार्यालय क्र.२ अंतर्गत जाऊळाचा गणपती ते नागोजी पाटणकर हायस्कूल, पाडळकर मार्केट गंगावेश. विभागीय कार्यालय क्र.३अंतर्गत एसएससी बोर्ड ते राजेंद्रनगर, महादेव मंदीर साठमारी चौक. विभागीय कार्यालय क्र.४ अंतर्गत ताराराणी चौक ते सी.बी.एस स्टँड, काँग्रेस कमिटी मेनरोड, दाभोळकर कॉर्नर ते शाहूपुरी पोलिस स्टेशन ते राजीव गांधी पुतळा मेनरोड परिसरात मुरुम टाकून पॅचवर्क करण्यात आले. 

पुराचे पाणी ओसरणा-या भागामध्ये व शहरातील मुख्य रस्त्यांवरील चेंबर लाईन महापालिकेच्यावतीने युध्दपातळीवर साफ सफाई करण्यात आल्या.  शहरामध्ये  ५०० पेक्षा जास्त मॅनहोल चेंबरची सफाई करण्यात आली. ही सफाई बृहन्मुंबई महापालिकेच्या सक्शन कम जेटींग कम वॉटर रिसायकल मशिनद्वारे करण्यात आली. या मशिनरीद्वारे मॅनहोल चेंबर साफ करून  ५० हजार लिटर पेक्षा जास्त राळ, गाळ व खरमाती चेंबरमधून काढण्यात आला. 

शहरातील बरेचसे रस्ते खराब झाले असल्याने जे रस्ते देखभाल दुरुस्ती कालावधीमध्ये आहेत ते रस्ते तातडीने संबंधीत ठेकेदारामार्फत दुरुस्त करुन घेण्याचे आदेश आयुक्त  के.मंजूलक्ष्मी यांनी दिले. या कामामध्ये ठेकेदाराकडून अथवा अभियंत्याकडून कोणताही हलगर्जीपणा झाल्यास संबंधीतांवर सक्त कारवाई करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. वॉरंन्टी कालावधीमधील तीन वर्षाच्या आतील जे ४०० रस्ते आहेत त्याची तपासणी करुन शासन निर्णय प्रमाणे ते संबंधीत ठेकेदारामार्फत तातडीने दुरुस्ती करुन घेऊन  सुस्थितीत ठेवण्याचे आदेश दिले.

पूर ओसणा-या भागामध्ये महापालिकेच्यावतीने युध्दपातळीवर स्वच्छता व औषध फवारणी करण्यात आली.  या स्वच्छता मोहिमेअंतर्गत पहिल्या टप्प्यात  ७ टन गाळ, फ्लोटींग मटेरियल व कचरा उठावण्यात आला. यामध्ये दसरा चौक ते व्हिनस कॉर्नर, जामदार क्लब, सुतारवाडा, पंचगंगा तालीम परिसर, व्हीनस कॉर्नर, लक्ष्मी नारायण मंदिर, जयंती नाला पंपीग स्टेशन, सीता कॉलनी, नाईक मळा, कारजगेमळा, रमणमळा मळा, जाधववाडी, कदमवाडी, कुंभार गल्ली, रिलायन्स मॉल, कामगार चाळ, दुधाळी गवत मंडई, सुतार वाडा, कलेक्टर ऑफिस, बापट कॅम्प, मोकाशी पॅसेज, चावरे पॅसेज, सिद्धार्थ नगर या परिसरातून हा कचरा उठाव करण्यात आला. यासाठी ५ जेसीबी, ४ आयवा डंपर, २ फायर फायटर, २ पाण्याचे टँकर, ८ ट्रॅक्टर ट्रॉली, औषध फवारणीचे ९ टॅक्टर, पाणी फवारणीचे २ टॅक्टर, धूर फवारणीची ९ मशिन व २० हॅन्ड पंप व महापालिकेच्या ३०० सफाई कर्मचा-यांनी मदत केली.

पिंपरी-चिंचवड महापालिका : अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड  महापालिकेद्वारे क्षेत्रीय कार्यालय स्तरावर आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित करण्यात आले. या क्षेत्रीय स्तरांवरच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षांमुळे त्या त्या भागातील पूर नियंत्रण परिस्थिती हाताळली गेली. शहरातील सुमारे २८०० पेक्षा अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी निवारा केंद्रांमध्ये तसेच महापालिका शाळांमध्ये हलविण्यात आले. या ठिकाणी भोजनासह आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून शहरात विविध ठिकाणी बचावकार्य सुरू होते. 

‘अ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील सम्राट चौक, लालटोपी नगर, भाटनगर, पिंपरी रिव्हर रोड, रामनगर, पत्राशेड लिंकरोड, बौद्धनगर आदी ठिकाणी बचावकार्य केले.  सुमारे ६५० नागरिकांना भाटनगर पिंपरी शाळा, आंबेडकर कॉलनी, मेवणी हॉल, निराधार हॉल पिंपरी येथे स्थलांतरित करण्यात आले.   ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील चिंचवड येथील तानाजी नगर , काळेवाडी येथील पवनानगर, रावेत येथील समीर लॉन्स, शिंदे वस्ती रस्ता, जाधव घाट आदी परिसरात बचावकार्य झाले.  सुमारे ३०० नागरिकांना काळेवाडी येथील महापालिकेच्या प्राथमिक शाळेत तसेच दत्तोबा काळे इंग्रजी मीडियम स्कूलमध्ये स्थलांतरित केले. ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत लक्ष्मीनगर गल्ली क्र. ३,४,५,६, पवार वस्ती,  पिंपळेगुरव, भुजबळ वस्ती, वाकड आदी परिसरात बचावकार्य पूर्ण केले. तिथल्या  ३१ नागरिकांना पिंपळेगुरव येथील नवीन मुला मुलींच्या शाळा नं. ५४ येथे तर १० नागरिकांना वाकड येथील आबाजी भूमकर शाळेत स्थलांतरित करण्यात आले.

‘ई’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत रामनगर, बोपखेल येथे २० ते २५ घरांमध्ये तीन ते चार फूट पाणी शिरले. या ठिकाणी बचावकार्यादरम्यान सुमारे १०० नागरिकांचे मनपाच्या बोपखेल येथील प्राथमिक शाळेत स्थलांतरण करण्यात आले. ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत घरकूल, श्रीराम कॉलनी, तळवडे, डिफेंस कॉलनी, पाटीलनगर, चिखली आदी परिसरात बचावकार्य केले. या ठिकाणांहून साचलेले पाणी तसेच घरांमध्ये शिरलेले पाणी काढण्यात आले. तसेच नदीकाठच्या नागरिकांना सूचना देऊन स्थलांतरित केले. ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत संजय गांधीनगर, आंबेडकरनगर, सुभाषनगर, पवनानगर, जगतापनगर, संजय गांधीनगर या ठिकाणी  बचावकार्यादरम्यान  सुमारे ३३० नागरिकांना कमला नेहरू शाळा, पिंपरी येथे, ४५० नागरिकांना रहाटणी शाळा येथे, ४० नागरिकांना थेरगाव शाळा येथे तर ५० नागरिकांना विवेकानंद बॉक्सिंग हॉल येथे स्थलांतरित करण्यात केले . ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत हिराबाई झोपडपट्टी, कासारवाडी, भारतनगर, फुगेवाडी, दापोडी परिसर मुळानगर, मधुबन सोसायटी, जुनी सांगवी इथल्या बचावकार्यात  १५० नागरिकांचे कासारवाडी उर्दू शाळेत, सुमारे ३०० नागरिकांचे मीनाताई ठाकरे महापालिका शाळेत, सुमारे १५० नागरिकांचे दापोडी येथील हुतात्मा भगतसिंग महापालिका शाळेत स्थलांतर तर सुमारे ३०० नागरिकांचे जुनी सांगवी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शाळेत स्थलांतर केले. अतिवृष्टी तसेच धरणातील पाणी सोडण्याच्या वेळी  शहरात विविध ठिकाणी कार्यरत असणाऱ्या नियंत्रण पथकांद्वारेही बचावकार्य सुरू होते.  कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी तत्काळ महापालिका नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, महापालिका व पोलीस प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन  पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. शेखर सिंह यांनी केले. 


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

No comments:

Post a Comment

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...