Tuesday, April 30, 2024

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांचे मतदार जागृती अभियान

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी' अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी  स्थानिक स्वराज्य संस्था युद्धपातळीव काम करीत आहेत. "सिस्टमॅटिक व्होटर्स एज्युकेशन ऍण्ड इलेक्‍ट्रोरल पार्टीसिपेशन" (स्वीप)  या उपक्रमातंर्गत स्थानिक स्वराज्यसंस्थांच्या शाळांनी मतदार जागृती अभियान  राबविण्यास सुरुवात केले आहे. या अभियानास विद्यार्थी आणि शिक्षकांचा चांगला सहभाग लाभत आहे. 

कोल्हापूर महानगरपालिका : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी कोल्हापूर महानगरपालिका सज्ज झाली आहे. कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्राथमिक, माध्यमिक शाळांतील विद्यार्थीनींनी रांगोळी रेखाटून मतदार जागृती अभियान आपला सहभाग नोंदवला. रांगोळीच्या माध्यमातून 'व्होट इंडिया', 'जो हैं सच्चा और इमानदार, वही हैं देश का हकदार' असे संदेश दिले.  विद्यार्थीनींनी आपल्या घराच्या परिसरात मतदान जागृती करणारी घोषवाक्य लिहून लावली आहेत. 'जागरूक मतदार लोकशाहीचा आधार', 'मतदान हा अधिकार नाही, तर कर्तव्य सुद्धा आहे' ही घोषवाक्य लक्ष वेधून घेत आहेत.   विद्यार्थ्यांनी पालकांना पात्र लिहून मतदानाचा हक्क बजावणे किती महत्त्वाचे आहे ते पटवून दिले आहे.  विद्यार्थ्यांच्या मार्फत मतदान जनजागृती बाबत शाळा परिसरात प्रभात फेरी काढण्यात आली. "सोडा सर्व काम. चला करू मतदान", "मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो", "जन मन का यहा नारा है, मतदान अधिकार हमारा है", "मतदान हा अधिकार नाही, तर कर्तव्य सुद्धा आहे" अशा घोषणा लिहिलेले फलक हाती घेत, नारे देत मतदार जागृती अभियान विद्यार्थ्यांनी प्रभात फेरीद्वारे शिक्षकांच्या साथीने राबविले. शिक्षकांद्वारे पथनाट्यांतून  मतदान जनजागृती करण्यात आली. 

जळगाव महानगरपालिका :  जागरुक मतदार हा लोकशाहीचा रक्षक असतो.  लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत जागरुक मतदारामध्ये मतदान जनजागृती निर्माण कारण्यासाठी जळगाव महानगरपालिकेतर्फे मनपा शाळांमधील इयत्ता ६ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांची काव्यरत्नावली चौकातील भाऊंच्या उद्यानात चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. यात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या चित्रांद्वारे मतदार जनजागृती विषयांवर संदेश संबोधित केले. यावेळी चित्रकला स्पर्धेत सहभागी  विद्यार्थ्यांच्या पालाकांना मतदान करण्याची  प्रतिज्ञा देण्यात आली. 

पनवेल महानगरपालिका :  सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४  च्या पार्श्वभूमीवर  पनवेल महापालिकेच्या लोकनेते दि.बा पाटील विद्यालय व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शाळा पोदी यांच्यावतीने मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रभातफेरी काढण्यात आली. या उपक्रमात शाळेच्या सर्व शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने या प्रभात फेरीमध्ये सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी "मतदार राजा जागा हो.. लोकशाहीचा धागा हो...",  "वोट देने जाना है... देश को आगे बढाना है... ", "आपल्या मताचे दान आहे लोकशाहीची शान"  अशा घोषणा देत नागरीक, व्यावसायिक, फळ, भाजी विक्रेते या मतदारांमध्ये मतदान करण्यासाठी जनजागृती केली. महापालिका शाळा क्रमांक ४ मध्ये रांगोळी  स्पर्धांच्या माध्यमातून महापालिकेद्वारे विद्यार्थ्यांच्या मदतीने  मतदार जनजागृती करण्यात आली.  पनवेल मनपा शाळा क्रमांक ८ च्यावतीने मतदानावर आधारित घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली;  तर गुजराती शाळा क्रमांक ९ मध्ये रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पना शक्तीचा वापर करून सुंदर अशी चित्रे व रांगोळ्या व घोष वाक्य लिहिल. 

सुमारे २ लाख विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ‘मतदान करणे हे प्रत्येक नागरिकांचे प्रथम कर्तव्य आहे, हे कर्तव्य बजावत असताना सुजाण नागरिक म्हणून तुम्ही निवडणुकीत मतदान करा’ अशा आशयाच्या पत्रांचे वाटप करण्यात आले. याचबरोबर महापालिकेच्या लोकनेते दि.बा.पाटील विद्यालयामध्ये पालकसभा व व्यवस्थापन समितीच्या सभा घेऊन ‘ देशाची लोकशाही व्यवस्था मजबूत करण्यासाठी नागरिकांनी मतदान करणे गरजेचे असल्याचा’ संदेश पालकांना देण्यात आला.

छत्रपती संभाजीनगर महापालिका :  छत्रपती संभाजीनगर महापालिकेने गुढीपाडवाच्या दिवशी  शहरांतून निघणाऱ्या शोभायात्रांमधून मतदार जागृती केली. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या प्रियदर्शिनी शाळेतील विद्यार्थ्यांनी मतदार जागृतीसाठी पथनाट्य केले आणि शाळेलगतच्या वसाहतींमधून शोभायात्रा काढली. शोभायात्रेत प्रियदर्शिनी शाळेच्या विद्यार्थ्यांसह महापालिकेच्या गारखेडा व उस्मानपुरा शाळेचे विद्यार्थीही सहभागी झाले होते. 'गुढीपाडवा, मतदान वाढवा' असा संदेश विद्यार्थ्यांनी दिला. शोभायात्रेत सुमारे दोन हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. या उपक्रमांतर्गत पालक मेळावा घेण्यातआला. उस्मानपुरा शाळेच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून मतदान करण्याविषयी नागरिकांना आवाहन केले. 

चंद्रपूर महानगरपालिका : लोकशाहीच्या मजबुतीकरणासोबतच मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून "सिस्टमॅटिक व्होटर्स एज्युकेशन ऍण्ड इलेक्‍ट्रोरल पार्टीसिपेशन" (स्वीप) हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा आरंभ चंद्रपूर महापालिकेने मनपा शाळांपासून केला. स्वीप अंतर्गत चंद्रपूर मनपाने शालेय विद्यार्थ्यांकडून संकल्पपत्र लिहून घेत,  पालकांना मतदानासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न केला.  संकल्पपत्रातील  संदेशानुसार विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना पत्र लिहुन निवडणुकीमध्ये मतदान करण्याचे आवाहन केले. 

लोकशाहीच्या मजबुतीकरणात शिक्षण क्षेत्राचा वाटा महत्त्वाचा आहे. हे पुन्हा एकदा  'लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४'च्या  जनजागृती अभियानास विद्यार्थी आणि शिक्षक  वर्गांनी सहभाग नोंदवून पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

लोकसभा सार्वत्रीक निवडणूक २०२४ : मतदारांसाठी लक्षवेधी ठरणाऱ्या आरोग्य आणि परिवहन सुविधा

'लोकसभा सार्वत्रीक निवडणूक २०२४'  महाराष्ट्र सज्ज झाला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्य्यातील मतदान झाले आहे.  मतदानाचे तीन टप्पे शिल्लक आहेत.  पहिल्या दोन टप्प्यात मतदान करतानाचे नागरिकांचे आणि निवडणूक आयोगाचे  अनुभव पाहता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी मतदानावर परिणाम होऊ नये यासाठी उपाययोजना आखल्या आहेत. 

मुंबईत मतदानावेळी मतदान केंद्रांवर येणाऱ्या नागरिकांना उष्माघात व अन्य त्रास होऊ नयेयासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आता मुंबईत सुरू करण्यात आलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हेसुद्धा मतदान केंद्रांशी जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे मतदान केंद्रांवर आरोग्य सुविधा पुरविणे सोपे होणार आहे.

मुंबईत २० मे रोजी मतदान होणार आहे. मुंबईत ९ हजार ८६२मतदान केंद्रे आहेत. त्यात शहरात २ हजार ५०९ तर उपनगरात ७ हजार ३५३ मतदान केंद्रे आहेत. मतदान केंद्रांवर मतदानासाठी येणाऱ्या नागरिकांना उन्हामध्ये रांगा लावाव्या लागणार आहेत. मे महिना हा उन्हाळ्याचा महिना असल्याने या कालावधीत अधिक तापमान असण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता निवडणूक आयोगाकडून केंद्रावर येणाऱ्या नागरिकांसाठी आरोग्य सुविधा पुरविण्यात येणार आहे. मतदान केंद्रांवर आरोग्य सेवा पुरविण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाकडून मुंबई पालिकेवर सोपविण्यात आली आहे. . त्यामुळे  मुंबई महानगरपालिकेने निवडणूक केंद्रांवर आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आपला दवाखाना, आरोग्य केंद्र आणि डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. 

निवडणूक आयोगाच्या स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदान जनजागृतीसाठी येवला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मा. किरण देशमुख यांनी डॉक्टर असोसिएशनची बैठक घेतली.  या बैठकीला शहरातील डॉक्टर असोसिएशनचा चांगला प्रतिसाद लाभला. मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावलेल्या मतदारांसाठी सवलत देण्याची भूमिका येवला नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी  जाहीर केली. त्यानुसार  जे नागरिक २० मे २०२४ ला मतदान करतील त्यांना आरोग्य तपासणी फी व इंजेक्शन फी यात सवलत देण्याचे डॉक्टर असोसिएशन यांच्यातर्फे कळवण्यात आले. तसेच शहरात व तालुक्यात उष्माघातामुळे नागरिकांना त्रास होऊ नये  याकरिता मतदान केंद्रांवर डॉक्टर असोसिएशनची टीम उपलब्ध राहून सेवा पुरवण्याचा निर्णय यावेळी डॉक्टर असोसिएशन कमिटीतर्फे घेण्यात आला. 

निवडणुकीत मतदान केंद्रापर्यंत पोहोचताना दिव्यांग उमेदवारांच्या वाट्याला येणारा मनस्ताप टाळण्यासाठी बेस्ट प्रशासनाने एक  महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.   दिव्यांग उमेदवारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी बेस्ट उपक्रमाची एसी बससेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोग, समाज कल्याण विभाग आणि बेस्ट उपक्रमाकडून ही सुविधा उपलब्ध केली जाणार असून लवकरच याबाबत निर्णय होईल. या मतदारांना कोणतेही शुल्क भरावे  लागणार नाही.  सध्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांतीलच मतदारांसाठी या बेस्ट सेवेचा विचार होत आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ४० टक्क्यांहून अधिक अपंगत्व असलेल्या दिव्यांग आणि ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी 'व्होट फ्रॉम होम' ही घरबसल्या मतदान करण्याची सुविधा दिली आहे. मात्र ज्या मतदारांना मतदान केंद्रात जाऊन मतदान करण्याची इच्छा असेल, त्यांच्यासाठी बेस्टची एसी सेवा दिली जाणार आहे. मुंबई उपनगरांतील निवडणुकीच्या दिवशी ही सेवा  दिव्यांगासाठी देण्यात येणार आहे.

ज्येष्ठ नागरीकांसाठीही मतदानाच्या दिवशी या  बस सेवा  उपलब्ध केल्या जाणार आहेत.  त्यासाठी कोणत्या भागांत किती ज्येष्ठ नागरीक आहे, याची सविस्तर माहिती बेस्ट उपक्रमाला दिली जाणार आहे. त्यानुसार त्या-त्या भागांत बेस्टची सुविधा सकाळी मतदान सुरू होण्यापासून उपलब्ध केली जाईल. 

निवडणूक काळात निवडणूक कर्मचाऱ्यांची तसेच पोलिसांची वाहतूक करण्यासाठीही निवडणूक आयोगाने बेस्ट बसगाड्या उपलब्ध करण्यास सांगितले आहे. त्यावरही सध्या चर्चा सुरू आहे. ५०० हून अधिक बस उपलब्ध करण्याचे नियोजन असून यामध्ये ५० बस पोलिस आणि निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी असणार आहेत. 

अशा विविध लोकोपयोगी उपक्रमांद्वारे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाच्या रुपाने लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी सज्ज झाल्या आहे.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

Thursday, April 25, 2024

चंद्रपूर महापालिका आणि मतदार जागृती अभियान

१९ एप्रिल २०२४  रोजी सकाळी ७  ते सायंकाळी ६ या वेळेत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात  'लोकसभा निवडणूक २०२४' साठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. या मतदानास नागरिकांचा समाधानकारक प्रतिसाद लाभला. याचे श्रेय चंद्रपूर महानगरपालिकेला जाते.  लोकसभा निवडणूक २०२४' साठी  मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासनामार्फत विविध प्रयत्न केले गेले. चंद्रपूर महानगरपालिकेनेही केले. 

लोकशाहीच्या मजबुतीकरणासोबतच मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून "सिस्टमॅटिक व्होटर्स एज्युकेशन ऍण्ड इलेक्‍ट्रोरल पार्टीसिपेशन" (स्वीप) हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा आरंभ चंद्रपूर महापालिकेने मनपा शाळांपासून केला. स्वीप अंतर्गत चंद्रपूर मनपाने शालेय विद्यार्थ्यांकडून संकल्पपत्र लिहून घेत,  पालकांना मतदानासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न केला.  संकल्पपत्रातील  संदेशानुसार विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना पत्र लिहुन निवडणुकीमध्ये मतदान करण्याचे आवाहन केले. 

मतदार संघांतर्गत समाविष्ट असलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांचा मतदान प्रक्रियेत शंभर टक्के सहभाग असावा, त्यांना मतदान प्रक्रियेची माहिती व्हावी, सक्षम लोकशाहीसाठी सर्वांनी मतदानाचा हक्क निर्भीड आणि निरपेक्षपणे बजावावा यासाठी मतदारांमध्ये जाणीव, जागृती निर्माण व्हावी म्हणून स्वीप अंतर्गत सर्व विद्यार्थी व पालक यांच्याकडून संकल्प पत्र भरून घेण्यात आले.  यामध्ये तयार केलेल्या संकल्प पत्राची प्रत शालेय विद्यार्थ्यांमार्फत त्यांच्या पालकांना देण्यात आली. चंद्रपूर मनपा शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला गेला. 

 मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी  नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचून ‘मतदार चिठ्ठी’ चे वाटप प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. 'मतदार चिठ्ठी'द्वारे आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करता येते. तसेच मतदान केंद्र कुठे आहे याचीही माहिती मिळते.  चंद्रपूर महापालिकेनेही ‘मतदार चिठ्ठी’ चे  वाटप केले. या वाटपादरम्यान ज्या नागरिकांना मतदार चिट्ठी मिळाली नसेल त्यांना आपल्या बूथ लेव्हल ऑफिसरशी (बीएलओ) संपर्क करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. तसेच  व्होटर हेल्पलाईन ॲपवर जाऊन व्होटर सर्विसेसमध्ये, नो युवर पोलिंग स्टेशन डिटेल्समध्ये जाऊन आपला व्होटींग कार्ड नंबर (Epic Number ) टाकून कशी माहिती करून घेता येईल त्याविषयी जनजागृती केली.  त्याचप्रमाणे https://electoralsearch.eci.gov.in/pollingstation  या लिंकवर जाऊन   'मतदार चिठ्ठी'ची कशी माहिती करती येईल याविषयी नागरिकांना मार्गदर्शन केले.  चंद्रपूर महानगरपालिकेने 'मतदार चिठ्ठी'च्या माहितीसाठी  18001237980 हा टोल फ्री क्रमांकही उपलब्ध करून दिला.  

मतदान हा आपला हक्क असला तरी अनेकदा त्याबाबत उदासीनता असते. त्यामुळे मतदारांमध्ये  याबाबत जागरूक वाढवणे आवश्यक आहे . मतदान केंद्रावर जाण्यास कंटाळा, सुटीचा दिवस,अनास्था अश्या विविध कारणांनी मतदानाचा टक्का खालावतो. मतदान वाढावे यासाठी शासकीय यंत्रणा तर प्रयत्नरत आहेच,मात्र त्याला संस्था,आस्थापना,व्यावसायिक यांची साथ मिळाल्यास निश्चितच मतदान जनजागृती होणार आहे.  या संदर्भात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आणि नागरिकांना त्यांचे मताधिकार वापरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी शहरातील आस्थापनांनी पुढे येत प्रेरीत उपक्रम राबविण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त मा. श्री. विपीन पालीवाल यांनी केले. .या संदर्भात शहरातील विविध आस्थापनांची बैठक १२ एप्रिल २०२४ ला चंद्रपूर महानगरपालिका  सभागृहात आयोजीत करण्यात आली होती.  

चंद्रपूर शहरातील उपहारगृह,मॉल,चित्रपटगृह, दुकानं इत्यादी  आस्थापनांनी, मतदान करणाऱ्या नागरिकांसाठी काही योजना राबविल्यास नागरिक मतदान करण्यास प्रोत्साहीत होऊन शहराची मतदान टक्केवारी वाढणं शक्य आहे.  शहरी मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी मतदानाला प्रोत्साहीत करणारे अशाप्रकारचे उपक्रम घेत  शहरातील आस्थापनांनी सहयोग करण्याचे आवाहन मा. आयुक्तांद्वारे बैठकीत करण्यात आले.

१९ एप्रिल रोजी जे नागरीक मतदान करतील, ज्यांच्या बोटाला शाई असेल त्यांना १९  व  २०  एप्रिल रोजी आझाद बगीच्यात मोफत प्रवेश दिला जाणार असल्याची घोषणा चंद्रपूर महानगरपालिकेने केली. 

चंद्रपूर महानगरपालिकेने  'स्वीप' अंतर्गत केलेल्या मतदार जागृती अभियानाचा फरक सकारात्मक झाला. नागरिकांचे मतदान करण्याच्या प्रमाणात वाढ झाली.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

लोककला, लोकसंस्कृतीचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या पात्रांच्या माध्यमातून मतदान जागृती

'लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४' साठी महाराष्ट्रातील  विविध स्थानिक स्वराज्य संस्थानी मतदान जागृती अभियान हाती घेतले आहे. या अभियानासाठी लोककलांचा आधार घेतला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख नगरपंचायतीने मतदान जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. कोकणची लोककला असलेल्या 'नमन' या लोककलेच्या माध्यमातून मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य असून, त्याचे भान नागरिकांना रहावे, मतदानाच्या दिवशी सर्व नागरिकांनी मतदान करावे व आपला हक्क आणि कर्तव्य बजावावे, असा संदेश नमन लोककलेमधील गौळण व वग या माध्यमातून देण्यात आला.

नमन या लोककलेच्या माध्यमातून देवरुख नगरपंचायतीच्या पाणी पुरवठा कर व स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांनी मतदानाची जनजागृती सुरू केली आहे. या नमनमधील गौळण प्रकारात नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी मावशी, गौळण आणि पेंद्या या भूमिका  साकारल्या. तसेच 'वग' प्रकारात राजा, काळू-बाळू भूमिकाही देवरुख नागरपंचायातीच्या कर्मचाऱ्यांनी साकारल्या. कर्मचाऱ्यांनी साकारलेल्या भूमिकांना  प्रेक्षकांची वाहवा मिळाली. या नमनात  ढोलकी, कीबोर्ड साथही नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी दिली.

मातृ मंदिर चौक व देवरुख बसस्थानक येथे जनजागृती करण्यात आली. ७ मे २०२४ रोजी सर्व नागरिकांनी आपले अमूल्य मत देऊन मतदान करावे, असे आवाहनही 'नमन'च्या माध्यमातून देण्यात आले. 

लोकशाही टिकवा, मतदान करा' असा संदेश देत  वासुदेव वसई-विरार शहरातील रस्त्यावर आणि नाक्यांवर फिरत आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी अधिकाअधिक नागरिकांनी मतदान करावे, यासाठी वसई-विरार महापालिकेने लोकसंस्कृतीचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या 'वासुदेव' या  प्रमुख पात्राच्या रुपात जनजागृती सुरू केली आहे.

वासुदेव आणि महाराष्ट्राचे एक वेगळे नाते आहे. डोक्यावर मोरपिसांची टोपी हातात टाळ आणि तोंडात संतांचे अभंग असे लोभसवाणे रूप घेऊन वासुदेव नेहमी शहरांत गावात सकाळी फिरत असतो वंशपरंपरागत हा भिक्षुकीच्या व्यवसाय करणाऱ्या वासुदेवाचे दर्शन आजही अधूनमधून होत असते. अशाच वासुदेवाचे दर्शन सध्या वसई-विरार परिसरात सध्या सर्वांना होताना दिसत आहे. पूर्वीच्या काळात वासुदेव घरधनीच्या पित्तरांचे गोडवे गात प्रभुनामाची लोकगीते गात असे. वसईत दिसणारा हा वासुदेव मात्र लोकशाहीचा जागर करतोय. लोकशाही टिकविण्यासाठी मतदान करा, असे आवाहन हा वासुदेव लोकांना करत आहे.

वसई-विरार महापालिकेतर्फे मतदार जनजागृती आणि सहभाग कार्यक्रम (एसव्हीपी) सुरू करण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून वासुदेवाच्या रुपात नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. 'पायवाट; प्रॉडक्शनतर्फे हा वासुदेवाच्या पात्राची निर्मिती करण्यात आली आहे. हा वासुदेव ठिकठिकाणी फिरून लोकांना मतदानाचे महत्व पटवून देत आहे. आपले एक मत महत्वाचे आहे. एक मत देशाचे भवितव्य ठरविणा आहे. ते मत वाया घालवू नका, २० मे २०२४  रोजी मतदान करण्यासाठी केंद्रावर नक्की या, असे आवाहन हा वासुदेव लोकांना करत आहे. शहरातील चौक गर्दीची ठिकाणे या ठिकाणी हा वासुदेव लोकगीतातून लोकांना मतदानाने आवाहन करत आहे.

महाराष्ट्र संस्कृती आणि पंरपरेत वासुदेवाचे स्थान आहे. त्याची वेशभूषा आणि मधाळ वाणी आजही लोकांना आकर्षित करते. त्यामुळे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या वासुदेवाचा आधार घेण्यात आला आहे. त्याला बघण्यासाठी ऐकण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे.वासुदेवाच्या या आवाहनामुळे नागरीक मतदानासाठी मोठ्या  उत्साहाने बाहेर पडतील आणि आपले कर्तव्य पार पाडतील या उद्देशापोटी  मतदार जागृती अभियासाठी वासुदेवाची निवड केली आहे.

एकंदरीत लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी लोककला, लोकसंस्कृतीचा माध्यम म्हणून केलेल्या वापरास नागरिकांचाही उत्तम प्रतिसाद लाभत आहे.  कदाचित मतदानाचा टक्का वाढविण्याची ही सुरुवात असावी.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

Saturday, March 16, 2024

मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे उपक्रम

मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ठाणे महापालिकेकडून डिसेंबर २०२२मध्ये 'मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे' योजनेची सुरुवात झाली. या योजनेमध्ये  रस्ते, स्वच्छता, शौचालये आणि सौंदर्यीकरणावर विशेष भर देण्यात आला आहे. मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणामार्फत मेट्रो, उड्डाणपूल, खाडीकिनारा मार्गासारख्या मोठ्या प्रकल्पांची अंमलबजावणी शहरात सुरू असताना 'ठाणे महापालिका पुढील सहा महिन्यांत मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे' उपक्रमांतर्गत शहरातील सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या दैनंदिन प्रश्नांची उकल शोधण्यासाठी युद्धपातळीवर अभियान राबवेल, अशी घोषणा मा. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केली होती.  त्यानुसार विकासकामांना सुरुवात झाली.  कालौघात 'मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे' ही योजना लक्षवेधी ठरली आहे.  नव्या वर्षासाठी  ठाणे महापालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये 'मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे २.०' या योजनेचा समावेश या माध्यमातून शहरातील विविध कामांसाठी कोट्यवधींची तरतूद करण्यात आली आहे.  ती विकासकामे पुढीलप्रमाणे आहेत. 


कचऱ्यापासून वीजनिर्मितीसाठी २५ कोटी

■ डायघर येथे कचरा पूर्वप्रक्रिया प्रकल्पाचा पहिला टप्पा कार्यान्वित

■ प्रकल्पाचा दुसरा टप्पा- कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्यात येणार असून त्यासाठी २५ कोटी रुपयांची तरतूद

■ कचऱ्याच्या संकलनासाठी चार चाकी घंटागाड्या, सहाचाकी घंटागाड्या व कॉम्पॅक्टरचा वापर

■ नेहमी कचरा टाकला जाणारी १५०पेक्षा जास्त ठिकाणे कायमस्वरूपी बंद

■ शहर कचरामुक्त (शून्य कचरा) करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू

■ घंटागाडी योजनेसाठी ८० कोटी व कचरावेचक मानधन व सोयी-सुविधांसाठी ४ कोटी ५० लाख तरतूद

■ कोलशेत येथे ३० टन क्षमतेचे, गायमुख येथे १०० टन क्षमतेचे विकेंद्रीत यांत्रिकी कचरा प्रक्रिया केंद्रांसाठी १ कोटी ५० लाखांची तरतूद


सार्वजनिक ठिकाणी विशेष शौचालये

सार्वजनिक ठिकाणी पर्यटकांच्या दृष्टीने महापालिका कार्यक्षेत्रांतील ८ प्रभाग समितीत एकूण ३० बैठे कंटेनर शौचालयांत १७० सिट्स उपलब्ध असतील. याशिवाय नाक्यावर काम करणाऱ्या कामगारांच्या दृष्टीने शौचालये उभारण्यात येणार असून यासाठी १ कोटींची तरतूद केली आहे.


ठाणे शहर सौंदर्यीकरण प्रकल्प २.०

■ मासुंदा तलावपाळी येथे म्युझिकल फांऊटन व लेझर शो

■ शहर शुसोभीकरण प्रकल्पांतर्गत विद्युतीकरण, विद्युत कारंजे, उद्यान व स्थापत्य कामांसाठी ५० कोटींची तरतूद

■ एकात्मिक तलाव संवर्धन व सुशोभीकरणांतर्गत सुरू असलेली कामे पूर्ण करून नव्या वर्षातील कामांसाठी २० कोटींची तरतूद

■ राज्य सरोवर संवर्धन योजनेतून तलावांच्या ४ कोटींची तरतूद

■ ग्रीन यात्रा या समाजसेवी संस्थेद्वारे देसाई तलाव, फडकेपाडा तलाव, कासारवडवली तलाव, काबेसर तलाव, शिवाजीनगर तलाव, डायघर तलाव, जेल तलाव या सात तलावांचे संवर्धन


पाणीपुरवठा सक्षम करणार

■ अमृत योजना :  २.० अंतर्गत पाणी पुरवठा विस्तारीकरणासाठी ३२३ कोटी ७२ लाखांच्या रकमेची योजना मंजूर

■ १४ जलकुंभ, ८५ कि.मी. लांबीची जलवाहिनी वितरण व्यवस्था, एक एम. बी. आर. (१० द.ल.लि.) व ४ ठिकाणच्या पंपिंग मशिनरीची क्षमता वाढविण्याच्या कामाचा अंतर्भाव आहे. यामध्ये १८ हजार २५५ हाऊस कनेक्शन देण्यात येणार असून सुमारे एक लाख १४ हजार २४८ कुटुंबांना या योजनेचा लाभ होणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात २० कोटींची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.


मोफत दहनविधी सुविधा

एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यावर अंत्यविधीचा खर्च हा सर्वसामान्य कुटुंबाला आर्थिक विवंचनेत टाकणारा असतो. याचा विचार करुन ठाणे पालिकेने सर्व प्रकारचे दहनविधी मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी दोन कोटींची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.


५० उपद्रव शोध पथक

रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास अथवा लघुशंका केल्यास उपद्रव शोध पथकामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. या कारवाईसाठी शहरात प्रती पथक २ सुरक्षारक्षक असलेले ५० उपद्रव शोध पथक तयार करण्यात येणार असून ही पथके गस्त घालून उपद्रव निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कारवाईचा बडगा उगारणार आहेत. याबाबतची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून हा उपक्रम प्रथमच ठाणे शहरात राबवण्यात येणार आहे.


सार्वजनिक रस्ते साफसफाई

■ शहरातील रस्त्यांवर स्वच्छतेसाठी २५ पथकाची नियुक्ती

■ यांत्रिकी सफाई वाहनांच्यासकारात्मक परिणामुळे आणखी ७ वाहने खरेदी करण्याची प्रक्रीया

■ खाजगीकरणातून रस्ते  साफसफाईसाठी ८५ कोटी तरतूद

■ सर्वकष स्वच्छता मोहीम संपूर्ण वर्षभर राबविण्यात येणार

■ सफाई कामगारांची आरोग्य तपासणी आणि वैद्यकीय उपचार

■ सफाई कामगारांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजनेसाठी ३ कोटी रु.


स्वच्छ शौचालय

■ ठाणे महानगरपालिकाक्षेत्रात ७४२शौचालयांच्या ९७११ सिट्सच्या नुतनीकरण

■ ४६१ युनिट्समधील ५,९५९ सिट्सचे नुतनीकरण पूर्ण

■ २८१ युनिट्समधील ३,७५२ सिट्सचे नूतनीकरण मार्च २०२४ पर्यंत

■ पुनर्बाधणी अंतर्गत एकूण ११५ युनिट्सच्या १,७४७ सिट्सच्या पुनर्बाधणीची कामे मे २०२४ पर्यंत

■ सार्वजनिक शौचालयांची सर्वंकष स्वच्छतेच्या दृष्टीने शौचालयात २४ तास पाणी उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यासाठी १२ कोटींची तरतूद


नागरी सुविधांना बळ मिळणार

■ कोणतीही करवाढ व दरवाढ नसणाऱ्या  काटकसरीचा  अर्थसंकल्प

■  महसुली उत्पन्न वाढविण्यावर भर

■ खर्चामध्ये वित्तीय शिस्त महिला, ज्येष्ठ नागरिकव युवा यांच्यासाठीच्या कल्याणकारी योजनांवर भर.

■ भांडवली कामांतर्गत हाती घेतलेली कामे पूर्ण करण्याचे नियोजन

■ प्रशासकीय कामकाजामध्ये पारदर्शकता व कार्यक्षमता यावर भर.

■ कामांचा दर्जा उत्तम रहावा याकडे विशेष लक्ष


ॲडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंट संकल्पना

पालिकेमार्फत पुरवण्यात येणाऱ्या सेवासुविधा प्रभावीपणे पुरवण्याच्या दृष्टीकोनातून लोकसहभाग असणे आवश्यक आहे. यासाठी महापालिका प्रशासन अॅडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंट (एएलएम) ही संकल्पना आगामी आर्थिक वर्षात नागरिकांसमोर सादर करणार आहे. यामध्ये प्रभाग स्तरावर नागरिकांचे समूह एकत्र येऊन एलएम समिती स्थापन करतील. अशा एएलएम समितीमार्फत त्यांच्या क्षेत्रातील प्रामुख्याने घनकचरा व्यवस्थापन, परिसर- शौचालयाची स्वच्छता, आपत्ती व्यवस्थापन आदी पुरवल्या जाणाऱ्या सेवांवर देखरेख ठेवली जाईल.

ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात 'मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे २.०' मध्ये केलेल्या विशेष उपाययोजनांमुळे २०२४ मध्येही अभियानाची विशेष चर्चा असणार आहे.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

डिस्पोजेबल फिमेल युरीनेशन डिव्हाइस

शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे आयोजित ३१ वी राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद या स्पर्धेची फेरीराज्यपातळीवर नाशिक येथे ९ ते १० डिसेंबर २०२३ दरम्यान पार पडली. यामध्ये नवी मुंबई पालिका शाळा क्रमांक ४६ गोठिवली शाळेतील पल्लवी सोळंके व प्रीती राठोड या दोन विद्यार्थिनींनी विल्हेवाट लावता येणारे महिलांचे लघवीचे साधन' अर्थातच  'डिस्पोजेबल फिमेल युरीनेशन डिव्हाइस' हा प्रोजेक्ट सादर केला. त्या प्रोजेक्टची निवड या परिषदेतून राष्ट्रीय पातळीवर झाली आहे. 

हिलांना समाजात वावरताना स्वच्छतागृहांच्या कमतरतेमुळे तसेच अव्यवस्थेमुळे उद्भवणाऱ्या समस्या,  त्यातून होणारे संसर्ग या विषयावर नवी मुंबई महापालिका शाळा क्रमांक ४६च्या विद्यार्थिनींनी प्रकल्प तयार केलाय. विद्यार्थिनींनी स्वत:ला येणाऱ्या अडचणींवर संशोधन करून त्यावर उपाय म्हणून 'डिस्पोजेबल फिमेल युरीनेशन डिव्हाइस' तयार केले आहे. जे वापरण्यास अतिशय सोपे तसेच सुरक्षीतही आहे. या प्रकल्पाची दखल 'राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद २०२३' मध्ये घेतली असून या प्रकल्पाची निवड राष्ट्रीय स्तरावर झालेली आहे. हा प्रकल्प नवी मुंबई महानगरपालिकेच्या गोठीवली येथील शाळा क्रमांक ४६ मधील प्रीती राठोड व पल्लवी सोळंके या दोन विद्यार्थिनींनी तयार  केला आहे.  या दोन्ही विद्यार्थिनींचा महापालिका मुख्यालयातील विशेष समारंभात महापालिका आयुक्त श्री.राजेश नार्वेकर यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. या अभिनव प्रकल्पासाठी विद्यार्थिनींना नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षिका  वासंती पाटील व स्नेहल पाटील तसेच  मुख्याध्यापक कल्पना गोसावी आणि रघुनाथ शेलार यांचे मार्गदर्शन लाभले.  

राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद २०२३ या स्पर्धेत ४५००पेक्षा अधिक विज्ञान प्रकल्पांची नोंदणी झाली होती. स्पर्धेत ३६ जिल्हे सहभागी होते. जिल्हास्तरीय प्रकल्प चाळणी फेरीत १८८ प्रकल्पांची निवड झाली होती. राज्यस्तरीय प्रकल्प चाळणी फेरीमधे ५२  प्रकल्पांची  निवड झाली; पैकी ३०  प्रकल्प राष्ट्रीय स्तरावर निवडले गेले आहेत. त्यात  'डिस्पोजेबल फिमेल युरीनेशन डिव्हाइस' ची निवड होणे हे नवी मुंबई महापालिकेच्या शाळांसाठे गौरवास्पद बाबा आहे. तसेच  मुंबई महापालिका स्त्रियांचे आरोग्य आणि पर्यावरण पुरकतेसाठी जे प्रयत्न करीत आहे, त्यात   'डिस्पोजेबल फिमेल युरीनेशन डिव्हाइस'  हा प्रकल्प लक्षणीय तसेच लक्षवेधी ठरणार आहे. 

शहरामधील व ग्रामीण भागामधील स्त्रियांनी शौचालय वापरणे अत्यंत जरुरीचे असते.  जेव्हा स्त्रिया बाहेर गेल्यानंतर सार्वजनिक शौचालय वापरतात तेव्हा त्यांना युरीन इन्फेकशनचा  त्रास सहन करावा लागतो. सार्वजनिक शौचालये काही प्रमाणात अस्वच्छ असतात. अशी शौचालये  इतर स्त्रियांनी ते वापरल्यामुळे ६० ते ७०% स्त्रियांना हा युरीन इन्फेकशनचा त्रास सहन करावा लागतो. जेव्हा शौचालय अस्वच्छ असतात तेव्हा त्यामधील बॅक्टेरिया आपल्या युरिनरी टँक मध्ये जाऊन संसर्ग निर्माण करतात. त्यामुळे लघवीला जळजळ होणे, लाल रंगाची लघवी होणे, वारंवार लघवी होणे, पोटाच्या 'खालच्या बाजूस दुखणे हे आजार स्त्रियांना होतात. युरीन इन्फेकशच्या त्रासाची समस्या सतत लांबचा प्रवास करणाऱ्या महिला, नोरकरदार स्त्रिया,  शाळा-कॉलेज शिकणाऱ्या मुली यांना  सतावत असते.  नवी मुंबई महापालिकेच्या विद्यार्थिनींनी स्वत:ला येणाऱ्या अडचणींवर संशोधन करून त्यावर उपाय म्हणून 'डिस्पोजेबल फिमेल युरीनेशन डिव्हाइस' तयार केले आहे.

  • सध्या बाजारात विविध प्रकारचे डिस्पोजेबल फिमेल युरीनेशन डिव्हाइस आहेत. मात्र नवी मुंबई महानगरपालिकेच्या विद्यार्थींनी बनविलेले डिस्पोजेबल फिमेल युरीनेशन डिव्हाइस वैशिष्ट्यपूर्ण आहे. 
  • डिव्हाइसमध्ये विशिष्ट पेपरचा वापर केला जाणार आहे की, जे  वापरून झाल्यावर विल्हेवाट लावता येऊ शकतो. किंवा ते आपण डस्टबीन मध्ये टाकू शकतो.
  • आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे  त्या पेपरला आकार दिला जाणार आहे . डिव्हाइस ठेवण्यासाठी एक निर्जंतुक पॅकेट असेल, त्याला पुढच्या बाजूने दोन फोल्ड असतील.
  • पॅकेटमध्ये जो डिव्हाईस असेल ते डिव्हाईस हे काढल्या नंतर दोन फोल्ड सहज उघडतील अशी त्याची रचना असेल. डिव्हाईसची पुढची बाजू अशा पद्धतीने पकड़ायची की, त्याच्या दुसऱ्या (मागील) बाजूला  युरिनचा प्रवाह ठेवता येईल. डिव्हाईस. वापरून झाल्यानंतर ते दोन फोल्ड बंद करून ते डस्टबीन मध्ये टाकता येते.  

डिस्पोजेबल फिमेल युरीनेशन डिव्हाइस फायदे 

* स्त्रियांसाठी उपयुक्त

* स्त्रियांना होणारा युरीन इन्फेकशनचा  (Urine infection) चा त्रास कमी होणार. 

* दोन्ही प्रकारची शौचालयांमध्ये   (Indian,Western) वापरण्यासाठी उपयुक्त

* या डिव्हाइसचा वापर केल्यामुळे वृद्ध स्त्रियांना डायपर वापरण्याची गरज नाही.

* जिथे शौचालय नसेल तिथे तर युरीनेशनसाठी स्त्रियांना या  डिव्हाइचा  वापर करता येऊ शकतो. 

मध्यंतरी WHO ने एक आकडेवारी प्रसिद्ध केली होती. या आकडेवारीनुसार  भारतामध्ये जवळ-जवळ ८०% महिलाना त्यांच्या जीवनात एकदा तरी युरीन इन्फेकशनच्या त्रासला सामोरे जावे लागते. भारतामध्ये होणारी ही समस्या टाळण्यासाठी भारत सरकार ने वेगवेगळ्या उपाययोजना काढल्या आहेत. तरी सुद्धा

लोकसंख्या जास्त असल्यामुळे शौचालय हे खराबच राहतात. अशा परिस्थिती नजीकच्या भविष्यात  'डिस्पोजेबल फिमेल युरीनेशन डिव्हाइस' हे साधन स्त्री वर्गासाठी नक्कीच वरदान ठरणार आहे. 



Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

Tuesday, March 12, 2024

नव्या वर्षातील दुसरी भेट : महत्त्वाकांक्षी सागरी किनारा मार्गाची दक्षिण मार्गिका सुरू

महाराष्ट्र शासनाने मुंबईकरांना नव्या वर्षात सुरुवातीला जानेवारी  महिन्यात  सागरी मार्ग सुरू करून अनोखी भेट दिली. जो अटल सागरी सेतू म्हणून ओळखला जातो.  काही दिवसांच्या अंतराने महाराष्ट्र शासनाने नागरिकांनी आणखी एक भेट दिली आहे. ही भेट आहे, सागरी किनारामार्गाची  दक्षिण मार्गिका.  ११ मार्च २०२४ ला सागरी किनारामार्गच्या दक्षिणेकडच्या बाजूचा एक मार्ग सुरू केला आहे. या मार्गाचे  अनावरण राज्याची मा. मुख्यमंत्री  श्री. एकनाथ शिंदे, मा. उपमुख्यमंत्री श्री. देवेन्द्र फडणवीस आणि मा. उपमुख्यमंत्री  श्री. अजित पवार यांच्या हस्ते झाले. 

 मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या  सागरी किनाऱ्याच्या पहिल्या टप्प्याच्या (वरळी ते मरीन ड्राईव्ह) एका लेनचे उद्घाटन  करण्यात आले. या सोहळ्यास मा. मुख्यमंत्री तसेच मा. उपमुख्यमंत्री यांच्या बरोबरीने शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे मा.पालकमंत्री  श्री.  दीपक केसरकर,मा.  कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. मंगलप्रभात लोढा, मा. माजी केंद्रीय राज्यमंत्री  श्री.मिलिंद देवरा, स्थानिक लोकप्रतिनिधी, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे मा.  आयुक्त तथा प्रशासक डॉ.  इकबालसिंह चहल, मा. अतिरिक्त आयुक्त  श्रीमतीआश्विनी भिडे, डॉ.अश्विनी जोशी आदी यावेळी उपस्थित होते.  हा सागरी किनारा छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने ओळखला जाणार असल्याची घोषणा यावेळी मा. उपमुख्यमंत्री  श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यामुळे  सागरी किनारा मार्गाच्या  दक्षिणेकडच्या मार्गाचे नाव  'धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण)’ आहे.  हा सागरी किनारा मार्ग मुंबई महापालिकेने बांधला आहे. सागरी मार्गाची एकूण लांबी १०.५८ किलोमीटर इतकी आहे. त्यापैकी ९ किलोमीटरचा मार्ग दक्षिण मुंबईत आहे.  मुंबईच्या वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी सागरी सेतूंची मोठी मदत होणार असल्याचा दावा महाराष्ट्र शासनाने केला आहे. 

सध्यातरी या सागरी मार्गाची  उद्घाटन झालेली दक्षिणेकडची बाजू  केवळ सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत  खुली राहणार आहे. कारण अद्याप उत्तर दिशेला म्हणजेच वरळीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेची कामे शिल्लक असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सुरुवातीला केवळ सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेतच वरळी ते मरिन ड्राईव्ह ही नऊ किमीची एक बाजू सुरू राहू शकणार आहे. त्यानंतर रात्रीच्या वेळी दुसऱ्या बाजूची कामे सुरू राहणार आहेत. तसेच शनिवार, रविवारी हा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. 

ऑक्सीजन पार्क 

धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पाच्या परिसरात ३२० एकर क्षेत्रावर जागतिक दर्जाचे उद्यान साकारण्यात येईल, अशी ग्वाही मा.  मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.  सर्वसामान्य मुंबईकरांचा प्रवास सुखकर होण्याबरोबरच वेळेची आणि इंधनाची बचत करणारे तसेच प्रदूषणमुक्त मुंबई करण्याचे सरकारचे उद्दिष्ट साध्य करणारे प्रकल्प उभारण्यात येत आहेत. इंजिनिअरींगचा चमत्कार असणारा किनारी रस्ता हा या अनुषंगाने उपयुक्त प्रकल्प असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. प्रियदर्शिनी पार्क आणि रेसकोर्सच्या उपलब्ध होणाऱ्या ३००  एकर जागेत आबालवृद्धांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे सेंट्रल पार्क उभारण्यात येणार असून मुंबईकरांसाठी हे ऑक्सीजन पार्क ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

सागरी किनारा प्रकल्पामुळे होणारे फायदे

सागरी किनारी रस्त्यामुळे अंदाजे ७० टक्के वेळेची बचत होणार असून इंधनामध्ये ३४ टक्के बचत होईल. इंधन बचतीमुळे प्रती वर्षी विदेशी चलनाची देखील मोठ्या प्रमाणात बचत होईल. ध्वनी आणि वायू प्रदूषण कमी होईल. सुमारे ७० हेक्टर हरितक्षेत्र निर्मितीमुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होऊन मुंबईकरांचे जीवनमान सुधारेल. या हरितक्षेत्रात सायकल ट्रॅक, सार्वजनिक उद्याने, जॉगिंग ट्रॅक, खुले प्रेक्षागृह आदी प्रस्तावित आहेत. या रस्त्यामुळे इतर मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल आणि सुरक्षित व जलद प्रवास करता येईल. मुंबईकरांना सागर किनारी अतिरिक्त प्रोमीनेड उपलब्ध होईल.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) हा दक्षिण मुंबईतील प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वांद्रे वरळी सी लिंकच्या वरळी टोकापर्यंत असणार आहे. या रस्त्याची लांबी १०.५८ कि.मी. असून मार्गिकांची रस्त्यावरील संख्या दोन्ही बाजूला प्रत्येकी चार असेल. तर बोगद्यांमध्ये ती दोन्ही बाजूला प्रत्येकी तीन असेल. भराव टाकून बनविलेल्या रस्त्यांची लांबी ४.३५ कि.मी. असून पुलांची एकूण लांबी २.१९ कि.मी.आहे. या मार्गातील मलबार हिल टेकडीच्या\ खालील दुहेरी बोगद्यांची लांबी प्रत्येकी २.०७२ कि.मी. असून त्याचा अंतर्गत व्यास ११ मीटर आहे. याचे एकूण भरावक्षेत्र १११ हेक्टर इतके असून तीन ठिकाणी आंतरबदल असतील ज्यांची लांबी १५.६६ कि.मी. इतकी आहे. ७.५ कि.मी. लांबीचे नवीन पदपथ असून बस वाहतूकीसाठी समर्पित मार्गिका ठेवण्यात आली आहे. समुद्री लाटांपासून बचावासाठी ७.४७ कि.मी. लांबीची सागरी तटरक्षक भिंत असणार आहे. या प्रकल्पात अमरसन्स, हाजी अली, वरळी डेअरी, थडाणी जंक्शन, वरळी येथे पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. हा प्रकल्प मे २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून २५ फेब्रुवारी पर्यंत याची भौतिक प्रगती ८५.९१ टक्के तर आर्थिक प्रगती ८१.१९ टक्के इतकी झाली आहे. बोगदा खणन काम १०० टक्के पूर्ण झाले असून पुनःप्रापणाचे (रिक्लेमेशन) चे काम ९८ टक्के पूर्ण झाले आहे. समुद्रभिंत उभारण्याचे काम देखील पूर्णत्वास आले असून आंतरबदल ८७ टक्के तर पुलांचे काम ८५ टक्के पूर्ण झाले आहे.

कसा आहे मुंबईचा कोस्टल रोड प्रकल्प?

मुंबई ते कांदिवली २९ किलोमीटर लांबीचा हा कोस्टल रोड असेल. पैकी  दक्षिण कोस्टल रोड हा १०.५८ किमी लांबीचा आहे.  यामध्ये एकूण आठ मार्गिका आहेत. त्यामध्ये जाणाऱ्या आणि येणाऱ्या चार अशा आहेत. तसेच बोगाद्यामध्ये ३ + ३ अशा मार्गिका आहेत. भराव टाकून बनवलेल्या रस्ता हा एकूण ४.३५  किमी लांबीचा आहे. तसेच पुलांची एकूण लांबी ही २.१९ किमी इतकी आहे. बोगद्यांची लांबी ही प्रत्येकी २.१९  किमी इतकी आहे.  प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वरळी ह्या पहिल्या टप्प्यातील एक मार्गिका सुरू झाली आहे.  या एकूण प्रकल्पाला खर्च १२, ७२१  कोटी रुपये  खर्च आलाआहे.  कोस्टल रोड पूर्ण झाल्यानंतर प्रवासामध्ये ७० टक्के वेळेची बचत होणार असून ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण त्यामुळे कमी होईल. 

बोगद्याची वैशिष्ट्ये

किनारा मार्गावरील पहिला बोगदा खणण्याची सुरुवात जानेवारी २०२१ मध्ये करण्यात आली होती. हा बोगदा जानेवारी २०२२ मध्ये पूर्ण झाला. दुसरा बोगदा खणण्याची सुरुवात एप्रिल २०२२ मध्ये करण्यात आली आणि हा बोगदा मे २०२३ मध्ये पूर्ण झाला. बोगद्याला ३७५ मि.मी. जाडीचे कॉक्रीटचे अस्तर लावण्यात आलेले असून त्यावर अग्नीप्रतिबंधक उपाययोजनेअंतर्गत अग्नीरोधक फायरबोर्ड लावण्यात येत आहेत. भारतात प्रथमच सकार्डो वायुविजन प्रणालीची व्यवस्था करण्यात आली असून आपत्कालिन निर्वासनासाठी प्रत्येक ३०० मीटरवर छेद बोगदे

आहेत. उपयोगिता सेवेसाठी बोगद्यांमध्ये युटीलिटी बॉक्सची व्यवस्था करण्यात आली आहे. दुहेरी बोगद्यासाठी अद्ययावत वाहतूक व्यवस्थापन नियंत्रण प्रणालीची व्यवस्था करण्यात येत आहे.

प्रकल्पाचा खर्च

मुंबई किनारी रस्त्यासाठी एकूण बांधकाम खर्च १३९८३.८३ कोटी रुपये अपेक्षित आहे. यामध्ये ९३८३.७४ कोटी रुपयांच्या प्रत्यक्ष बांधकाम खर्चाबरोबरच इतर अनुषंगिक खर्चाचा समावेश आहे.

इतर वैशिष्ट्ये

सागरी रस्ता प्रकल्पातील बोगदा खणणाऱ्या यंत्राने (टीबीएम) खोदण्यात येणारा भारतातील सर्वात मोठ्या व्यासाचां बोगदा (व्यास १२.१९ मी.) आहे. भारतात प्रथमच रस्ते वाहतूक बोगद्यामध्ये सकार्डो वायुविजन प्रणालीची योजना करण्यात आली आहे. तसेच भारतामध्ये प्रथमच एकलस्तंभ पाईलचा पाया बांधून. पुलांची उभारणी करण्यात आली आहे. एकाच प्रकल्पामध्ये पुनः प्रापण करुन रस्ता, पूल, उन्नत मार्ग, उतरण मार्ग, आच्छादित बोगदा, समुद्र तसेच टेकडीखालून बोगदा, हरितक्षेत्राची निर्मिती करण्यात आली आहे. प्रकल्पातील प्रवाळांचे (कोरल) स्थलांतर व अस्तित्व टिकविण्याचे काम यशस्वीरित्या साध्य करण्यात आले आहे.

सागरी किनारा मार्गाचा दुसरा टप्पा 

येत्या काही वर्षांत दक्षिण मुंबईतून सागरी किनारा मार्गावरून थेट मुलुंड, ठाणे, ऐरोलीपर्यंत जाता येणार आहे. सागरी किनारा मार्गाचा दुसरा टप्पा असलेला वर्सोवा ते दहिसर मार्ग हा गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्याला जोडला जाणार आहे. त्यामुळे मरीन ड्राईव्ह येथून थेट भाईंदरपर्यंत जाता येणार आहेच पण ठाण्यापर्यंतचा प्रवासही सुसाट होणार आहे. वर्सोवा दहिसर मार्गावर मालाड माईंडस्पेस जंक्शनपासून हा नवा जोडमार्ग (कनेक्टर) असेल.

सागरी किनारा मार्गाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. वर्सोवा-दहिसर या मार्गाचे काम सहा टप्प्यांत सुरू होणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करून कंत्राटदारांना स्विकृतीपत्रही देण्यात आले आहे. वांद्रे ते वर्सोवा सागरी मार्ग हा प्रकल्प एमएसआरडीसी यांच्यामार्फत राबवला जाईल. त्यामुळे पालिका प्रशासनाने या मार्गाची तयारी सुरू केली आहे.

पश्चिम द्रुतगती महामार्ग, लिंक रोड, एस. व्ही. रोड या पूरक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते. वर्सोवा ते दहिसर हा एकूण १८.४७ किमीचा मार्ग आहे. या संपूर्ण मार्गावर पूल, बोगदा, उन्नत मार्ग अशी गुंतागुंतीची रचना आहे. सहा टप्प्यांसाठी वेगवेगळे कंत्राटदार नेमण्यात आले आहेत. या प्रत्येक टप्प्याचे काम सुमारे पाच हजार कोटींचे आहे. यापैकी बांगूर नगर ते माईंडस्पेस मालाड या दुसऱ्या टप्प्यांतर्गत गोरेगाव मुलुंड जोड रस्त्याला ४.४६ किमीचा एक उन्नत जोड (कनेक्टर) देण्यात येणार आहे. त्यामुळे हा टप्पा महत्त्वाचा मानला जात आहे.

भविष्यात हे सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर मरीन ड्राइव्ह येथून सागरी किनारा मार्गावरून थेट भाईंदर पश्चिमपर्यंत जाता येणार आहे. तसेच गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्याचा कनेक्टर तयार झाल्यानंतर थेट मुलुंड, ठाण्यापर्यंतही जाता येणार आहे. त्यामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडणारा मार्ग मिळणार आहेच, पण शहर आणि पूर्व उपनगरही जोडले जाईल.

संपूर्ण प्रकल्पाचा खर्च ३५ हजार कोटींवर

वर्सोवा ते दहिसर या प्रकल्पाची लांबी जास्त असून कांदळवने, खाडी यासारख्या विविध भूभागातून तसेच मेट्रो कारशेडवरून हा मार्ग जाईल. अशा भूभागांवरील पूल, भूयारी मार्ग असे अंतर्भूत आहेत. या प्रकल्पाचा खर्च ३५,९५५ कोटी इतका आहे. प्रकल्पाचे काम चार वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असेल. वर्सोवा ते दहिसरमधील प्रवास वेळेत ३० ते ४० मिनिटांची बचत होईल.

 एकूणच वेळ आणि इंधन बचतीबरोबरच वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी करून मुंबईकरांचे दैनंदिन जीवनमान सुखकर करण्यामध्ये सागरी किनारामार्ग महत्त्वाची भूमिका निश्चितच बजावणार आहे.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...