Sunday, September 22, 2024

नागरिकांचा सहभाग आणि सूचनांच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहर विकसित होतंय ! कॉफी विथ कमिशनर आणि अंदाजपत्रकात नागरिकांचा सहभाग अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांचा समावेश

पण राहत असलेल्या शहरात नेमक्या कोणत्या सुविधा आपल्याला अपॆक्षित आहेत? आपल्याला हवं असलेले शहर कस आहे असं तुम्हाला महापालिका प्रशासनाने विचारले तर ? तर तुमची अनेक अभ्यासपूर्ण उत्तरं तयार असतील. तुमच्या कल्पनेतलं तुम्हाला हव्या  असणाऱ्या शहराची निर्मिती होईल आणि नागरिकांच्या सहभागातून शहर विकसित होतील, याच दृष्टिकोनातून पिंपरी चिंचवड महापालिकेने शहर विकसित करताना नागरिकांच्या सहभागाला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. विशेष म्हणजे शहरासाठी एखादा उपक्रम राबवताना त्यातून शहरातीलंच गरजू नागरिकांना रोजगाराच्या दृष्टिकोनातून कसा उपयोग होईल या प्रयत्नातून वेगवेगळ्या उपक्रमांची आखणी होत आहे.  याच उद्देशातून कॉफी विथ कमिशनर आणि अंदाजपत्रकात नागरिकांचा सहभाग सारखे उपक्रमांची आखणी होत असते.

पिंपरी शहरातील सार्वजनिक शौचालयांच्या देखभालीचे काम करणा-या बचत गटातील महिलांशी आयुक्त शेखर सिंह हे आता महिन्यातून दोनवेळा संपर्क साधणार आहेत. त्यासाठी ‘कॉफी विथ कमिशनर’ हा उपक्रम पिंपरी-चिंचवड महापालिकेने सुरू केला असून, त्याद्वारे संबंधित महिलांच्या अडचणी जाणून घेतल्या जाणार आहेत.

नवी दिशा उपक्रमाअंतर्गत शहरातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक शौचालयांच्या देखभालीचे काम देण्यात आले आहे. त्यातील विविध महिला बचत गटातील महिलांना काम करताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या माध्यमातून या महिलांना येणाऱ्या समस्या सोडवण्याबरोबरच आरोग्य विभागामार्फत सार्वजनिक शौचालयांच्या स्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून सुधारणा करण्यावर भर दिला जाणार आहे. ‘कॉफी विथ कमिशनर’ उपक्रमाची पहिली बैठक गुरुवारी झाली. त्यामध्ये ‘अ’ आणि ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरातील सार्वजनिक शौचालय देखभालीचे काम करणाऱ्या महिला सहभागी झाल्या होत्या. त्यामध्ये आयुक्त शेखर सिंह यांनी महिलांशी संवाद साधताना नवी दिशा उपक्रमामध्ये भविष्यातील संधी, आव्हाने याबाबत माहिती दिली. महिलांनीही त्यांच्या समस्या आणि अनुभव सांगितले.

दरम्यान, महापालिकेच्या वतीने महिन्यातून दोनवेळा ‘कॉफी विथ कमिशनर’ या उपक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. विविध क्षेत्रीय कार्यालयांतील संबंधित महिलांना आयुक्तांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. नवी दिशा उपक्रमाने आम्हाला वेगळी ओळख निर्माण करून दिली. समस्या, अभिप्राय आणि सूचना आयुक्तांसमोर मांडण्याची संधी मिळाली. महापालिका आमच्या सूचनांवर विचार करेल. या उपक्रमांमुळे नवी दिशा उपक्रमातील महिला बचत गटांचा प्रशासनातील सहभाग वाढविण्यास नक्कीच मदत मिळेल.

नागरिकांच्या सूचनांनुसार विकास साधला जाणार 

पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे 'अंदाजपत्रकात नागरी सहभाग' हा महत्त्वाकांक्षी उपक्रम 

पिंपरी चिंचवड शहराच्या विकासामध्ये नागरिकांचा सहभाग असावा, यासाठी महापालिकेने 'अंदाजपत्रकात नागरी सहभाग' हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केला आहे. त्यासाठी चित्ररथ (एलईडी व्हॅन) तयार केले गेले आणि त्याद्वारे विविध भागांतील नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन केले गेले.  

शहरातील विविध उपाययोजना, उपक्रम, प्रकल्प यामध्ये नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी महापालिकेने 'अंदाजपत्रकात नागरी सहभाग' उपक्रम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून नागरिकांच्या मागणीनुसार महापालिका हद्दीतील संबंधित परिसरांमध्ये विकासकामे करण्यासाठी मदत होणार आहे. 'पीसीएमसी स्मार्ट सारथी' या मोबाईल अॅपच्या माध्यमातून नागरिकांच्या अपेक्षा, सूचना, कल्पना ऑनलाइन पद्धतीने नोंदविल्या जात आहेत. यामध्ये नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी जनजागरण मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी महापालिका हद्दीत चित्ररथाच्या (एलइडी व्हॅन) साहाय्याने शहरातील विविध भागातील नागरिकांना सहभागी होण्याबाबत आवाहन केले जात आहे. अनेक नागरिकांना या चित्ररथामुळे यामागील कल्पना आणि उद्दिष्ट्ये समजावून सांगण्यास मदत होत आहे. 

पिंपरी अर्थसंकल्पात नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी केलेल्या चित्ररथावरील क्यूआर कोड स्कॅन करून सहभाग नोंदविताना तरुण. आतापर्यंत या मोहिमेत सहभागी होऊन त्यांच्या परिसरातील पायाभूत सुविधांबाबतच्या मागण्या, अभिप्राय नोंदविल्या आहेत. आतापर्यंतचा प्रतिसाद आतापर्यंत शहरातील विविध भागातील नागरिकांनी रस्ते, सांडपाणी, आरोग्य, उद्याने, क्रीडांगणे आणि इतर सार्वजनिक सुविधा निर्माण करण्याच्या सूचना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून सुचविल्या आहेत. त्यांचा समावेश २०२५ - २६ या वर्षाच्या अर्थसंकल्पात केला जाणार आहे. 

नागरिकांच्या सूचना आणि मार्गदर्शनानुसार करण्यात येत असलेला हा विकास नागरिकाभिमुख आहे. शहरात राहणाऱ्या नागरिकांच्या अनेक मागण्या आणि समस्यांचे निराकरण या उपक्रमातून होऊन भविष्यात पिंपरी चिंचवड शहर नागरिकांच्या सोयीचे शहर बनेल यात शंका नाही.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x  

Saturday, September 14, 2024

पर्यावरणपूरक गणरंगी रंगल्या स्थानिकस्वराज्य संस्था... भाग-१

महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण महाराष्ट्राकडे गणेशोत्सव पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी साद घातली. तिला प्रतिसाद देत यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा यासाठी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था सज्ज झाल्या.  उत्सवाच्या आधी म्हणजे साधारण महिना दीड महिना आधीपासून राज्यातील स्थनिक स्वराज्य संस्था कामास लागल्या. स्थानिक स्वराज्यसंस्थांचे पर्यावरणपूरक गणेशोत्सव जागृतीचे काम उत्सवानंतरही सुरू आहे. 

संपूर्ण महाराष्ट्राचे सांस्कृतिक अभिसरण म्हणजे गणेशोत्सव. उत्सवकाळात संपूर्ण राज्य उत्साहाची उत्सवी झूल पांघरते. साफसफाई, सजावट आणि उत्सवकाळात अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीला उधाण येते. वातावरण सर्वत्र प्रसन्न होऊन जाते. या प्रसन्न वातावरणाला फक्त धार्मिक टच न राहता त्याचा सामाजिक खासकरून पर्यावरणपूरक टच अबाधीत राहण्यासाठी राज्यभरातील स्थानिक स्वराज्यसंस्था सज्ज झाल्या. स्थानिक स्वराज्यसंस्थांच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव जनजागृतीच्या कामाची सुरुवात खड्डेमुक्त रस्ते, मूर्तींसाठी शाडू माती उपलब्ध करून देणे आणि एक खिडकी कार्यक्रमाने झाली. 

एक खिडकी कार्यक्रम : सार्वजनीक ठिकाणी बाप्पांना विराजमान होण्यासाठी मंडप हवेत. यासाठी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी सार्वजनिक गणेश मंडळांना मंडप उभारण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकृत वेबसाईटवरून मंडळांनी मंडपस्थापनेच्या परवानग्या घेतल्या. ही मंडप बसविण्याची परवानगी  नवरात्रौत्सवापर्यंत कायम असणार आहे. महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार यंदाच्या गणेशोत्सवात गेल्या  १० वर्षांपासून शासन नियमांचे व कायद्याचे पालन करणाऱ्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडपासाठी १०० रुपये शुल्क आकारले. 


बृहन्मुंबई महानगरपालिका : 

गणेशोत्सवाच्या आगमन-विसर्जन काळात रस्त्यावरील खड्ड्यांवर तात्काळ कार्यवाहीच्या सूचना मुंबई महानगरपालिकेने संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या. पालिकेच्या रस्ते आणि वाहतूक विभागामार्फत खड्डेमुक्त रस्त्यांसाठी २२७ नागरी संस्था प्रभागांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे २२७ दुय्यम अभियंत्याची नेमणूक केली. दुय्यम अभियंता नेमून दिलेल्या विभागात रस्त्यांची पाहणी करून खड्डे आढळल्यास ते मास्टिकपद्धतीने बुजविले. दुय्यम अभियंत्यांबरोबरीने सहायक अभियंता, कार्यकारी अभियंता आणि उपप्रमुख अभियंता यांनी प्रत्यक्ष कार्यस्थळावर जाऊन रस्त्यांची पाहणी करण्याच्या सूचनाही मुंबई महानगर पालिकेने  दिल्या. यंदा खड्डे दुरुस्तीसाठी मास्टिक वापरले गेले . मुंबई महापालिकेच्या सर्व विभागांतील मास्टिक कूकर हे सुस्थितीत तसेच वापरासाठी उपलब्ध असावेत, याची खातरजमा विभागीय पातळीवर करावी अशा सूचनाही बृहन्मुंबई महापालिकेने संबंधित अभियंते तसेच अधिकाऱ्यांना दिल्या. सर्व कंत्राटदारांना मास्टिकचे उत्पादन व उपलब्धता, आवश्यक त्या प्रमाणात पुरवठा होईल, यासाठी विशेष लक्ष देण्याच्या सूचना केल्या. 

घरगुती गणेशोत्सवामध्ये पर्यावरणस्नेही गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचे प्रमाण हळूहळू वाढत आहे.अनेक गृहनिर्माण सोसायट्याही पर्यावरणस्नेही कागदी मूर्तीची प्रतिष्ठापना करू लागल्या आहेत, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी २० ते २२ टक्के मंडळे पर्यावरणस्नेही मूर्तीकडे वळली आहेत. परिणामी पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचा एक भाग म्हणून बृहन्मुंबई  महानगरपालिकेने गणपती मूर्तिकारांना शाडूची माती पुरविणे, काही ठिकाणी जागा उपलब्ध करून देणे, मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार करणे, पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने गणेश गौरव स्पर्धेचे आयोजन करणे असे कार्यक्रम आखले. २१७ मूर्तिकारांनी शाडू मातीसाठी मुंबई महानगर पालिकेकडे मागणी केली होती.  खास गणेशोत्सवासाठी पालिकेने   ५०० टन  शाडू माती मूर्तिकारांना मोफत पुरविली. 

गणेशोत्सवाच्या कालावधीत शहरातील सार्वजनिक स्वच्छता आणि सुस्थितीतील रस्ते या दोन्ही बाबींवर सर्वाधिक प्राधान्याने लक्ष परविण्याचे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिकेने संबंधित अधिकाऱ्यांना दिले. संपूर्ण उत्सव कालावधीत पालिकेच्या अधिकारी, कर्मचारी, कामगारांनी अधिक कार्यतत्पर आणि सजग रहावे. भाविक, नागरिक यांना कोणत्याही असुविधा होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही बृहन्मुंबई महानगरपालिकेने अधिकाऱ्यांना दिल्या. या सूचनेप्रमाणे अधिकाऱ्यांनी गणेशोत्सावाच्या पार्श्वभूमीवर  सर्वसामान्य नागरिक, स्वच्छता कर्मचारी, सुरक्षा रक्षक, जीवरक्षक यांच्याशी संवाद साधला.

गणेशोत्सव हा सर्वांचा सण आहे. हा सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा, असे आवाहनही महापालिकेने अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जनतेला केले. लोंबकळणाऱ्या तारा, विसर्जन स्थळावर कार्यरत स्वयंसेवक, पाणी, प्रसाधनगृह, वाहनतळ, जर्मन तराफे आदींची चोख व्यवस्था कारण्याचे आदेश पालिकेने अधिकाऱ्याना दिले आहेत. विसर्जन मार्गांवर वृक्षछाटणी केली. गणेशमूर्तींचे आगमन आणि विसर्जन मार्गांवर प्रशासन विशेष लक्ष दिले. पालिकेने धोकादायक पुलांची नावे यापूर्वी जाहीर केली. त्या ठिकाणी पोलिस यंत्रणेशी समन्वय साधून रहदारी सुरळीत ठेवावी, मुख्य रस्त्यांबरोबरच लहानसहान रस्ते, गल्लीबोळ, झोपडपट्टी आणि तत्सम वस्ती अशा सर्व ठिकाणी स्वच्छता राखावी, समुद्रकिनारे, चौपाट्यांवर अधिक स्वच्छता ठेवावी, कचरा संकलन आणि वाहतूक फेऱ्या वाढवाव्यात, असे निर्देशही पालिकेने अधिकाऱ्याना दिले. 

उत्सव कालावधीत शेकडो टन निर्माल्य निर्माण होते. या निर्माल्यापासून मुंबई महानगरपालिका खतनिर्मिती करणार आहे. या खतांवर महापालिकेची उद्याने बहरणार आहेत.  महापालिकेने  निर्माल्य गोळा करण्यासाठी यंदा तब्बल १५० कलश आणि ३५० वाहने सज्ज ठेवली. प्रत्येक वॉर्डाला निर्माल्य जमा करण्यासाठी  वाहने व कलश पुरविले.  भाविकांनी गणेशोत्सवात निर्माण होणारे निर्माल्य नैसर्गिक प्रवाह, नदी, समुद्र, खाडीमध्ये टाकू नये यासाठी पालिकेने कलशामध्येच टाकण्याचे आवाहन बृहन्मुंबई महापालिकेच्या घनकचरा विभागाने केले. 

दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई महानगरपालिकेने गणेशोत्सव काळात नागरिकांना उपयुक्त ठरणारी 'श्री गणेशोत्सव माहिती पुस्तिका - २०२४'  प्रकाशित केली.   पुस्तिकेत कृत्रिम तलावांच्या माहितीसह भरती व ओहोटीच्या वेळा जाहीर केल्या आहेत. त्याचप्रमाणे  शासनाच्या *'श्रीगणेश गौरव स्पर्धा' अर्जाच्या नमुन्याचाही या पुस्तिकेत समावेश करण्यात आला.  पुस्तिकेत धोकादायक पुलांची यादी महत्त्वाच्या नियंत्रण कक्षांचे संपर्क क्रमांक, विभागीय नियंत्रण कक्षांचे संपर्क क्रमांक, नैसर्गिक विसर्जन स्थळांचा विभागवार नकाशा, मूर्ती विसर्जन दिवशी समुद्राला असलेल्या भरती व ओहोटीच्या वेळा, लाटांची उंची इत्यादी माहितीचा समावेश आहे.  उत्सव काळात नागरिकांची गैरसोय न होण्यासाठी पुस्तिकेचे प्रकाशन केले आहे. पुस्तिकेच्या मुखपृष्ठावर असलेला 'क्यूआर कोड' स्कॅन करून  पुस्तिका पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्याची सुविधासुद्धा पालिकेने उपलब्ध करून दिलीय. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर देखील ही पुस्तिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

ठाणे  महानगरपालिका : 

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे आयोजन व्हावे यासाठी ठाणे महापालिकेतर्फे मार्च  २०२४पासून विविध उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. या अंतर्गत महापालिकेने यंदा ठाणे महापालिका क्षेत्रातील ६ मूर्तीकारांना निःशुल्क शाडूची माती उपलब्ध करून दिली. तसेच  ४ मूर्तीकारांना, महापालिकेने वर्तक  नगर प्रभाग समिती क्षेत्रात ३ आणि माजिवडा मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात १  जागा मूर्ती घडविण्यासाठी निशुल्क उपलब्ध करू दिल्या. 

रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी  ठाण महापालिकेने संबंधित अधिकाऱ्यांना सुचना दिल्या. त्याप्रमाणे अधिकाऱ्यांनी मास्टिक तंत्रज्ञानाचा वापर करीत  गणेशोत्सवापूर्वी 'खड्डेमुक्त ठाणे' ही मोहीम हाती घेतली. महापालिका क्षेत्रातील एकूण २१४ मंडळांनी मंडपांच्या परवानगीसाठी अर्ज केले. तर १२ मंडळांनी ऑफलाईन अवस्थेत अर्ज केले. 

ठाणे महापालिकेच्या किसननगर शाळेतील विद्यार्थ्यांना शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती घडवण्याचे प्रशिक्षण देणारी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. पर्यावरणस्नेही संस्कार शालेय जीवनात झाले, तर पुढील पिढी निसर्गाचे रक्षण अधिक उत्तम पद्धतीने करू शकेल,या विचारातून कार्यशाळेचे आयोजन  करण्यात आले होते.  विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभाग घेत शाडू मातीपासून गणेशाच्या मूर्ती साकारल्या. परब वाडी, कळवा, किसन नगर, बाळकूम, दिवा, वर्तक नगर, शीळ, मानपाडा, येऊर आणि टेंभीपाडा येथील महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचा या कार्यशाळेत सहभाग होता. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातांनी मूर्ती घडवलील्या. गणेशमूर्ती घडवण्याच्या कार्यशाळेत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना विद्यार्थ्यांच्या मनात रुजावी यासाठी , प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीमुळे होणारे जलप्रदूषण, पर्यावरणाची हानी याविषयीची सखोल माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.  शिवाय, पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याची प्रतिज्ञाही विद्यार्थ्यांनी घेतली.

मूर्ती विसर्जनासाठी ठाणे महापालिकेने एक अभिनव उपक्रम राबविला. 'गणेशमूर्ती विसर्जनासाठी महापालिका येणार घरापाशी' या उपक्रमात ठाणे महापालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर भर देतानाच विसर्जन व्यवस्था, कृत्रिम तलाव या व्यवस्थेला प्राधान्य दिले. गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी सहा फिरत्या विसर्जन केंद्रांची व्यवस्था केली.बांधकाम विभाग, पर्यावरण विभाग आणि घनकचरा विभाग यांनी विसर्जन व्यवस्थेचे नियोजन केले आहे. नऊ विसर्जन घाट,आणि ४९ ठिकाणी टाकी विसर्जन व्यवस्था आणि सहा फिरत्या विसर्जन व्यवस्थांचा समावेश होता. जेल तलाव, मढवी हाऊस, राममारुती रोड, महागिरी कोळीवाडा, टेंभीनाका, रिजन्सी हाइट्स आझादनगर, लोढा लक्झेरिया, कामगार हॉस्पिटल, किसन नगर बस स्टॉप, महिला चेक नाका, देवदया नगर- शिवाई नगर या दहा ठिकाणी मूर्ती स्वीकृती केंद्रांची सोय.  करण्यात आली होती.  ठाणे  महापालिकेचा हा विसर्जन उपक्रम ८ सप्टेंबर (दीड दिवस), १२ सप्टेंबर (पाच दिवस) सुरू होता; तर  १7 सप्टेंबर (१० दिवस) लाही सुरू असणारा आहे. 

नवीमुंबई महानगरपालिका :  नवीमुंबई महापालिकेने प्लास्टिकमुक्त गणेशोत्सवाचा संकल्प सोडला आहे. त्या सोबतच  विसर्जनाच्या दिवशी आपल्या घराच्या जवळ कृत्रिम तलावाचे स्थळ दर्शवणारी लिंक नागरिकांना देण्याचा निर्णय घेतला. बाप्पांच्या आगमनासाठी रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी नवीमुंबई महापालिका सज्ज झाली होती. ज्या मूर्तिकारांना मूर्ती घडविण्यासाठी शाडू मातीची गरज होती, त्यांनाही पालिकेने शाडू मातीचा पुरवठा केला. शाडूच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करून पर्यावरणशीलदृष्टीकोन जपणा-या नागरिकांचा ‘पर्यावरणमित्र’ प्रशस्तिपत्राने सन्मान केला. 

नमुंमपा क्षेत्रातील २२ नैसर्गिक विसर्जन स्थळांवर तराफ्यांची व्यवस्था करण्यात आली होती.  नागरिकांना आवश्यक सूचना देण्यासाठी ध्वनीक्षेपक यंत्रणा व व्यासपीठ उभारण्यात आले. सर्वच ठिकाणी पुरेशी विद्युत व्यवस्था आणि जनरेटर व्यवस्था ठेवण्यात आली होती. . मुख्य विसर्जन स्थळांवर नजिकच्या नागरी आरोग्य केंद्रामार्फत वैद्यकीय पथके तैनात ठेवण्यात आलेली असून विभाग कार्यालयांच्या वतीने विसर्जनस्थळी पुरेशा संख्येने स्वयंसेवक व लाईफगार्ड्स व्यवस्था सज्ज  होते.  नमुंमप अग्निशमन दलाचे जवान दक्षतेने कार्यरत होते. नमुंमपा क्षेत्रातील सर्व विसर्जन स्थळी ओल्या व सुक्या निर्माल्यासाठी स्वतंत्र कलश ठेवण्यात आलेले असून संकलित निर्माल्य स्वतंत्र वाहनांव्दारे प्रकल्प स्थळी नेण्यात येत आहे. त्याठिकाणी निर्माल्याचे पावित्र्य राखून त्याची विल्हेवाट लावण्याची सुयोग्य व्यवस्था करण्यात आलेली आहे. नवीमुंबई महानगरपालिका संकलित केलेल्या कचऱ्याचे वाटप बचतगटांना करीत त्यापासून अगरबत्ती तयार केल्या जातील. 

गणेशोत्सव हा पवित्र व मंगलमय वातावरणात साजरा होण्यासाठी पर्यावरणपूरक पध्दतीने साजरा होणे ही काळाची गरज आहे. यासाठी पर्यावरणस्नेही दृष्टीकोन विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याची गरज लक्षात घेत 'पर्यावरणपूरक गणेशोत्सव' हा उपक्रम नवीमुंबई महापालिकेद्वारे  शाळा स्तरावर घेण्यात आला. पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन ही आपली प्रत्येकाची जबाबदारी असुन आपले प्रत्येक सण पर्यावरणपूरक पध्दतीने साजरे करायला हवेत. ही संकल्पना विद्यार्थ्यांमध्ये रूजवण्याचा प्रभावी प्रयत्न या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आला. नवी मुंबई महापालिका शाळांतील इयत्ता ६ वी ते ८ वीच्या विद्यार्थांनी मोठ्या उत्साहाने यात सहभाग घेतला. गणेशोत्सवाच्या कालावधीत ध्वनी व जलप्रदूषण होते. हे प्रदूषण थांबवण्याकरिता पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही संकल्पना विद्यार्थांमध्ये रुजवण्यात आली व पर्यावरणाचे संतुलन राखण्याबाबत विद्यार्थ्यांना कृतीतून पर्यावरण मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी कल्पनाशक्तीचा वापर करून गणपतीच्या सुबक मूर्ता बनवल्या. पर्यावरण रक्षण करणेबाबत पर्यावरणपूरक गणपतीमूर्ती बनवून पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा सामाजिक संदेश विद्यार्थ्यांनी दिला. 

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या प्रचार-प्रसारासाठी नवीमुंबई महापालिकेने सोशल मीडियाच्या ऑनलाइन माध्यमांप्रमाणेच पारंपरिक मुद्रितमाध्यमांचाही उपयोग केला. महापालिकेकडून आरतीसंग्रह प्रकाशित करण्यात आला असून आरती संग्रहाच्या एका बाजूस पारंपरिक आरत्या प्रकाशित करण्यात आल्या.  दुसऱ्या बाजूस स्वच्छताविषयक कचरा वर्गीकरण, प्लास्टिक प्रतिबंध, निर्माल कलशांचा वापर, सजावटीत प्लास्टिक व थर्माकोलऐवजी कागद, कापड अशा पुनर्वापरयोग्य साहित्याचा उपयोग करावा. तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर टाळून शाडूच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करणे आणि नैसर्गिक जलस्रोतांचे रक्षण करीत कृत्रिम तलावातच विसर्जन करण्याचे संदेश प्रसारित करण्यात आलेत . नवी मुंबई महापालिकेने आरती संग्रहासारख्या पारंपरिक माध्यमाचा उपयोग करून स्वच्छता व पर्यावरणाचे संदेश प्रसारित करण्यासाठी प्रभावीपणे राबविलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे. 

कल्याण-डोंबिवली महापालिका :   पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा वास घेणाऱ्या  कल्याण-डोंबिवली महापालिकेने कृत्रिम तलावांमध्ये गणपती विसर्जन करणाऱ्या गणेशभक्तांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान केला.  गणपतीचे विसर्जन करण्यासाठी गणेशभक्तांनी नदी, खाडी, ओहोळ असे नैसर्गिक जलस्रोत प्रदूषित करू नयेत. अधिकाधिक भाविकांनी पालिकेने निर्माण केलेल्या कृत्रिम तलावांमध्ये गणपती विसर्जन करावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

यंदा कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील विविध भागांत एकूण ६३ कृत्रिम तलाव पालिकेने निर्माण केले आहेत. भाविकांना आपल्या घर परिसरात गणपती विसर्जन करण्याची संधी मिळावी. प्रत्येक भाविकाला दोन ते तीन किलोमीटर अंतर वाहन, पायी चालत जाऊन गणपती विसर्जन करण्यास लागू नये, वाहन कोंडीचा कोणालाही त्रास होऊ नये तसेच जलप्रदूषण होऊ नये, नैसर्गिक जलस्रोत स्वच्छ राहण्यासाठी कृत्रिम तलावांची पालिकेने सोय  केली आहे. 

निर्माल्यापासून खतनिर्मिती :

'विसर्जन आपल्या दारी' या शीर्षकाखाली निर्माल्य संकलनाचा हा उपक्रम राबविला जात आहे. कृत्रिम तलावांत एक निर्माल्य कलश ठेवण्यात आला आहे. तेथे भाविकांना निर्माल्य टाकण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. निर्माल्यापासून खत तयार करून ते कल्याण-डोंबिवली पालिकेचे बगिचे, उद्यानांमधील झाडांसाठी गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही वापरता येणार आहे.  

नाशिक : 

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नाशिक महापालिकेनेही पुढाकार घेतला.  नाशिक महापालिकेने  शंभर टन शाडू माती खरेदी केली असून  शहरातील सहाही विभागांमध्ये तिचे मोफत वितरण केले.  खास गणेशोत्सवासाठी नाशिक महापालिकेने मूर्तिकांरांना भेटून ४५ टन शाडू मातीचे वाटप केले. तसेच नागरिकांना स्वस्त दारात शाडू मातीच्या मूर्ती उपलब्ध करून दिल्या.  'मातीचा गणपती बसवून त्याचे विसर्जन घरीच करा. गणपतीच्या मातीत वृक्षारोपण करा. गोदावरीबरोबर तिच्या उपनद्याही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. नदी, तलाव, विहीर या प्रदूषित होणार नाही याची काळजी घ्या. अशा आशयाची जनजागृती नाशिक महापालिकेकडून नागरिकांमध्ये करण्यात आली.  पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या सजगतेसाठी नाशिक महापालिकेने कचरा गोळा करणाऱ्या घंटा गाड्यांचाही अतिशय प्रभावीपणे उपयोग केला. 

गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही नाशिक महापालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी 'मिशन विघ्नहर्ता' मोहीम महापालिकेने हाती घेतली. या मोहिमेचा एक भाग म्हणून पर्यावरणपूरक प्रोत्साहन देण्यासाठी पर्यावरणपूरक घरगुती आरास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. शाडू मातीपासून किंवा अन्य पर्यावरणपूरक साहित्यापासून तयार केलेल्या श्री मूर्तीची प्रतिष्ठापना, पर्यावरणपूरक गणेशोत्सव आरास व पर्यावरणपूरक श्री विसर्जन अशा तिन्ही प्रकारे घरगुती पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या नागरिकांसाठी या पर्यावरणपूरक स्पर्धेत भाग घेता आला.  स्पर्धेत  प्रथम येणाऱ्या स्पर्धकाला दहा हजार रुपयांचे पहिले बक्षीस दिले जाणार आहे. द्वितीय पाच हजार, तर तृतीय पारितोषिक तीन हजार रुपये पारितोषिकाने गौरव करण्यात आला. 

नाशिक महापालिकेने गेल्यावर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना राबविताना 'मूर्तिदान' मोहीम राबविली होती. नाशिक शहरात सुमारे दोन लाख पीओपी मूर्तींची प्रतिष्ठापना झाल्याचे मूर्तिदान मोहिमेमधून स्पष्ट झाले होते. यंदाही पीओपी मूर्तींची मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. पीओपीच्या गणेशमूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन केल्यामुळे वाढणारे प्रदूषण पाहता  महापालिकेने सहा विभागांमध्ये मूर्ती संकलन केंद्र व कृत्रिम तलावांची निर्मिती केली. तसेच 'पीओपी'च्या मूर्तींचे  घरगुती विसर्जनाच्या दृष्टिकोनामधून अमोनियम बायोकार्बोनेट पावडर ही महापालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयात 'विनामूल्य' उपलब्ध करून देण्यात आली. 

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नव्या मार्गदर्शक तत्त्वानुसार नदीचे प्रदूषण व नुकसान टाळण्यासाठी नाशिक महापालिकेने यंदा  'पीओपी'च्या मूर्तीवर बंदी जाहीर केली होती. मात्र, त्यानंतरही गणेश उत्सवासाठी शहरातील मूर्ती विक्रेते, उत्पादक व व्यापाऱ्यांनी 'पीओपी'पासून मूर्ती बनविल्या. ज्या मूर्ती विक्रेते, उत्पादक आणि व्यापाऱ्यांकडे  'पीओपी'च्या मूर्ती शिल्लक राहिल्या असतील  कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले. कृत्रिम तलावात विसर्जन केले नाही तर गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवसानंतर महापालिकेच्या विभागीय अधिकाऱ्यांमार्फत नियुक्त केलेल्या भरारी पथकामार्फत कारवाई केली जाईल, असा इशारा नाशिक महापालिकेने दिला. 

नागपूर : 

पर्यावरणपूरक गणेशोत्साबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी  नागपूर महापालिकेकडून विविध उपक्रम राबवण्यात आले.  त्या अंतर्गत यंदासुद्धा गणेशोत्सव काळात संकलित होणाऱ्या निर्माल्यापासून खत निर्मिती करण्याचा निर्णय नागपूर महापालिकेने घेतला. यंदा निर्माल्य संकलनाकरता महापालिकेकडून शहरात १२ रथ ठेवण्यात आले. या निर्माल्यरथांचे लोकार्पण नागपूर महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाद्वारे करण्यात आले. निर्माल्यरथांमध्ये फक्त आणि फक्त निर्माल्य टाकण्याचे आवाहन घनकचरा विभागाने भाविकांना केले आहे.  निर्माल्यरथांच्या व्यवस्थेसाठी टोल फ्री क्रमांक देखील जाहीर  केले. लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली आणि नेहरूनगर झोनसाठी  १८००२६७७९६६ हा टोल फ्री क्रमांक, तर गांधीबाग, सतरंजीपुरा, लकडगंज, आशीनगर आणि मंगळवारी या झोनसाठी १८००२६६२१०१ हा  टोल फ्री क्रमांक आहे. 

नागपूरमध्ये विदर्भासह मध्य भारतातून अनेक ठिकाणांहून वैद्यकीय उपचार घ्यायला रुग्ण येत असतात. अनेक रुग्णांना मोठ्या प्रमाणात रक्ताची आवश्यकता असते. त्यानुषंगाने पर्यावरणपूरक गणेशोत्सवासोबतच सामाजिक कार्य म्हणून रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचा उपक्रम नागपूर महापालिकेने राबविला.  शहरात जाणवणारा रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी नागपूर महापालिकेने उचललेले सकारात्मक पाऊल कौतुकास्पद आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून रक्तदानाचा उपक्रम राबविण्यासाठीच्या या  पुढाकारातून नागपूर महापालिकेकडून चार हजार युनिट रक्त संकलन करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले. 

महापालिकेच्या रक्तदान अभियानाचा शुभारंभ  विदर्भ इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेडचा (व्हीआयपीएल) राजा या गणेशोत्सव मंडळापासून झाली.  या मंडळात १०० नागरिकांनी रक्तदान केले. इतर मंडळांना रक्तदान शिबिराकरिता महापालिकेतर्फे आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. एक सकारात्मक पाऊल म्हणून या शिबिरांत मोठ्या प्रमाणात रक्तदान करा, असे आवाहन नागपूर महापालिकेने केले. 

पुणे  महानगरपालिका :  नागरिकांना पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे आवाहन करणाऱ्या पुणे महानगरपालिकेतर्फे विसर्जनाची अतिशय चोख व्यवस्था करण्यात आली . महापालिकेद्वारे  गणेश विसर्जनासाठी १५ क्षेत्रिय कार्यालयांअंतर्गत एकूण ४२ बांधीव हौद, एकूण २६५ ठिकाणी ठेवलेल्या ५६८ लोखंडी टाक्यांची सुविधा उपलब्ध करण्यात आली.  

नागरिकांनी नदी, तलाव अशा नैसर्गिक स्त्रोतात मूर्तीचे विसर्जन न करता अधिकाधिक प्रमाणात मूर्ती दान कराव्यात, यासाठी महापालिकेतर्फे  क्षेत्रीय कार्यालयामार्फत जनजागृती करण्यात आली.  क्षेत्रिय कार्यालयांअंतर्गत सर्व कृत्रिम हौद व मूर्ती संकलनाच्या ठिकाणी निर्माल्य संकलनाची व्यवस्था करण्यात आली.  यासाठी २५६ ठिकाणी निर्माल्य कलश-कंटेनर ठेवण्यात आले आहेत.

पुनरावर्तन उपक्रम:

गणेशोत्सव कालावधीत पुणे महानगरपालिका व विविध स्वयंसेवी संस्थांमार्फत पुनरावर्तन उपक्रम राबविण्यात आला.  या उपक्रमात गणेश विसर्जनानंतरची शाडूची माती संकलित करून त्याचा पुनर्वापर केला जाणार आहे. या पुनरावर्तन उपक्रमाबाबतची सविस्तर माहिती व शाडू माती संकलनाच्या केंद्राविषयीची सविस्तर माहिती www.punaravartan.org या वेबसाईटवर पुणे महापालिकेद्वारे उपलब्ध करून देण्यात आली. 

निर्माल्याचे होणार खत:

निर्माल्यामध्ये केवळ हार, पाने, फुले एवढ्याच गोष्टीचा समावेश होतो. त्यामध्ये प्लास्टिक, थर्माकोल, कापडी वस्तू किंवा तसबिरी, मूर्ती किंवा मूर्तीचे अवशेष तसेच कुठलेही खाद्यपदार्थ न टाकण्याचे पुणे महापालिकेने आवाहन केले. निर्माल्य एकत्र करून त्याचे खत बनवून शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. अधिकाधिक नागरिकांनी मूर्तिदानास  प्रोत्साहन देण्यासाठी  विसर्जन हौदाच्या ठिकाणी खतांच्या पिशव्या पुणे महापालिकेने उपलब्ध केल्या. 

मोफत सुलभ शौचालयांची सोय :  पुण्याला गणेशोत्सवाची निराळी परंपरा आहे. पुणे शहरातील मंडळांचे देखावे आणि मानाचे गणपती चे दर्शन घेण्यासाठी शहरासह देशभरातून गणेश भक्तांचा ओढा वाढतो.  शेवटच्या पाच दिवसांमध्ये लाखोंच्या संख्येने भक्त येतात. या गर्दीत महिलांची कुचंबणा न होण्यासाठी  महापालिकेने विशेष  काळजी घेतली असून ठिकठिकाणी फिरते शौचालयांची व्यवस्था केली. तर शहराच्या मध्यवर्ती भागातील सुलभ शौचालये मोफत उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला. 

पुणे महापालिकेकडून पालखी सोहळा तसेच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये फिरत्या शौचालयांची व्यवस्था केली जाते. त्यानुसार महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून नियोजन केले जाते. पालखी सोहळ्यामध्ये लाखो संख्येने वारकरी येत असतात. त्यांची योग्य प्रकारे काळजी महापालिकेककडून घेतली जाते. तसेच मेडिकल कॅम्प लावले जातात. त्याच धर्तीवर आता गणेशोत्सवात महापालिकेने नियोजन  केले आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून ते पाचव्या दिवसापर्यंत दररोज दोनशे फिरत्या  शौचालयांची व्यवस्था केली. गणेशोत्सवात  पाचव्या दिवसानंतर फिरत्या  शौचालयांच्या संख्येत गरजेनुसार वाढ केली. तसेच ही शौचालये स्वच्छ ठेवण्याची देखील काळजी घेण्यात आली असून त्यासाठी सेवक तैनात करण्यात आले. 

सुलभ शौचालयांसह खासगी हॉटेल चालकांना देखील त्यांची स्वच्छतागृहेसुध्दा नागरिकांसाठी खुली ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे खाद्य पदार्थांची खरेदी करावीच अशी सक्ती त्यांना करता येणार नाही. नागरिकांची संख्या बघता इतरांनीदेखील सहाकार्य करावे असे आवाहन पुणे महापालिकेने केले. 

आळंदी नगरपरिषद:  तीर्थक्षेत्रासाठी लोकप्रिय असणाऱ्या आळंदीने शहरानेही यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा वसा घेतला. याचे श्रेय आळंदी नगरपरिषदेचे आहे.आळंदी नगर परिषदमार्फत गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर पुणे - आळंदी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आले.  यंदाचा गणेश उत्सव हा पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा, यासाठी आळंदी नगर परिषदेने पुढाकार घेतला असून, 'माझी वसुंधरा अभियान ४.० अभियानांतर्गत कृत्रिम जलस्त्रोतांची निर्मिती केली.  गणेशोत्सवाच्या कालावधीत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, विषारी रंग, प्लास्टिक आणि थर्मोकोलचीसजावट इत्यादी गोष्टींचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो.हे सर्व घटक पाण्यात न विरघळणारे आणि  विषारी आहेत.  नैसर्गिक जलस्रोतांमध्ये यांचे विसर्जन केल्यानंतर त्यांचे अवशेष पाण्यात न विरघळता तसेच राहतात. परिणामी जलप्रदूषण होऊन पाण्यातील अनेक जिवांच्या अस्तित्वाला धोका निर्माणहोतो. त्यामुळे आळंदी नगर परिषद मागील काही वर्षांपासून 'मूर्तिदान' ही संकल्पना अत्यंत प्रभावीपणे राबवित असून, आळंदीकरांचा या उपक्रमाला  यंदाही पाठिंबा मिळाला.  नगरपरिषदेमार्फत केलेल्या मूर्ती संकलन केंद्रावर विधिवत आरती करून गणेश मूर्ती व्यवस्थितरीत्या जमा केल्या.  या मूर्ती पुढे पुनर्वापरासाठी सेवाभावी संस्थांकडे सुपूर्द करण्यात आल्या. या संस्थांमार्फत सर्व गणेश मूर्तीचे पावित्र्य जपत त्यांचा पुनर्वापर केला जातो. परिणामी  जलस्त्रोतांचे प्रदूषण रोखले जाऊन पर्यावरण संवर्धनास हातभार लागतो.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x  

Wednesday, August 28, 2024

महापालिकेचा जाहिरात मार्गदर्शक मसुदा - २०२४

मुंबई महानगरपालिकेने  जाहिरात मार्गदर्शक मसुदा - २०२४  तयार केलेला आहे. आदर्श निवडणूक आचारसंहितेचे निकष मुंबई महापालिकेच्या जाहिरात मार्गदर्शक धोरणाच्या मसुद्यात (२०२४) समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यानुसार- 

  • सार्वजनिक ठिकाणांचा वापर प्रचाराचे बॅनर, फलक, घोषणा यासाठी करता येणार नाहीच. 
  • खासगी निवासस्थानी उमेदवाराचे जास्तीत जास्त तीन झेंडे लावता येतील. 
  • कुणाला एकापेक्षा अधिक पक्ष किंवा उमेदवाराचे झेंडे लावायचे असल्यास अशा प्रत्येक पक्षाचा एकच झेंडा लावता येईल.
  • खासगी वाहनावर जास्तीत जास्त एक फूट बाय दीड फूट आकाराचा एकच झेंडा लावता येईल. त्याची काठी तीन फुटांपेक्षा जास्त उंच नसेल. 
  • वाहनावर योग्य आकाराचे एक किंवा दोन लहान स्टीकर मात्र लावता येतील.
  • महत्त्वाचे म्हणजे रोड शो करताना वाहनावर कोणतेही बॅनर लावता येणार नाही. 
  • जास्तीत जास्त सहा फूट बाय चार फूट आकाराचे एकच बॅनर हातात पकडून नेता येईल. 
  • खासगी जागा मालकाने किंवा ताबेदाराने स्वेच्छेने परवानगी दिल्याशिवाय तेथे झेंडा-बॅनर लावता येणार नाही.


बॅनर, फलक किंवा ध्वज आदी अस्थायी  स्वरुपाच्या जाहिराती पालिकेच्या  सक्षम प्राधिकरणाच्या परवानगीविना लावल्यास पालिका कायदा तसेच राज्याच्या  मालमत्तेचे रस्त्यावरील इतर वाहनांना उपद्रव विद्रुपीकरण प्रतिबंधक कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येईल. 

प्रचार कार्यालयाच्या जागेसाठी नियम 

कार्यालयाची जागा अतिक्रमण करून उभारलेल्या मालमत्तेवर नसावी. तसेच कोणत्याही धार्मिक ठिकाणीही नसावी. रुग्णालये-शैक्षणिक संस्थांच्या जवळही प्रचार कार्यालय  नसावे. सध्या अस्तिवात असलेल्या मतदान केंद्रापासून दोनशे मीटरच्या आतसुद्धा प्रचार कार्यालय थाटता येणार नाही. प्रचार कार्यालयात पक्षाचे चिन्ह, फोटो असलेला एकच बॅनर, झेंडा लावता येईल. बॅनरचा आकार चार फुटाच्या आत असावा.

लोकप्रतिनिधींच्या छायाचित्रांनाही मनाई असणार 

एखाद्या योजना प्रकल्पाची माहिती देणाऱ्या फलकावर प्रकल्पाच्या तपशीलासह संबंधित खासदार, आमदार, नगरसेवकाचे नाव तसेच क्षेत्र यांचा उल्लेख करता येईल. मात्र या लोकप्रतिनिधींची छायाचित्रे त्यावर लावता येणार नाहीत.

गणपती, नवरात्र मंडळांसाठी विशेष नियमावली 

केवळ यंदाच्या धार्मिक उत्सवादरम्यान मंडपांमध्ये व्यापारी, राजकीय, सामाजिक जाहिरातींचे बॅनर, फलक, ध्वज लावण्यास परवानगी असेल. त्या-त्या वेळी पालिका त्यासंबंधी परिपत्रक काढणार आहे.

जाहिरात फलकांची  नियमावली 

घाटकोपरची दुर्घटना झाल्यानंतर पालिका प्रशासनाने सक्षम जाहिरात फलक धोरण तयार करण्यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समिती स्थापन केली होती. त्यामध्ये सह पोलीस आयुक्त महानगरपालिकेचे उप आयुक्त (विशेष), अनुज्ञापन अधीक्षक, (वाहतूक), डिजिटल जाहिराती रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत बंद ठेवाव्यात. पर्यावरणविषयक नामांकित तज्ज्ञ संस्थेचे एक प्रतिनिधी, आयआयटी मुंबईचे दोन तज्ज्ञ सदस्य,

आयआयटी मुंबईच्या औद्योगिक संरेखन विभागाचे एक तज्ज्ञ प्रतिनिधी यांचा समावेश होता. या समितीच्या सूचना अंतर्भूत करून सर्वसमावेशक धोरण जाहीर करण्यात आले आहे. महापालिकेने १६ वर्षे जुने जाहिरात फलक धोरण बदलून नवीन धोरण तयार केले आहे.  

या नव्या धोरणात डिजिटल जाहिरात फलकांबाबतच्या नियमावलीचाही समावेश करण्यात आला आहे. दुभाजक, पदपथ, इमारतीच्या गच्चीवर, संरक्षक भिंत, रस्त्यावरील कमानी, यावर जाहिरात फलक लावण्यास मनाई करण्यात आलीआहे. हा मसुदा मंजूर झाल्यानंतर नवीन धोरण १० वर्षांसाठी लागू करण्यात येणार आहे. जाहिरात फलकांच्या नव्या धोरणावर ऑगस्ट महिन्यापर्यंत  हरकती व सूचना नोंदवता येणार आहेत.

असे आहेत नियम

■ दोन होर्डिंगच्या मध्ये किमान ७० मीटरचे अंतर राखले जाईल. बॅक टू बॅक तसेच व्ही आकाराच्या फलकांचा त्यासाठी अपवाद केला जाईल. मुंबईत पूर्व द्रुतगती महामार्ग, पश्चिम द्रुतगती महामार्गावर, तसेच पदपथ, मार्गिका, वाहतूक बेटे येथे होर्डिंगला परवानगी दिली जाणार नाही.

■ सक्तीने ठवलेल्या खुल्या जागांवर, जसे की खेळाची मैदाने, मनोरंजन मैदाने, उद्याने येथे होर्डिंगला परवानगी दिली जाणार नाही. अशी जागा सक्तीची नसल्याचे प्रमाणित केल्यास परवानगी मिळेल.

■ वाहन तळ, सार्वजनिक खेळाची मैदाने, वारसा इमारती आदी ठिकाणी होर्डिंगला परवानगी मिळणार नाही.

■ जमिनीपासून १०० मीटर उंचीपेक्षा अधिक होर्डिंगला परवानगी मिळणार नाही.

■ महनीय व्यक्तींच्या पुतळ्यापासून ५० मीटर अंतरात होर्डिंगला परवानगी नसेल.

■ जाहिरात फलकाची लांबी, रुंदी जास्तीत जास्त ४० फूट असावी. 

■ काचेच्या तावदानावर ५० टक्क्यांपेक्षा जास्त भाग व्यापला जाऊ नये. 

■रस्त्यांवरील कमानी, रस्ते दुभाजक, पदपथ, वाहतूक बेट, उच्चदाबाच्या विद्युत वाहिन्यांखाली जाहिराती लावता येणार नाही.

■ डिजिटल जाहिरातींची प्रकाशमानता कमी असावी.

नव्या जाहिरात फलक धोरणाबाबत संबंधितांनी आपल्या लेखी हरकती व सूचना पालिका मुख्यालयात तळमजल्यावरील उपायुक्त विशेष यांच्या कार्यालयात करावा.  तसेच  दादर पश्चिमेकडील सेनापती बापट मार्गावरील सिवेज ऑपरेशन इमारतीतील परवाना अधीक्षकांच्या कार्यालयातही लेखी हरकती सादर करण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने कळवले आहे. sl.licence@mcgm.gov. in किंवा hc01. icence@mcgm. gov.in या ई-मेल पत्त्यावरही हरकती पाठवता येतील.

मुंबईप्रमाणे  नवी मुंबई महानगरपालिकेनेही शहरात अनधिकृत होर्डिंगविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने निश्चित करून दिलेल्या १२६ ठिकाणीच आता होर्डिंग लावता येणार आहेत. अनधिकृतपणे जाहिरातबाजी केल्यास दंडात्मक व गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. 

नवी मुंबई महानगरपालिकेने केलेले आवाहन

  • शहरात कुठेही बॅनर होडिंग लावून शहराच्या सौंदर्यास बाधा पोहोचवू नका. 
  • मनपाने निश्चित दिलेल्या १२६ ठिकाणीच बॅनर, होर्डिंग लावण्यात यावेत.
  • होर्डिंग लावण्यासाठी मनपाची परवानगी घ्यावी व शुल्क भरावे, होर्डिंगवर परवानगीचा स्टीकर लावावा.
  • कोणत्याही स्थितीमध्ये ४ विनापरवाना होडिंग, बॅनर लावल्यास दंडात्मक कारवाई होणार, गुन्हेही दाखल केले जातील. 

व्हॉट्सॲपवर छायाचित्र पाठवा

नागरिकांनी शहरात विनापरवाना होडिंग बॅनर निदर्शनास आल्यास तत्काळ त्याचे छायाचित्र काढून ८४२२९५५९१२ या क्रमांकावर व्हॉट्सअॅप करावे. छायाचित्र गुगल लोकेशनसह असावे, असे आवाहन केले आहे.

मराठी पाटी न लावणाऱ्या दुकानदारांवर मुंबई महापालिकेकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. २८ नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२४ या कालावधीत केलेल्या कारवाईत ९४ हजार ९०३ दुकानदारांनी अधिनियमानुसार मराठी पाट्या प्रदर्शित न केल्याचे निदर्शनास आले होते. यातील ९१ हजार ५१५ दुकानदारांनी मराठी पाट्या लावल्या.  मराठी पाट्या न लावणाऱ्या उर्वरित दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या दंडातून १ कोटी ३५ लाख ६० हजार ५०० रुपये दंड वसूल केला आहे.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x  

Saturday, August 17, 2024

कल्याण डोंबिवली महापालिकेत समाविष्ट २७ गावांमध्ये क्लस्टर योजना आणि एकीकडे मुंबईत प्रकल्प ग्रस्तांना पर्यायी घरे मिळण्याचा मार्गही मोकळा

आराखडा तयार करण्याचे मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश 

ल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांमध्ये गेल्या काही वर्षांत अनधिकृत बांधकामे वाढली आहेत. या २७ गावांतील धोकादायक आणि अनधिकृत बांधकामांवर निर्बंध आणून सुनियोजित विकास करण्यासाठी आता क्लस्टरच्या पर्यायाची चाचणी केली जात आहे. सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत २७ गावांमध्ये क्लस्टर योजना लागू करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे येथील अनधिकृत बांधकामांना चाप बसणार आहे. येथील कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षात अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले. यात २७ गावांमध्ये अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणावर वाढली. कधी महापालिका तर कधी ग्रामपंचायत अशा स्थानिक प्रशासनाच्या अदलाबदलीमुळे बांधकामांवर नियंत्रण राहिले नाही. जुन्या बांधकामांमुळे येथे पायाभूत सुविधा उभारण्यामध्येही अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे या २७ गावांचा सुनियोजित विकास करण्यासाठी राज्य सरकारने आता येथे क्लस्टर योजनेची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. कल्याण- लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत या विषयांवर तोडगा कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील २७ गावांतील विविध प्रश्नांवरही चर्चा झाली. २७ गावांतील जिल्हा परिषदेच्या शाळांचा महापालिकेत समावेश करून घेण्यात यावा याबाबत सरकार सकारात्मक आहे. 

प्रकल्प ग्रस्तांना पर्यायी घरे मिळण्याचा मार्ग मोकळा 

विकास योजनांमध्ये बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांसाठी मुंबई महापालिकेने प्रत्येक झोनमध्ये घरे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सातही झोनमध्ये किमान पाच हजार घरे बांधली जाणार आहेत. यात मुलुंडमध्ये सात हजार, भांडुपमध्ये एक हजार ९०० तर, बोरिवलीत ५०० च्या वर घरे बांधण्याची कार्यवाही सुरू आहे. ही घरे खासगी विकासकाच्या माध्यमातून बांधली जाणार आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना पर्यायी घरे मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

पालिकेच्या विकासकामांमध्ये घरे बाधित झाल्यानंतर तेथील प्रकल्पग्रस्तांना इतर ठिकाणी पुनर्वसन करून तेथे पर्यायी घरे उपलब्ध करून दिली जातात. माहुलमध्ये रासायनिक प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण असल्याने आरोग्याला घातक आहे. त्यामुळे तिथे पुनर्वसन करण्यास प्रकल्पग्रस्तांचा तीव्र विरोध आहे.

त्यामुळे प्रत्येक झोनमध्ये घरे देण्याचा निर्णय पालिका वास्तव्यापासून जवळपास घरे प्रशासनाने घेतला आहे. सातही झोनमध्ये प्रत्येकी किमान पाच हजार घरे खासगी विकसकाच्या माध्यमातून बांधण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार मुलुंडमध्ये सात हजार, भांडुपमध्ये एक हजार ९००, तर बोरिवलीत ५००च्या वर घरे बांधण्याची कार्यवाही सुरू आहे. या योजनेत खासगी विकसक, जमीन मालक ३०० चौरस फुटांची घरे बांधून देणार आहे. त्याच्या बदल्यात त्यांना टीडीआर किंवा मोबदला मिळणार आहे.

माहुलमध्ये प्रदूषण असल्याने तिथे जाण्यास प्रकल्पग्रस्तांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे राहत्या ठिकाणाच्या जवळपास पुनर्वसन व्हावे, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे. त्यामुळे प्रत्येक झोनमध्ये घरे उपलब्ध करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यामुळे प्रकल्पबाधितांना ते राहत असलेल्या ठिकाणाजवळच घरे उपलब्ध होणार आहेत.

सध्याची स्थिती

* माहुलमध्ये एकूण १७ हजार घरांपैकी ६ हजार घरांचे वितरण.

* सुमारे पाच हजार घरे ताब्यात मिळणे बाकी.

* माहुलमध्ये सुमारे सात हजारच घरे शिल्लक

* पालिकेला सद्यस्थितीत ३६ हजार घरांची गरज आहे.

* प्रस्तावित प्रकल्पांमुळे ही गरज ५० हजारांवर जाणार.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x  

लोकहिताचा शहर विकास

गेल्या काही दिवसात नागरिकांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून अनेक नाविन्यपूर्ण आणि हिताचे निर्णय शासन दरबारी घेण्यात आले. मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेले हे निर्णय लोकहिताचे आहेतच पण त्याशिवाय नागरिकाभिमुख शहर नियोजनाच्या दृष्टीने ते अत्यंत महत्वाचे आहेत. या योजना आणि उपक्रमांमुळे एका सुनियोजित शहराचा प्रवास होत आहे. पर्यावरणविषयक उपक्रम असो, महिला कल्याण असो किंवा दळणवळणाचे नवे प्रकल्प असो.. मुंबई शहर बदलतंय, याचाच प्रत्यय येत राहतो,   याच विषयी घेतलेला हा विस्तृत आढावा.. 

बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध करून देणार.. 

राज्यातील महिला बचत गट आणि महिला उद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादनांना राष्ट्रीयस्तरावर बाजारपेठ उपलब्ध होण्यसाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आधारित डिजीटल मार्केटिंग अ‍ॅप करावे. शहरांमध्ये बचत गटांची संख्या वाढवावी. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मैदानावर सुटीच्या दिवशी बचत गटांसाठी स्टॉलची व्यवस्था करून द्यावी. ग्रामीण भागातील बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू शहरांमधील बाजारपेठेत उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  नुकतेच दिले.राज्यात सुमारे ७ लाख ८२ हजार बचत गट कार्यरत असून उमेद अंतर्गत सुमारे सहा लाख, एनयूएलएम अंतर्गत ३१ हजार, माविम अंतर्गत ग्रामीण ८७ हजार आणि शहरी ६५ हजार असे बचत गट कार्यरत आहेत. महानगरांमध्ये बचत गट, महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना स्टॉलची उभारणी करण्यासाठी महापालिकांनी पुढाकार घ्यावा. मोकळ्या जागा, मैदाने याठिकाणी काही दिवसांकरिता स्टॉलची उभारणी करून देण्यात यावी. जेणेकरून याठिकाणी हक्काची बाजारपेठ या गटांना मिळेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

बचत गटांच्या वस्तूंना मोठी मागणी असते. त्याची दखल घेऊन राष्ट्रीयस्तरावर देखील त्याला बाजारपेठ मिळावी यासाठी उमेद, एनयूएलएम, माविम यांनी एकत्रित येऊन एक व्यासपीठ निर्माण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. यावेळी धर्मवीर आनंद दिघे महारोजगार अ‍ॅपच्या माध्यमातून शासकीय स्तरावर असंघटित कामगारांचे डिजीटल जॉबकार्ड तयार करण्याची संकल्पना यावेळी सादर करण्यात आली.

सेव्ह मुंबई उपक्रमासह घाटकोपर येथे मानवनिर्मित जंगलाचे लोकार्पण  

ग्लोबल वॉर्मिंगमुळे जगासमोर पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी पर्यावरण रक्षण महत्त्वाचे असल्याने  यामध्ये सर्वांनी योगदान द्यावे. आपल्या सर्वांच्या योगदानातून आपल्याला पर्यावरणपूरक महाराष्ट्र करावयाचा आहे, असे प्रतिपादन मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ‘सेव्ह मुंबई’ (Save Mumbai) कार्यक्रमाचा लोकार्पण सोहळा व ‘द ॲड्रेस  सोसायटी’च्या वतीने अडीच एकर क्षेत्रफळावरील मानवनिर्मित जंगलाचे लोकार्पण मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले. 

र्यावरण रक्षणासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘एक पेड़ माँ के नाम’ अभियान सुरू केले आहे. या अभियानात प्रत्येकाने सहभागी होऊन आपण सर्वांनी राज्यात वृक्ष लागवडीची जनचळवळ सुरू करूया. अर्बन फॉरेस्ट ऑक्सिजन पार्क असल्याने जिथे जागा मिळेल तिथे वृक्ष लागवड करून अर्बन फॉरेस्ट निर्माण करण्यात सर्वांनी सहभाग घ्यावा. यासाठी शासन आवश्यक ते सर्व सहकार्य करेल. बृहन्मुंबई महापालिका आणि एमएमआरडीएनेही त्यांच्या रिकाम्या असणाऱ्या जागेत अर्बन फॉरेस्ट निर्माण करण्यात पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.ग्लोबल वॉर्मिंगचा सामना करण्यासाठी राज्य शासनाने वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली आहे. प्रदूषणमुक्त  राज्य करण्याचा संकल्प राज्य शासनाने केला आहे. राज्यात बांबू लागवडीस प्रोत्साहन देण्यात येत असून जवळपास २१ लाख हेक्टरवर बांबू लागवड करण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे. 

ठाणे शहरात अद्ययावत प्रसूतिगृहाचे लोकार्पण 

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वागळे इस्टेट येथील शिवाजीनगर भागातील जुन्या स्वर्गीय मीनाताई ठाकरे प्रसूतिगृह आणि डायलिसिस केंद्राच्या अद्ययावत नूतन वास्तूचे लोकार्पण मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतेच झाले. अद्ययावत सात बेडचा एएनसी विभाग, दहा बेडचा पीएनसी विभाग, दोन बेडचा रिकव्हरी रूम, न्यू बॉन्सेबलायझेशन युनिट, लेबर रूम, शस्त्रक्रियागृह, ओपीडी, प्रयोगशाळा तपासण्या, सोनोग्राफी तपासणी, सात खाटांचे डायलिसिस केंद्र या सुविधांचा समावेश असलेल्या स्व. मीनाताई ठाकरे प्रसूतिगृहाचा लाभ नागरिकांना मिळणार आहे. ठाणेकरांना सार्वजनिक वाहतुकीचा आणखी एक पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी ठाणे महापालिकेने आखलेल्या १२ हजार २०० कोटींच्या अंतर्गत मेट्रो प्रकल्पास केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे. सहा डब्यांच्या मेट्रोवर अखेर केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केले असून यामुळे हा बहुचर्चित प्रकल्प आता मार्गी लागला आहे. या मेट्रोची सुरुवात २०२९ पर्यंत होणार असून या प्रकल्पामुळे ठाणेकरांचा प्रवास सुखकर आणि गतिमान होणार आहे.

प्रकल्पग्रस्तांच्या पर्यायी घराचा मार्ग मोकळा

विकास योजनांमध्ये बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांसाठी पालिकेने प्रत्येक झोनमध्ये घरे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सातही झोनमध्ये किमान पाच हजार घरे बांधली जाणार आहेत. यात मुलुंडमध्ये सात हजार, भांडुपमध्ये एक हजार ९०० तर, बोरिवलीत ५०० च्या वर घरे बांधण्याची कार्यवाही सुरू आहे. ही घरे खासगी विकसकाच्या माध्यमातून बांधली जाणार आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना पर्यायी घरे मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

Thursday, August 8, 2024

एक-मेका साहाय्य करू.. पुणे आणि कोल्हापूर मनपाच्या मदतीला मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पनवेल महानगरपालिका

गेल्या काही दिवसांपासून राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरांना अतिवृष्टीचा सामना करावा लागला. मुसळधार पावसाचा सर्वात जास्त फटका पुणे आणि कोल्हापूर शहरांना बसला.  मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पुणे आणि कोल्हापूर महानगर पालिकांनी शर्थीचे प्रयत्न केले.  पूर ओसरल्यानंतर पुणे आणि कोल्हापूरातील पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीकरिता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे यांनी राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांना मदत करण्याचे निर्देश दिले. मा.मुख्यमंत्र्यांच्या निर्देशांनुसार  मुंबई, ठाणे,  नवी मुंबई आणि पनवेल महानगरपालिका  पुरस्थितीनंतर ओढवलेली परिस्थिती हाताळण्यासाठी हिरहिरीने पुढे आल्या. मुंबई, ठाणे,  नवी मुंबई आणि पनवेल महानगरपालिकेने  पुणे आणि कोल्हापूर मनपा क्षेत्रातील पूरग्रस्तांना केलेल्या मदतीची दखल  तेथील नागरिकांप्रमाणेच तिथल्या लोकप्रतिनिधींनीही घेतली. आपल्या महानगरपालिका क्षेत्राची स्वच्छता राखतानाच इतर शहरांच्या अडचणीच्या काळात मदत करण्याचा पायंडा  मुंबई, ठाणे,  नवी मुंबई आणि पनवेल या महानगरपालिकांनी  पुन्हा एकवार घातला आहे. 

बृहन्मुंबई  महानगरपालिका :  जुलै २०२४ मध्ये कोल्हापुरात मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीनंतर तेथील जनजीवन विस्कळीत झाले होते. शहरातील पर्जन्य जलवाहिन्या वाहिन्यांच्या स्वच्छतेसाठी कोल्हापूर महानगरपालिकेचे मा. आयुक्त के. मंजूलक्ष्मी  यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांच्याशी पत्रव्यवहार केला. शहरातील स्वच्छतेसाठी दोन सक्शन कम जेटिंग विथ रिसायकलर ही यंत्रे मदतीसाठी देण्याची विनंती  मा. आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी  डॉ. गगराणी  यांनापत्राद्वारे केली.  त्याच पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मदतीचा हात पुढे केला.  कोल्हापूर महानगरपालिकेच्या विनंतीवरून पर्जन्य जलवाहिन्यांच्या स्वच्छताकामासाठी बृहन्मुंबई पालिकेचे दोन चमू मुंबईहून कोल्हापुरात दाखल झाले.  डॉ. गगराणी यांच्या आदेशानुसार बृहन्मुंबई  महानगरपालिकेच्या   पर्जन्य जलवाहिन्या विभागाने कनिष्ठ अभियंता श्री.आकाश रैनाक यांच्या नेतृत्त्वाखाली  दोन सक्शन कम जेटिंग विथ रिसायकलर संयंत्रे कोल्हापुरात रवाना केली. या चमूमध्ये प्रत्येक संयंत्रासोबत चार जणांचे मनुष्यबळ आहे. दोन्ही संयंत्रांसोबत एकूण आठजण कोल्हापुरात दाखल झाले. या चमूमध्ये वाहन चालक, तंत्रज्ञ, कामगार आदींचासमावेश आहे. कोल्हापुरात २०१९, २०२१ मध्येही पूर परिस्थिती आली असताना बृहन्मुंबई  महानगरपालिकेने अशाच प्रकारे मदतीचा हात पुढे केला होता. 

ठाणे महानगरपालिका :  पुणे महानगरपालिका क्षेत्रातील अतिवृष्टीमधील बाधित नागरिकांना मदतकार्य करण्यासाठी  मा.  मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार मा. महापालिका आयुक्त श्री.सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महापालिकेच्या ठाणे आपत्ती दलाची टीम   पहाटे पुण्याला रवाना करण्यात आली. ठाणे महापालिकेच्या वतीने पुणे येथे रवाना करण्यात आलेल्या पथकात  २  उपअभियंता (यांत्रिकी), २ सुपरवायझर, ३ तांत्रिक कर्मचारी, ४ जेटींग वाहने ४ वाहनचालक, ८ ऑपरेटर/मदतनीस, १७७ सफाई कामगार, ४ उपमुख्य स्वच्छता निरीक्षक, १२ स्वच्छता निरीक्षक, १० हवालदार, ७ वाहनचालक आदींचा समावेश होता.    त्याचबरोबर  ८० खराटे झाडू, ८० ब्रश, ८० फावडे, ८० काटे/पंजे आदी साहित्याही  आपत्ती दलाच्या टीमकडे देण्यात आले.

अतिवृष्टीमधील बाधितांना प्राथमिक औषधोपचार मिळावे यासाठीही ठाणे महापालिकेने आपत्ती दलाच्या टीम सोबत वैद्यकीय सेवेची कुमकही पाठवली. त्यात वैद्यकीय किट, पुरेसा औषधसाठा, ORS पॅकेट्स  पाणी व बिस्कीदे आदी साहित्यांचा समावेश होता. तसेच नागरिकांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी कार्डिअक ॲम्ब्युलन्स, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिता सोनावणे, १ परिचारक व १ वाहनचालक यांची सोया आपत्ती व्यवस्थापन दलात करण्यात आली होती. 

अतिवृष्टीझालेल्या परिसरात साथीचे आजार पसरू नयेत यासाठी  फायलेरियाची टीम परिवहनच्या बसमधून रवाना करण्यात आली. या चमूमध्ये ५ धूर  फवारणी मशीन्स,  दोन युटीलिटी वाहने, १ इनोव्हा वाहन आणि औषधसाठ्यांसह १० फवारणी पंपाचा समावेश होता. या   पथकासोबत २ स्वच्छता निरीक्षक, ४ वाहनचालक, १९  फायलेरिया मदतनिशी होते. पुणे अतिवृष्टीमधील बाधितांच्या मदतीसाठी ठाणे महापालिकेचे  एकूण २५७ अधिकारी कर्मचारी पुण्याला रवाना झाले. उपायुक्त श्री.जी.जी गोदेपुरे यांच्या नियंत्रणाखाली  आपत्ती दलाचे पथक रवाना करण्यात आले.

नवी मुंबई महानगरपालिका :  पुणे शहरातील अतिवृष्टीनंतर  निर्माण झालेली पूरस्थिती हाताळण्यासाठी ठाणे पुणे महापालिकेच्या मदतीला  नवी मुंबई महानगरपालिकाही धावून गेली. महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेचे मदतकार्य पथक पुण्यात रवाना झाले. नेहमीच इतरांच्या मदतीसाठी सज्ज असणा-या नवी मुंबई महानगरपालिकेच्या पथकाने सिंहगड रोड एकतानगरी परिसरात केलेल्या स्वच्छता कार्याचे तेथील लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी मनापासून कौतुक करीत आभार मानले. 

पूर परिस्थितीमुळे पुणे शहरातील अनेक भागातील रस्त्यांवर तसेच घरातही गाळ आणि कचरा मोठ्या प्रमाणात जमा झाला होता. त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होणार असल्याचे लक्षात घेत जलद स्वच्छता करणे महत्वाचे होते. या अनुषंगाने मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार, आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे यांनी लगेच महानगरपालिकेचे ११५ जणांचे पथक तयार केले.  पथकास  २ जेटींग मशिन्स व आवश्यक स्वच्छता साधनांसह  तातडीने पुण्याकडे रवाना केले.

पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत नमुंमपा मदतकार्य पथकास सिंहगड रोड परिसरातील एकतानगरी हा पूरग्रस्त भागात साफसफाई करण्याचे सूचित करण्यात आले. त्या अनुषंगाने मदत पथकाने  साफसफाई कामाचे नियोजन केले.  पथकातील २ स्वच्छता पर्यवेक्षक आणि १००  हून अधिक स्वच्छताकर्मींसह तेथील परिसरात व घरांतील स्वच्छतेत महत्वपूर्ण योगदान दिले.  परिसरात रोगराई पसरू नये म्हणून सोबत नेलेल्या जंतुनाशक पावडरचीही फवारणी करण्यात आली.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या मदत पथकाने आत्मियतेने स्वयंस्फुर्तीने काम केलेल्या कामाची प्रशंसा  सिंहगड रोड परिसराच्या माजी नगरसेविका श्रीम. मंजुषा नागपुरे आणि त्या परिसरातील नागरिकांनी केली.

पनवेल महानगरपालिका :  पुराचे पाणी ओसरल्यानंतर पुणेकरांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागला. पाण्यात वाहून आलेल्या कचऱ्यामुळे शहर विस्कळीत झाले.  पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पुणे महापालिका शर्थीचे प्रयत्न करीत आहे.  साथीचे रोग पसरण्याची भीती असल्यामुळे यंत्रणा वेगाने कामाला लागली. अशा  बिकट परिस्थितीत पनवेल महापालिकेला मदतीचाप्रस्ताव येताच मा. आयुक्त श्री.मंगेश चितळे यांनी क्षणाचाही विलंब न करता हातपुढे केला.  मनुष्यबळाची अधिक कुमक पुण्यात पाठवून स्वच्छतेचे काम सुरू केले.  पाच खासगी बसमधून पनवेल महापालिकेचे सुमारे २५० सफाई कामगार पुण्यात रवाना झाले.  स्वच्छतेचे नियोजन करण्यासाठी उपायुक्त डॉ. वैभव विधातेही कामगारांसमवेत पुण्याला रवाना झाले आहेत. या पथकात एक मुख्य आरोग्य निरीक्षक, सहा स्वच्छता निरीक्षक, १० स्वच्छता पर्यवेक्षक, २५० मनुष्यबळ, ३० जंतूनाशक फवारणी कर्मचारी आदींचा समावेश होता.  मदत गटातील कामगारांच्या सुरक्षेसाठी ३०० मास्क, ३०० हँड ग्लोव्हज, स्प्रे पंप, पाच फॉगिंग मशिन आदी साहित्यही देण्यात आले. 

हा झाला मुंबई, ठाणे,  नवी मुंबई आणि पनवेल महानगरपालिकांनी पुणे आणि कोल्हापूर शहरातील पूरग्रस्तांना केलेल्या मदतीचा आढावा. याचबरोबरीने पुणे, पिंपरी-चिंचवड आणि कोल्हापूर मनपाने शहरातील पूरस्थिती कशी हाताळली हेसुद्धा तितकेच इंटरेस्टिंग आहे. 

पुणे महानगरपालिका :  पुणे शहरात पूर परिस्थितीमुळे अनेक भागांत झालेला कचरा आणि चिखल स्वच्छता करण्यासाठी तसेच पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पुणे महानगरपालिकेतर्फे युद्धपातळीवर मोहिम हाती घेण्यात आली. पूरबाधित परिसराची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली.  महानगरपालिकेतर्फे शहरात रोगराई पसरू नये यासाठीदेखील उपायोजना करण्यात आल्या. 

शहरात २५ जुलै रोजी पहाटे मुसळधार पाऊस झाल्याने पुणे महानगरपालिका क्षेत्रातील खालील सखल भागातील साईनाथ नगर, वडगाव शेरी, शांतीनगर, इंदिरानगर, चिमागार्डन, योजना पोल्ट्री फार्म, विश्रांत सोसायटी, यशवंतनगरी, कळस, ताडीवाला रोड, पाटील इस्टेट, पुलाची वाडी, भीम नगर विसर्जन गणपती घाट, बालेवाडी, आदर्श नगर बोपोडी, कोथरूड बावधन प्रभाग क्र. १०, ११, १२, एरंडवणा, शाहू वसाहत, तपोधाम, राजपूत झोपडपट्टी स्मशानभूमी, शिवणे, उत्तमनगर माशे आळी, बाजारसमिती, इंदिरा वसाहत, भीमनगर, कोंढवे धावडे, एकता नगर, निंबज नगर, सहकारनगर, धनकवडी, कात्रज, आंबेगाव बुद्रुक, जांभूळवाडी, कोळेवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी, नदीपात्र, अष्टभुजा, आपटे घाट, टिळक पूल, ओंकारेश्वर मंदिर आतील व बाहेरील परिसर या भागात  पाणी शिरले. 

महापालिका आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्कालिन परिस्थिती विचारात घेऊन प्रथमतः बचाव कार्याला प्राधान्य देण्यात आले. यासाठी पुणे महानगरपालिकेकडील ८ बोटी तैनात करण्यात आल्या. जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून एनडीआरएफच्या दोन तुकड्या (प्रत्येकी  ३० जवान व ४ बोटी)सैन्य दलाचा एक कॉलम (८० जवान, डॉक्टर्स, इंजिनिअर्स, २ बोटी ) असे तीन बचाव पथकही तैनात करण्यात आले.

स्थलांतरीत करण्यात आलेल्या नागरिकांसाठी तात्पुरत्या स्वरुपात २६ ठिकाणी तात्पुरती निवारा व्यवस्था करण्यात आली होती. याठिकाणी पुणे महानगरपालिका, विविध सामाजिक संस्था, मंडळे व व्यक्ती यांच्या माध्यमातून जेवण, नाष्टा इत्यादीची सोय करण्यात आली. पुणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून ६८ पिण्याच्या पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याठिकाणी वैद्यकीय मदतदेखील आवश्यकतेनुसार उपलब्ध करण्यात आली. पुणे महानगरपालिकेमार्फत २ हजार ७०० ब्लँकेट, ५ हजार चादर  आणि ७ हजार बेडशीट तसेच प्लास्टिक बादल्या पूरग्रस्तांना उपलब्ध करून देण्यात आल्या. 

मदत व बचाव कार्यामध्ये स्वयंसेवी संस्था, विविध सेवाभावी व्यक्ती, मंडळे व त्यांचे कार्यकर्ते, स्थानिक लोकप्रतिनिधी यांचादेखील सहभाग होता.  त्यांच्याकडून ७९१ स्वयंसेवक, १६ डॉक्टर, १८ हजार ५० अन्नाची पाकीटे, औषधे, २ हजार  चादर, २ हजार ७०० ब्लँकेट, ८ हजार ५९८ पाणी बाटल्या आणि एक हजार स्वच्छता कीट उपलब्ध झाले. 

बाधित परिसरात मदत कार्य सुरु करण्यात आले आहे. यासाठी बाधित परिसरातील लोकप्रतिनिधी, महापालिका आयुक्त, महानगरपालिकेचे विविध विभागाचे अधिकारी व  क्षेत्रिय अधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. लोकप्रतिनिधींच्या सूचना, स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांची मागणी इत्यादी बाबी विचारात घेऊन मदत कार्याचे नियोजन करण्यात आले आहे. पूर ओसरताच स्वच्छतेच्या कामास प्राधान्य देण्यात आले. २७ जुलै रोजी रोजी पुणे मनपामार्फत पूरबाधित परिसरात १२ मुख्य आरोग्य निरीक्षक, ६४ स्वच्छता निरीक्षक, ९८ स्वच्छता पर्यवेक्षक, ४ हजार २२७ स्वच्छता कर्मचारी, ७३ फवारणी कर्मचारी नेमण्यात आले होते.

राज्य शासनाच्या निर्देशानुसार पूरबाधित भागाची युद्धपातळीवर स्वच्छता करण्यात आली.  परिसरात रोगराई पसरू नये याचीदेखील दक्षता घेण्यात येत आहे. ९९८ किलो जंतुनाशक पावडर, १०४ स्पेर पंप,  ४२ धूर फवारणी यंत्र, ४ रिसा यक्लर, २४ डम्पर, ३ ट्रॅक्टर, ९ पाण्याचे टँकर,  १० विद्युत पंप आणि ७ जनरेटरचा स्वच्छतेच्या कामात उपयोग करण्यात आला. त्यासोबतच २० जेसीबी, ४० डीपी, ५० बीआरसी, ८ हायवा ट्रक,  ३५ जेटींग, १२१ घंटा गाडी, २९४ छोटी गाडी, १३१ कॉम्पॅक्टर, २९ बिन लिफ्टर आणि ४० टिप्परचाही उपयोग करण्यात आला. २७ जुलै रोजी एका दिवसात  २२८ टन कचरा, २६.५ टन गाळ स्वच्छ करण्यात आला. ३३.५३ टन तुटलेल्या झाडाचा कचरा उचलण्यात आला.  

श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर जि. नाशिक (दिंडोरी प्रणीत) व पुणे महानगरपालिका यांचे संयुक्त विद्यमाने विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये १६२ टन कचरा, ६४ टन गाळ स्वच्छ करण्यात आला.  झाडांची कटिंग करून २६ टन कचरा उचलण्यात आला आहे. या कामाकरिता १५ जेसीबी, ११ डीपी, २ बी.आर.सी., १५ हायवा, २४ जेटींग मशीन, ११ घंटागाडी, ७५ छोटा हत्ती, ८ कॉम्पॅक्टर, ३ बिनलिफ्टर, १० टिपर वापरण्यात आले. पुणे महानगरपालिका आणि पीएमआरडीएच्या शोध व बचाव पथकामार्फत पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या व्यक्तींचा शोधह घेतला. 

पूरग्रस्त भागातील स्वच्छताविषक कामे पूर्ण करण्यात आली असून रोगराई पसरू नये यासाठी जंतुनाशक फवारणीदेखील करण्यात आली. याकामाचे पर्यवेक्षण करण्यासाठी महापलिका आयुक्त डॉ. राजेन्द्र भोसले, अतिरिक्त महापालिका आयुक्त, महानगरपालिकेच्या विविध विभागांचे खातेप्रमुख यांच्या अंतर्गत , क्षेत्रिय व परिमंडळ स्तरावरील अधिकारी, कर्मचारी व सेवक कार्यरत आहेत. स्वच्छता विषयक व आपत्कालीन तक्रारीसाठी पुणे महानगरपालिकेतर्फे मध्यवर्ती नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून प्रत्येक क्षेत्रिय कार्यालायातदेखील नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले.  नागरिकांनी स्वच्छता विषयक मागणी तक्रारीकरिता ०२०-२५५०१२६९ व २५५०६८०० या  क्रमांकावर किंवा क्षेत्रीय कार्यालयाच्या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. भोसले यांच्याकडून करण्यात आले. 

कोल्हापूर महानगरपालिका :  शहरामध्ये सतत पडत असलेल्या पावसामुळे मुख्य रस्त्यावर खड्डे पडले. हे खड्डे तातडीने मुजविण्याचे आदेश आयुक्त  के.मंजूलक्ष्मी यांनी शहर अभियत्यांना दिले.  त्यानुसार चारही विभागीय कार्यालयांद्वारे मुरुम टाकून रस्ते पॅचवर्क करण्यात आले. विभागीय कार्यालय क्र.१ अंतर्गत देवकर पाणंद, पांडूरंग नगरी, तपोवन मेनरोड, यशवंत लॉन ते कळंबा रोड. विभागीय कार्यालय क्र.२ अंतर्गत जाऊळाचा गणपती ते नागोजी पाटणकर हायस्कूल, पाडळकर मार्केट गंगावेश. विभागीय कार्यालय क्र.३अंतर्गत एसएससी बोर्ड ते राजेंद्रनगर, महादेव मंदीर साठमारी चौक. विभागीय कार्यालय क्र.४ अंतर्गत ताराराणी चौक ते सी.बी.एस स्टँड, काँग्रेस कमिटी मेनरोड, दाभोळकर कॉर्नर ते शाहूपुरी पोलिस स्टेशन ते राजीव गांधी पुतळा मेनरोड परिसरात मुरुम टाकून पॅचवर्क करण्यात आले. 

पुराचे पाणी ओसरणा-या भागामध्ये व शहरातील मुख्य रस्त्यांवरील चेंबर लाईन महापालिकेच्यावतीने युध्दपातळीवर साफ सफाई करण्यात आल्या.  शहरामध्ये  ५०० पेक्षा जास्त मॅनहोल चेंबरची सफाई करण्यात आली. ही सफाई बृहन्मुंबई महापालिकेच्या सक्शन कम जेटींग कम वॉटर रिसायकल मशिनद्वारे करण्यात आली. या मशिनरीद्वारे मॅनहोल चेंबर साफ करून  ५० हजार लिटर पेक्षा जास्त राळ, गाळ व खरमाती चेंबरमधून काढण्यात आला. 

शहरातील बरेचसे रस्ते खराब झाले असल्याने जे रस्ते देखभाल दुरुस्ती कालावधीमध्ये आहेत ते रस्ते तातडीने संबंधीत ठेकेदारामार्फत दुरुस्त करुन घेण्याचे आदेश आयुक्त  के.मंजूलक्ष्मी यांनी दिले. या कामामध्ये ठेकेदाराकडून अथवा अभियंत्याकडून कोणताही हलगर्जीपणा झाल्यास संबंधीतांवर सक्त कारवाई करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. वॉरंन्टी कालावधीमधील तीन वर्षाच्या आतील जे ४०० रस्ते आहेत त्याची तपासणी करुन शासन निर्णय प्रमाणे ते संबंधीत ठेकेदारामार्फत तातडीने दुरुस्ती करुन घेऊन  सुस्थितीत ठेवण्याचे आदेश दिले.

पूर ओसणा-या भागामध्ये महापालिकेच्यावतीने युध्दपातळीवर स्वच्छता व औषध फवारणी करण्यात आली.  या स्वच्छता मोहिमेअंतर्गत पहिल्या टप्प्यात  ७ टन गाळ, फ्लोटींग मटेरियल व कचरा उठावण्यात आला. यामध्ये दसरा चौक ते व्हिनस कॉर्नर, जामदार क्लब, सुतारवाडा, पंचगंगा तालीम परिसर, व्हीनस कॉर्नर, लक्ष्मी नारायण मंदिर, जयंती नाला पंपीग स्टेशन, सीता कॉलनी, नाईक मळा, कारजगेमळा, रमणमळा मळा, जाधववाडी, कदमवाडी, कुंभार गल्ली, रिलायन्स मॉल, कामगार चाळ, दुधाळी गवत मंडई, सुतार वाडा, कलेक्टर ऑफिस, बापट कॅम्प, मोकाशी पॅसेज, चावरे पॅसेज, सिद्धार्थ नगर या परिसरातून हा कचरा उठाव करण्यात आला. यासाठी ५ जेसीबी, ४ आयवा डंपर, २ फायर फायटर, २ पाण्याचे टँकर, ८ ट्रॅक्टर ट्रॉली, औषध फवारणीचे ९ टॅक्टर, पाणी फवारणीचे २ टॅक्टर, धूर फवारणीची ९ मशिन व २० हॅन्ड पंप व महापालिकेच्या ३०० सफाई कर्मचा-यांनी मदत केली.

पिंपरी-चिंचवड महापालिका : अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड  महापालिकेद्वारे क्षेत्रीय कार्यालय स्तरावर आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित करण्यात आले. या क्षेत्रीय स्तरांवरच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षांमुळे त्या त्या भागातील पूर नियंत्रण परिस्थिती हाताळली गेली. शहरातील सुमारे २८०० पेक्षा अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी निवारा केंद्रांमध्ये तसेच महापालिका शाळांमध्ये हलविण्यात आले. या ठिकाणी भोजनासह आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून शहरात विविध ठिकाणी बचावकार्य सुरू होते. 

‘अ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील सम्राट चौक, लालटोपी नगर, भाटनगर, पिंपरी रिव्हर रोड, रामनगर, पत्राशेड लिंकरोड, बौद्धनगर आदी ठिकाणी बचावकार्य केले.  सुमारे ६५० नागरिकांना भाटनगर पिंपरी शाळा, आंबेडकर कॉलनी, मेवणी हॉल, निराधार हॉल पिंपरी येथे स्थलांतरित करण्यात आले.   ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील चिंचवड येथील तानाजी नगर , काळेवाडी येथील पवनानगर, रावेत येथील समीर लॉन्स, शिंदे वस्ती रस्ता, जाधव घाट आदी परिसरात बचावकार्य झाले.  सुमारे ३०० नागरिकांना काळेवाडी येथील महापालिकेच्या प्राथमिक शाळेत तसेच दत्तोबा काळे इंग्रजी मीडियम स्कूलमध्ये स्थलांतरित केले. ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत लक्ष्मीनगर गल्ली क्र. ३,४,५,६, पवार वस्ती,  पिंपळेगुरव, भुजबळ वस्ती, वाकड आदी परिसरात बचावकार्य पूर्ण केले. तिथल्या  ३१ नागरिकांना पिंपळेगुरव येथील नवीन मुला मुलींच्या शाळा नं. ५४ येथे तर १० नागरिकांना वाकड येथील आबाजी भूमकर शाळेत स्थलांतरित करण्यात आले.

‘ई’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत रामनगर, बोपखेल येथे २० ते २५ घरांमध्ये तीन ते चार फूट पाणी शिरले. या ठिकाणी बचावकार्यादरम्यान सुमारे १०० नागरिकांचे मनपाच्या बोपखेल येथील प्राथमिक शाळेत स्थलांतरण करण्यात आले. ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत घरकूल, श्रीराम कॉलनी, तळवडे, डिफेंस कॉलनी, पाटीलनगर, चिखली आदी परिसरात बचावकार्य केले. या ठिकाणांहून साचलेले पाणी तसेच घरांमध्ये शिरलेले पाणी काढण्यात आले. तसेच नदीकाठच्या नागरिकांना सूचना देऊन स्थलांतरित केले. ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत संजय गांधीनगर, आंबेडकरनगर, सुभाषनगर, पवनानगर, जगतापनगर, संजय गांधीनगर या ठिकाणी  बचावकार्यादरम्यान  सुमारे ३३० नागरिकांना कमला नेहरू शाळा, पिंपरी येथे, ४५० नागरिकांना रहाटणी शाळा येथे, ४० नागरिकांना थेरगाव शाळा येथे तर ५० नागरिकांना विवेकानंद बॉक्सिंग हॉल येथे स्थलांतरित करण्यात केले . ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत हिराबाई झोपडपट्टी, कासारवाडी, भारतनगर, फुगेवाडी, दापोडी परिसर मुळानगर, मधुबन सोसायटी, जुनी सांगवी इथल्या बचावकार्यात  १५० नागरिकांचे कासारवाडी उर्दू शाळेत, सुमारे ३०० नागरिकांचे मीनाताई ठाकरे महापालिका शाळेत, सुमारे १५० नागरिकांचे दापोडी येथील हुतात्मा भगतसिंग महापालिका शाळेत स्थलांतर तर सुमारे ३०० नागरिकांचे जुनी सांगवी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शाळेत स्थलांतर केले. अतिवृष्टी तसेच धरणातील पाणी सोडण्याच्या वेळी  शहरात विविध ठिकाणी कार्यरत असणाऱ्या नियंत्रण पथकांद्वारेही बचावकार्य सुरू होते.  कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी तत्काळ महापालिका नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, महापालिका व पोलीस प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन  पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. शेखर सिंह यांनी केले. 


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...