Tuesday, April 30, 2024

लोकसभा सार्वत्रीक निवडणूक २०२४ : मतदारांसाठी लक्षवेधी ठरणाऱ्या आरोग्य आणि परिवहन सुविधा

'लोकसभा सार्वत्रीक निवडणूक २०२४'  महाराष्ट्र सज्ज झाला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्य्यातील मतदान झाले आहे.  मतदानाचे तीन टप्पे शिल्लक आहेत.  पहिल्या दोन टप्प्यात मतदान करतानाचे नागरिकांचे आणि निवडणूक आयोगाचे  अनुभव पाहता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी मतदानावर परिणाम होऊ नये यासाठी उपाययोजना आखल्या आहेत. 

मुंबईत मतदानावेळी मतदान केंद्रांवर येणाऱ्या नागरिकांना उष्माघात व अन्य त्रास होऊ नयेयासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आता मुंबईत सुरू करण्यात आलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हेसुद्धा मतदान केंद्रांशी जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे मतदान केंद्रांवर आरोग्य सुविधा पुरविणे सोपे होणार आहे.

मुंबईत २० मे रोजी मतदान होणार आहे. मुंबईत ९ हजार ८६२मतदान केंद्रे आहेत. त्यात शहरात २ हजार ५०९ तर उपनगरात ७ हजार ३५३ मतदान केंद्रे आहेत. मतदान केंद्रांवर मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांना उन्हामध्ये रांगा लावाव्या लागणार आहेत. मे महिना हा उन्हाळ्याचा महिना असल्याने या कालावधीत अधिक तापमान असण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता निवडणूक आयोगाकडून केंद्रावर येणाऱ्या नागरिकांसाठी आरोग्य सुविधा पुरविण्यात येणार आहे. मतदान केंद्रांवर आरोग्य सेवा पुरविण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाकडून मुंबई पालिकेवर सोपविण्यात आली आहे. . त्यामुळे  मुंबई महानगरपालिकेने निवडणूक केंद्रांवर आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आपला दवाखाना, आरोग्य केंद्र आणि डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. 

निवडणूक आयोगाच्या स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदान जनजागृतीसाठी येवला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मा. किरण देशमुख यांनी डॉक्टर असोसिएशनची बैठक घेतली.  या बैठकीला शहरातील डॉक्टर असोसिएशनचा चांगला प्रतिसाद लाभला. मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावलेल्या मतदारांसाठी सवलत देण्याची भूमिका येवला नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी  जाहीर केली. त्यानुसार  जे नागरिक २० मे २०२४ ला मतदान करतील त्यांना आरोग्य तपासणी फी व इंजेक्शन फी यात सवलत देण्याचे डॉक्टर असोसिएशन यांच्यातर्फे कळवण्यात आले. तसेच शहरात व तालुक्यात उष्माघातामुळे नागरिकांना त्रास होऊ नये  याकरिता मतदान केंद्रांवर डॉक्टर असोसिएशनची टीम उपलब्ध राहून सेवा पुरवण्याचा निर्णय यावेळी डॉक्टर असोसिएशन कमिटीतर्फे घेण्यात आला. 

निवडणुकीत मतदान केंद्रापर्यंत पोहोचताना दिव्यांग उमेदवारांच्या वाट्याला येणारा मनस्ताप टाळण्यासाठी बेस्ट प्रशासनाने एक  महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.   दिव्यांग उमेदवारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी बेस्ट उपक्रमाची एसी बससेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोग, समाज कल्याण विभाग आणि बेस्ट उपक्रमाकडून ही सुविधा उपलब्ध केली जाणार असून लवकरच याबाबत निर्णय होईल. या मतदारांना कोणतेही शुल्क भरावे  लागणार नाही.  सध्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांतीलच मतदारांसाठी या बेस्ट सेवेचा विचार होत आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ४० टक्क्यांहून अधिक अपंगत्व असलेल्या दिव्यांग आणि ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी 'व्होट फ्रॉम होम' ही घरबसल्या मतदान करण्याची सुविधा दिली आहे. मात्र ज्या मतदारांना मतदान केंद्रात जाऊन मतदान करण्याची इच्छा असेल, त्यांच्यासाठी बेस्टची एसी सेवा दिली जाणार आहे. मुंबई उपनगरांतील निवडणुकीच्या दिवशी ही सेवा  दिव्यांगासाठी देण्यात येणार आहे.

ज्येष्ठ नागरीकांसाठीही मतदानाच्या दिवशी या  बस सेवा  उपलब्ध केल्या जाणार आहेत.  त्यासाठी कोणत्या भागांत किती ज्येष्ठ नागरीक आहे, याची सविस्तर माहिती बेस्ट उपक्रमाला दिली जाणार आहे. त्यानुसार त्या-त्या भागांत बेस्टची सुविधा सकाळी मतदान सुरू होण्यापासून उपलब्ध केली जाईल. 

निवडणूक काळात निवडणूक कर्मचाऱ्यांची तसेच पोलिसांची वाहतूक करण्यासाठीही निवडणूक आयोगाने बेस्ट बसगाड्या उपलब्ध करण्यास सांगितले आहे. त्यावरही सध्या चर्चा सुरू आहे. ५०० हून अधिक बस उपलब्ध करण्याचे नियोजन असून यामध्ये ५० बस पोलिस आणि निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी असणार आहेत. 

अशा विविध लोकोपयोगी उपक्रमांद्वारे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाच्या रुपाने लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी सज्ज झाल्या आहे.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

No comments:

Post a Comment

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...