Thursday, April 25, 2024

लोककला, लोकसंस्कृतीचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या पात्रांच्या माध्यमातून मतदान जागृती

'लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४' साठी महाराष्ट्रातील  विविध स्थानिक स्वराज्य संस्थानी मतदान जागृती अभियान हाती घेतले आहे. या अभियानासाठी लोककलांचा आधार घेतला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख नगरपंचायतीने मतदान जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. कोकणची लोककला असलेल्या 'नमन' या लोककलेच्या माध्यमातून मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य असून, त्याचे भान नागरिकांना रहावे, मतदानाच्या दिवशी सर्व नागरिकांनी मतदान करावे व आपला हक्क आणि कर्तव्य बजावावे, असा संदेश नमन लोककलेमधील गौळण व वग या माध्यमातून देण्यात आला.

नमन या लोककलेच्या माध्यमातून देवरुख नगरपंचायतीच्या पाणी पुरवठा कर व स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांनी मतदानाची जनजागृती सुरू केली आहे. या नमनमधील गौळण प्रकारात नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी मावशी, गौळण आणि पेंद्या या भूमिका  साकारल्या. तसेच 'वग' प्रकारात राजा, काळू-बाळू भूमिकाही देवरुख नागरपंचायातीच्या कर्मचाऱ्यांनी साकारल्या. कर्मचाऱ्यांनी साकारलेल्या भूमिकांना  प्रेक्षकांची वाहवा मिळाली. या नमनात  ढोलकी, कीबोर्ड साथही नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी दिली.

मातृ मंदिर चौक व देवरुख बसस्थानक येथे जनजागृती करण्यात आली. ७ मे २०२४ रोजी सर्व नागरिकांनी आपले अमूल्य मत देऊन मतदान करावे, असे आवाहनही 'नमन'च्या माध्यमातून देण्यात आले. 

लोकशाही टिकवा, मतदान करा' असा संदेश देत  वासुदेव वसई-विरार शहरातील रस्त्यावर आणि नाक्यांवर फिरत आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी अधिकाअधिक नागरिकांनी मतदान करावे, यासाठी वसई-विरार महापालिकेने लोकसंस्कृतीचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या 'वासुदेव' या  प्रमुख पात्राच्या रुपात जनजागृती सुरू केली आहे.

वासुदेव आणि महाराष्ट्राचे एक वेगळे नाते आहे. डोक्यावर मोरपिसांची टोपी हातात टाळ आणि तोंडात संतांचे अभंग असे लोभसवाणे रूप घेऊन वासुदेव नेहमी शहरांत गावात सकाळी फिरत असतो वंशपरंपरागत हा भिक्षुकीच्या व्यवसाय करणाऱ्या वासुदेवाचे दर्शन आजही अधूनमधून होत असते. अशाच वासुदेवाचे दर्शन सध्या वसई-विरार परिसरात सध्या सर्वांना होताना दिसत आहे. पूर्वीच्या काळात वासुदेव घरधनीच्या पित्तरांचे गोडवे गात प्रभुनामाची लोकगीते गात असे. वसईत दिसणारा हा वासुदेव मात्र लोकशाहीचा जागर करतोय. लोकशाही टिकविण्यासाठी मतदान करा, असे आवाहन हा वासुदेव लोकांना करत आहे.

वसई-विरार महापालिकेतर्फे मतदार जनजागृती आणि सहभाग कार्यक्रम (एसव्हीपी) सुरू करण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून वासुदेवाच्या रुपात नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. 'पायवाट; प्रॉडक्शनतर्फे हा वासुदेवाच्या पात्राची निर्मिती करण्यात आली आहे. हा वासुदेव ठिकठिकाणी फिरून लोकांना मतदानाचे महत्व पटवून देत आहे. आपले एक मत महत्वाचे आहे. एक मत देशाचे भवितव्य ठरविणा आहे. ते मत वाया घालवू नका, २० मे २०२४  रोजी मतदान करण्यासाठी केंद्रावर नक्की या, असे आवाहन हा वासुदेव लोकांना करत आहे. शहरातील चौक गर्दीची ठिकाणे या ठिकाणी हा वासुदेव लोकगीतातून लोकांना मतदानाने आवाहन करत आहे.

महाराष्ट्र संस्कृती आणि पंरपरेत वासुदेवाचे स्थान आहे. त्याची वेशभूषा आणि मधाळ वाणी आजही लोकांना आकर्षित करते. त्यामुळे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या वासुदेवाचा आधार घेण्यात आला आहे. त्याला बघण्यासाठी ऐकण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे.वासुदेवाच्या या आवाहनामुळे नागरीक मतदानासाठी मोठ्या  उत्साहाने बाहेर पडतील आणि आपले कर्तव्य पार पाडतील या उद्देशापोटी  मतदार जागृती अभियासाठी वासुदेवाची निवड केली आहे.

एकंदरीत लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी लोककला, लोकसंस्कृतीचा माध्यम म्हणून केलेल्या वापरास नागरिकांचाही उत्तम प्रतिसाद लाभत आहे.  कदाचित मतदानाचा टक्का वाढविण्याची ही सुरुवात असावी.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

No comments:

Post a Comment

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...