Saturday, May 18, 2024

मतदान जनजागृती अभियान राबविण्यात मुंबई महानगर पालिकेचा यशस्वी पुढाकार

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४साठी मुंबईत २० मे रोजी मतदान होणार आहे. या मतदानात मुंबईतून मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी मुंबई महानगर पालिकेद्वारे मतदार जनजागृती मोहीम राबविण्यात आल्या.  या मोहिमा राबविण्यापूर्वी  मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. भूषण गगराणी पालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या मतदार जनजागृती मोहिमेच्या रुपरेषेचे सादरीकरण केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केलेहोते. 

मुंबई महानगरपालिकेद्वारे सोसायटी, इमारती, झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन जनजागृती मोहीम राबविण्यात आली. पालिकेचा आरोग्य विभाग, मालमत्ता कर विभाग, अनुज्ञापन विभाग या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांद्वारे  मुंबईत ठिकठिकाणी मतदानाविषयी जनजागृती मोहिमा यशस्वीपणे राबविल्या गेल्या. 

मुंबईतून अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी मुंबई महापालिकेकडून नागरी रहिवाशी ठिकाणांबरोबरीने शैक्षणिक संस्था  आणि व्यावसायिक ठिकाणीही मतदार जागृती अभियान  राबविले गेले.   यात व्यापारी संकुले, मंडई, चित्रपटगृहे, बाजारपेठा, नाट्यगृहे, मॉल, शाळा, महाविद्यालयांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता.  

मतदान हा प्रत्येकाचा अधिकार आहे. त्यामुळे निवडणुकीत हा अधिकार प्रत्येकाने बजावणे अपेक्षित आहे. लोकसभा निवडणुकी  २०२४ च्या पार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का वाढीसाठी मुंबई महापालिकेच्या विविध उद्यानात फलक लावत मतदानाविषयी जनजागृती मोहीम घेण्यात आली. 

मुंबई महापालिकेच्या उद्यान  खात्याच्या अखत्यारित क्रीडांगणे व मनोरंजन मैदाने अशा विविध आरक्षणासाठी ११०० हून अधिक भूभाग राखीव आहेत. हा भूखंड व त्यातील सुविधा मुंबईकरांना निःशुल्कपणे उपलब्ध असून, त्यांचा नियमितपणे वापर होत असतो. विविध मनोरंजनपर व क्रीडात्मक वापरासोबत नागरिकांना जागरूक करण्यासाठी उद्यान हे एक महत्त्वाचे केंद्रबिंदू ठरत आहे. लोकसभा निवडणूक - २०२४ मध्ये मुंबईकर मतदारांना जागरूक करून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी उद्यानात पोस्टर्स,  उद्याने, बॅनर्सद्वारे जनजागृती करण्यात आली. 

मुंबईत २० मे रोजी मतदान होणार आहे. मुंबईत ९ हजार ८६२मतदान केंद्रे आहेत. त्यात शहरात २ हजार ५०९ तर उपनगरात ७ हजार ३५३ मतदान केंद्रे आहेत. मतदान केंद्रांवर मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांना भर उन्हामध्ये रांगा लावाव्या लागणार आहेत. मे महिना हा उन्हाळ्याचा महिना असल्याने या कालावधीत अधिक तापमान असण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता निवडणूक आयोगाकडून केंद्रावर येणाऱ्या नागरिकांसाठी आरोग्य सुविधा पुरविण्यात येणार आहे. मतदान केंद्रांवर आरोग्य सेवा पुरविण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाकडून मुंबई पालिकेवर सोपविण्यात आली आहे.  त्यामुळे  मुंबई महानगरपालिकेने निवडणूक केंद्रांवर आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आपला दवाखाना, आरोग्य केंद्र आणि डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला.

मुंबई महानगर पालिकेने मतदार जागृती अभियान राबवून लोकशाहीच्या उत्सवात आपला सक्रीय सहभाग नोंदविला. तसेच पालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांना मतदान जागृती अभियानात सहभागी करून उपक्रमाची लोकप्रियता वाढविली.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

No comments:

Post a Comment

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...