Tuesday, April 30, 2024

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांचे मतदार जागृती अभियान

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी' अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी  स्थानिक स्वराज्य संस्था युद्धपातळीव काम करीत आहेत. "सिस्टमॅटिक व्होटर्स एज्युकेशन ऍण्ड इलेक्‍ट्रोरल पार्टीसिपेशन" (स्वीप)  या उपक्रमातंर्गत स्थानिक स्वराज्यसंस्थांच्या शाळांनी मतदार जागृती अभियान  राबविण्यास सुरुवात केले आहे. या अभियानास विद्यार्थी आणि शिक्षकांचा चांगला सहभाग लाभत आहे. 

कोल्हापूर महानगरपालिका : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी कोल्हापूर महानगरपालिका सज्ज झाली आहे. कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्राथमिक, माध्यमिक शाळांतील विद्यार्थीनींनी रांगोळी रेखाटून मतदार जागृती अभियान आपला सहभाग नोंदवला. रांगोळीच्या माध्यमातून 'व्होट इंडिया', 'जो हैं सच्चा और इमानदार, वही हैं देश का हकदार' असे संदेश दिले.  विद्यार्थीनींनी आपल्या घराच्या परिसरात मतदान जागृती करणारी घोषवाक्य लिहून लावली आहेत. 'जागरूक मतदार लोकशाहीचा आधार', 'मतदान हा अधिकार नाही, तर कर्तव्य सुद्धा आहे' ही घोषवाक्य लक्ष वेधून घेत आहेत.   विद्यार्थ्यांनी पालकांना पात्र लिहून मतदानाचा हक्क बजावणे किती महत्त्वाचे आहे ते पटवून दिले आहे.  विद्यार्थ्यांच्या मार्फत मतदान जनजागृती बाबत शाळा परिसरात प्रभात फेरी काढण्यात आली. "सोडा सर्व काम. चला करू मतदान", "मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो", "जन मन का यहा नारा है, मतदान अधिकार हमारा है", "मतदान हा अधिकार नाही, तर कर्तव्य सुद्धा आहे" अशा घोषणा लिहिलेले फलक हाती घेत, नारे देत मतदार जागृती अभियान विद्यार्थ्यांनी प्रभात फेरीद्वारे शिक्षकांच्या साथीने राबविले. शिक्षकांद्वारे पथनाट्यांतून  मतदान जनजागृती करण्यात आली. 

जळगाव महानगरपालिका :  जागरुक मतदार हा लोकशाहीचा रक्षक असतो.  लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत जागरुक मतदारामध्ये मतदान जनजागृती निर्माण कारण्यासाठी जळगाव महानगरपालिकेतर्फे मनपा शाळांमधील इयत्ता ६ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांची काव्यरत्नावली चौकातील भाऊंच्या उद्यानात चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. यात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या चित्रांद्वारे मतदार जनजागृती विषयांवर संदेश संबोधित केले. यावेळी चित्रकला स्पर्धेत सहभागी  विद्यार्थ्यांच्या पालाकांना मतदान करण्याची  प्रतिज्ञा देण्यात आली. 

पनवेल महानगरपालिका :  सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४  च्या पार्श्वभूमीवर  पनवेल महापालिकेच्या लोकनेते दि.बा पाटील विद्यालय व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळा पोदी यांच्यावतीने मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रभातफेरी काढण्यात आली. या उपक्रमात शाळेच्या सर्व शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने या प्रभात फेरीमध्ये सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी "मतदार राजा जागा हो.. लोकशाहीचा धागा हो...",  "वोट देने जाना है... देश को आगे बढाना है... ", "आपल्या मताचे दान आहे लोकशाहीची शान"  अशा घोषणा देत नागरीक, व्यावसायिक, फळ, भाजी विक्रेते या मतदारांमध्ये मतदान करण्यासाठी जनजागृती केली. महापालिका शाळा क्रमांक ४ मध्ये रांगोळी  स्पर्धांच्या माध्यमातून महापालिकेद्वारे विद्यार्थ्यांच्या मदतीने  मतदार जनजागृती करण्यात आली.  पनवेल मनपा शाळा क्रमांक ८ च्यावतीने मतदानावर आधारित घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली;  तर गुजराती शाळा क्रमांक ९ मध्ये रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पना शक्तीचा वापर करून सुंदर अशी चित्रे व रांगोळ्या व घोष वाक्य लिहिल. 

सुमारे २ लाख विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ‘मतदान करणे हे प्रत्येक नागरिकांचे प्रथम कर्तव्य आहे, हे कर्तव्य बजावत असताना सुजाण नागरिक म्हणून तुम्ही निवडणुकीत मतदान करा’ अशा आशयाच्या पत्रांचे वाटप करण्यात आले. याचबरोबर महापालिकेच्या लोकनेते दि.बा.पाटील विद्यालयामध्ये पालकसभा व व्यवस्थापन समितीच्या सभा घेऊन ‘ देशाची लोकशाही व्यवस्था मजबूत करण्यासाठी नागरिकांनी मतदान करणे गरजेचे असल्याचा’ संदेश पालकांना देण्यात आला.

छत्रपती संभाजीनगर महापालिका :  छत्रपती संभाजीनगर महापालिकेने गुढीपाडवाच्या दिवशी  शहरांतून निघणाऱ्या शोभायात्रांमधून मतदार जागृती केली. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या प्रियदर्शिनी शाळेतील विद्यार्थ्यांनी मतदार जागृतीसाठी पथनाट्य केले आणि शाळेलगतच्या वसाहतींमधून शोभायात्रा काढली. शोभायात्रेत प्रियदर्शिनी शाळेच्या विद्यार्थ्यांसह महापालिकेच्या गारखेडा व उस्मानपुरा शाळेचे विद्यार्थीही सहभागी झाले होते. 'गुढीपाडवा, मतदान वाढवा' असा संदेश विद्यार्थ्यांनी दिला. शोभायात्रेत सुमारे दोन हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. या उपक्रमांतर्गत पालक मेळावा घेण्यातआला. उस्मानपुरा शाळेच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून मतदान करण्याविषयी नागरिकांना आवाहन केले. 

चंद्रपूर महानगरपालिका : लोकशाहीच्या मजबुतीकरणासोबतच मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून "सिस्टमॅटिक व्होटर्स एज्युकेशन ऍण्ड इलेक्‍ट्रोरल पार्टीसिपेशन" (स्वीप) हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा आरंभ चंद्रपूर महापालिकेने मनपा शाळांपासून केला. स्वीप अंतर्गत चंद्रपूर मनपाने शालेय विद्यार्थ्यांकडून संकल्पपत्र लिहून घेत,  पालकांना मतदानासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न केला.  संकल्पपत्रातील  संदेशानुसार विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना पत्र लिहुन निवडणुकीमध्ये मतदान करण्याचे आवाहन केले. 

लोकशाहीच्या मजबुतीकरणात शिक्षण क्षेत्राचा वाटा महत्त्वाचा आहे. हे पुन्हा एकदा  'लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४'च्या  जनजागृती अभियानास विद्यार्थी आणि शिक्षक  वर्गांनी सहभाग नोंदवून पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

No comments:

Post a Comment

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...