Tuesday, June 20, 2023

समूह विकास योजनेतून ठाणेकरांना लवकरच हक्काचे घर मिळणार


आशियातील सर्वांत मोठ्या समूह विकास अर्थात क्लस्टर योजनेचा शुभारंभ नुकताच मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात करण्यात आला. या योजनेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात तब्बल दहा हजार घरांची निर्मिती केली जाणार आहे. १५०० हेक्टरवर ही महत्त्वाकांक्षी योजना आकारास येणार आहे. त्यामुळे अनधिकृत व अधिकृत असलेल्या धोकादायक तसेच अतिधोकादायक इमारतींतील रहिवाशांना भविष्यात स्वतःचे हक्काचे घर उपलब्ध होणार असल्याने त्यांना दिलासा मिळेल. 

ठाणे शहरात मोडकळीस आलेल्या धोकादायक अनधिकृत व अधिकृत इमारतींचा सुनियोजित व संपूर्ण नागरी पायाभूत सुविधांसह पुनर्विकास व्हावा यासाठी एकूण ४५ नागरी पुनरुत्थान आराखडे तयार करण्यात आले आहेत. त्यातील अत्यंत दाटीवाटीचे क्षेत्र असलेल्या किसननगर नागरी पुनरुत्थान आराखडा क्र. १२मधील नागरी पुनरुत्थान योजना क्र. १ व २च्या प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ नुकताच मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. नागरी पुनरुत्थान १ व २ची अंमलबजावणी सिडको प्राधिकरणामार्फत होणार आहे. 

किसननगर भागात समूह पुनर्विकास योजनेचा (क्लस्टर) पहिला टप्पा राबविण्यासाठी परिसरातील राज्य शासनाच्या विविध विभागांच्या मालकीचे असलेले मोकळे भुखंड ताब्यात घेऊन त्यावर क्लस्टर योजनेतील इमारती उभारण्यासाठी पालिकेने हालचाली सुरु केल्या आहेत. या इमारतींची उभारणी केल्यानंतर त्याठिकाणी योजनेतील लाभार्थींना घरे देऊन त्यांच्या राहत्या इमारती पाडून त्याजागी आराखड्यानुसार इमारतींसह इतर सोयी सुविधांची उभारणी करण्यात येणार आहेत. योजनेतील लाभार्थींकरिता संक्रमण शिबीरांची उभारणी करण्यासाठी दिड ते दोन वर्षांचा कालावधी लागण्याबरोबरच मोठा निधी खर्च होणार असून हे सर्व टाळण्यासाठीच पालिकेने हा नवा पर्याय शोधला आहे. 

ठाणे महापालिका क्षेत्रात २५ ते ३० वर्षांपुर्वी उभारण्यात आलेल्या अनेक बेकायदा इमारती धोकादायक झाल्या असून यातील नागरिकांना हक्काचे आणि सुरक्षित घर मिळावे यासाठी शहरात समुह पुनर्विकास योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी शहरातील विविध भागांचे एकूण ४५ नागरी पुनर्निर्माण आराखडे तयार करण्यात आले असून त्याचे एकूण क्षेत्र १५०९ हेक्टर इतके आहे. त्यातील लोकमान्यनगर, कोपरी, किसननगर, राबोडी, टेकडी बंगला, हाजुरी, आझादनगर, गोकुळनगर, महागिरी, चरई, सिद्धेश्वर परिसर आणि स्थानक परिसर या भागातील १२ आराखड्यांना यापुर्वीच मान्यता मिळाली आहे. असे असले तरी या योजनेचा पहिला टप्पा किसननगर भागात सिडकोच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. 

या योजनेत बाधित होणाऱ्या इमारती पाडून त्याजागी नव्या इमारती उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी बांधकाम पाडकामाचे दर आणि ठेकेदार निश्चित करण्याकरिता पालिकेने निविदा काढण्यासाठी जोरदार हालचाली सुरु केल्या होत्या. या इमारती पाडण्याआधी तेथील रहिवाशांना दुसऱ्याठिकाणी स्थलांतरित करावे लागणार असून त्यासाठी संक्रमण शिबीरे पालिकेला उभारावी लागणार आहेत. संक्रमण शिबीरांच्या उभारणीसाठी दिड ते दोन वर्षांचा कालावधी लागण्याबरोबरच मोठा निधी खर्च होणार आहे. त्यानंतर रहिवाशांना संक्रमण शिबीरात स्थलांतरीत करून योजनेतील इमारती उभारण्याचे काम हाती घ्यावे लागणार असून त्यासाठी एक ते दिड वर्षांचा काळ लागणार आहे. हे सर्व टाळण्यासाठी पालिकेच्या क्लस्टर विभागाने आता परिसरातील राज्य शासनाच्या विविध विभागांच्या मालकीचे असलेले मोकळे भुखंड ताब्यात घेऊन त्यावर क्लस्टर योजनेतील इमारती उभारण्यासाठी कृती केली जाईल. आणि येत्या काळात लवकरच ठाणे शहरात अनधिकृत घरात राहणाऱ्या नागरिकांना समूह विकास प्रकल्पाच्या माध्यमातून हक्काचे घर मिळेल.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

No comments:

Post a Comment

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...