Monday, July 29, 2024

नवशहर निर्मितीत पाळीव प्राण्यांचाही प्राधान्याने विचार

कालौघात शहरे बदलत आहेत. बदलत्या शहरांच्या गरजाही बदलत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या बदलत्या गरजांनुसार  स्थानिक स्वराज्य संस्थानिरनिराळ्या उपाय योजना करीत आहेत. या उपाय योजना ह्या फक्त नागरिकांसाठीच नसून  शहरातील पाळीव प्राण्यांसाठी सुद्धा आहेत.  पाळीव प्राण्यांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे कोणत्या उपाय योजना केल्या जात आहेत याचा घेतलेला आढावा :

मुंबई महानगरपालिका : 

महालक्ष्मी व्हेट रुग्णालय : मुंबईत सुमारे एक लाख १५ हजार पाळीव प्राणी आहेत. त्यात गायी, म्हशी, बैल, शेळ्या-मेंढ्या, श्वान आदींचा समावेश आहे. पाळीव श्वानांची संख्या ३६ हजार ५००, तर भटक्या श्वानांची संख्या ९८ हजार ७०० पेक्षा जास्त आहे. मांजरांची संख्याही मोठी आहे. या प्राण्यांना अद्ययावत उपचार मिळावेत यासाठी सध्या पालिकेचा खार येथे एकच पशुवैद्यकीय दवाखाना आहे. तर, मुंबई शहर व उपनगरात सुमारे २०० खासगी पशुवैद्यकीय दवाखाने आणि मुंबई सोसायटी फॉर प्रिव्हेंशन ऑफ कुएल्टी टू ॲनिमल संस्थेचे परळ येथे खासगी रुग्णालय आहे.  पाळीव प्राण्यांच्या रुग्णालयात  आणखी एका रुग्णालयाची भर पडणार आहे. मुंबईतील या पशुवैद्यकीय रुग्णालयाची इमारत  महालक्ष्मी परिसरात उभारण्यात आली आहे.  मुंबई महापालिकेने पशुवैद्यकीय रुग्णालयासाठी महालक्ष्मी येथे टाटा ट्रस्टला ४, ३४०.१९ चौरस मीटर जागा दिली आहे. पाळीव प्राण्यांच्या उपचारासाठी सध्या अस्तित्त्वात असणारी यंत्रणा अपुरी पडत असल्याने पालिकेने या रुग्णालयाची उभारणी टाटा ट्रस्टच्या सहकार्याने केली आहे. . 'बांधा, वापरा व हस्तांतरित करा' या तत्त्वावर मुंबई पालिका व टाटा ट्रस्ट यांच्यात करार करण्यात आला आहे. या रुग्णालयाची देखभाल आणि वैद्यकीय सेवाही टाटा ट्रस्ट करणार आहे. जून २०२४ अखेरपर्यंत हे रुग्णालय सेवेत येणार आहे. या रुग्णालयात जनावरांवर २४ तास उपचार होणार आहेत. त्यामुळे आपल्या पाळीव प्राण्यांच्या आरोग्याची काळजी घेणारे पालिका रुग्णालय प्राणिमित्रांना उपलब्ध होणार आहे.

नव्या रुग्णालयातील सुविधा : 

■ आयसीसीयू, ब्लड बँक, डायलेसिस सेंटर अशा सुविधा या रुग्णालयात असतील. तसेच हे रुग्णालय ४०० लहान प्राण्यांच्या उपचार क्षमतेचे असेल.

■ रुग्णालयात जखमी, आजारी, भटक्या जनावरांवर मोफत उपचार केले जातील.  त्यांच्यासाठी २४ तास मोफत रुग्णवाहिकेची सेवाही पुरवली  जाईल. 

■ शस्त्रक्रिया, गायनॉकोलॉजी, अपघात, इमर्जन्सी वॉर्ड, आयसीयू, कॅन्सर वॉर्ड,  ॲण्ड स्कीन वॉर्ड, ओपीडी मेडिसिन-ओपीडी, सीटीस्कॅन, एमआरआय, रेडिओलॉजी सोनोग्राफी, ब्लॅड बँक, डायलेसिस सेंटर अशा अद्ययावत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. 

■ मुंबईत पाळीव श्वानांची संख्या मोठी आहे. महालक्ष्मी येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात श्वान, मांजरांवर मोफत उपचार होणार आहेत. मात्र, मोठी शस्त्रक्रिया, सीटीस्कॅन, एमआरआय यासाठी पैसे आकारण्यात येतील. 

पाळीव प्राण्यांचे निर्बिजीकरण :   बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या निर्देशांनुसार, उप आयुक्त (विशेष) किरण दिघावकर यांच्या पर्यवेक्षणाखाली मुंबई महानगरातील भटके आणि पाळीव श्वानांसंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आता नागरिकांच्या सोयीसाठी मुंबईतील भटके श्वान किंवा पाळीव प्राण्यांचे लसीकरण करणे, निर्बिजीकरण करणे तसेच त्यांच्या अनुषंगाने काही तक्रारी किंवा विनंती असल्यास नागरिकांना मायबीएमसी ( MyBMC) मोबाइल ॲप्लिकेशनवर जाऊन त्या नोंदवता येणार आहेत. www.mcgm.gov.in या संकेतस्थळावरावरील https://vhd.mcgm.gov.in/register-grievance या लिंकवर जाऊनही विनंती किंवा तक्रार नोंदवता येईल. 

https://vhd.mcgm.gov.in/register-grievance या लिंकवर क्लिक केल्यानंतर तक्रार किंवा विनंती यापैकी एकाची निवड करून त्याअंतर्गत विहित माहिती भरावी लागेल. माहिती नोंदवल्यानंतर संबंधित विनंती किंवा तक्रारीसाठी एक विशिष्ट क्रमांक तयार होईल आणि तो नागरिकाच्या थेट मोबाइल क्रमांकावर उपलब्ध होऊ शकेल. या क्रमांकाच्या आधारे नागरिक तक्रार किंवा विनंतीच्या कारवाईबाबतच्या स्थितीचा वेळावेळी आढावा घेऊ शकतील.  मोबाइल ॲप्लिकेशनवर तसेच संकेतस्थळावर प्राणी कल्याणाशी संबंधित विविध उपाययोजनांची माहिती, प्राण्यांसाठी काम करणारे विविध शासकीय विभाग किंवा संस्था इत्यादींची माहिती देण्यात आली आहे. 

शव दहनासाठी ऑनलाइन नोंदणी सुविधा :  बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मालाड येथील स्मशानभूमीमध्ये लहान आकाराच्या पाळीव मृत प्राण्यांच्या दहनासाठी सुविधा देण्यात आली आहे. नागरिकांना त्यांच्याकडील सुमारे ५० किलो वजनापेक्षा कमी वजनाच्या मृत प्राण्यांचे या स्मशानभूमीत दहन करण्यासाठी आता ऑनलाइन पद्धतीने वेळेची नोंदणी करता येणार आहे. https://vhd.mcgm.gov.in/incineration-booking या लिंकवर ही सुविधा उपलब्ध आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर नागरिकांना मृत प्राण्यासंदर्भात संपूर्ण माहिती भरुन द्यावी लागेल. तसेच नोंदणी प्रक्रियेपासून पुढील दोन दिवसांच्या आत (आज किंवा उद्या यापैकी एक असं) नेमक्या कोणत्या वेळेत प्राण्याचे दहन करावयाचे आहे, त्या वेळेची (स्लॉट) निवड करावी लागेल. मालाड येथे दुपारी १२ आणि दुपारी ४ वाजता असे दोनदा मृत प्राण्यांचे दहन केले जाते. त्यामुळे नागरिकांनी या दोन्ही दहन कालावधीच्या पूर्वीचीच वेळ निवडावी. नोंदणी तसेच विहित वेळेसंदर्भातील माहिती नागरिकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर नोंदणीनंतर उपलब्ध होईल.निवडलेल्या विहित वेळेत मालाड येथील स्मशानभूमीमध्ये त्यांना प्राण्याचे अंत्यविधी करता येईल.

मुंबई रेबीज निर्मूलन प्रकल्प :  प्राणी कल्याण करणे व त्यासोबतच प्राण्यांपासून मानवामध्ये होणारे संक्रमण टाळण्यासाठी मुंबई महानगरपालिकेद्वारे उपक्रम राबविले जात आहेत. त्याच अनुषंगाने भटक्या श्वानांच्या चाव्यामुळे माणसांना होणाऱ्या संक्रमणाचा धोका कमी करणे तसेच श्वानांना आवश्यक आरोग्य सुविधा पुरवण्याच्या उद्देशाने महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्यावतीने फेब्रुवारी २०२४ मध्ये  'मुंबई रेबीज निर्मूलन प्रकल्प' अंतर्गत भटक्या श्वानांच्या रेबीज प्रतिबंधक लसीकरणासाठी नुकतेच अभियान हाती घेण्यात आले होते . या मोहिमेद्वारे महानगरातील विविध सदनिका, बंगले, सोसायटीमधील नागरिकांकडे असलेल्या पाळीव प्राण्यांची माहिती संकलित करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी गटाने प्रत्येक सोसायटीला भेट दिली. मुंबईकर नागरिकांनी या मोहिमेत सहभाग घेऊन कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे करण्यात आले होते. 

नाशिक महानगरपालिका : 

'पशू रुग्णवाहिका' सेवा  : नाशिक महापालिकेने शहरातील जखमी किंवा आजारी भटक्या जनावरांवर तत्काळ उपचार करता यावेत यासाठी 'ॲनिमल ॲम्ब्युलन्स' (पशू रुग्णवाहिका) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.  पाळीव तसेच भटके श्वान, मांजर आणि इतर गरजू प्राण्यांसाठी अशी सेवा प्रथमच नाशिक महापालिकेकडून दिली जाणार आहे. 'पशू रुग्णवाहिका' जखमी प्राण्यांना आवश्यक उपचारांसाठी पशुवैद्यकीय डॉक्टरांपर्यंत पोहोचवेल. या सुविधेसाठी नाशिक महापालिकेद्वारे  कंत्राटदाराची नेमणूक करण्यात येईल. संबंधित कंत्राटदार महापालिकेच्या  नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, पंचवटी, नाशिकरोड, सिडको आणि सातपूर या सहाही विभागांतील ''पशू रुग्णवाहिका'' सेवेवर देखरेख ठेवणार आहे. त्यामुळे आता शहरातील जखमी अवस्थेतील भटक्या जनावरांनाही तत्काळ उपचार मिळू शकणार आहेत. मात्र, त्यांच्याबाबतची माहिती 'पशू रुग्णवाहिके' पर्यंत पोहोचविण्याठी योग्य नियोजन करण्याची गरज असून, त्या अनुषांगाने वेळीच उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त पशुप्रेमींनी व्यक्त केली आहे.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका : 

श्वान पाळण्याचा परवाना :  शहरात महापालिकेतर्फे ७५० रुपयांत श्वान पाळण्याचा परवाना मोजक्याच कागदाच्या अटींसह देण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेने श्वान पाळण्याच्या परवान्याची प्रक्रिया बऱ्यापैकी सुरळीत आणि ऑनलाइन  करून दिली आहे. परिणामी, आतापर्यंत साडेतीन हजारांहून अधिक श्वान पाळणाऱ्यांनी नोंदणी करून परवाना मिळविला आहे.   त्याचबरोबर मांजर, म्हैस, गाय, उंट यांच्यासह अन्य प्राणी पाळण्याचा  परवाना महापालिकेकडून देण्यात येत आहे.  परवाना घेण्याच्या अर्जासोबत पाळीव प्राण्यांचे पाच बाय सात इंच आकाराचे दोन फोटो, जनावरे ठेवण्यासाठी उपलब्ध जागेची माहिती, पाळीव जनावरे पाळण्यासाठी शेजारी राहणाऱ्या व्यक्तीचे ना-हरकत प्रमाणपत्र, कुत्रा व मांजरीस रेबीज लसीकरण प्रमाणपत्र, मांजरीचे निर्बिजीकरण शस्त्रक्रिया केल्याचे पशुवैद्यकाचे प्रमाणपत्र आदी बाबी बंधनकारक करण्यात आल्या आहेत.

एप्रिल २०२४ , मध्ये १२१ जणांनी नवीन परवाने घेतले तर ९४ जणांनी परवान्याचे नूतनीकरण करून घेतले. तसेच मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात २९ जणांनी नवीन परवाने घेतले आहेत तर ३७ जणांनी परवान्याचे नूतनीकरण केले आहे.  पाळीव प्राणी परवाना पत्रकामुळे गेल्या दीड महिन्यांत महापालिकेला एक लाख ९५ हजार ५०० रुपये मिळाले आहेत. गेल्यावर्षी एप्रिल २०२३  महिन्यात १५ जणांनी नवे तर ५३ जणांनी परवान्याचे नूतनीकरण केले होते. मे महिन्यात २० जणांनी  नवे  तर २३ जणांनी श्वान परवान्याचे जुन्या परवान्याचे नूतनीकरण केले होते. 

पाळीव प्राण्यांसाठी उद्यान आणि स्मशानभूमी :  छत्रपती संभाजीनगर महापालिका क्षेत्रामध्ये पाळीव प्राण्यांची संख्या जास्त आहे. विशेष करून श्वान व मांजर यासारखे पाळीव प्राणी अनेक घरांमध्ये पाळले जातात. वयोमानापरत्वे किंवा अन्य कारणांमुळे या प्राण्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणे सुकर व्हावे, यासाठी शहर परिसरातील पाळीव प्राण्यांसाठी नजीकच्या भविष्यात स्मशानभूमी उभारण्याचा निर्णय छत्रपती संभाजीनगर महापालिकेने घेतला असल्याची घोषणा आयुक्त श्री. जी. श्रीकांत यांनी केली आहे. पाळीव प्राण्यांच्या मृतदेहावर त्यांच्या मालकांद्वारे वेगवेगळ्या प्रकारे अंत्यसंस्कार केले जातात. हे सर्व प्रकार आरोग्याच्या दृष्टीने अनेकदा योग्य नसतात. ही बाबी लक्षात घेऊन स्मशानभूमी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. 

छत्रपती संभाजीनगर महापालिका क्षेत्रात पाळीव प्राण्यांसाठी  स्मशानभूमी बरोबरीने उद्यानही नजीकच्या उभारले जाणार आहे. हे उद्यानात श्वानांबरोबरीने मांजरींसाठीही विविध सोयी-सुविधा उपलब्ध असणार आहे. उद्यानांच्या सुविधांमध्ये जॉगिंग ट्रॅक, खेळाचे मैदान, स्विमिंग पूल, ग्रूमिंग सलून, पाळीव प्राणी क्लिनिक, पार्किंग आणि बरेच काही समाविष्ट आहे. 

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका :  

डॉग पार्क : पिंपरी-चिंचवड शहर १८१ चौरस किलोमीटर क्षेत्रात विस्तारले आहे. शहराची लोकसंख्या ३० लाखांवर गेली आहे. नागरिक मोठ्या हौसेने श्वान पाळतात. कालांतराने त्यांचा इतका लळा  लागतो की, ते कुटुंबातील एक सदस्य होऊन जातात. अशा पाळीव श्वानांच्या सोयीसाठी महापालिकेने डॉग पार्क उभारले आहे. सदर डॉग पार्क  पिंपळे सौदागर इथल्या  स्वराज चौकात असणाऱ्या  लिनन गार्डनच्या एका कोपऱ्यात ३२ गुंठे जागेत बनविण्यात आले आहे. पाळीव श्वानांना मनोरंजन व खेळण्याची व्यवस्था करणे तसेच मनुष्य व प्राणी संघर्ष कमी करणे या हेतूने महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने ही नवी संकल्पना पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीत राबविली आहे. त्याला श्वानप्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

 हे डॉग पार्क हल्लीच जानेवारी २०२४ मध्ये  खुले केले आले आहे. हिरवळ निर्माण करून श्वानांना फिरण्यासाठी जॉगिंग ट्रॅक बनविण्यात आला आहे. तसेच, खेळण्यासाठी विविध साधने बनविण्यात आली आहेत. त्यांच्यासाठी विशिष्ठ  टॉयलेट तयार केले आहेत .श्वानांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सेलिब्रेशन पॉईन्टही तयार करण्यात आला आहे. लोखंडी पत्र्यापासून आकर्षक कलाकृती साकारून सादर डॉग पार्क सजविले आहे, श्वानांसोबत आलेल्या नागरिकांसाठी डॉग कॅफे करण्यात आला  आहे.

भिवंडी महानगरपालिका : 

कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी ठेकेदार :   भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात सध्यासुमारे २५ हजार पेक्षा जास्त भटकी कुत्री आहेत. त्यांची संख्या मोजून आणि त्यांना मार्किंग करून नव्याने त्यांची नसबंदी करण्याची मागणी केली जात आहे. त्यासाठी  भिवंडी महानगरपालिका ठेकेदारांची नेमणूक करण्यात आहे. त्यासाठी महापालिका निविदा काढणार आहे.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 


No comments:

Post a Comment

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...