Friday, May 17, 2024

नवी मुंबई महानगरपालिकेचा मतदान जागृती अभियानात सक्रिय सहभाग

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने सर्वत्र आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. २० मे २०२४ ला पाचव्या टप्प्यातील मतदान पार पाडणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मतदानाचा पाचवा टप्पा पार पडणार आहे.  त्यासाठी नवी मुंबई महानगत पालिका अत्यंत प्रभावीपणे मतदान जागृती अभियान पार पाडत आहे. त्याची सुरुवात महापालिकेने आचारसंहितेपासूनच केली. मनपाच्या सर्व अधिकाऱ्यांनी  विभागीय पातळीवर काटेकोरपणे दक्ष रहावे व कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी, असे निर्देश नवीमुंबई  महापालिका मा. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी  दिले. नवी मुंबई महानगरपालिकेत  मतदारजागृती अभियान आढावा बैठक झाली. त्यावेळी मा. आयुक्त डॉ. कैलास शिंदे बोलत होते. 

आदर्श आचारसंहितेच्या नियामानुसार प्रचारफलकांना परवानगी देण्यात यावी. परवानगी देताना सर्वांना समान न्याय देण्यात यावा. अशाच प्रकारे प्रचारासाठी मैदाने उपलब्ध करून देण्याबाबतही समान भूमिका ठेवण्यात यावी. कोणत्याही प्रकारे विनापरवानगी होर्डिंग्ज, बॅनर्स, झेंडे लागणार नाहीत याची दक्षता घ्यावी. याचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच खासगी संस्थांच्या जाहिरातीही हटविण्यात याव्यात. उद्घाटने, शुभारंभ यांच्या कोनशिला झाकून घेण्यात याव्यात. अशा सर्व बाबींकडे नवी मुंबई महापालिकेच्या आठही विभागांतील सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी यांनी क्षेत्रीय स्तरावर स्वतः पाहणी करून गांभीर्याने लक्ष द्यावे, असे स्पष्ट निर्देश मा. आयुक्तांनी  दिले. त्याचप्रमाणे एनएमएमटीबसेस व बसस्थानके याठिकाणीही विनापरवानगी फलक लागणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. 

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढण्याच्या दृष्टीने विविध प्रसारमाध्यमांचा अधिक चांगला उपयोग करून व्यापक जनजागृती करावी, असेही निर्देश मा.आयुक्तांनी दिले. यामध्ये, विभाग कार्यालय पातळीवर मतदान जनजागृती कक्ष स्थापन करावा व या कक्षा नागरिकांना मतदानाविषयी आदी बाबींविषयी माहिती द्यावी, मतदान करण्यासाठी संपर्क साधून प्रोत्साहित करावे, असे निर्देश आयुक्तांनी दिले. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सुव्यवस्थितरीतीने पार पडणे ही आपली सर्वांची जबाबदारी असून त्याकडे काटेकोर लक्ष देण्यासोबतच निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी व्यापक जनजागृती करण्याकडेही विशेष लक्ष देण्याचे निर्देश नमुमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आढावा बैठकीत दिले.

आपापल्या विभागीय क्षेत्रातील सोसायट्या, वसाहती, उद्योग समूह याठिकाणी भेटी देऊन मतदान करण्याविषयी जनजागृती करण्याच्या सूचना मा. आयुक्तांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या. मतदानाच्या प्रचार, प्रसिद्धीप्रमाणेच मतदान केंद्रांवर सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्यावे. ही केंद्रे निवडणूक आयोगाने सूचित केल्याप्रमाणे तळ मजल्यावर असावीत. या केंद्रावर पाणी, विद्युत, स्वच्छतागृहे, रॅम्प अशा व्यवस्थेसह प्रामुख्याने व्हिलचेअरचीही व्यवस्था असणे गरजेचे  असल्याचे  मा. आयुक्तांनी सांगितले. 

लोकसभा निवडणुकीत प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावावा यादृष्टीने क्षेत्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन रेल्वे स्टेशन, बसडेपो, मार्केट, मॉल, मार्ट्स, सिनेमागृहे, नाट्यगृहे, मंगल  कार्यालये, रुग्णालये, सभागृहे, उद्याने अशा वर्दळीच्या ठिकाणी विविध माध्यमांतून मतदानाविषयी व्यापक स्वरूपात जनजागृती करण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले. याशिवाय फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप अशा समाज माध्यमांचाही प्रभावी वापर करावा तसेच एनएमएमटी बसेसवर फलक लावून व बसेसमध्ये ऑडिओ सूचना प्रसारित करून जनजागृती करण्याचे  मा. आयुक्तांद्वारे सूचित करण्यात आले आहे..

२० मे २०२४ रोजी नवी मुंबई लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत  प्रत्येक मतदाराने मतदान करून आपला मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी स्वीप कार्यक्रमांतर्गत  नवी मुंबई महानगर पालिकेद्वारे मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे. यादृष्टीने महापालिकेच्या माध्यमातून महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रीय स्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मतदार जनजागृतीसाठी विविध माध्यमांचा वापर करताना सध्याच्या सोशल मीडियाप्रेमी युगात लोकांमध्ये असलेली सेल्फी छायाचित्र काढण्याची आवड लक्षात घेता मतदार जनजागृतीचे सेल्फी स्टँड तयार करून ते  नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयासह आठही विभाग कार्यालये तसेच ऐरोलीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, वंडर्स पार्क, निसर्गोद्यान, मनपा रुग्णालये, भावे नाटयगृह व इतर मनपा कार्यालयांमध्ये ठेवण्यात आले आहेत.

महापालिका मुख्यालयातील सेल्फी स्टँडवर नवी मुंबई महानगरपालिकेचे मा.आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सेल्फी काढून नागरिकांना २० मे २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत मतदान करण्याचे आवाहन केले आहे. लोकशाही बळकट करणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य असून त्याकरिता संविधानाने आपल्याला दिलेला मतदानाचा अधिकार हक्काने बजावावा, असा संदेश आयुक्तांनी दिला आहे.

नवी मुंबई नागरिकांनी या सेल्फी स्टँडवर आपले सेल्फी छायाचित्र काढून ते सोशल मीडियाच्या फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स, व्हॉट्सप आणि इतर लोकप्रिय समाज माध्यमांतून प्रसारित करावे आणि स्वतः मतदान करावेच व इतरांनाही मतदान करण्याविषयी सेल्फीच्या माध्यमातून प्रोत्साहित करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी या दृष्टीने स्वीप कार्यक्रमांतर्गत नवीमुंबई महापालिकेचे  मा. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार विविध प्रसार माध्यमांचा वापर केला जात आहे. यामध्ये मतदान यंत्राचे मुखवटे अर्थात शुभंकर (मॅस्कॉट्स) तयार करण्यात आले असून हे चार मॅस्कॉट्स संपूर्ण महापालिका क्षेत्रात फिरून २० मे रोजी होणाऱ्या नवी मुंबई लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याविषयी जनजागृती करत आहेत.

हिरव्या फ्लुरोसन्ट रंगात चटकन नजरेत भरणारे हे मोठ्या आकाराचे चार मॅस्कॉट्स लक्षवेधी असून या मॅस्कॉटच्या पुढील भागावर मतदान यंत्राची प्रतिकृती आहे. त्याचप्रमाणे पाठीवरील मागील भागात मतदान करण्याविषयी आवाहन करणारा फलक प्रदर्शित करण्यात आला असून त्यावर 'वोटर हेल्पलाईन' अॅपचा क्यूआर कोड नमूद करण्यात आलेला आहे.

हे मॅस्कॉट्स नागरिकांमध्ये व त्यातही मुलांमध्ये लोकप्रिय होत असून अनेकजण या मॅस्कॉटसोबत सेल्फी छायाचित्र काढून आपापल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून प्रदर्शित करीत आहेत.  महापालिका निवडणूक विभागाचे उप आयुक्त शरद पवार यांच्या नियंत्रणाखाली या मॅस्कॉट्समार्फत मतदान जनजागृती प्रचार वेळापत्रक तयार करण्यात आले असून प्रत्येक मॅस्कॉटला विभाग नेमून देण्यात आलेला आहे. संबंधित विभागांचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी यांचे मॅस्कॉट्सव्दारे जनजागृती कार्यावर लक्ष असणार आहे.

पथनाट्यांप्रमाणेच लक्ष वेधून घेणाऱ्या मॅस्कॉट्सव्दारे लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन करणाऱ्या स्वीप उपक्रमास नागरिकांची पसंती मिळताना दिसत आहे.

बेलापूर विधानसभा क्षेत्रातील १७४ शाळा व ३९ महाविद्यालयांमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेद्वारे मतदार जागृती अभियानचे विविध उपक्रम राबविण्यात आले.  विद्यार्थ्यांमार्फत त्यांचे पालक व कुटुंबीय , नातेवाइकांना लोकसभा निवडणुकीसाठी (२०२४)  मतदान करण्याविषयी आवाहन करण्याच्या अनुषंगाने चित्रकला, रांगोळी, निबंध, वक्तृत्त्व, प्रश्नमंजुषा, गायन  अशा विविध  स्पर्धात्मक  उपक्रमांप्रमाणेच  प्रभातफेऱ्या, पथनाट्ये  ह्या  जनजागृतीपर माध्यमांचा  प्रभावीपणे उपयोग करण्यात  आला.  

नवी मुंबई महानगरपालिकेने स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मतदतीने मतदार जागृती अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीत मतदान करण्याविषयी नागरिकांना आवाहन करणारे बिल्ले (बॅजेस) स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या गणवेशावर लावून, त्या माध्यमातून मतदान करण्याविषयी संदेश देण्याचा अभिनव उपक्रम नवी मुंबई महानगरपालिकेद्वारे  राबविला जात आहे. 

नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या मतदार जागृती अभियानांपैकी हे एक अभियान आहे.  त्यानुसार बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, दिघा अशा आठही विभाग कार्यालय क्षेत्रातील स्वच्छताकर्मीच्या गणवेशावर हे बिल्ले झळकत आहेत. त्यावर असलेल्या 'मी मतदान करणारच. तुम्हीदेखील आपला मतदानाचा हक्क बजावा. माझे मत माझा अधिकार' अशा मजकुरातून मतदानाविषयीचे आवाहन केले जात आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मतदान जागृती अभियान अत्यंत प्रभावीपणे राबविले. नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम (NMMT) यांच्यामार्फत बसेसमधून २० मे २०२४ रोजीच्या लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठीचा व्यापक प्रचार सूरू असून त्याच्या व्हिडिओ क्लिपलाही नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. (https://www.instagram.com/reel/C6swYWuvf8A/?igsh=MWFlZGFtc3R1Z2Npdg%3D%3D) इथे विडिओ क्लिपइन्सर्ट करणे. 

अशाप्रकारे लोकशाहीचा निवडणूकउत्सव साजरा करण्यासाठी नवीमुंबई मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. महापालिका लोकसहभागाने उत्सव साजरा करीत आहे. 


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

ठाणे महापालिका क्षेत्रातील मतदान जागृती अभियान

'लोकसभा सार्वत्रिक निवडणूक - २०२४' साठी मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावे या उद्देशाने ठाणे महापालिकेने मोहीम हाती घेतली आहे. मतदान आणि मतदार जनजागृतीसाठी ठाणे महानगरपालिकेने आयुक्त श्री. सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम हाती घेतले आहेत. ठाणे महानगरपालिकेतर्फे मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.   'रन फॉर व्होट'  या नावाने भरविण्यात आलेल्या ह्या मिनी मॅरेथॉन स्पर्धेस ठाणे जिल्हा अॅथलेटिक असोसिएशन आणि ठाणे सिटीझन्स फाउंडेशन  तसेच ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाचेही सहकार्य लाभले. ह्या स्पर्धेस ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे विशेष उपस्थिती लाभली. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या  'रन फॉर व्होट' या मिनी मॅरेथॉनला ठाणेकरांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. युवकांनी मोठ्या संख्येने निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊन राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी मतदान करावे, असा संदेश या स्पर्धेद्वारे देण्यात आला. प्रत्येकाने येत्या २० मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करावे, असे आवाहन ठाणे महापालिकेचे  मा. आयुक्त श्री. सौरव राव यांनी केले. 'रन फॉर वोट' या मिनी मॅरेथॉन स्पर्धेत स्वीप पथक कर्मचाऱ्यांनी धावपटूंसोबत सहभागी होऊन मतदानाबाबत जनजागृती केली. या पथकाने धावपटूंना मतदानाची शपथ दिली. 'मी मतदान करणारच...आपणही मतदानासाठी सज्ज राहा' या आशयाचा मजकूर असलेल्या  माहितीपत्रकांचे वाटपही करण्यात आले. यावेळी ठिकठिकाणी सेल्फी पॉइंटवर तरुणांनी सेल्फी काढून मतदान जनजागृतीच्या घोषणा दिल्या. देशाच्या भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

ठाणे महापालिकेने पीडीसी इव्हेंट्सच्या साथीने विवियाना मॉल आणि कोरम मॉल येथे फ्लॅशमॉबद्वारे जागृती केली आणि मतदान करण्याबद्दल आवाहन केले. या  मतदानाचा जनजागृती अभियानात तरुणाईचा सहभाग महत्त्वाचा होता. आम्ही  मतदान करणार आहोत, आपणही न विसरता हे राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करावे, असे आवाहन  फ्लॅशमॉबमध्ये सहाभागी झालेल्या युवकांनी नागरिकांना केले. तसेच, फ्लॅशमॉबद्वारे नृत्यातून रसिकांची मनेही जिंकली.

" येत्या २० मे रोजी आपल्याकडे लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या मतदानाची टक्केवारी वाढवणे आवश्यक आहे. त्यामुळे आपण मतदानासाठी एकमेकांना प्रोत्साहन देऊया आणि मतदानाची टक्केवारी वाढवूया, असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त श्री. सौरभ राव यांनी नमो ग्रँड सेंट्रल पार्क येथे नागरिकांना केले.

महापालिका आयुक्त श्री. सौरभ राव यांनी पर्यटक आणि ठाणेकर यांच्यात सध्या चर्चेत असलेल्या, नमो ग्रँड सेंट्रल पार्कला सकाळी भेट दिली. कोलशेत येथे सुमारे २० एकरच्या सुविधा भूखंडावर ठाणे महापालिकेसाठी हे पार्क कल्पतरू डेव्हलपर्स यांनी विकसित केले आहे. या पार्कची पाहणी आयुक्त राव यांनी केली. त्यावेळी, तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांशी आयुक्त राव यांनी संवाद साधला. मतदान हे नागरिकांचे कर्तव्य आहे त्यामुळे आपण ते पार पाडले पाहिजे. त्यात हयगय नको, असे यावेळी आयुक्त  श्री. राव यांनी सांगितले.

नागरिकांनीही  आयुक्तांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच, आपापल्या गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान जागृती विषयी सुरू असलेल्या उपक्रमांची माहितीही नागरिकांनी दिली.

मतदान जनजागृतीसाठी शहरात फलक उभारणीचे नियोजन  ठाणे पालिका प्रशासनाने आखले आहे. शहरात पालिकेकडून मतदान जनजागृतीचे फलक झळकत आहेत. या फलकांवर मतदानाचे महत्त्व आणि मतदान करण्याचे आवाहन करणारे संदेश देण्यात येणार आहेत. शहरातील महत्त्वाचे चौक आणि इतर भागांत फलक लावले जाणार आहेत. या फलकांद्वारे नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रेरित केले जाणार आहे. काही दिवसांपूर्वी महापालिकेने स्वाक्षरी मोहीम राबविली. यासाठी किसननगर शाळा क्रमांक २३ मध्ये 'मी मतदानाचा हक्क बजावणार' असा फलक लावण्यात आला होता.

निवडणुकीत जास्तीत नागरिकांनी सहभागी मतदानाचा अधिकार बजावावा, यासाठी राज्यांतींल विविध शहरात नागरिकांमध्ये जनजागृती आली. ठाणे महापालिकेच्या किसननगर शाळा क्र. २३ मध्ये 'मी मतदानाचा हक्क बजावणार' असा फलक लावण्यात आला होता.  त्याद्वारे स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. मा. महापालिका आयुक्त श्री. सौरभ राव यांनीही या फलकावर स्वाक्षरी करून या मोहिमेत सहभाग घेत उपस्थितांना मतदान करण्याचा संदेश दिला.

मनोरंजन क्षेत्राच्या माध्यमातूनही ठाणे महापालिकेने मतदाराला जागृती अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. ठाणे महापालिकेच्या दोन्ही नाट्यगृहात मतदानासाठी जनजागृती केली जात आहे. गडकरी रंगायतन आणि घाणेकर नाट्यगृहात प्रत्येक प्रयोगाच्या वेळी मतदानाचा संदेश दिला जात आहे. ठाणे महापालिका आयुक्त श्री.  सौरभ राव यांच्या निर्देशानुसार हा उपक्रम राबविला जात आहे.   गडकरी रंगायतनची आसन क्षमताएक हजार आहे. तेथे दररोज किमान दोन नाटकांचे प्रयोग होतात. शनिवार-रविवारी हे प्रमाण तीन प्रयोगापर्यंत जाते. तर, घाणेकर नाट्यगृहाची आसनक्षमता ११००प्रेक्षकांची आहे. येथे दररोज किमान एक प्रयोग होतो तर, शनिवार- रविवारी किमान दोन प्रयोग होतात. घाणेकर नाट्यगृहातील मिनी थिएटरमध्येही प्रयोग होतात. प्रत्येक प्रयोगाच्या आधी मतदान करण्याबद्दलचा संदेश दिला जात आहे.   या माध्यमातून प्रयोगांना येणाऱ्या हजारो रसिकांपर्यंत मतदान करण्याचा संदेश पोहोचवण्यात येत आहे. 

अशाप्रकारे ठाणे महानगरपालिका मतदार आणि मतदान जागृती अभियानास सज्ज झाली असून अत्यंत प्रभावीपणे स्वीप अंतर्गत मतदान जागृती अभियान राबवीत आहे.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

आढावा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या मतदार जागृती अभियानाचा

सोमवार, दिनांक १३ मे २०२४ या दिवशी छत्रपती संभाजीनगर विधानसभा क्षेत्रात  'लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४'साठी चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडले.  'स्वीप' अंतर्गत 'लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४' अंतर्गत छत्रपती संभाजीनगर महापालिकाने  मतदार जागृती अभियान राबविले.  छत्रपती संभाजीनगर महापालिकेने गुढीपाडवाच्या दिवशी  शहरांतून निघणाऱ्या शोभायात्रांमधून मतदार जागृती केली. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या प्रियदर्शिनी शाळेतील विद्यार्थ्यांनी मतदार जागृतीसाठी पथनाट्य केले आणि शाळेलगतच्या वसाहतींमधून शोभायात्रा काढली. शोभायात्रेत प्रियदर्शिनी शाळेच्या विद्यार्थ्यांसह महापालिकेच्या गारखेडा व उस्मानपुरा शाळेचे विद्यार्थीही सहभागी झाले होते. 'गुढीपाडवा, मतदान वाढवा' असा संदेश विद्यार्थ्यांनी दिला. शोभायात्रेत सुमारे दोन हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. या उपक्रमांतर्गत पालक मेळावा घेण्यातआला. उस्मानपुरा शाळेच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून मतदान करण्याविषयी नागरिकांना आवाहन केले. 

छत्रपती संभाजीनगर महापालिकेने शहरातील मतदान केंद्रांना दीडशे टँकरद्वारे पाणी पुरवठा केला. सरासरी आठ लाख लिटर पाणी या केंद्रांसाठी तीन दिवसांत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून पाणी पुरवठा करण्यात आला.  महापालिका क्षेत्रातील मतदान केंद्रांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्याचे आणि मतदान केंद्रांमधील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या आदेशानुसार महापालिकेने तयारी केली. महापालिका क्षेत्रातील मतदान केंद्रांची संख्या ८५० आहे. या मतदान केंद्रांसाठी शनिवारपासून टँकरने पाणी पुरवठा केला.  शनिवार, रविवार आणि सोमवारअसे तीन दिवस मतदान केंद्रांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला. तीन दिवसात सुमारे दीडशे टँकर्सने पाणी देण्यात आले. दीडशे टँकरच्या माध्यमातून सरासरी आठ लाख लिटर पाणी देण्यात आले. मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांकडून पाण्याबद्दल तक्रार येणार नाही याची दक्षता पालिकेकडून घेण्यात आली होती.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आरोग्य विषयक उपाययोजना करण्याचे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी छत्रपती संभाजीनगर महापालिकेला कळवले. त्यानुसार पालिकेचे प्रशासक श्री.  जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी  सुक्ष्म नियोजन केले.  मतदानाच्या दिवशी वाढत्या उन्हाचा त्रास मतदारांना किंवा मतदानाच्या प्रक्रियेत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना झाल्यास त्यांच्यावर लगेचच औषधोपचार करण्याच्या दृष्टीने छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्रत्येक मतदान केंद्रासाठी आरोग्य पथक स्थापन केले. 

सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात वैद्यकीय कक्ष सुरू करण्यात आला.  २३ रुग्णवाहिकादेखील सज्ज ठेवण्यात आल्या.  त्यात महापालिकेच्या नऊ, १०८ च्या सहा आणि खासगी रुग्णालयांकडून उपलब्ध करून घेतलेल्या नऊ रुग्णवाहिकांचा समावेश होता.  मतदारांना आरोग्य विषयक कोणत्याही प्रकारचा त्रास  झाल्यास त्याला लगेचच मदत मिळेल अशी व्यवस्था करण्यात आली. 

पूर्व, पश्चिम, मध्य आणि फुलंब्री मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात वैद्यकीय कक्षदेखील तयार करण्यात आला होता.   या कक्षात दोन खाटा, ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, सलाइनची व्यवस्था करण्यात आली.  मेल्ट्रॉन रुग्णालयात पन्नास खाटांचा उष्माघात कक्ष सुरू करण्यात आला होता. 

पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) पूर्व, पश्चिम, मध्य आणि फुलंब्री मतदार संघातील मतदान केंद्रांसाठी ३११ वैद्यकीय पथके आणि २३ रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक वैद्यकीय पथकाकडे मेडिकल कीट देण्यात आले होते. मतदान केंद्रातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना किंवा मतदान करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना आरोग्यदृष्ट्या काही त्रास होऊ लागल्यास त्यांच्यावर लगेचच उपचार करण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली होती. वैद्यकीय पथकांवर नियंत्रण देण्यासाठी 'स्मार्ट सिटी' कार्यालयात कंट्रोल रुम तयार करण्यात आले होते

पालिका क्षेत्रातील मतदान केंद्रांमध्ये देखभाल दुरुस्तीची कामे  महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाकडून करून  घेण्यात आली. 

अशा प्रकारे छत्रपती संभाजीनगर महापालिकेने 'स्वीप' अंतर्गत फक्त मतदान जागृती अभियान राबविले नाही; तर ते  महापालिका क्षेत्रात प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी  मतदान केंद्रांवर उत्तम  नागरीसुविधांचीही व्यवस्था केली.



Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

Tuesday, April 30, 2024

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांचे मतदार जागृती अभियान

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी' अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी  स्थानिक स्वराज्य संस्था युद्धपातळीव काम करीत आहेत. "सिस्टमॅटिक व्होटर्स एज्युकेशन ऍण्ड इलेक्‍ट्रोरल पार्टीसिपेशन" (स्वीप)  या उपक्रमातंर्गत स्थानिक स्वराज्यसंस्थांच्या शाळांनी मतदार जागृती अभियान  राबविण्यास सुरुवात केले आहे. या अभियानास विद्यार्थी आणि शिक्षकांचा चांगला सहभाग लाभत आहे. 

कोल्हापूर महानगरपालिका : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी कोल्हापूर महानगरपालिका सज्ज झाली आहे. कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्राथमिक, माध्यमिक शाळांतील विद्यार्थीनींनी रांगोळी रेखाटून मतदार जागृती अभियान आपला सहभाग नोंदवला. रांगोळीच्या माध्यमातून 'व्होट इंडिया', 'जो हैं सच्चा और इमानदार, वही हैं देश का हकदार' असे संदेश दिले.  विद्यार्थीनींनी आपल्या घराच्या परिसरात मतदान जागृती करणारी घोषवाक्य लिहून लावली आहेत. 'जागरूक मतदार लोकशाहीचा आधार', 'मतदान हा अधिकार नाही, तर कर्तव्य सुद्धा आहे' ही घोषवाक्य लक्ष वेधून घेत आहेत.   विद्यार्थ्यांनी पालकांना पात्र लिहून मतदानाचा हक्क बजावणे किती महत्त्वाचे आहे ते पटवून दिले आहे.  विद्यार्थ्यांच्या मार्फत मतदान जनजागृती बाबत शाळा परिसरात प्रभात फेरी काढण्यात आली. "सोडा सर्व काम. चला करू मतदान", "मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो", "जन मन का यहा नारा है, मतदान अधिकार हमारा है", "मतदान हा अधिकार नाही, तर कर्तव्य सुद्धा आहे" अशा घोषणा लिहिलेले फलक हाती घेत, नारे देत मतदार जागृती अभियान विद्यार्थ्यांनी प्रभात फेरीद्वारे शिक्षकांच्या साथीने राबविले. शिक्षकांद्वारे पथनाट्यांतून  मतदान जनजागृती करण्यात आली. 

जळगाव महानगरपालिका :  जागरुक मतदार हा लोकशाहीचा रक्षक असतो.  लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत जागरुक मतदारामध्ये मतदान जनजागृती निर्माण कारण्यासाठी जळगाव महानगरपालिकेतर्फे मनपा शाळांमधील इयत्ता ६ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांची काव्यरत्नावली चौकातील भाऊंच्या उद्यानात चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. यात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या चित्रांद्वारे मतदार जनजागृती विषयांवर संदेश संबोधित केले. यावेळी चित्रकला स्पर्धेत सहभागी  विद्यार्थ्यांच्या पालाकांना मतदान करण्याची  प्रतिज्ञा देण्यात आली. 

पनवेल महानगरपालिका :  सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४  च्या पार्श्वभूमीवर  पनवेल महापालिकेच्या लोकनेते दि.बा पाटील विद्यालय व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळा पोदी यांच्यावतीने मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रभातफेरी काढण्यात आली. या उपक्रमात शाळेच्या सर्व शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने या प्रभात फेरीमध्ये सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी "मतदार राजा जागा हो.. लोकशाहीचा धागा हो...",  "वोट देने जाना है... देश को आगे बढाना है... ", "आपल्या मताचे दान आहे लोकशाहीची शान"  अशा घोषणा देत नागरीक, व्यावसायिक, फळ, भाजी विक्रेते या मतदारांमध्ये मतदान करण्यासाठी जनजागृती केली. महापालिका शाळा क्रमांक ४ मध्ये रांगोळी  स्पर्धांच्या माध्यमातून महापालिकेद्वारे विद्यार्थ्यांच्या मदतीने  मतदार जनजागृती करण्यात आली.  पनवेल मनपा शाळा क्रमांक ८ च्यावतीने मतदानावर आधारित घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली;  तर गुजराती शाळा क्रमांक ९ मध्ये रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पना शक्तीचा वापर करून सुंदर अशी चित्रे व रांगोळ्या व घोष वाक्य लिहिल. 

सुमारे २ लाख विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ‘मतदान करणे हे प्रत्येक नागरिकांचे प्रथम कर्तव्य आहे, हे कर्तव्य बजावत असताना सुजाण नागरिक म्हणून तुम्ही निवडणुकीत मतदान करा’ अशा आशयाच्या पत्रांचे वाटप करण्यात आले. याचबरोबर महापालिकेच्या लोकनेते दि.बा.पाटील विद्यालयामध्ये पालकसभा व व्यवस्थापन समितीच्या सभा घेऊन ‘ देशाची लोकशाही व्यवस्था मजबूत करण्यासाठी नागरिकांनी मतदान करणे गरजेचे असल्याचा’ संदेश पालकांना देण्यात आला.

छत्रपती संभाजीनगर महापालिका :  छत्रपती संभाजीनगर महापालिकेने गुढीपाडवाच्या दिवशी  शहरांतून निघणाऱ्या शोभायात्रांमधून मतदार जागृती केली. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या प्रियदर्शिनी शाळेतील विद्यार्थ्यांनी मतदार जागृतीसाठी पथनाट्य केले आणि शाळेलगतच्या वसाहतींमधून शोभायात्रा काढली. शोभायात्रेत प्रियदर्शिनी शाळेच्या विद्यार्थ्यांसह महापालिकेच्या गारखेडा व उस्मानपुरा शाळेचे विद्यार्थीही सहभागी झाले होते. 'गुढीपाडवा, मतदान वाढवा' असा संदेश विद्यार्थ्यांनी दिला. शोभायात्रेत सुमारे दोन हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. या उपक्रमांतर्गत पालक मेळावा घेण्यातआला. उस्मानपुरा शाळेच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून मतदान करण्याविषयी नागरिकांना आवाहन केले. 

चंद्रपूर महानगरपालिका : लोकशाहीच्या मजबुतीकरणासोबतच मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून "सिस्टमॅटिक व्होटर्स एज्युकेशन ऍण्ड इलेक्‍ट्रोरल पार्टीसिपेशन" (स्वीप) हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा आरंभ चंद्रपूर महापालिकेने मनपा शाळांपासून केला. स्वीप अंतर्गत चंद्रपूर मनपाने शालेय विद्यार्थ्यांकडून संकल्पपत्र लिहून घेत,  पालकांना मतदानासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न केला.  संकल्पपत्रातील  संदेशानुसार विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना पत्र लिहुन निवडणुकीमध्ये मतदान करण्याचे आवाहन केले. 

लोकशाहीच्या मजबुतीकरणात शिक्षण क्षेत्राचा वाटा महत्त्वाचा आहे. हे पुन्हा एकदा  'लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४'च्या  जनजागृती अभियानास विद्यार्थी आणि शिक्षक  वर्गांनी सहभाग नोंदवून पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

लोकसभा सार्वत्रीक निवडणूक २०२४ : मतदारांसाठी लक्षवेधी ठरणाऱ्या आरोग्य आणि परिवहन सुविधा

'लोकसभा सार्वत्रीक निवडणूक २०२४'  महाराष्ट्र सज्ज झाला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्य्यातील मतदान झाले आहे.  मतदानाचे तीन टप्पे शिल्लक आहेत.  पहिल्या दोन टप्प्यात मतदान करतानाचे नागरिकांचे आणि निवडणूक आयोगाचे  अनुभव पाहता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी मतदानावर परिणाम होऊ नये यासाठी उपाययोजना आखल्या आहेत. 

मुंबईत मतदानावेळी मतदान केंद्रांवर येणाऱ्या नागरिकांना उष्माघात व अन्य त्रास होऊ नयेयासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आता मुंबईत सुरू करण्यात आलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हेसुद्धा मतदान केंद्रांशी जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे मतदान केंद्रांवर आरोग्य सुविधा पुरविणे सोपे होणार आहे.

मुंबईत २० मे रोजी मतदान होणार आहे. मुंबईत ९ हजार ८६२मतदान केंद्रे आहेत. त्यात शहरात २ हजार ५०९ तर उपनगरात ७ हजार ३५३ मतदान केंद्रे आहेत. मतदान केंद्रांवर मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांना उन्हामध्ये रांगा लावाव्या लागणार आहेत. मे महिना हा उन्हाळ्याचा महिना असल्याने या कालावधीत अधिक तापमान असण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता निवडणूक आयोगाकडून केंद्रावर येणाऱ्या नागरिकांसाठी आरोग्य सुविधा पुरविण्यात येणार आहे. मतदान केंद्रांवर आरोग्य सेवा पुरविण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाकडून मुंबई पालिकेवर सोपविण्यात आली आहे. . त्यामुळे  मुंबई महानगरपालिकेने निवडणूक केंद्रांवर आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आपला दवाखाना, आरोग्य केंद्र आणि डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. 

निवडणूक आयोगाच्या स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदान जनजागृतीसाठी येवला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मा. किरण देशमुख यांनी डॉक्टर असोसिएशनची बैठक घेतली.  या बैठकीला शहरातील डॉक्टर असोसिएशनचा चांगला प्रतिसाद लाभला. मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावलेल्या मतदारांसाठी सवलत देण्याची भूमिका येवला नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी  जाहीर केली. त्यानुसार  जे नागरिक २० मे २०२४ ला मतदान करतील त्यांना आरोग्य तपासणी फी व इंजेक्शन फी यात सवलत देण्याचे डॉक्टर असोसिएशन यांच्यातर्फे कळवण्यात आले. तसेच शहरात व तालुक्यात उष्माघातामुळे नागरिकांना त्रास होऊ नये  याकरिता मतदान केंद्रांवर डॉक्टर असोसिएशनची टीम उपलब्ध राहून सेवा पुरवण्याचा निर्णय यावेळी डॉक्टर असोसिएशन कमिटीतर्फे घेण्यात आला. 

निवडणुकीत मतदान केंद्रापर्यंत पोहोचताना दिव्यांग उमेदवारांच्या वाट्याला येणारा मनस्ताप टाळण्यासाठी बेस्ट प्रशासनाने एक  महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.   दिव्यांग उमेदवारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी बेस्ट उपक्रमाची एसी बससेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोग, समाज कल्याण विभाग आणि बेस्ट उपक्रमाकडून ही सुविधा उपलब्ध केली जाणार असून लवकरच याबाबत निर्णय होईल. या मतदारांना कोणतेही शुल्क भरावे  लागणार नाही.  सध्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांतीलच मतदारांसाठी या बेस्ट सेवेचा विचार होत आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ४० टक्क्यांहून अधिक अपंगत्व असलेल्या दिव्यांग आणि ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी 'व्होट फ्रॉम होम' ही घरबसल्या मतदान करण्याची सुविधा दिली आहे. मात्र ज्या मतदारांना मतदान केंद्रात जाऊन मतदान करण्याची इच्छा असेल, त्यांच्यासाठी बेस्टची एसी सेवा दिली जाणार आहे. मुंबई उपनगरांतील निवडणुकीच्या दिवशी ही सेवा  दिव्यांगासाठी देण्यात येणार आहे.

ज्येष्ठ नागरीकांसाठीही मतदानाच्या दिवशी या  बस सेवा  उपलब्ध केल्या जाणार आहेत.  त्यासाठी कोणत्या भागांत किती ज्येष्ठ नागरीक आहे, याची सविस्तर माहिती बेस्ट उपक्रमाला दिली जाणार आहे. त्यानुसार त्या-त्या भागांत बेस्टची सुविधा सकाळी मतदान सुरू होण्यापासून उपलब्ध केली जाईल. 

निवडणूक काळात निवडणूक कर्मचाऱ्यांची तसेच पोलिसांची वाहतूक करण्यासाठीही निवडणूक आयोगाने बेस्ट बसगाड्या उपलब्ध करण्यास सांगितले आहे. त्यावरही सध्या चर्चा सुरू आहे. ५०० हून अधिक बस उपलब्ध करण्याचे नियोजन असून यामध्ये ५० बस पोलिस आणि निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी असणार आहेत. 

अशा विविध लोकोपयोगी उपक्रमांद्वारे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाच्या रुपाने लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी सज्ज झाल्या आहे.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

Thursday, April 25, 2024

चंद्रपूर महापालिका आणि मतदार जागृती अभियान

१९ एप्रिल २०२४  रोजी सकाळी ७  ते सायंकाळी ६ या वेळेत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात  'लोकसभा निवडणूक २०२४' साठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. या मतदानास नागरिकांचा समाधानकारक प्रतिसाद लाभला. याचे श्रेय चंद्रपूर महानगरपालिकेला जाते.  लोकसभा निवडणूक २०२४' साठी  मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासनामार्फत विविध प्रयत्न केले गेले. चंद्रपूर महानगरपालिकेनेही केले. 

लोकशाहीच्या मजबुतीकरणासोबतच मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून "सिस्टमॅटिक व्होटर्स एज्युकेशन ऍण्ड इलेक्‍ट्रोरल पार्टीसिपेशन" (स्वीप) हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा आरंभ चंद्रपूर महापालिकेने मनपा शाळांपासून केला. स्वीप अंतर्गत चंद्रपूर मनपाने शालेय विद्यार्थ्यांकडून संकल्पपत्र लिहून घेत,  पालकांना मतदानासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न केला.  संकल्पपत्रातील  संदेशानुसार विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना पत्र लिहुन निवडणुकीमध्ये मतदान करण्याचे आवाहन केले. 

मतदार संघांतर्गत समाविष्ट असलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांचा मतदान प्रक्रियेत शंभर टक्के सहभाग असावा, त्यांना मतदान प्रक्रियेची माहिती व्हावी, सक्षम लोकशाहीसाठी सर्वांनी मतदानाचा हक्क निर्भीड आणि निरपेक्षपणे बजावावा यासाठी मतदारांमध्ये जाणीव, जागृती निर्माण व्हावी म्हणून स्वीप अंतर्गत सर्व विद्यार्थी व पालक यांच्याकडून संकल्प पत्र भरून घेण्यात आले.  यामध्ये तयार केलेल्या संकल्प पत्राची प्रत शालेय विद्यार्थ्यांमार्फत त्यांच्या पालकांना देण्यात आली. चंद्रपूर मनपा शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला गेला. 

 मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी  नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचून ‘मतदार चिठ्ठी’ चे वाटप प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. 'मतदार चिठ्ठी'द्वारे आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करता येते. तसेच मतदान केंद्र कुठे आहे याचीही माहिती मिळते.  चंद्रपूर महापालिकेनेही ‘मतदार चिठ्ठी’ चे  वाटप केले. या वाटपादरम्यान ज्या नागरिकांना मतदार चिट्ठी मिळाली नसेल त्यांना आपल्या बूथ लेव्हल ऑफिसरशी (बीएलओ) संपर्क करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. तसेच  व्होटर हेल्पलाईन ॲपवर जाऊन व्होटर सर्विसेसमध्ये, नो युवर पोलिंग स्टेशन डिटेल्समध्ये जाऊन आपला व्होटींग कार्ड नंबर (Epic Number ) टाकून कशी माहिती करून घेता येईल त्याविषयी जनजागृती केली.  त्याचप्रमाणे https://electoralsearch.eci.gov.in/pollingstation  या लिंकवर जाऊन   'मतदार चिठ्ठी'ची कशी माहिती करती येईल याविषयी नागरिकांना मार्गदर्शन केले.  चंद्रपूर महानगरपालिकेने 'मतदार चिठ्ठी'च्या माहितीसाठी  18001237980 हा टोल फ्री क्रमांकही उपलब्ध करून दिला.  

मतदान हा आपला हक्क असला तरी अनेकदा त्याबाबत उदासीनता असते. त्यामुळे मतदारांमध्ये  याबाबत जागरूक वाढवणे आवश्यक आहे . मतदान केंद्रावर जाण्यास कंटाळा, सुटीचा दिवस,अनास्था अश्या विविध कारणांनी मतदानाचा टक्का खालावतो. मतदान वाढावे यासाठी शासकीय यंत्रणा तर प्रयत्नरत आहेच,मात्र त्याला संस्था,आस्थापना,व्यावसायिक यांची साथ मिळाल्यास निश्चितच मतदान जनजागृती होणार आहे.  या संदर्भात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आणि नागरिकांना त्यांचे मताधिकार वापरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी शहरातील आस्थापनांनी पुढे येत प्रेरीत उपक्रम राबविण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त मा. श्री. विपीन पालीवाल यांनी केले. .या संदर्भात शहरातील विविध आस्थापनांची बैठक १२ एप्रिल २०२४ ला चंद्रपूर महानगरपालिका  सभागृहात आयोजीत करण्यात आली होती.  

चंद्रपूर शहरातील उपहारगृह,मॉल,चित्रपटगृह, दुकानं इत्यादी  आस्थापनांनी, मतदान करणाऱ्या नागरिकांसाठी काही योजना राबविल्यास नागरिक मतदान करण्यास प्रोत्साहीत होऊन शहराची मतदान टक्केवारी वाढणं शक्य आहे.  शहरी मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी मतदानाला प्रोत्साहीत करणारे अशाप्रकारचे उपक्रम घेत  शहरातील आस्थापनांनी सहयोग करण्याचे आवाहन मा. आयुक्तांद्वारे बैठकीत करण्यात आले.

१९ एप्रिल रोजी जे नागरीक मतदान करतील, ज्यांच्या बोटाला शाई असेल त्यांना १९  व  २०  एप्रिल रोजी आझाद बगीच्यात मोफत प्रवेश दिला जाणार असल्याची घोषणा चंद्रपूर महानगरपालिकेने केली. 

चंद्रपूर महानगरपालिकेने  'स्वीप' अंतर्गत केलेल्या मतदार जागृती अभियानाचा फरक सकारात्मक झाला. नागरिकांचे मतदान करण्याच्या प्रमाणात वाढ झाली.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

लोककला, लोकसंस्कृतीचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या पात्रांच्या माध्यमातून मतदान जागृती

'लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४' साठी महाराष्ट्रातील  विविध स्थानिक स्वराज्य संस्थानी मतदान जागृती अभियान हाती घेतले आहे. या अभियानासाठी लोककलांचा आधार घेतला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख नगरपंचायतीने मतदान जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. कोकणची लोककला असलेल्या 'नमन' या लोककलेच्या माध्यमातून मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य असून, त्याचे भान नागरिकांना रहावे, मतदानाच्या दिवशी सर्व नागरिकांनी मतदान करावे व आपला हक्क आणि कर्तव्य बजावावे, असा संदेश नमन लोककलेमधील गौळण व वग या माध्यमातून देण्यात आला.

नमन या लोककलेच्या माध्यमातून देवरुख नगरपंचायतीच्या पाणी पुरवठा कर व स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांनी मतदानाची जनजागृती सुरू केली आहे. या नमनमधील गौळण प्रकारात नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी मावशी, गौळण आणि पेंद्या या भूमिका  साकारल्या. तसेच 'वग' प्रकारात राजा, काळू-बाळू भूमिकाही देवरुख नागरपंचायातीच्या कर्मचाऱ्यांनी साकारल्या. कर्मचाऱ्यांनी साकारलेल्या भूमिकांना  प्रेक्षकांची वाहवा मिळाली. या नमनात  ढोलकी, कीबोर्ड साथही नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी दिली.

मातृ मंदिर चौक व देवरुख बसस्थानक येथे जनजागृती करण्यात आली. ७ मे २०२४ रोजी सर्व नागरिकांनी आपले अमूल्य मत देऊन मतदान करावे, असे आवाहनही 'नमन'च्या माध्यमातून देण्यात आले. 

लोकशाही टिकवा, मतदान करा' असा संदेश देत  वासुदेव वसई-विरार शहरातील रस्त्यावर आणि नाक्यांवर फिरत आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी अधिकाअधिक नागरिकांनी मतदान करावे, यासाठी वसई-विरार महापालिकेने लोकसंस्कृतीचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या 'वासुदेव' या  प्रमुख पात्राच्या रुपात जनजागृती सुरू केली आहे.

वासुदेव आणि महाराष्ट्राचे एक वेगळे नाते आहे. डोक्यावर मोरपिसांची टोपी हातात टाळ आणि तोंडात संतांचे अभंग असे लोभसवाणे रूप घेऊन वासुदेव नेहमी शहरांत गावात सकाळी फिरत असतो वंशपरंपरागत हा भिक्षुकीच्या व्यवसाय करणाऱ्या वासुदेवाचे दर्शन आजही अधूनमधून होत असते. अशाच वासुदेवाचे दर्शन सध्या वसई-विरार परिसरात सध्या सर्वांना होताना दिसत आहे. पूर्वीच्या काळात वासुदेव घरधनीच्या पित्तरांचे गोडवे गात प्रभुनामाची लोकगीते गात असे. वसईत दिसणारा हा वासुदेव मात्र लोकशाहीचा जागर करतोय. लोकशाही टिकविण्यासाठी मतदान करा, असे आवाहन हा वासुदेव लोकांना करत आहे.

वसई-विरार महापालिकेतर्फे मतदार जनजागृती आणि सहभाग कार्यक्रम (एसव्हीपी) सुरू करण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून वासुदेवाच्या रुपात नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. 'पायवाट; प्रॉडक्शनतर्फे हा वासुदेवाच्या पात्राची निर्मिती करण्यात आली आहे. हा वासुदेव ठिकठिकाणी फिरून लोकांना मतदानाचे महत्व पटवून देत आहे. आपले एक मत महत्वाचे आहे. एक मत देशाचे भवितव्य ठरविणा आहे. ते मत वाया घालवू नका, २० मे २०२४  रोजी मतदान करण्यासाठी केंद्रावर नक्की या, असे आवाहन हा वासुदेव लोकांना करत आहे. शहरातील चौक गर्दीची ठिकाणे या ठिकाणी हा वासुदेव लोकगीतातून लोकांना मतदानाने आवाहन करत आहे.

महाराष्ट्र संस्कृती आणि पंरपरेत वासुदेवाचे स्थान आहे. त्याची वेशभूषा आणि मधाळ वाणी आजही लोकांना आकर्षित करते. त्यामुळे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या वासुदेवाचा आधार घेण्यात आला आहे. त्याला बघण्यासाठी ऐकण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे.वासुदेवाच्या या आवाहनामुळे नागरीक मतदानासाठी मोठ्या  उत्साहाने बाहेर पडतील आणि आपले कर्तव्य पार पाडतील या उद्देशापोटी  मतदार जागृती अभियासाठी वासुदेवाची निवड केली आहे.

एकंदरीत लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी लोककला, लोकसंस्कृतीचा माध्यम म्हणून केलेल्या वापरास नागरिकांचाही उत्तम प्रतिसाद लाभत आहे.  कदाचित मतदानाचा टक्का वाढविण्याची ही सुरुवात असावी.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...