Tuesday, June 20, 2023

समूह विकास योजनेतून ठाणेकरांना लवकरच हक्काचे घर मिळणार


आशियातील सर्वांत मोठ्या समूह विकास अर्थात क्लस्टर योजनेचा शुभारंभ नुकताच मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात करण्यात आला. या योजनेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात तब्बल दहा हजार घरांची निर्मिती केली जाणार आहे. १५०० हेक्टरवर ही महत्त्वाकांक्षी योजना आकारास येणार आहे. त्यामुळे अनधिकृत व अधिकृत असलेल्या धोकादायक तसेच अतिधोकादायक इमारतींतील रहिवाशांना भविष्यात स्वतःचे हक्काचे घर उपलब्ध होणार असल्याने त्यांना दिलासा मिळेल. 

ठाणे शहरात मोडकळीस आलेल्या धोकादायक अनधिकृत व अधिकृत इमारतींचा सुनियोजित व संपूर्ण नागरी पायाभूत सुविधांसह पुनर्विकास व्हावा यासाठी एकूण ४५ नागरी पुनरुत्थान आराखडे तयार करण्यात आले आहेत. त्यातील अत्यंत दाटीवाटीचे क्षेत्र असलेल्या किसननगर नागरी पुनरुत्थान आराखडा क्र. १२मधील नागरी पुनरुत्थान योजना क्र. १ व २च्या प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ नुकताच मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. नागरी पुनरुत्थान १ व २ची अंमलबजावणी सिडको प्राधिकरणामार्फत होणार आहे. 

किसननगर भागात समूह पुनर्विकास योजनेचा (क्लस्टर) पहिला टप्पा राबविण्यासाठी परिसरातील राज्य शासनाच्या विविध विभागांच्या मालकीचे असलेले मोकळे भुखंड ताब्यात घेऊन त्यावर क्लस्टर योजनेतील इमारती उभारण्यासाठी पालिकेने हालचाली सुरु केल्या आहेत. या इमारतींची उभारणी केल्यानंतर त्याठिकाणी योजनेतील लाभार्थींना घरे देऊन त्यांच्या राहत्या इमारती पाडून त्याजागी आराखड्यानुसार इमारतींसह इतर सोयी सुविधांची उभारणी करण्यात येणार आहेत. योजनेतील लाभार्थींकरिता संक्रमण शिबीरांची उभारणी करण्यासाठी दिड ते दोन वर्षांचा कालावधी लागण्याबरोबरच मोठा निधी खर्च होणार असून हे सर्व टाळण्यासाठीच पालिकेने हा नवा पर्याय शोधला आहे. 

ठाणे महापालिका क्षेत्रात २५ ते ३० वर्षांपुर्वी उभारण्यात आलेल्या अनेक बेकायदा इमारती धोकादायक झाल्या असून यातील नागरिकांना हक्काचे आणि सुरक्षित घर मिळावे यासाठी शहरात समुह पुनर्विकास योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी शहरातील विविध भागांचे एकूण ४५ नागरी पुनर्निर्माण आराखडे तयार करण्यात आले असून त्याचे एकूण क्षेत्र १५०९ हेक्टर इतके आहे. त्यातील लोकमान्यनगर, कोपरी, किसननगर, राबोडी, टेकडी बंगला, हाजुरी, आझादनगर, गोकुळनगर, महागिरी, चरई, सिद्धेश्वर परिसर आणि स्थानक परिसर या भागातील १२ आराखड्यांना यापुर्वीच मान्यता मिळाली आहे. असे असले तरी या योजनेचा पहिला टप्पा किसननगर भागात सिडकोच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. 

या योजनेत बाधित होणाऱ्या इमारती पाडून त्याजागी नव्या इमारती उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी बांधकाम पाडकामाचे दर आणि ठेकेदार निश्चित करण्याकरिता पालिकेने निविदा काढण्यासाठी जोरदार हालचाली सुरु केल्या होत्या. या इमारती पाडण्याआधी तेथील रहिवाशांना दुसऱ्याठिकाणी स्थलांतरित करावे लागणार असून त्यासाठी संक्रमण शिबीरे पालिकेला उभारावी लागणार आहेत. संक्रमण शिबीरांच्या उभारणीसाठी दिड ते दोन वर्षांचा कालावधी लागण्याबरोबरच मोठा निधी खर्च होणार आहे. त्यानंतर रहिवाशांना संक्रमण शिबीरात स्थलांतरीत करून योजनेतील इमारती उभारण्याचे काम हाती घ्यावे लागणार असून त्यासाठी एक ते दिड वर्षांचा काळ लागणार आहे. हे सर्व टाळण्यासाठी पालिकेच्या क्लस्टर विभागाने आता परिसरातील राज्य शासनाच्या विविध विभागांच्या मालकीचे असलेले मोकळे भुखंड ताब्यात घेऊन त्यावर क्लस्टर योजनेतील इमारती उभारण्यासाठी कृती केली जाईल. आणि येत्या काळात लवकरच ठाणे शहरात अनधिकृत घरात राहणाऱ्या नागरिकांना समूह विकास प्रकल्पाच्या माध्यमातून हक्काचे घर मिळेल.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Monday, June 19, 2023

पावसाळ्यातील आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिका सज्ज

पावसाला कोणत्याही क्षणी सुरुवात होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.  वातावरणात तशा प्रकारचे बदल घडून येत आहेत.  पावसात अतिवृष्टी होणे, पूरस्थिती निर्माण होणे स्वाभावीक आहे. या पूरस्थितीचा सामना करण्यासाठी महाराष्ट्रातील महापालिका सज्ज झाल्या आहेत. 

बृहनमुंबई महानगरपालिका : यंदा पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर  महानगरपालिकेच्या मुख्य आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाच्या धर्तीवर सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये विभागीय नियंत्रण कक्ष प्रथमच स्वतंत्र मनुष्यबळासह सुसज्ज करण्यात आले आहेत. त्यासोबतच ५८ हॉट लाईन्सची सुविधा ही महानगरपालिकेची २४ प्रशासकीय विभाग कार्यालये, ६ मोठी रुग्णालये व २८ बाह्य यंत्रणांना जोडण्यासाठी सज्ज ठेवण्यात आली आहे.  मुंबई पोलीसांमार्फत बृहन्मुंबईत बसविण्यात आलेल्या ५३६१ सिसिटीव्ही कॅमे-यांचे थेट प्रक्षेपण पहाण्याकरिता व्हिडीओ वॉलची सुविधा आपत्कालीन कक्षात उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच आपत्ती प्रसंगी वाहतूक व्यवस्था कोलमडल्यास विविध रेल्वे स्थानकांवर अडकून पडलेल्या प्रवाशांकरिता, तसेच आपत्तीमुळे बेघर झालेल्या नागरिकांकरिता तात्पुरते आश्रय मिळावा म्हणून निवाऱ्याची व्यवस्था करण्याच्या सूचना संबधीत अधिकाऱ्यानी दिल्या आहेत.  

बृहन्मुंबई महापलिकेद्वारे ‘पावसाळ्याच्याअनुषंगाने सर्वस्तरीय करण्यात येणारी कार्यवाही पुढीलप्रमाणे 

  • महापालिकेचा मुख्य आपत्कालीन नियंत्रण कक्ष वर्षाचे ३६५ दिवस २४ तास कार्यरत असतो. पण पण यंदा ५८ हॉट लाईन्स कार्यरत ठेवण्यात आलेल्या आहेत.  ५८ हॉट लाईन्स: महापालिकेची २४ प्रशासकीय विभाग कार्यालये, ६ मोठी रुग्णालये व २८ बाहय यंत्रणांना जोडणाऱ्या  ५८ हॉट लाईन्स कार्यरत.
  • आणिबाणी प्रसंगी महापालिका आयुक्त, सर्व अतिरिक्त आयुक्त, परिमंडळीय उपायुक्त व विभागीय सहाय्यक आयुक्त यांच्यातील संदेशवहन सुलभ व्हावे, याकरिता अतिमहत्वाच्या ६१ ठिकाणांसह संबधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वाहनांमध्ये अत्याधुनिक डिजीटल मोबाईल रेडीओ प्रणाली कार्यान्वित
  • हेल्पलाईन क्रमांक १९१६: १९१६ क्रमांकाच्या ३० लाईन्स हंटींग सुविधेसह तत्पर\
  • थेट दूरध्वनी क्रमांक – २२६९४७२५ / २७, २२७०४४०३ फॅक्स- २२६९४७१९
  • सिसिटीव्ही कॅमे-यांद्वारे अवलोकनः मुंबई पोलीसांमार्फत बृहन्मुंबईत बसविण्यात आलेल्या ५३६१ सिसिटीव्ही कॅमे-यांचे थेट प्रक्षेपण पहाण्याकरिता व्हिडीओ वॉलची सुविधा. सिसिटीव्ही कॅमे-यांद्वारे प्राप्त होणा-या थेट चलत छायाचित्रणाचे नियमित अवलोकन.
  • विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांद्वारे प्रसारित होणा-या बातम्यांचे नियमित अवलोकन करता यावे यासाठी ३ दूरचित्रवाणी संच.
  • नियंत्रण कक्षातील संदेशवहन यंत्रणा कोलमडल्यास त्वरीत संदेशवहनाकरिता हॅम रेडीओ तयार ठेवण्यात आलेला आहे.

शहर आपत्ती व्यवस्थापन केंद्र येथील बॅकअप नियंत्रण कक्ष

महानगरपालिकेतील मुख्य आपत्कालीन नियंत्रण कक्षात काही समस्या उद्भवल्यास समन्वय कार्य अबाधितपणे व्हावे यासाठी पर्यायी नियंत्रण कक्ष (Backup Control Room) परळ परिसरातील साईबाबा मार्गावरील बेस्ट वसाहतीच्या शेजारी असणा-या शहर आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेत सुरु करण्यात आलेला आहे. हा नियंत्रण कक्ष देखील संपूर्ण वर्षभर व दिवसाचे २४ तास कार्यरत आहे. तसेच येथे आवश्यक ते मनुष्यबळ कार्यतत्पर ठेवण्यात आले आहे. बॅकअप नियंत्रण कक्ष मुख्य नियंत्रण कक्षाप्रमाणेच हॉट लाईन्स, बिनतारी यंत्रणा, हॅम रेडीओ यांनी जोडलेला आहे. तसेच हेल्पलाईन क्रमांक १९१६ यावर     येणा-या तक्रारी नोंदविण्याची पर्यायी व्यवस्था आहे.

डिझास्टर मॅनेजमेंट बीएमसी :  पावसाच्या  घटनांबद्दल पूर्वसूचना किंवा माहिती मुंबईकरांना मिळू शकते ती मिळावी यासाठी मुंबई महानगर पालिकेमार्फत 'डिझास्टर मॅनेजमेंट बीएमसी' नावाचे अॅप्लिकेशन उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे अॅप्लिकेशन प्ले स्टोअर'च्या माध्यमातून डाऊनलोड करता येते. 

अॅन्ड्रॉइड व आयओएस या दोन्ही प्रकारच्या प्रणालींकरिता या अॅपची सुविधा आहे. . त्यामुळे आपत्कालीनप्रसंगी कुठे संपर्क करावा? कसा साधावा? त्यावेळची भौगोलिक परिस्थिती काय आहे या सगळ्या बाबतची माहिती मुंबईकरांना एका क्लिकवर मिळणार आहे. अॅपमुळे मुंबई शहर व उपनगरात

होत असलेल्या पावसाचा दर १५मिनिटांचा दर तासाचा तसेच दर २४ तासांचा अद्ययावत अहवाल मिळणार आहे. विशेष म्हणजे मुंबई महापालिका क्षेत्रातील महत्त्वाच्या ठिकाणांनुसार तिथे पडलेल्या पावसाची माहितीही तत्काळ व सहजपणे बघता येऊ शकेल. हवामान पर्यायांमध्ये वाऱ्याचा वेग, वाऱ्याची दिशा, हवेतील दमटपणाचे प्रमाण, पर्जन्यमापनाची तीव्रता या बाबीही अंतर्भूत आहेत. ज्या नागरिकांनी हे अॅप डाऊनलोड केले असेल अशा नागरिकांना समुद्रास ४.५ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटांची वेळ  व उंची तसेच वेधशाळेमार्फत जोरदार, अतिजोरदार, मुसळधार पावसाच्या अंदाजाची माहिती नोटीफिकेशनद्वारे

प्राप्त होणार आहे. पालिका नियंत्रण कक्षांची माहिती मिळणार आहे.  संबंधीत संपर्क यंत्रणा कोणत्याही स्थितीमध्ये खंडित होणार नाही याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. धोकादायक इमारती, दरडीचीही माहितीही या अॅप्लिकेशनमध्ये मिळणार आहे.  आपल्या विभागातील पाणी साचण्याची ठिकाणे, संभाव्य दरडी कोसळण्याची ठिकाणे, मोडकळीस आलेल्या इमारती याबाबतच्या माहितीसोबतच तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आलेल्या पालिकेच्या शाळा, विविध नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीत नागरिकांनी काय करावे व काय करू नये याची माहिती देण्यात आली आहे

आयफ्लोजचा पूर अलर्ट : अचानक पडलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होऊन मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर यंदाच्या मुंबईकरांसाठी आयफ्लोजप्रणाली उपलब्ध करून दिली आहे. बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या आपत्कालीन पावसाळ्यात व्यवस्थापन विभाग आणि राष्ट्रीय समुद्रीतट संशोधन केंद्र यांच्यामार्फत संयुक्तरीत्या पूर प्रवण क्षेत्राची आगाऊ सूचना देणारी ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. याप्रणालीमध्ये नॅशनल सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्टिंग, भारतीय हवामान विभाग, भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पालिका

आणि आयएमडीद्वारे स्थापित पर्जन्यमापक स्थानकांच्या नेटवर्कमधील माहितीचा समावेश करण्यात आला आहे.  आपत्ती व्यवस्थापनासह इतर विभागांना सतर्क राहून पुरामुळे होणारी हानी टाळता येणार आहे. आयफ्लोज ही प्रणाली ६ ते ७२ तास अगोदर संभाव्य पूर-प्रवण क्षेत्रांना सतर्कतेचा इशारा देण्यास सक्षम आहे. तसेच या प्रणालीमार्फत संभाव्य पूरप्रवण क्षेत्र, पुराच्या पाण्याची संभाव्य उंची, सर्व २४ विभागीय क्षेत्रांमधील स्थाननिहाय समस्या आणि पुराच्या येणाऱ्या घटकांची असुरक्षितता आणि जोखीम यांची\ पूर माहिती प्राप्त होणार आहे.

पालिकेच्या महिला अभियंत्या सज्ज :  पावसाळ्यात मुंबईतील सखल भागात साचणाऱ्या पाण्याचा निचरा करणे, हे मोठे आव्हान असते. हे आव्हान सक्षमपणे पेलण्यासाठी पालिकेतील १८ महिला अभियंत्यांची टीम सातत्याने कार्यरत आहे. पालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागासाठी १८ महिला अभियंता म्हणून कार्यरत असून त्यात मुंबई शहरात १ दुय्यम अभियंता, पूर्व उपनगरात ९ दुय्यम अभियंता, पश्चिम उपनगरात ७ दुय्यम अभियंता कार्यरत आहेत. या शिवाय पश्चिम उपनगरात १ सहायक अभियंता अशी एकत्रित १८ अभियंत्यांची टीम काम करीत आहे. ही टीम नालेसफाईपासून ते भरतीच्या काळात अगदी उदंचन केंद्र (पंपिंग स्टेशन) वर सेवा बजावण्यापर्यंत विविध पातळ्यांवरील पावसाळा पूर्व कामांची जबाबदारी पार पाडत आहेत.

नवी मुंबई महानगरपालिका  :  १३ जून २०२३ पासून  शहरात पावसाळा सुरुवात  झाली आहे. महानगरपालिकेसह पोलिस, वाहतूक विभाग, महावितरण, एमआयडीसी, सिडको, एपीएमसी, एमआयडीसी व सर्व यंत्रणांनी दक्ष राहावे. पावसाळापूर्व सर्व कामे चोख झाली आहेत का, याची दक्षता सर्व शासकीय तसेच नीम शासकीय यंत्रणांनी घ्यावी असे आदेश नवी मुंबई महानानगर पालिका आयुक्तांनी नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील महानगरपालिकेसह

पोलिस, वाहतूक विभाग, महावितरण, एमआयडीसी, सिडको, एपीएमसी, एमआयडीसी व सर्व यंत्रणांना दिले आहेत.  वृक्ष कोसळणे, अपघात होणे,

आग लागणे, वीजपुरवठा खंडित होणे अशा घटना घडल्यास तत्काळ मदतकार्य सुरू झाले पाहिजे, अशा सूचनाही आयुक्तांनी दिल्या आहेत.  महानगरपालिकेने मुख्यालयात मुख्य नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. संपर्क यंत्रणा कोणत्याही स्थितीमध्ये खंडित होणार नाही याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. तसेच  शहर आपत्ती व्यवस्थापनमी समितीच्या वेळोवेळी बैठका घेतल्या आहेत. 

विरार वसई महानगर पालिका : वसई, विरार शहरात  पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. पावसाळ्यात झाडे उन्मळून पडणे, पावसाचे पाणी साचून वाहतूक कोंडी होणे, पाणी तुंबणे, दरड कोसळणे अशा घटना समोर येत असतात. नागरिकांना तात्काळ मदत मिळावी यासाठी आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष सज्ज ठेवण्यात आले आहेत. नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत राहणार आहे. ९ प्रभागातील कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. तसेच दिवाणमान येथील कायमस्वरूपी असलेले मुख्य आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष हे सुरूच आहे. कक्षांमार्फत पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्या, निर्माण होणाऱ्या अडचणी, नैसर्गिक आपत्ती यांचे निराकरण केले जाणार आहे. येथे संपर्क साधा. 

'ए' बोळिंज - ९६६५००२८२०

'बी' विरार पूर्व - ९६६५००२८४७

'सी' चंदनसार- ९६६५००३२७२

'डी' आचोळे ९६६५००३३६४

'ई' नालासोपारा ९६६५००३५११

'एफ' पेल्हार ९६६५००३८४५

'जी' वालीव ९६६५००३८८७

'एच' नवघर - माणिकपूर ९६६५००४४८४

'आय' वसई ९६६५००४०५५

मुख्य आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, दिवाणमान ०२५०२३३४५४६/ २३३४५४७ / ७०५८९१११२५/ ७०५८९९१४३०


अग्निशमन दलाची मान्सूनपूर्व तयारी :  पावसाळ्यात मुंबईच्या समुद्रात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी अग्निशमन दलाची मान्सूनपूर्व तयारी सुरू आहे. अतिवृष्टी आणि समुद्राच्या भरती दरम्यान अग्निशमन दलाची एफआरडी टीम स्वतःच्या बोटी आणि जेटस्की बोटींसह मुंबईच्या चौपाटीवर तैनात राहणार आहेत. याचे प्रात्यक्षिक सध्या अग्निशमन दलातर्फे मुंबईच्या समुद्रात सुरु आहे. ६ बोटी आणि समुद्रात वेगाने धावणारी ३ जेटस्की गिरगाव, दादर, गोराई, आक्सा, वर्सोवा आणि जुहू चौपाटीवर तैनात राहणार आहेत.

नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधावयाचा असल्यास त्यांनी खालील माध्यमांचा वापर करावा –

• १९१६ मदतसेवा क्रमांक

• संकेतस्थळ – dm.mcgm.gov.in

• मोबाईल अॅप – Disaster Management BMC

• इन्स्टाग्राम – my_bmc

• ट्वीटर हॅन्डल – @mybmc

• फेसबुक – myBmc

• यु ट्युब – MyBMCMyMumbai

• चॅटबॉट क्रमांक – ८९९९२२८९९९

• विभागीय नियंत्रण कक्ष (संपर्क क्रमांक सोबत जोडण्यात आले आहेत)

• मान्सुन कालावधीत नागरिकांनी समुद्र किनारी पाण्यात जाणे टाळावे.

• अतिमुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असल्यास साचलेल्या पाण्यातून जाणे टाळावे.

• मान्सुन कालावधीत गडगडाट व वीजा चमकत असताना उघड्या परिसरात जाणे तसेच झाडाखाली उभे रहाणे टाळावे.

• महाराष्ट्र शासन, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे.

• अफवा पसरवू नयेत व अफवांवर विश्वास ठेवू नये.


विभागीय नियंत्रण कक्षांचे संपर्क क्रमांक


अनु क्र. विभागाचे नाव दूरध्वनी क्रामांक

१ ए २२६२४०००

२ बी २३७९४०००

३ सी २२०१४०००

४ डी २३८६४०००

५ ई २३०१४०००

६ एफ दक्षिण २४१०३०००

७ एफ उत्तर २४०८४०००

८ जी दक्षिण २४२२४०००

९ जी उत्तर २४३९७८८८ / २४२१२७७८

१० एच पूर्व २६११४०००

११ एच पश्चिम २६४४४०००

१२ के पूर्व २६८४७०००

१३ के पश्चिम २६२३४०००

१४ एल २६५०५१०९/८६५२७५०४०५

१५ एम पूर्व २५५५८७८९

१६ एम पश्चिम २५२६४७७७

१७ एन २५०१३०००

१८ पी दक्षिण २८७२७०००

१९ पी उत्तर २८८२६०००

२० आर दक्षिण २८०५४७८८

२१ आर उत्तर २८९३६०००

२२ आर मध्य २८९३११८८

२३ एस २५९५४०००

२४ टी २५६९४०००


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Wednesday, May 31, 2023

राज्यात ‘मेरी लाईफ, मेरा स्वच्छ शहर’ उपक्रम रिड्यूस, रियूज आणि रिसायकल संकल्पनेवर भर

केंद्र सरकारचे स्वच्छता अभियान दिवसेंदिवस लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमधून करण्याचा प्रयत्न केला जात आहे.  त्यासाठी शहरांतील विविध महानगरपालिका, नगरपरिषद तसेच नगरपंचायती  'मेरी लाईफ, मेरा स्वच्छ शहर', ही मोहीम  आणि  त्या अंतर्गत  रिड्यूस, रियूज आणि रिसायकल- 'थ्री-आर केंद्रांची सुरुवात करीत आहेत. 

"स्वच्छतेतून परोपकाराची बीजे पेरली जातात. परोपकारातून माणुसकी जपली जाते" स्वच्छता आणि  परोपकारावर महत्त्वाचे कार्य करणारे संत गाडगे बाबा यांचे महत्त्वाचे विचार महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था आचरणात आणतआहेत. याचे चालते-बोलते उदाहरण आहे ‘मेरी लाईफ, मेरा स्वच्छ शहर’ हे अभियान आणि  थ्री-आर केंद्रे. 

आपल्या प्रत्येकाच्या घरात कित्येक अशा वस्तू असतात की,  त्यांचा वापर करत नाही. वापरात नसलेल्या वस्तू  ह्या नेहमी अडगळीत पडून राहतात. तर अशा चांगल्या स्थितीतल्या; पण वापरात नसलेल्या वस्तू स्थानिक स्वराज्य संस्थांनी ठिकठिकाणच्या बेघर निवारा केंद्रांमध्ये आणण्याचे आवाहन केले होते.  त्या आवाहनाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. नागरिकांचा लाभणारा प्रतिसाद पाहता ‘मेरी लाईफ, मेरा स्वच्छ शहर’ या अभियानातंर्गत  थ्री-आर केंद्रे चालवण्यासाठी वापरात नसलेल्या पण चांगल्या स्थितीत असणाऱ्या वस्तू आणून देण्यासाठी पुन्हा एकदा विविध स्थानिक स्वराज्य संस्थांनी आवाहन केले आहे. 

थ्री-आर केंद्रांमध्ये केंद्रात जुनी पुस्तके, प्लास्टिक, कपडे, पादत्राणे आणि इतर निरुपयोगी वस्तू नागरिकांकडून गोळा करुन त्यांचा पुनर्वापर करण्यात येणार आहे.यासाठी पालिकेच्यावतीने ई-रिक्षा व घंटागाडीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे उपक्रमातंर्गत जमा केलेल्या वस्तूंची नोंद रजिस्टरमध्ये ठेवली जाणार आहे. गरजू नागरिकांनी त्यांना आवश्यक वस्तू या केंद्रातून घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच या अभियानातून टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवण्याच्या स्पर्धाही आयोजित केल्या आहेत. त्याचे प्रदर्शनही या केंद्रात भरवले जाणार आहे. विजेत्यांना आकर्षक बक्षीसे व प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

काही महापालिकांनी ‘थ्री आर’ केंद्रांद्वारे नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत.   घनकचरा व्यवस्थापनात ‘थ्री आर’ ही अत्यंत महत्वाची संकल्पना असून यामध्ये कचरा कमी करणे (Reduce), कच-याचा पुनर्वापर करणे (Reuse) व कच-यावर पुनर्प्रक्रिया करणे (Recycle) अपेक्षित आहे.  या विषयास अनुरूप कार्यवाही करीत नवी मुंबई महानगरपालिका 'रिसायकल मार्ट’ ही अत्यंत आगळीवेगळी संकल्पना ‘थ्री आर’च्या माध्यमातून राबवित आहेत. 'रिसायकल मार्ट'ला डी मार्टचा उत्तम पाठींबा मिळत आहे. 'रिसायकल मार्टमध्ये  ‘थ्री आर’ च्या अनुषंगाने यामध्ये नागरिकांनी घरातील वापरून झालेले कपडे, प्लास्टिक बॉटल्स, वस्तू व दुधाच्या पिशव्या, लेदरचे साहित्य, भांडी, वर्तमानपत्रे, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे अशा टाकाऊ वस्तू 'डी मार्ट' मध्ये आणून दिल्यास त्यावर त्यांना वस्तूंनुसार पॉईंट्सची कुपन्स दिली जाणार आहेत. त्या पॉईंट्सनुसार त्यांना तितक्या रक्कमेची सूट त्यांनी डी मार्ट मध्ये खरेदी केलेल्या नव्या सामानावर दिली जाणार आहे. याव्दारे घरातील सुक्या कच-याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी त्या वस्तू उपलब्ध करून देऊन नागरिकांकडून पर्यावरण रक्षणाला हातभार लावला जाणार आहे शिवाय त्या टाकाऊ वस्तूंच्या बदल्यात नागरिकांना पॉईंट्स स्वरूपात आर्थिक लाभही होणार आहे.

सुक्या कच-याची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावण्यासाठी ‘थ्री आर' ची संकल्पना अत्यंत मोलाची असून त्याकरिता डी मार्ट सारख्या लोकप्रिय वाणिज्य आस्थापनेने नवी मुंबई महानगरपालिकेची ‘रिसायकल मार्ट’ संकल्पना राबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अशा प्रकारचा बहुउपयोगी नाविन्यपूर्ण उपक्रम देशात बहुधा पहिल्यांदाच राबविला जात असेल.यामध्ये पर्यावरण जपणूकीसाठी हातभार आणि पॉईंट्सच्या रूपाने पैशांची बचत अशा दोन्ही बाजूने हा उपक्रम नागरिकांसाठी फायद्याचा असल्याने याचा लाभ नागरिक मोठ्या प्रमाणावर घेतील व या उपक्रमाचा उपयोग स्वच्छ सर्वेक्षणातील मानांकन उंचाविण्यासाठी होईल असा विश्वास व्यक्त केला.

तर मग रिड्यूस, रियूज आणि रिसायकल संकल्पनेवर भर देणाऱ्या ‘मेरी लाईफ, मेरा स्वच्छ शहर’ उपक्रमात सहभागी होणार ना? 


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Saturday, May 27, 2023

पालिकेचे आता 'मिशन मेरिट'

मुंबई महानगरपालिकेचे 'मिशन ॲडमिशन - ‘ एकच लक्ष्य एक लक्ष’ही मोहीम २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात विशेष लोकप्रिय झाली. मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने शाळांमधील पटसंख्येत वाढ करण्याचे ध्येय ठेवून हाती घेतली होती. पालिकेच्या शाळांमधून विद्यार्थ्यांची शिक्षण घेण्याची आवड वाढली पाहिजे, या अनुषंगाने पालिकेने आपल्या शैक्षणिक पद्धतीत आमूलाग्र बदल घडवून आणले. या शिक्षण पद्धतीला 'स्मार्ट स्कूल'ची जोड दिली.  

मिशन ॲडमिशन - एकच लक्ष्य एक लक्ष ' या विशेष मोहिमेनंतर आता 'मिशन मेरिट' हाती घेतले आहे. प्रत्येक मूल शिक्षण प्रवाहात आणण्याबरोबरच त्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी ही खास मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी तयार केलेल्या कृती

आराखड्याची अंमलबजावणी येत्या १५ जून २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून मुंबई महापालिका करणार आहे. 'मिशन मेरीट' अंतर्गत मुंबई महापालिकेच्या शैक्षणिक सेवा- सुविधांमध्ये आमूलाग्र बदल करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासोबत वेगवेगळे उपक्रम राबविले जाणार आहेत. 

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाद्वारे माटुंगा येथील 'एसआयईएस शाळेच्या  सभागृहात  'गुणवत्तापूर्ण शिक्षण' कार्यक्रम अंतर्गत चर्चासत्र संपन्न झाले. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने या चर्चासत्रात नियोजन करण्यात आले. ज्या शिक्षकांनी, मुख्याध्यापक, अधिकाऱ्यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे त्यांच्या शिक्षण पद्धती, बिगर शासकीय संस्थांच्या प्रतिनिधींनी मुलांना शिक्षणात प्रवाहात आणण्यासाठी हाती घेतलेले निरनिराळे उपक्रम आणि लातूर पॅटर्न या त्रिसूत्रीच्या आधारावर 'मिशन मेरिट' राबविण्यात येणार आहे. या तीनही क्षेत्रातील जाणकारांनी मुंबई

महापालिकेच्या शिक्षण विभागातील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करून पुढील वर्षभराचे नियोजन केले आहे. खास करून 'मिशन मेरीट'साठी विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती, विविध शिष्यवृत्ती परीक्षा, पायाभूत साक्षरता व गणितीय संकल्पना इयत्तेनुसार अध्ययन निष्पत्ती आदी विषयांवर विचारमंथन करण्यासाठी उप शिक्षणाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.  हाच मुंबई महानगर पालिकेच्या शिक्षण समितीचा  कृती आराखडा आहे. हा कृती आराखडा यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून राबविण्यात येणार आहे. 

कसा असेल 'मिशन मेरीट' कृती आराखडा... 

'मिशन मेरीट'मध्ये विद्यार्थ्यांच्या बौद्धिक प्रगतीचा, शैक्षणिक गुणवत्तेचा अभ्यास करून अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालात विद्यार्थ्यांना  शिक्षण घेण्यात समस्या निर्माण झाली असल्यास त्याची कारणे, त्या समस्येवरील उपाय समिती

सादर करणार आहे. त्यानंतर, या अहवालानुसार आणखी एक सविस्तर कृती आराखडा (ॲक्शन प्लॅन) तयार करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक समितीत दहा सदस्यांचासमावेश असेल. हे सदस्य अभ्यासकरून त्यावर आठ दिवसांत उपाय व उपक्रम सुचविणार आहेत. उप शिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितींच्या अहवालावर अभ्यास करून त्यावर कृतीआराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर, यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच १५ जून २०२३ पासून या आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या मार्गी लावण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या लागणार, त्यामध्ये कोणाचा सहभाग असेल, कोणकोणते साहित्य त्यासाठी लागणार याचे सूक्ष्म नियोजन करण्यात येणार आहे.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Monday, May 22, 2023

पिंपरी चिंचवड महापालिका शाळेचा आदर्श घ्यायला हवा

आर्टिफिशियल इंटेलिजन्स ( AI ) म्हणजे कृत्रीम  बुद्धिमत्ता. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून अनेक ऍप तयार केले जात आहेत. कृत्रीम  बुद्धिमत्तेचा वापर करून जशी  दैनंदिन कामे सुरळीतपणे पूर्ण करता येतात. तशीच ऑफीसची म्हणजे विविध कार्यालयीन कामे सुरळीत पूर्ण करता येतात. आता तर कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग विविध शाळांमध्येही केला जात आहे. यात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांनी बाझी मारली आहे. 


स्मार्ट सिटीअंतर्गत विविध शहरांतील महापालिकेच्या शाळांमधून  'ई-क्लास' रूम  हा प्रकल्प राबविला जात असून, त्यात स्मार्ट इंटरॅक्टिव्ह टीव्ही, कॉम्पुटर लॅब, स्टेम लॅब, रोबोटिक्स, शाळेच्या आतील नेटवर्किंग, मल्टिमीडिया कन्टेन्ट अशा विविध साधनांचा समावेश आहे. सध्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या  ११२ शाळांमधून दोन टप्प्यात स्मार्ट इंटरॅक्टिव्ह टूल बसविण्याचे काम एप्रिल २०२१ मधेच पूर्ण करण्यात आले. शाळेच्या भिंती ह्या अधिक बोलक्या दिसण्यासाठी एकूण ४० शाळांमध्ये शैक्षणिक पेटिंगचे काम शिक्षण विभागाच्या ऑर्डरनुसार एप्रिल २०२३ मध्ये पूर्ण झाले आहे. आता पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेत  आणखी एका घटकाची भर पडणार आहे आणि ती  आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची. 

कोरोना महामारीच्या काळात रिमोट वर्क आणि डिस्टन्स एज्युकेन यासारख्या डिजिटली प्रणालीकडे खूप ऑफिस वळले.  कारण वेळ वाचतो.गावकुसातील विद्यार्थ्यांना  चांगले शिक्षण घेता यावे यासाठी शाळांनीसुद्धा  डिजिटल शिक्षणपद्धतींचा मार्ग अवलंबविला. या डिजिटल शिक्षणप्रणालीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सची बहर पडली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ११२ शाळांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड अटेन्डन्स प्रणाली आणि विद्यार्थ्यांचे इमोशन आणि वर्तन विश्लेषक करण्याचे सॉफ्टवेअर येत्या शैक्षणिक वर्षापासून राबविण्याचे आदेश पालिका प्रशासनाने दिले आहेत. यासाठी ५३०० विद्यार्थी व ५७२ शिक्षकांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

शिक्षकांचे रजिस्ट्रेशन बेनेट कोलमन आणि कंपनी लिमिटेड आणि मे. ऐडीक सोलुशन प्रा. लि. यांच्या मार्फत शिक्षण विभागाच्या आदेशाने आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे काम सुरू करण्यात आले. त्यासाठी २८ आणि २९ एप्रिल रोजी शाळेतील शिक्षकांचे ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यात आले. तसेच, १ मे रोजी प्रत्यक्ष रजिस्ट्रेशन प्रक्रिया राबविण्यात आली. विद्यार्थी आणि शिक्षक यांचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी एक मोबाइल अॅप्लिकेशन विकसित करण्यात आले  असून त्याद्वारे विद्यार्थ्यांचे नाव, इयत्ता, तुकडी, जन्म दिनांक, रक्त गट, पालकांची माहिती, पत्ता, मोबाईल नंबर आणि त्यांचा ३ वेगवेगळ्या अँगलचा फोटो अॅप्लिकेशनद्वारे घेतला गेला. प्रक्रिया पार पाडण्यासाठी शिक्षकांच्या मदतीला मे. ऐडीक सोलुशन यांनी नेमलेलया  ३५ समन्वयकांनी  वेगवेगळ्या शाळांना भेट देऊन शिक्षकांना मार्गदर्शन केले व ही प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आर्टीफिशियल इंटेलिजन्स सॉफ्टवेअर प्रणाली अंतर्गत रजिस्ट्रेशन ड्राईव्हमध्ये विद्यार्थ्यांची फोटोसह माहिती घेताना शिक्षकांना मदत केली. या प्रणालीचे काम मे महिन्यातच पूर्ण होणार असून, येत्या शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. 

आर्टीफिशियल इंटेलिजन्स या प्रणालीमध्ये एका वर्गात दोन कॅमेरे बसविण्यात आले आहेत. जे वर्गातील विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवणार आहेत. वर्गात विद्यार्थ्यांची हजेरी आणि त्याच्या वर्तणुकीवर लक्ष राहणार आहे. वर्गात विद्यार्थी खेळताना किंवा भांडताना कोणाला लागले तर सॉफ्टवेअर डिटेक्ट करणार. सॉफ्टवेअर रन होईल तेव्हा अॅनालिसिस करेल की, विद्यार्थ्याचा कोणत्या तासाला त्याचा मूड कसा होता. यामध्ये भांडण झाले तर फाईट, पडला तर फॉल डाऊन, लागले तर डेंजर असे सॉफ्टवेअर ते डिटेक्ट करणार आहे. 

आर्टीफिशियल इंटेलिजन्स'मध्ये ज्या विद्यार्थ्यांची नोंदणी राहिलेली आहे, त्या राहिलेल्या व नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची नोंदणी १४ जूननंतर करण्यात येणार आहे. आर्टीफिशियल इंटेलिजन्स हे ऍप विद्यार्थी आणि शिक्षकांमधला दुवा ठरणार आहेत. या ऍपमुळे विद्यार्थ्यांची फक्त शैक्षणीक प्रगती होणार नसून त्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होणार आहे.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Saturday, May 20, 2023

सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचतोय ‘आपला दवाखाना’

मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने मुंबईसह राज्यभरात 'बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात ७०० आपला दवाखाने सुरू केले जाणार आहेत. आतापर्यंत ४००  आपला दवाखाना सुरू करण्यात आले आहेत.  महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक  सर्वसामान्य व्यक्तीला स्वस्त दारात पण दर्जेदार आरोग्य सुविधा मिळावी यासाठी 'आपला दवाखाना' या आरोग्य योजनेचा शुभारंभ करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १९ जानेवारीला मुंबईत  २० आपला दवाखान्यांचं लोकार्पण करण्यात आलं. यापूर्वी ऑक्टोबर २०२२ मध्ये मुंबईत एकूण ५२  ठिकाणी ‘आपला दवाखाना’ अंतर्गत आरोग्य सेवा सुरू करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील सर्वसामान्यांना दर्जेदार आणि मोफत आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी नोव्हेंबर २०२२ पासून राज्यात  ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ आरोग्य योजनेला प्रारंभ झाला. या आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रात ७०० आपला दवाखाने सुरू केले जाणार आहेत. आपला दवाखानाला मिळणारा प्रतिसाद पाहता मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'बाळासाहेब ठाकरे दवाखाना' योजनेला युद्धपातळीवर गती देण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत ३१७ बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू  करण्यासाठी तयारी झाली आहे.  यात ठाणे परिमंडळात २९ आपला दवाखाना असून पुणे परिमंडळ ३०, नाशिक परिमंडळ ५२, कोल्हापूर २७, छत्रपती संभाजीनगर परिमंडळ २८, लातूर परिमंडळ ४४, अकोला परिमंडळ ५३ आणि नागपूर परिमंडळात ५४ असे ३१७ आपला दवाखाना सुरू करण्यात येणार आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून सराकरी आणि पालिका हॉस्पिटलचा भार वाढला आहे. विशेषत: झोपडपट्ट्या असलेल्या परिसरात अशा दवाखान्यांची खूप गरज आहे. त्यामुळे महापालिका हद्दीत पहिल्या आरोग्यवर्धिनी केंद्रांचे  आपला दवाखान्यात रूपांतर केले जात आहे.   मुंबई महापालिकेने सुरू केलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेच्या लाभार्थींची संख्या आठ लाखांवर पोहचली आहे. आपला दवाखान्याच्या माध्यमातून मुंबईतील नागरिकांना विविध वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत असून नागरिकांचा पैसा आणि वेळेचीही बचत होत आहे. औषधे आणि मोफत वैद्यकीय चाचण्यांच्या पर्यायामुळे मुंबईकरही सुविधांचा मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहेत. येत्या काळात मुंबईत आणखी दवाखाने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सध्या १५६ ठिकाणी ‘आपला दवाखाना’ कार्यरत आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील मिळून १५६ दवाखान्यांत आतापर्यंत ८,०१,२३३ नागरिकांनी विविध सुविधांचा लाभ घेतला आहे. पॉलिक्लिनिक व डायग्नॉस्टिक केंद्रात ३२,९१८ रुग्णांनी दंत चिकित्सा, स्त्री-रोग तज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, जनरल फिजिशियन, त्वचारोग तज्ज्ञ इत्यादी विविध तज्ज्ञांच्या उपचार सुविधेचा लाभ घेतला. ७,६८,३१५ रुग्णांनी मोफत वैद्यकीय तपासणी व औषधोपचारांचा लाभ घेतला आहे. आपला  दवाखान्यात रुग्णांच्या सेवेसाठी  एक वैद्यकीय अधिकारी, एक परिचारिका, एक फार्मसीस्ट आणि एक मदतनीस अशा चौघांची कंत्राटीपद्धतीने नियुक्ती करण्यात आली आहे. या जागांच्या भरतीसाठी पालिकेकडून जाहिरात काढण्यात येते. 

काय आहे ‘आपला दवाखाना’ योजना?

‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ ही मुंबई महानगरपालिका आणि शिंदे सरकारची नवीन आरोग्य योजना आहे. सुरुवातीला 'आपला दवाखाना’ अंतर्गत या   ठाणे आणि मुंबई शहरात आपला दवाखाना अंतर्गत आरोग्य सुविधा दिल्या गेल्या.पण आता  संपूर्ण महाराष्ट्रात 'आपला दवाखाना' आरोग्य योजना सुरू करण्याचे मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे  लक्ष्य आहे. आगामी काळात राज्यभरात असे  ७००  दवाखाने सुरू करण्यात येतील असं आश्वासन शिंदे सरकारने दिलं आहे.

मुंबईतील झोपडपट्टी परिसरात आणि राज्यातील गामीण तसंच दुर्गम भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रत्येक छोट्या आजारासाठी हॉस्पिटलमध्ये यावं लागतं. यामुळे वैद्यकीय उपचाराला उशीर होतोच शिवाय प्रवासाचा खर्च होतो आणि अनेकदा तर राहण्याची गैरसोय सुद्धा होते. दुसऱ्याबाजूला दैनंदिन रुग्णांमुळे हॉस्पिटलवरील ताण वाढतो ज्याचा थेट परिणाम अपघात विभाग, आयसीयू आणि प्रसूती विभागा अशा तात्काळ उपचार गरजेचा असलेल्या रुग्णांच्या उपचारावर होतो. खरंतर वस्त्यांमध्ये सरकारी दवाखाने सुरू करण्याची मागणी ही गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. मुंबईसह राज्यभरातील महापालिका आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची प्रचंड गर्दी दिसून येते. अगदी ताप,सर्दी अशा आजारांसाठीही रुग्णांना उपचार आणि वैद्यकीय टेस्ट करण्यासाठी घरापासून दूर हॉस्पिटल गाठावे लागते. यावर उपाय म्हणून दर २५ ते ३० हजार लोकसंसंख्येच्या वस्तीजवळ  ‘आपला दवाखाना’ असावा असं महापालिकेचं लक्ष्य आहे. तसेच आपला दवाखाना’च्या माध्यमातून हजारो मुंबईकरांना विनामूल्य आरोग्य सुविधा पुरविण्यात येत आहेत. या आरोग्य सुविधा आपल्या जवळच्या आपला दवाखान्यात सकाळपासून रात्रीपर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहे.’


'आपला दवाखाना' अंतर्गत मिळणाऱ्या आरोग्य सुविधा. 

  • या योजनेअंतर्गत साधारणपणे २५  हजार ते ३०  हजार लोकसंख्येसाठी 1 दवाखाना सुरू करण्याचं प्रशासनाचं नियोजन आहे.
  • सकाळी ७.०० ते दुपारी २. ००  आणि दुपारी ३.०० ते रात्री १०. ०० या वेळेत राज्यातील सर्व 'आपला दवाखाना'' सुरू राहतील. 
  • 'आपला दवाखाना' अंतर्गत १४७ प्रकारच्या विविध वैद्यकीय चाचण्या विनामूल्य करून मिळतात. 
  • काही ठिकाणी पोर्ट केबिनमध्ये प्राथमिक उपचारासाठी दवाखाना सुरू केला जाणार आहे.
  • पॉलिक्लिनिकमध्ये 'आपला दवाखाना' अंतर्गत वैद्यकीय तज्ज्ञांद्वारे विनामूल्य वैद्यकीय सल्ला आणि उपचार मिळत आहे 
  • 'आपला दवाखाना' मधील सीटी स्कॅन, एमआरआय, एक्स रे, इत्यादी चाचण्या  महानगरपालिकेच्या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये  केल्या जातात. 
  • कान नाक घसा तज्ज्ञ (ENT) नेत्रचिकिस्ता, स्त्री रोग तज्ज्ञ, वैद्यकीय तपासणी तज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट, त्वचारोग तज्ज्ञ, दंतशल्य चिकित्सा, बालरोग तज्ज्ञ अशा आरोग्य सुविधा पॉलिक्लिनिकच्या माध्यमातून दिल्या जात आहेत. 
  • ग्रामीण भागात प्रामुख्याने एसटी स्थानकाजवळ 'आपला दवाखाना' सुरू करण्याचं सरकारचं नियोजन आहे.
  • महापालिकेच्या उपलब्ध दवाखान्यात दुसऱ्या सत्रात (दुपार नंतर) आणि इतर ठिकाणी मोकळ्या जागेत पोर्टाकेबिनमध्ये दवाखाने सुरू केले आहेत. 

Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Friday, April 28, 2023

महापालिकेच्या शाळांची 'स्मार्ट' शिक्षणाकडे वाटचाल

महापालिकेच्या शाळांमधून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी, तसेच पालिकेच्या शाळांचा शैक्षणीक दर्जा डिजिटली दर्जेदार व्हावा यासाठी विविध शैक्षणीक प्रयोग केले जात आहेत. गेल्या काही वर्षांपासून पालिका शाळांमध्ये 'डिजिटल वर्ग' सुरू करण्याची चर्चा सुरू होती. प्रत्यक्षात पालिका शाळांमध्ये 'डिजिटल वर्ग' सुरू करण्याची प्रक्रिया २०२१-२२ आणि २०२२-२३ मध्ये पार पडली. जून २०२३-२४ च्या शैक्षणीक वर्षात पालिकेच्या शाळा डिजिटली अधिक समृद्ध व्हाव्यात याची तयारी  एप्रिल २०२३ पासूनच  करण्यास सुरुवात झाली आहे.  याचे प्रतिबिंब महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर, नाशिक, मुंबई, पुणे, मिरा-भाईंदर आणि पिंपरी-चिंचवडच्या शाळांमधून दिसून येत आहे. 

काही वर्षांपूर्वी पालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी आधुनिक  शिक्षणाचे दरवाजे 'व्हर्म्युअल क्लासरूम'च्या यशस्वी संकल्पनेतून उघडले गेले. पालिकेच्या विद्यार्थ्यांना संगणकीय युगात बसल्या जागी 'टॅब' द्वारे शिक्षण घेण्यासाठीही दालन उघडण्यात आले आहे . विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण शिक्षकांमार्फत शाळेतील वर्गातच दिले जाते आणि त्यासाठी इंटरॅक्टिव पॅनल (एलईडी) चा वापर केला जातो. व्हाईट बोर्ड, स्मार्ट बोर्ड, स्पीकर्स या यंत्रणांच्या साहाय्याने हे शिक्षण आत्मसात करता येते. विद्यार्थ्यांना कोडी, अॅनिमेशन, गेम्स आदी माध्यमांतून शिक्षण दिले जाते. तर अशा प्रकारचे डिजिटल शिक्षणाचे बदल महाराष्ट्रातील पालिका शाळा करीत आहेत.  

छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेच्या ७२ शाळांमधून शिक्षण दिले जाते. यापैकी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून ५० स्मार्ट शाळा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  या ५० शाळांपैकी वीस शाळांचे स्मार्ट क्लास रूमची कामे पूर्ण झाली आहेत.  त्यासाठी सुमारे ६५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेच्या प्रत्येक शाळेतील काही वर्ग खोल्या 'स्मार्ट क्लास रूम बनवण्यात येणार आहेत. या स्मार्ट क्लासरूममध्ये एलईडी टीव्ही, प्रोजेक्टर, इंटरनेट कनेक्शनची सुविधा राहणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच संबंधित विषयातील जागतिक स्तरावरीलही ज्ञान घेता येणार आहे. प्रत्येक स्मार्ट क्लास रूम मधील फर्निचरमध्येही वेगळेपणा बघायला मिळणार आहे. शाळेचा परिसर देखील स्मार्ट करण्यात आला आहे..विद्यार्थ्यांसाठी खेळाचे साहित्य, प्रयोगशाळा, ग्रंथालय आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

नाशिकमध्ये महापालिकेच्या 'स्मार्ट स्कूल' या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत ६९ शाळांचे ६५६ वर्ग डिजिटाइज होणार आहेत. वर्षभरात हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन असतानाच महापालिका शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठी 'मिशन अॅडमिशन' मोहीम राबविली जात आहे.  सध्यातरी नाशिक मनपाच्या नऊ शाळांमध्ये  स्मार्ट स्कूल'  अंतर्गत प्रत्येक वर्गात संगणक, २००० पुस्तके पुरविण्यात आली आहेत. बोलक्या भिंती नावाचा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या क्रीएटीव्हीटीला  चालना दिली जात आहे. 

पिंपरी चिंचवड मधल्या पालिकेच्याशाळांची वाटचालही 'स्मार्ट स्कूल'कडे चालली आहे. स्मार्ट शिक्षणासाठी उपयुक्त असणारे एलईडी टीव्ही आणि प्रोजेक्टर बसविण्यात आले आहेत.  मिरा-भाईंदर पालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या शाळांमध्ये ५० वर्गांचे डिजिटलायझेशन सुरू केले आहे. शिक्षकांना  या डिजिटल वर्गांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.  शिक्षकांनी विद्यार्थ्याना कसे डिजिटल शिक्षण दिले पाहिजे हे शिकविले गेले आहे. 

मुंबईत पालिकेच्या ११५० शाळांमध्ये तीन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मराठी शाळांना गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात गळती लागल्यामुळे पालिकेने आता इंग्रजी सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या शाळा पालिकेने सुरू केल्या आहेत. पालिकेच्या शाळांमध्ये आठ भाषांमध्ये शिक्षण दिले जाते. डिजिटलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दृक्- श्राव्य माध्यमातून शिक्षण देता यावे यासाठी २०२३-२४ या शैक्षणिक वर्षांत  आणखी १३०० डिजिटल वर्ग सुरू करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. हे वर्ग सुरू झाल्यास पालिकेच्या डिजिटल वर्गांची संख्या २६०० होणार आहेत. या नव्या वर्गांमुळे डिजिटल शिक्षणाचा विद्यार्थ्यांना चांगला लाभ होणार आहे. 

अशाप्रकारे  'स्मार्ट स्कूल' या प्रकल्पाद्वारे महापालिकेच्या शाळांना ऊर्जितावस्था प्राप्त करून देत गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...