Tuesday, March 12, 2024

नव्या वर्षातील दुसरी भेट : महत्त्वाकांक्षी सागरी किनारा मार्गाची दक्षिण मार्गिका सुरू

महाराष्ट्र शासनाने मुंबईकरांना नव्या वर्षात सुरुवातीला जानेवारी  महिन्यात  सागरी मार्ग सुरू करून अनोखी भेट दिली. जो अटल सागरी सेतू म्हणून ओळखला जातो.  काही दिवसांच्या अंतराने महाराष्ट्र शासनाने नागरिकांनी आणखी एक भेट दिली आहे. ही भेट आहे, सागरी किनारामार्गाची  दक्षिण मार्गिका.  ११ मार्च २०२४ ला सागरी किनारामार्गच्या दक्षिणेकडच्या बाजूचा एक मार्ग सुरू केला आहे. या मार्गाचे  अनावरण राज्याची मा. मुख्यमंत्री  श्री. एकनाथ शिंदे, मा. उपमुख्यमंत्री श्री. देवेन्द्र फडणवीस आणि मा. उपमुख्यमंत्री  श्री. अजित पवार यांच्या हस्ते झाले. 

 मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या  सागरी किनाऱ्याच्या पहिल्या टप्प्याच्या (वरळी ते मरीन ड्राईव्ह) एका लेनचे उद्घाटन  करण्यात आले. या सोहळ्यास मा. मुख्यमंत्री तसेच मा. उपमुख्यमंत्री यांच्या बरोबरीने शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे मा.पालकमंत्री  श्री.  दीपक केसरकर,मा.  कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. मंगलप्रभात लोढा, मा. माजी केंद्रीय राज्यमंत्री  श्री.मिलिंद देवरा, स्थानिक लोकप्रतिनिधी, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे मा.  आयुक्त तथा प्रशासक डॉ.  इकबालसिंह चहल, मा. अतिरिक्त आयुक्त  श्रीमतीआश्विनी भिडे, डॉ.अश्विनी जोशी आदी यावेळी उपस्थित होते.  हा सागरी किनारा छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने ओळखला जाणार असल्याची घोषणा यावेळी मा. उपमुख्यमंत्री  श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यामुळे  सागरी किनारा मार्गाच्या  दक्षिणेकडच्या मार्गाचे नाव  'धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण)’ आहे.  हा सागरी किनारा मार्ग मुंबई महापालिकेने बांधला आहे. सागरी मार्गाची एकूण लांबी १०.५८ किलोमीटर इतकी आहे. त्यापैकी ९ किलोमीटरचा मार्ग दक्षिण मुंबईत आहे.  मुंबईच्या वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी सागरी सेतूंची मोठी मदत होणार असल्याचा दावा महाराष्ट्र शासनाने केला आहे. 

सध्यातरी या सागरी मार्गाची  उद्घाटन झालेली दक्षिणेकडची बाजू  केवळ सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत  खुली राहणार आहे. कारण अद्याप उत्तर दिशेला म्हणजेच वरळीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेची कामे शिल्लक असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सुरुवातीला केवळ सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेतच वरळी ते मरिन ड्राईव्ह ही नऊ किमीची एक बाजू सुरू राहू शकणार आहे. त्यानंतर रात्रीच्या वेळी दुसऱ्या बाजूची कामे सुरू राहणार आहेत. तसेच शनिवार, रविवारी हा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. 

ऑक्सीजन पार्क 

धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पाच्या परिसरात ३२० एकर क्षेत्रावर जागतिक दर्जाचे उद्यान साकारण्यात येईल, अशी ग्वाही मा.  मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.  सर्वसामान्य मुंबईकरांचा प्रवास सुखकर होण्याबरोबरच वेळेची आणि इंधनाची बचत करणारे तसेच प्रदूषणमुक्त मुंबई करण्याचे सरकारचे उद्दिष्ट साध्य करणारे प्रकल्प उभारण्यात येत आहेत. इंजिनिअरींगचा चमत्कार असणारा किनारी रस्ता हा या अनुषंगाने उपयुक्त प्रकल्प असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. प्रियदर्शिनी पार्क आणि रेसकोर्सच्या उपलब्ध होणाऱ्या ३००  एकर जागेत आबालवृद्धांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे सेंट्रल पार्क उभारण्यात येणार असून मुंबईकरांसाठी हे ऑक्सीजन पार्क ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

सागरी किनारा प्रकल्पामुळे होणारे फायदे

सागरी किनारी रस्त्यामुळे अंदाजे ७० टक्के वेळेची बचत होणार असून इंधनामध्ये ३४ टक्के बचत होईल. इंधन बचतीमुळे प्रती वर्षी विदेशी चलनाची देखील मोठ्या प्रमाणात बचत होईल. ध्वनी आणि वायू प्रदूषण कमी होईल. सुमारे ७० हेक्टर हरितक्षेत्र निर्मितीमुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होऊन मुंबईकरांचे जीवनमान सुधारेल. या हरितक्षेत्रात सायकल ट्रॅक, सार्वजनिक उद्याने, जॉगिंग ट्रॅक, खुले प्रेक्षागृह आदी प्रस्तावित आहेत. या रस्त्यामुळे इतर मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल आणि सुरक्षित व जलद प्रवास करता येईल. मुंबईकरांना सागर किनारी अतिरिक्त प्रोमीनेड उपलब्ध होईल.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) हा दक्षिण मुंबईतील प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वांद्रे वरळी सी लिंकच्या वरळी टोकापर्यंत असणार आहे. या रस्त्याची लांबी १०.५८ कि.मी. असून मार्गिकांची रस्त्यावरील संख्या दोन्ही बाजूला प्रत्येकी चार असेल. तर बोगद्यांमध्ये ती दोन्ही बाजूला प्रत्येकी तीन असेल. भराव टाकून बनविलेल्या रस्त्यांची लांबी ४.३५ कि.मी. असून पुलांची एकूण लांबी २.१९ कि.मी.आहे. या मार्गातील मलबार हिल टेकडीच्या\ खालील दुहेरी बोगद्यांची लांबी प्रत्येकी २.०७२ कि.मी. असून त्याचा अंतर्गत व्यास ११ मीटर आहे. याचे एकूण भरावक्षेत्र १११ हेक्टर इतके असून तीन ठिकाणी आंतरबदल असतील ज्यांची लांबी १५.६६ कि.मी. इतकी आहे. ७.५ कि.मी. लांबीचे नवीन पदपथ असून बस वाहतूकीसाठी समर्पित मार्गिका ठेवण्यात आली आहे. समुद्री लाटांपासून बचावासाठी ७.४७ कि.मी. लांबीची सागरी तटरक्षक भिंत असणार आहे. या प्रकल्पात अमरसन्स, हाजी अली, वरळी डेअरी, थडाणी जंक्शन, वरळी येथे पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. हा प्रकल्प मे २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून २५ फेब्रुवारी पर्यंत याची भौतिक प्रगती ८५.९१ टक्के तर आर्थिक प्रगती ८१.१९ टक्के इतकी झाली आहे. बोगदा खणन काम १०० टक्के पूर्ण झाले असून पुनःप्रापणाचे (रिक्लेमेशन) चे काम ९८ टक्के पूर्ण झाले आहे. समुद्रभिंत उभारण्याचे काम देखील पूर्णत्वास आले असून आंतरबदल ८७ टक्के तर पुलांचे काम ८५ टक्के पूर्ण झाले आहे.

कसा आहे मुंबईचा कोस्टल रोड प्रकल्प?

मुंबई ते कांदिवली २९ किलोमीटर लांबीचा हा कोस्टल रोड असेल. पैकी  दक्षिण कोस्टल रोड हा १०.५८ किमी लांबीचा आहे.  यामध्ये एकूण आठ मार्गिका आहेत. त्यामध्ये जाणाऱ्या आणि येणाऱ्या चार अशा आहेत. तसेच बोगाद्यामध्ये ३ + ३ अशा मार्गिका आहेत. भराव टाकून बनवलेल्या रस्ता हा एकूण ४.३५  किमी लांबीचा आहे. तसेच पुलांची एकूण लांबी ही २.१९ किमी इतकी आहे. बोगद्यांची लांबी ही प्रत्येकी २.१९  किमी इतकी आहे.  प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वरळी ह्या पहिल्या टप्प्यातील एक मार्गिका सुरू झाली आहे.  या एकूण प्रकल्पाला खर्च १२, ७२१  कोटी रुपये  खर्च आलाआहे.  कोस्टल रोड पूर्ण झाल्यानंतर प्रवासामध्ये ७० टक्के वेळेची बचत होणार असून ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण त्यामुळे कमी होईल. 

बोगद्याची वैशिष्ट्ये

किनारा मार्गावरील पहिला बोगदा खणण्याची सुरुवात जानेवारी २०२१ मध्ये करण्यात आली होती. हा बोगदा जानेवारी २०२२ मध्ये पूर्ण झाला. दुसरा बोगदा खणण्याची सुरुवात एप्रिल २०२२ मध्ये करण्यात आली आणि हा बोगदा मे २०२३ मध्ये पूर्ण झाला. बोगद्याला ३७५ मि.मी. जाडीचे कॉक्रीटचे अस्तर लावण्यात आलेले असून त्यावर अग्नीप्रतिबंधक उपाययोजनेअंतर्गत अग्नीरोधक फायरबोर्ड लावण्यात येत आहेत. भारतात प्रथमच सकार्डो वायुविजन प्रणालीची व्यवस्था करण्यात आली असून आपत्कालिन निर्वासनासाठी प्रत्येक ३०० मीटरवर छेद बोगदे

आहेत. उपयोगिता सेवेसाठी बोगद्यांमध्ये युटीलिटी बॉक्सची व्यवस्था करण्यात आली आहे. दुहेरी बोगद्यासाठी अद्ययावत वाहतूक व्यवस्थापन नियंत्रण प्रणालीची व्यवस्था करण्यात येत आहे.

प्रकल्पाचा खर्च

मुंबई किनारी रस्त्यासाठी एकूण बांधकाम खर्च १३९८३.८३ कोटी रुपये अपेक्षित आहे. यामध्ये ९३८३.७४ कोटी रुपयांच्या प्रत्यक्ष बांधकाम खर्चाबरोबरच इतर अनुषंगिक खर्चाचा समावेश आहे.

इतर वैशिष्ट्ये

सागरी रस्ता प्रकल्पातील बोगदा खणणाऱ्या यंत्राने (टीबीएम) खोदण्यात येणारा भारतातील सर्वात मोठ्या व्यासाचां बोगदा (व्यास १२.१९ मी.) आहे. भारतात प्रथमच रस्ते वाहतूक बोगद्यामध्ये सकार्डो वायुविजन प्रणालीची योजना करण्यात आली आहे. तसेच भारतामध्ये प्रथमच एकलस्तंभ पाईलचा पाया बांधून. पुलांची उभारणी करण्यात आली आहे. एकाच प्रकल्पामध्ये पुनः प्रापण करुन रस्ता, पूल, उन्नत मार्ग, उतरण मार्ग, आच्छादित बोगदा, समुद्र तसेच टेकडीखालून बोगदा, हरितक्षेत्राची निर्मिती करण्यात आली आहे. प्रकल्पातील प्रवाळांचे (कोरल) स्थलांतर व अस्तित्व टिकविण्याचे काम यशस्वीरित्या साध्य करण्यात आले आहे.

सागरी किनारा मार्गाचा दुसरा टप्पा 

येत्या काही वर्षांत दक्षिण मुंबईतून सागरी किनारा मार्गावरून थेट मुलुंड, ठाणे, ऐरोलीपर्यंत जाता येणार आहे. सागरी किनारा मार्गाचा दुसरा टप्पा असलेला वर्सोवा ते दहिसर मार्ग हा गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्याला जोडला जाणार आहे. त्यामुळे मरीन ड्राईव्ह येथून थेट भाईंदरपर्यंत जाता येणार आहेच पण ठाण्यापर्यंतचा प्रवासही सुसाट होणार आहे. वर्सोवा दहिसर मार्गावर मालाड माईंडस्पेस जंक्शनपासून हा नवा जोडमार्ग (कनेक्टर) असेल.

सागरी किनारा मार्गाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. वर्सोवा-दहिसर या मार्गाचे काम सहा टप्प्यांत सुरू होणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करून कंत्राटदारांना स्विकृतीपत्रही देण्यात आले आहे. वांद्रे ते वर्सोवा सागरी मार्ग हा प्रकल्प एमएसआरडीसी यांच्यामार्फत राबवला जाईल. त्यामुळे पालिका प्रशासनाने या मार्गाची तयारी सुरू केली आहे.

पश्चिम द्रुतगती महामार्ग, लिंक रोड, एस. व्ही. रोड या पूरक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते. वर्सोवा ते दहिसर हा एकूण १८.४७ किमीचा मार्ग आहे. या संपूर्ण मार्गावर पूल, बोगदा, उन्नत मार्ग अशी गुंतागुंतीची रचना आहे. सहा टप्प्यांसाठी वेगवेगळे कंत्राटदार नेमण्यात आले आहेत. या प्रत्येक टप्प्याचे काम सुमारे पाच हजार कोटींचे आहे. यापैकी बांगूर नगर ते माईंडस्पेस मालाड या दुसऱ्या टप्प्यांतर्गत गोरेगाव मुलुंड जोड रस्त्याला ४.४६ किमीचा एक उन्नत जोड (कनेक्टर) देण्यात येणार आहे. त्यामुळे हा टप्पा महत्त्वाचा मानला जात आहे.

भविष्यात हे सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर मरीन ड्राइव्ह येथून सागरी किनारा मार्गावरून थेट भाईंदर पश्चिमपर्यंत जाता येणार आहे. तसेच गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्याचा कनेक्टर तयार झाल्यानंतर थेट मुलुंड, ठाण्यापर्यंतही जाता येणार आहे. त्यामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडणारा मार्ग मिळणार आहेच, पण शहर आणि पूर्व उपनगरही जोडले जाईल.

संपूर्ण प्रकल्पाचा खर्च ३५ हजार कोटींवर

वर्सोवा ते दहिसर या प्रकल्पाची लांबी जास्त असून कांदळवने, खाडी यासारख्या विविध भूभागातून तसेच मेट्रो कारशेडवरून हा मार्ग जाईल. अशा भूभागांवरील पूल, भूयारी मार्ग असे अंतर्भूत आहेत. या प्रकल्पाचा खर्च ३५,९५५ कोटी इतका आहे. प्रकल्पाचे काम चार वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असेल. वर्सोवा ते दहिसरमधील प्रवास वेळेत ३० ते ४० मिनिटांची बचत होईल.

 एकूणच वेळ आणि इंधन बचतीबरोबरच वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी करून मुंबईकरांचे दैनंदिन जीवनमान सुखकर करण्यामध्ये सागरी किनारामार्ग महत्त्वाची भूमिका निश्चितच बजावणार आहे.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

No comments:

Post a Comment

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...