Wednesday, May 31, 2023

राज्यात ‘मेरी लाईफ, मेरा स्वच्छ शहर’ उपक्रम रिड्यूस, रियूज आणि रिसायकल संकल्पनेवर भर

केंद्र सरकारचे स्वच्छता अभियान दिवसेंदिवस लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमधून करण्याचा प्रयत्न केला जात आहे.  त्यासाठी शहरांतील विविध महानगरपालिका, नगरपरिषद तसेच नगरपंचायती  'मेरी लाईफ, मेरा स्वच्छ शहर', ही मोहीम  आणि  त्या अंतर्गत  रिड्यूस, रियूज आणि रिसायकल- 'थ्री-आर केंद्रांची सुरुवात करीत आहेत. 

"स्वच्छतेतून परोपकाराची बीजे पेरली जातात. परोपकारातून माणुसकी जपली जाते" स्वच्छता आणि  परोपकारावर महत्त्वाचे कार्य करणारे संत गाडगे बाबा यांचे महत्त्वाचे विचार महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था आचरणात आणतआहेत. याचे चालते-बोलते उदाहरण आहे ‘मेरी लाईफ, मेरा स्वच्छ शहर’ हे अभियान आणि  थ्री-आर केंद्रे. 

आपल्या प्रत्येकाच्या घरात कित्येक अशा वस्तू असतात की,  त्यांचा वापर करत नाही. वापरात नसलेल्या वस्तू  ह्या नेहमी अडगळीत पडून राहतात. तर अशा चांगल्या स्थितीतल्या; पण वापरात नसलेल्या वस्तू स्थानिक स्वराज्य संस्थांनी ठिकठिकाणच्या बेघर निवारा केंद्रांमध्ये आणण्याचे आवाहन केले होते.  त्या आवाहनाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. नागरिकांचा लाभणारा प्रतिसाद पाहता ‘मेरी लाईफ, मेरा स्वच्छ शहर’ या अभियानातंर्गत  थ्री-आर केंद्रे चालवण्यासाठी वापरात नसलेल्या पण चांगल्या स्थितीत असणाऱ्या वस्तू आणून देण्यासाठी पुन्हा एकदा विविध स्थानिक स्वराज्य संस्थांनी आवाहन केले आहे. 

थ्री-आर केंद्रांमध्ये केंद्रात जुनी पुस्तके, प्लास्टिक, कपडे, पादत्राणे आणि इतर निरुपयोगी वस्तू नागरिकांकडून गोळा करुन त्यांचा पुनर्वापर करण्यात येणार आहे.यासाठी पालिकेच्यावतीने ई-रिक्षा व घंटागाडीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे उपक्रमातंर्गत जमा केलेल्या वस्तूंची नोंद रजिस्टरमध्ये ठेवली जाणार आहे. गरजू नागरिकांनी त्यांना आवश्यक वस्तू या केंद्रातून घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच या अभियानातून टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवण्याच्या स्पर्धाही आयोजित केल्या आहेत. त्याचे प्रदर्शनही या केंद्रात भरवले जाणार आहे. विजेत्यांना आकर्षक बक्षीसे व प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

काही महापालिकांनी ‘थ्री आर’ केंद्रांद्वारे नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत.   घनकचरा व्यवस्थापनात ‘थ्री आर’ ही अत्यंत महत्वाची संकल्पना असून यामध्ये कचरा कमी करणे (Reduce), कच-याचा पुनर्वापर करणे (Reuse) व कच-यावर पुनर्प्रक्रिया करणे (Recycle) अपेक्षित आहे.  या विषयास अनुरूप कार्यवाही करीत नवी मुंबई महानगरपालिका 'रिसायकल मार्ट’ ही अत्यंत आगळीवेगळी संकल्पना ‘थ्री आर’च्या माध्यमातून राबवित आहेत. 'रिसायकल मार्ट'ला डी मार्टचा उत्तम पाठींबा मिळत आहे. 'रिसायकल मार्टमध्ये  ‘थ्री आर’ च्या अनुषंगाने यामध्ये नागरिकांनी घरातील वापरून झालेले कपडे, प्लास्टिक बॉटल्स, वस्तू व दुधाच्या पिशव्या, लेदरचे साहित्य, भांडी, वर्तमानपत्रे, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे अशा टाकाऊ वस्तू 'डी मार्ट' मध्ये आणून दिल्यास त्यावर त्यांना वस्तूंनुसार पॉईंट्सची कुपन्स दिली जाणार आहेत. त्या पॉईंट्सनुसार त्यांना तितक्या रक्कमेची सूट त्यांनी डी मार्ट मध्ये खरेदी केलेल्या नव्या सामानावर दिली जाणार आहे. याव्दारे घरातील सुक्या कच-याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी त्या वस्तू उपलब्ध करून देऊन नागरिकांकडून पर्यावरण रक्षणाला हातभार लावला जाणार आहे शिवाय त्या टाकाऊ वस्तूंच्या बदल्यात नागरिकांना पॉईंट्स स्वरूपात आर्थिक लाभही होणार आहे.

सुक्या कच-याची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावण्यासाठी ‘थ्री आर' ची संकल्पना अत्यंत मोलाची असून त्याकरिता डी मार्ट सारख्या लोकप्रिय वाणिज्य आस्थापनेने नवी मुंबई महानगरपालिकेची ‘रिसायकल मार्ट’ संकल्पना राबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अशा प्रकारचा बहुउपयोगी नाविन्यपूर्ण उपक्रम देशात बहुधा पहिल्यांदाच राबविला जात असेल.यामध्ये पर्यावरण जपणूकीसाठी हातभार आणि पॉईंट्सच्या रूपाने पैशांची बचत अशा दोन्ही बाजूने हा उपक्रम नागरिकांसाठी फायद्याचा असल्याने याचा लाभ नागरिक मोठ्या प्रमाणावर घेतील व या उपक्रमाचा उपयोग स्वच्छ सर्वेक्षणातील मानांकन उंचाविण्यासाठी होईल असा विश्वास व्यक्त केला.

तर मग रिड्यूस, रियूज आणि रिसायकल संकल्पनेवर भर देणाऱ्या ‘मेरी लाईफ, मेरा स्वच्छ शहर’ उपक्रमात सहभागी होणार ना? 


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

No comments:

Post a Comment

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...