Friday, April 28, 2023

महापालिकेच्या शाळांची 'स्मार्ट' शिक्षणाकडे वाटचाल

महापालिकेच्या शाळांमधून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी, तसेच पालिकेच्या शाळांचा शैक्षणीक दर्जा डिजिटली दर्जेदार व्हावा यासाठी विविध शैक्षणीक प्रयोग केले जात आहेत. गेल्या काही वर्षांपासून पालिका शाळांमध्ये 'डिजिटल वर्ग' सुरू करण्याची चर्चा सुरू होती. प्रत्यक्षात पालिका शाळांमध्ये 'डिजिटल वर्ग' सुरू करण्याची प्रक्रिया २०२१-२२ आणि २०२२-२३ मध्ये पार पडली. जून २०२३-२४ च्या शैक्षणीक वर्षात पालिकेच्या शाळा डिजिटली अधिक समृद्ध व्हाव्यात याची तयारी  एप्रिल २०२३ पासूनच  करण्यास सुरुवात झाली आहे.  याचे प्रतिबिंब महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर, नाशिक, मुंबई, पुणे, मिरा-भाईंदर आणि पिंपरी-चिंचवडच्या शाळांमधून दिसून येत आहे. 

काही वर्षांपूर्वी पालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी आधुनिक  शिक्षणाचे दरवाजे 'व्हर्म्युअल क्लासरूम'च्या यशस्वी संकल्पनेतून उघडले गेले. पालिकेच्या विद्यार्थ्यांना संगणकीय युगात बसल्या जागी 'टॅब' द्वारे शिक्षण घेण्यासाठीही दालन उघडण्यात आले आहे . विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण शिक्षकांमार्फत शाळेतील वर्गातच दिले जाते आणि त्यासाठी इंटरॅक्टिव पॅनल (एलईडी) चा वापर केला जातो. व्हाईट बोर्ड, स्मार्ट बोर्ड, स्पीकर्स या यंत्रणांच्या साहाय्याने हे शिक्षण आत्मसात करता येते. विद्यार्थ्यांना कोडी, अॅनिमेशन, गेम्स आदी माध्यमांतून शिक्षण दिले जाते. तर अशा प्रकारचे डिजिटल शिक्षणाचे बदल महाराष्ट्रातील पालिका शाळा करीत आहेत.  

छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेच्या ७२ शाळांमधून शिक्षण दिले जाते. यापैकी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून ५० स्मार्ट शाळा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  या ५० शाळांपैकी वीस शाळांचे स्मार्ट क्लास रूमची कामे पूर्ण झाली आहेत.  त्यासाठी सुमारे ६५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेच्या प्रत्येक शाळेतील काही वर्ग खोल्या 'स्मार्ट क्लास रूम बनवण्यात येणार आहेत. या स्मार्ट क्लासरूममध्ये एलईडी टीव्ही, प्रोजेक्टर, इंटरनेट कनेक्शनची सुविधा राहणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच संबंधित विषयातील जागतिक स्तरावरीलही ज्ञान घेता येणार आहे. प्रत्येक स्मार्ट क्लास रूम मधील फर्निचरमध्येही वेगळेपणा बघायला मिळणार आहे. शाळेचा परिसर देखील स्मार्ट करण्यात आला आहे..विद्यार्थ्यांसाठी खेळाचे साहित्य, प्रयोगशाळा, ग्रंथालय आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

नाशिकमध्ये महापालिकेच्या 'स्मार्ट स्कूल' या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत ६९ शाळांचे ६५६ वर्ग डिजिटाइज होणार आहेत. वर्षभरात हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन असतानाच महापालिका शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यासाठी 'मिशन अॅडमिशन' मोहीम राबविली जात आहे.  सध्यातरी नाशिक मनपाच्या नऊ शाळांमध्ये  स्मार्ट स्कूल'  अंतर्गत प्रत्येक वर्गात संगणक, २००० पुस्तके पुरविण्यात आली आहेत. बोलक्या भिंती नावाचा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या क्रीएटीव्हीटीला  चालना दिली जात आहे. 

पिंपरी चिंचवड मधल्या पालिकेच्याशाळांची वाटचालही 'स्मार्ट स्कूल'कडे चालली आहे. स्मार्ट शिक्षणासाठी उपयुक्त असणारे एलईडी टीव्ही आणि प्रोजेक्टर बसविण्यात आले आहेत.  मिरा-भाईंदर पालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या शाळांमध्ये ५० वर्गांचे डिजिटलायझेशन सुरू केले आहे. शिक्षकांना  या डिजिटल वर्गांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.  शिक्षकांनी विद्यार्थ्याना कसे डिजिटल शिक्षण दिले पाहिजे हे शिकविले गेले आहे. 

मुंबईत पालिकेच्या ११५० शाळांमध्ये तीन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मराठी शाळांना गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात गळती लागल्यामुळे पालिकेने आता इंग्रजी सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या शाळा पालिकेने सुरू केल्या आहेत. पालिकेच्या शाळांमध्ये आठ भाषांमध्ये शिक्षण दिले जाते. डिजिटलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दृक्- श्राव्य माध्यमातून शिक्षण देता यावे यासाठी २०२३-२४ या शैक्षणिक वर्षांत  आणखी १३०० डिजिटल वर्ग सुरू करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. हे वर्ग सुरू झाल्यास पालिकेच्या डिजिटल वर्गांची संख्या २६०० होणार आहेत. या नव्या वर्गांमुळे डिजिटल शिक्षणाचा विद्यार्थ्यांना चांगला लाभ होणार आहे. 

अशाप्रकारे  'स्मार्ट स्कूल' या प्रकल्पाद्वारे महापालिकेच्या शाळांना ऊर्जितावस्था प्राप्त करून देत गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

No comments:

Post a Comment

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...