Saturday, September 14, 2024

पर्यावरणपूरक गणरंगी रंगल्या स्थानिकस्वराज्य संस्था... भाग-१

महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण महाराष्ट्राकडे गणेशोत्सव पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी साद घातली. तिला प्रतिसाद देत यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा यासाठी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था सज्ज झाल्या.  उत्सवाच्या आधी म्हणजे साधारण महिना दीड महिना आधीपासून राज्यातील स्थनिक स्वराज्य संस्था कामास लागल्या. स्थानिक स्वराज्यसंस्थांचे पर्यावरणपूरक गणेशोत्सव जागृतीचे काम उत्सवानंतरही सुरू आहे. 

संपूर्ण महाराष्ट्राचे सांस्कृतिक अभिसरण म्हणजे गणेशोत्सव. उत्सवकाळात संपूर्ण राज्य उत्साहाची उत्सवी झूल पांघरते. साफसफाई, सजावट आणि उत्सवकाळात अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीला उधाण येते. वातावरण सर्वत्र प्रसन्न होऊन जाते. या प्रसन्न वातावरणाला फक्त धार्मिक टच न राहता त्याचा सामाजिक खासकरून पर्यावरणपूरक टच अबाधीत राहण्यासाठी राज्यभरातील स्थानिक स्वराज्यसंस्था सज्ज झाल्या. स्थानिक स्वराज्यसंस्थांच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव जनजागृतीच्या कामाची सुरुवात खड्डेमुक्त रस्ते, मूर्तींसाठी शाडू माती उपलब्ध करून देणे आणि एक खिडकी कार्यक्रमाने झाली. 

एक खिडकी कार्यक्रम : सार्वजनीक ठिकाणी बाप्पांना विराजमान होण्यासाठी मंडप हवेत. यासाठी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी सार्वजनिक गणेश मंडळांना मंडप उभारण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकृत वेबसाईटवरून मंडळांनी मंडपस्थापनेच्या परवानग्या घेतल्या. ही मंडप बसविण्याची परवानगी  नवरात्रौत्सवापर्यंत कायम असणार आहे. महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार यंदाच्या गणेशोत्सवात गेल्या  १० वर्षांपासून शासन नियमांचे व कायद्याचे पालन करणाऱ्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडपासाठी १०० रुपये शुल्क आकारले. 


बृहन्मुंबई महानगरपालिका : 

गणेशोत्सवाच्या आगमन-विसर्जन काळात रस्त्यावरील खड्ड्यांवर तात्काळ कार्यवाहीच्या सूचना मुंबई महानगरपालिकेने संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या. पालिकेच्या रस्ते आणि वाहतूक विभागामार्फत खड्डेमुक्त रस्त्यांसाठी २२७ नागरी संस्था प्रभागांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे २२७ दुय्यम अभियंत्याची नेमणूक केली. दुय्यम अभियंता नेमून दिलेल्या विभागात रस्त्यांची पाहणी करून खड्डे आढळल्यास ते मास्टिकपद्धतीने बुजविले. दुय्यम अभियंत्यांबरोबरीने सहायक अभियंता, कार्यकारी अभियंता आणि उपप्रमुख अभियंता यांनी प्रत्यक्ष कार्यस्थळावर जाऊन रस्त्यांची पाहणी करण्याच्या सूचनाही मुंबई महानगर पालिकेने  दिल्या. यंदा खड्डे दुरुस्तीसाठी मास्टिक वापरले गेले . मुंबई महापालिकेच्या सर्व विभागांतील मास्टिक कूकर हे सुस्थितीत तसेच वापरासाठी उपलब्ध असावेत, याची खातरजमा विभागीय पातळीवर करावी अशा सूचनाही बृहन्मुंबई महापालिकेने संबंधित अभियंते तसेच अधिकाऱ्यांना दिल्या. सर्व कंत्राटदारांना मास्टिकचे उत्पादन व उपलब्धता, आवश्यक त्या प्रमाणात पुरवठा होईल, यासाठी विशेष लक्ष देण्याच्या सूचना केल्या. 

घरगुती गणेशोत्सवामध्ये पर्यावरणस्नेही गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचे प्रमाण हळूहळू वाढत आहे.अनेक गृहनिर्माण सोसायट्याही पर्यावरणस्नेही कागदी मूर्तीची प्रतिष्ठापना करू लागल्या आहेत, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी २० ते २२ टक्के मंडळे पर्यावरणस्नेही मूर्तीकडे वळली आहेत. परिणामी पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचा एक भाग म्हणून बृहन्मुंबई  महानगरपालिकेने गणपती मूर्तिकारांना शाडूची माती पुरविणे, काही ठिकाणी जागा उपलब्ध करून देणे, मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार करणे, पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने गणेश गौरव स्पर्धेचे आयोजन करणे असे कार्यक्रम आखले. २१७ मूर्तिकारांनी शाडू मातीसाठी मुंबई महानगर पालिकेकडे मागणी केली होती.  खास गणेशोत्सवासाठी पालिकेने   ५०० टन  शाडू माती मूर्तिकारांना मोफत पुरविली. 

गणेशोत्सवाच्या कालावधीत शहरातील सार्वजनिक स्वच्छता आणि सुस्थितीतील रस्ते या दोन्ही बाबींवर सर्वाधिक प्राधान्याने लक्ष परविण्याचे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिकेने संबंधित अधिकाऱ्यांना दिले. संपूर्ण उत्सव कालावधीत पालिकेच्या अधिकारी, कर्मचारी, कामगारांनी अधिक कार्यतत्पर आणि सजग रहावे. भाविक, नागरिक यांना कोणत्याही असुविधा होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही बृहन्मुंबई महानगरपालिकेने अधिकाऱ्यांना दिल्या. या सूचनेप्रमाणे अधिकाऱ्यांनी गणेशोत्सावाच्या पार्श्वभूमीवर  सर्वसामान्य नागरिक, स्वच्छता कर्मचारी, सुरक्षा रक्षक, जीवरक्षक यांच्याशी संवाद साधला.

गणेशोत्सव हा सर्वांचा सण आहे. हा सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा, असे आवाहनही महापालिकेने अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जनतेला केले. लोंबकळणाऱ्या तारा, विसर्जन स्थळावर कार्यरत स्वयंसेवक, पाणी, प्रसाधनगृह, वाहनतळ, जर्मन तराफे आदींची चोख व्यवस्था कारण्याचे आदेश पालिकेने अधिकाऱ्याना दिले आहेत. विसर्जन मार्गांवर वृक्षछाटणी केली. गणेशमूर्तींचे आगमन आणि विसर्जन मार्गांवर प्रशासन विशेष लक्ष दिले. पालिकेने धोकादायक पुलांची नावे यापूर्वी जाहीर केली. त्या ठिकाणी पोलिस यंत्रणेशी समन्वय साधून रहदारी सुरळीत ठेवावी, मुख्य रस्त्यांबरोबरच लहानसहान रस्ते, गल्लीबोळ, झोपडपट्टी आणि तत्सम वस्ती अशा सर्व ठिकाणी स्वच्छता राखावी, समुद्रकिनारे, चौपाट्यांवर अधिक स्वच्छता ठेवावी, कचरा संकलन आणि वाहतूक फेऱ्या वाढवाव्यात, असे निर्देशही पालिकेने अधिकाऱ्याना दिले. 

उत्सव कालावधीत शेकडो टन निर्माल्य निर्माण होते. या निर्माल्यापासून मुंबई महानगरपालिका खतनिर्मिती करणार आहे. या खतांवर महापालिकेची उद्याने बहरणार आहेत.  महापालिकेने  निर्माल्य गोळा करण्यासाठी यंदा तब्बल १५० कलश आणि ३५० वाहने सज्ज ठेवली. प्रत्येक वॉर्डाला निर्माल्य जमा करण्यासाठी  वाहने व कलश पुरविले.  भाविकांनी गणेशोत्सवात निर्माण होणारे निर्माल्य नैसर्गिक प्रवाह, नदी, समुद्र, खाडीमध्ये टाकू नये यासाठी पालिकेने कलशामध्येच टाकण्याचे आवाहन बृहन्मुंबई महापालिकेच्या घनकचरा विभागाने केले. 

दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई महानगरपालिकेने गणेशोत्सव काळात नागरिकांना उपयुक्त ठरणारी 'श्री गणेशोत्सव माहिती पुस्तिका - २०२४'  प्रकाशित केली.   पुस्तिकेत कृत्रिम तलावांच्या माहितीसह भरती व ओहोटीच्या वेळा जाहीर केल्या आहेत. त्याचप्रमाणे  शासनाच्या *'श्रीगणेश गौरव स्पर्धा' अर्जाच्या नमुन्याचाही या पुस्तिकेत समावेश करण्यात आला.  पुस्तिकेत धोकादायक पुलांची यादी महत्त्वाच्या नियंत्रण कक्षांचे संपर्क क्रमांक, विभागीय नियंत्रण कक्षांचे संपर्क क्रमांक, नैसर्गिक विसर्जन स्थळांचा विभागवार नकाशा, मूर्ती विसर्जन दिवशी समुद्राला असलेल्या भरती व ओहोटीच्या वेळा, लाटांची उंची इत्यादी माहितीचा समावेश आहे.  उत्सव काळात नागरिकांची गैरसोय न होण्यासाठी पुस्तिकेचे प्रकाशन केले आहे. पुस्तिकेच्या मुखपृष्ठावर असलेला 'क्यूआर कोड' स्कॅन करून  पुस्तिका पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्याची सुविधासुद्धा पालिकेने उपलब्ध करून दिलीय. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर देखील ही पुस्तिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

ठाणे  महानगरपालिका : 

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे आयोजन व्हावे यासाठी ठाणे महापालिकेतर्फे मार्च  २०२४पासून विविध उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. या अंतर्गत महापालिकेने यंदा ठाणे महापालिका क्षेत्रातील ६ मूर्तीकारांना निःशुल्क शाडूची माती उपलब्ध करून दिली. तसेच  ४ मूर्तीकारांना, महापालिकेने वर्तक  नगर प्रभाग समिती क्षेत्रात ३ आणि माजिवडा मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात १  जागा मूर्ती घडविण्यासाठी निशुल्क उपलब्ध करू दिल्या. 

रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी  ठाण महापालिकेने संबंधित अधिकाऱ्यांना सुचना दिल्या. त्याप्रमाणे अधिकाऱ्यांनी मास्टिक तंत्रज्ञानाचा वापर करीत  गणेशोत्सवापूर्वी 'खड्डेमुक्त ठाणे' ही मोहीम हाती घेतली. महापालिका क्षेत्रातील एकूण २१४ मंडळांनी मंडपांच्या परवानगीसाठी अर्ज केले. तर १२ मंडळांनी ऑफलाईन अवस्थेत अर्ज केले. 

ठाणे महापालिकेच्या किसननगर शाळेतील विद्यार्थ्यांना शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती घडवण्याचे प्रशिक्षण देणारी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. पर्यावरणस्नेही संस्कार शालेय जीवनात झाले, तर पुढील पिढी निसर्गाचे रक्षण अधिक उत्तम पद्धतीने करू शकेल,या विचारातून कार्यशाळेचे आयोजन  करण्यात आले होते.  विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभाग घेत शाडू मातीपासून गणेशाच्या मूर्ती साकारल्या. परब वाडी, कळवा, किसन नगर, बाळकूम, दिवा, वर्तक नगर, शीळ, मानपाडा, येऊर आणि टेंभीपाडा येथील महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचा या कार्यशाळेत सहभाग होता. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातांनी मूर्ती घडवलील्या. गणेशमूर्ती घडवण्याच्या कार्यशाळेत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना विद्यार्थ्यांच्या मनात रुजावी यासाठी , प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीमुळे होणारे जलप्रदूषण, पर्यावरणाची हानी याविषयीची सखोल माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.  शिवाय, पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याची प्रतिज्ञाही विद्यार्थ्यांनी घेतली.

मूर्ती विसर्जनासाठी ठाणे महापालिकेने एक अभिनव उपक्रम राबविला. 'गणेशमूर्ती विसर्जनासाठी महापालिका येणार घरापाशी' या उपक्रमात ठाणे महापालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर भर देतानाच विसर्जन व्यवस्था, कृत्रिम तलाव या व्यवस्थेला प्राधान्य दिले. गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी सहा फिरत्या विसर्जन केंद्रांची व्यवस्था केली.बांधकाम विभाग, पर्यावरण विभाग आणि घनकचरा विभाग यांनी विसर्जन व्यवस्थेचे नियोजन केले आहे. नऊ विसर्जन घाट,आणि ४९ ठिकाणी टाकी विसर्जन व्यवस्था आणि सहा फिरत्या विसर्जन व्यवस्थांचा समावेश होता. जेल तलाव, मढवी हाऊस, राममारुती रोड, महागिरी कोळीवाडा, टेंभीनाका, रिजन्सी हाइट्स आझादनगर, लोढा लक्झेरिया, कामगार हॉस्पिटल, किसन नगर बस स्टॉप, महिला चेक नाका, देवदया नगर- शिवाई नगर या दहा ठिकाणी मूर्ती स्वीकृती केंद्रांची सोय.  करण्यात आली होती.  ठाणे  महापालिकेचा हा विसर्जन उपक्रम ८ सप्टेंबर (दीड दिवस), १२ सप्टेंबर (पाच दिवस) सुरू होता; तर  १7 सप्टेंबर (१० दिवस) लाही सुरू असणारा आहे. 

नवीमुंबई महानगरपालिका :  नवीमुंबई महापालिकेने प्लास्टिकमुक्त गणेशोत्सवाचा संकल्प सोडला आहे. त्या सोबतच  विसर्जनाच्या दिवशी आपल्या घराच्या जवळ कृत्रिम तलावाचे स्थळ दर्शवणारी लिंक नागरिकांना देण्याचा निर्णय घेतला. बाप्पांच्या आगमनासाठी रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी नवीमुंबई महापालिका सज्ज झाली होती. ज्या मूर्तिकारांना मूर्ती घडविण्यासाठी शाडू मातीची गरज होती, त्यांनाही पालिकेने शाडू मातीचा पुरवठा केला. शाडूच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करून पर्यावरणशीलदृष्टीकोन जपणा-या नागरिकांचा ‘पर्यावरणमित्र’ प्रशस्तिपत्राने सन्मान केला. 

नमुंमपा क्षेत्रातील २२ नैसर्गिक विसर्जन स्थळांवर तराफ्यांची व्यवस्था करण्यात आली होती.  नागरिकांना आवश्यक सूचना देण्यासाठी ध्वनीक्षेपक यंत्रणा व व्यासपीठ उभारण्यात आले. सर्वच ठिकाणी पुरेशी विद्युत व्यवस्था आणि जनरेटर व्यवस्था ठेवण्यात आली होती. . मुख्य विसर्जन स्थळांवर नजिकच्या नागरी आरोग्य केंद्रामार्फत वैद्यकीय पथके तैनात ठेवण्यात आलेली असून विभाग कार्यालयांच्या वतीने विसर्जनस्थळी पुरेशा संख्येने स्वयंसेवक व लाईफगार्ड्स व्यवस्था सज्ज  होते.  नमुंमप अग्निशमन दलाचे जवान दक्षतेने कार्यरत होते. नमुंमपा क्षेत्रातील सर्व विसर्जन स्थळी ओल्या व सुक्या निर्माल्यासाठी स्वतंत्र कलश ठेवण्यात आलेले असून संकलित निर्माल्य स्वतंत्र वाहनांव्दारे प्रकल्प स्थळी नेण्यात येत आहे. त्याठिकाणी निर्माल्याचे पावित्र्य राखून त्याची विल्हेवाट लावण्याची सुयोग्य व्यवस्था करण्यात आलेली आहे. नवीमुंबई महानगरपालिका संकलित केलेल्या कचऱ्याचे वाटप बचतगटांना करीत त्यापासून अगरबत्ती तयार केल्या जातील. 

गणेशोत्सव हा पवित्र व मंगलमय वातावरणात साजरा होण्यासाठी पर्यावरणपूरक पध्दतीने साजरा होणे ही काळाची गरज आहे. यासाठी पर्यावरणस्नेही दृष्टीकोन विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याची गरज लक्षात घेत 'पर्यावरणपूरक गणेशोत्सव' हा उपक्रम नवीमुंबई महापालिकेद्वारे  शाळा स्तरावर घेण्यात आला. पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन ही आपली प्रत्येकाची जबाबदारी असुन आपले प्रत्येक सण पर्यावरणपूरक पध्दतीने साजरे करायला हवेत. ही संकल्पना विद्यार्थ्यांमध्ये रूजवण्याचा प्रभावी प्रयत्न या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आला. नवी मुंबई महापालिका शाळांतील इयत्ता ६ वी ते ८ वीच्या विद्यार्थांनी मोठ्या उत्साहाने यात सहभाग घेतला. गणेशोत्सवाच्या कालावधीत ध्वनी व जलप्रदूषण होते. हे प्रदूषण थांबवण्याकरिता पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही संकल्पना विद्यार्थांमध्ये रुजवण्यात आली व पर्यावरणाचे संतुलन राखण्याबाबत विद्यार्थ्यांना कृतीतून पर्यावरण मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी कल्पनाशक्तीचा वापर करून गणपतीच्या सुबक मूर्ता बनवल्या. पर्यावरण रक्षण करणेबाबत पर्यावरणपूरक गणपतीमूर्ती बनवून पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा सामाजिक संदेश विद्यार्थ्यांनी दिला. 

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या प्रचार-प्रसारासाठी नवीमुंबई महापालिकेने सोशल मीडियाच्या ऑनलाइन माध्यमांप्रमाणेच पारंपरिक मुद्रितमाध्यमांचाही उपयोग केला. महापालिकेकडून आरतीसंग्रह प्रकाशित करण्यात आला असून आरती संग्रहाच्या एका बाजूस पारंपरिक आरत्या प्रकाशित करण्यात आल्या.  दुसऱ्या बाजूस स्वच्छताविषयक कचरा वर्गीकरण, प्लास्टिक प्रतिबंध, निर्माल कलशांचा वापर, सजावटीत प्लास्टिक व थर्माकोलऐवजी कागद, कापड अशा पुनर्वापरयोग्य साहित्याचा उपयोग करावा. तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर टाळून शाडूच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करणे आणि नैसर्गिक जलस्रोतांचे रक्षण करीत कृत्रिम तलावातच विसर्जन करण्याचे संदेश प्रसारित करण्यात आलेत . नवी मुंबई महापालिकेने आरती संग्रहासारख्या पारंपरिक माध्यमाचा उपयोग करून स्वच्छता व पर्यावरणाचे संदेश प्रसारित करण्यासाठी प्रभावीपणे राबविलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे. 

कल्याण-डोंबिवली महापालिका :   पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा वास घेणाऱ्या  कल्याण-डोंबिवली महापालिकेने कृत्रिम तलावांमध्ये गणपती विसर्जन करणाऱ्या गणेशभक्तांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान केला.  गणपतीचे विसर्जन करण्यासाठी गणेशभक्तांनी नदी, खाडी, ओहोळ असे नैसर्गिक जलस्रोत प्रदूषित करू नयेत. अधिकाधिक भाविकांनी पालिकेने निर्माण केलेल्या कृत्रिम तलावांमध्ये गणपती विसर्जन करावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

यंदा कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील विविध भागांत एकूण ६३ कृत्रिम तलाव पालिकेने निर्माण केले आहेत. भाविकांना आपल्या घर परिसरात गणपती विसर्जन करण्याची संधी मिळावी. प्रत्येक भाविकाला दोन ते तीन किलोमीटर अंतर वाहन, पायी चालत जाऊन गणपती विसर्जन करण्यास लागू नये, वाहन कोंडीचा कोणालाही त्रास होऊ नये तसेच जलप्रदूषण होऊ नये, नैसर्गिक जलस्रोत स्वच्छ राहण्यासाठी कृत्रिम तलावांची पालिकेने सोय  केली आहे. 

निर्माल्यापासून खतनिर्मिती :

'विसर्जन आपल्या दारी' या शीर्षकाखाली निर्माल्य संकलनाचा हा उपक्रम राबविला जात आहे. कृत्रिम तलावांत एक निर्माल्य कलश ठेवण्यात आला आहे. तेथे भाविकांना निर्माल्य टाकण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. निर्माल्यापासून खत तयार करून ते कल्याण-डोंबिवली पालिकेचे बगिचे, उद्यानांमधील झाडांसाठी गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही वापरता येणार आहे.  

नाशिक : 

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नाशिक महापालिकेनेही पुढाकार घेतला.  नाशिक महापालिकेने  शंभर टन शाडू माती खरेदी केली असून  शहरातील सहाही विभागांमध्ये तिचे मोफत वितरण केले.  खास गणेशोत्सवासाठी नाशिक महापालिकेने मूर्तिकांरांना भेटून ४५ टन शाडू मातीचे वाटप केले. तसेच नागरिकांना स्वस्त दारात शाडू मातीच्या मूर्ती उपलब्ध करून दिल्या.  'मातीचा गणपती बसवून त्याचे विसर्जन घरीच करा. गणपतीच्या मातीत वृक्षारोपण करा. गोदावरीबरोबर तिच्या उपनद्याही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. नदी, तलाव, विहीर या प्रदूषित होणार नाही याची काळजी घ्या. अशा आशयाची जनजागृती नाशिक महापालिकेकडून नागरिकांमध्ये करण्यात आली.  पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या सजगतेसाठी नाशिक महापालिकेने कचरा गोळा करणाऱ्या घंटा गाड्यांचाही अतिशय प्रभावीपणे उपयोग केला. 

गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही नाशिक महापालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी 'मिशन विघ्नहर्ता' मोहीम महापालिकेने हाती घेतली. या मोहिमेचा एक भाग म्हणून पर्यावरणपूरक प्रोत्साहन देण्यासाठी पर्यावरणपूरक घरगुती आरास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. शाडू मातीपासून किंवा अन्य पर्यावरणपूरक साहित्यापासून तयार केलेल्या श्री मूर्तीची प्रतिष्ठापना, पर्यावरणपूरक गणेशोत्सव आरास व पर्यावरणपूरक श्री विसर्जन अशा तिन्ही प्रकारे घरगुती पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या नागरिकांसाठी या पर्यावरणपूरक स्पर्धेत भाग घेता आला.  स्पर्धेत  प्रथम येणाऱ्या स्पर्धकाला दहा हजार रुपयांचे पहिले बक्षीस दिले जाणार आहे. द्वितीय पाच हजार, तर तृतीय पारितोषिक तीन हजार रुपये पारितोषिकाने गौरव करण्यात आला. 

नाशिक महापालिकेने गेल्यावर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना राबविताना 'मूर्तिदान' मोहीम राबविली होती. नाशिक शहरात सुमारे दोन लाख पीओपी मूर्तींची प्रतिष्ठापना झाल्याचे मूर्तिदान मोहिमेमधून स्पष्ट झाले होते. यंदाही पीओपी मूर्तींची मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. पीओपीच्या गणेशमूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन केल्यामुळे वाढणारे प्रदूषण पाहता  महापालिकेने सहा विभागांमध्ये मूर्ती संकलन केंद्र व कृत्रिम तलावांची निर्मिती केली. तसेच 'पीओपी'च्या मूर्तींचे  घरगुती विसर्जनाच्या दृष्टिकोनामधून अमोनियम बायोकार्बोनेट पावडर ही महापालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयात 'विनामूल्य' उपलब्ध करून देण्यात आली. 

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नव्या मार्गदर्शक तत्त्वानुसार नदीचे प्रदूषण व नुकसान टाळण्यासाठी नाशिक महापालिकेने यंदा  'पीओपी'च्या मूर्तीवर बंदी जाहीर केली होती. मात्र, त्यानंतरही गणेश उत्सवासाठी शहरातील मूर्ती विक्रेते, उत्पादक व व्यापाऱ्यांनी 'पीओपी'पासून मूर्ती बनविल्या. ज्या मूर्ती विक्रेते, उत्पादक आणि व्यापाऱ्यांकडे  'पीओपी'च्या मूर्ती शिल्लक राहिल्या असतील  कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले. कृत्रिम तलावात विसर्जन केले नाही तर गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवसानंतर महापालिकेच्या विभागीय अधिकाऱ्यांमार्फत नियुक्त केलेल्या भरारी पथकामार्फत कारवाई केली जाईल, असा इशारा नाशिक महापालिकेने दिला. 

नागपूर : 

पर्यावरणपूरक गणेशोत्साबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी  नागपूर महापालिकेकडून विविध उपक्रम राबवण्यात आले.  त्या अंतर्गत यंदासुद्धा गणेशोत्सव काळात संकलित होणाऱ्या निर्माल्यापासून खत निर्मिती करण्याचा निर्णय नागपूर महापालिकेने घेतला. यंदा निर्माल्य संकलनाकरता महापालिकेकडून शहरात १२ रथ ठेवण्यात आले. या निर्माल्यरथांचे लोकार्पण नागपूर महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाद्वारे करण्यात आले. निर्माल्यरथांमध्ये फक्त आणि फक्त निर्माल्य टाकण्याचे आवाहन घनकचरा विभागाने भाविकांना केले आहे.  निर्माल्यरथांच्या व्यवस्थेसाठी टोल फ्री क्रमांक देखील जाहीर  केले. लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली आणि नेहरूनगर झोनसाठी  १८००२६७७९६६ हा टोल फ्री क्रमांक, तर गांधीबाग, सतरंजीपुरा, लकडगंज, आशीनगर आणि मंगळवारी या झोनसाठी १८००२६६२१०१ हा  टोल फ्री क्रमांक आहे. 

नागपूरमध्ये विदर्भासह मध्य भारतातून अनेक ठिकाणांहून वैद्यकीय उपचार घ्यायला रुग्ण येत असतात. अनेक रुग्णांना मोठ्या प्रमाणात रक्ताची आवश्यकता असते. त्यानुषंगाने पर्यावरणपूरक गणेशोत्सवासोबतच सामाजिक कार्य म्हणून रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचा उपक्रम नागपूर महापालिकेने राबविला.  शहरात जाणवणारा रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी नागपूर महापालिकेने उचललेले सकारात्मक पाऊल कौतुकास्पद आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून रक्तदानाचा उपक्रम राबविण्यासाठीच्या या  पुढाकारातून नागपूर महापालिकेकडून चार हजार युनिट रक्त संकलन करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले. 

महापालिकेच्या रक्तदान अभियानाचा शुभारंभ  विदर्भ इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेडचा (व्हीआयपीएल) राजा या गणेशोत्सव मंडळापासून झाली.  या मंडळात १०० नागरिकांनी रक्तदान केले. इतर मंडळांना रक्तदान शिबिराकरिता महापालिकेतर्फे आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. एक सकारात्मक पाऊल म्हणून या शिबिरांत मोठ्या प्रमाणात रक्तदान करा, असे आवाहन नागपूर महापालिकेने केले. 

पुणे  महानगरपालिका :  नागरिकांना पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे आवाहन करणाऱ्या पुणे महानगरपालिकेतर्फे विसर्जनाची अतिशय चोख व्यवस्था करण्यात आली . महापालिकेद्वारे  गणेश विसर्जनासाठी १५ क्षेत्रिय कार्यालयांअंतर्गत एकूण ४२ बांधीव हौद, एकूण २६५ ठिकाणी ठेवलेल्या ५६८ लोखंडी टाक्यांची सुविधा उपलब्ध करण्यात आली.  

नागरिकांनी नदी, तलाव अशा नैसर्गिक स्त्रोतात मूर्तीचे विसर्जन न करता अधिकाधिक प्रमाणात मूर्ती दान कराव्यात, यासाठी महापालिकेतर्फे  क्षेत्रीय कार्यालयामार्फत जनजागृती करण्यात आली.  क्षेत्रिय कार्यालयांअंतर्गत सर्व कृत्रिम हौद व मूर्ती संकलनाच्या ठिकाणी निर्माल्य संकलनाची व्यवस्था करण्यात आली.  यासाठी २५६ ठिकाणी निर्माल्य कलश-कंटेनर ठेवण्यात आले आहेत.

पुनरावर्तन उपक्रम:

गणेशोत्सव कालावधीत पुणे महानगरपालिका व विविध स्वयंसेवी संस्थांमार्फत पुनरावर्तन उपक्रम राबविण्यात आला.  या उपक्रमात गणेश विसर्जनानंतरची शाडूची माती संकलित करून त्याचा पुनर्वापर केला जाणार आहे. या पुनरावर्तन उपक्रमाबाबतची सविस्तर माहिती व शाडू माती संकलनाच्या केंद्राविषयीची सविस्तर माहिती www.punaravartan.org या वेबसाईटवर पुणे महापालिकेद्वारे उपलब्ध करून देण्यात आली. 

निर्माल्याचे होणार खत:

निर्माल्यामध्ये केवळ हार, पाने, फुले एवढ्याच गोष्टीचा समावेश होतो. त्यामध्ये प्लास्टिक, थर्माकोल, कापडी वस्तू किंवा तसबिरी, मूर्ती किंवा मूर्तीचे अवशेष तसेच कुठलेही खाद्यपदार्थ न टाकण्याचे पुणे महापालिकेने आवाहन केले. निर्माल्य एकत्र करून त्याचे खत बनवून शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. अधिकाधिक नागरिकांनी मूर्तिदानास  प्रोत्साहन देण्यासाठी  विसर्जन हौदाच्या ठिकाणी खतांच्या पिशव्या पुणे महापालिकेने उपलब्ध केल्या. 

मोफत सुलभ शौचालयांची सोय :  पुण्याला गणेशोत्सवाची निराळी परंपरा आहे. पुणे शहरातील मंडळांचे देखावे आणि मानाचे गणपती चे दर्शन घेण्यासाठी शहरासह देशभरातून गणेश भक्तांचा ओढा वाढतो.  शेवटच्या पाच दिवसांमध्ये लाखोंच्या संख्येने भक्त येतात. या गर्दीत महिलांची कुचंबणा न होण्यासाठी  महापालिकेने विशेष  काळजी घेतली असून ठिकठिकाणी फिरते शौचालयांची व्यवस्था केली. तर शहराच्या मध्यवर्ती भागातील सुलभ शौचालये मोफत उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला. 

पुणे महापालिकेकडून पालखी सोहळा तसेच सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये फिरत्या शौचालयांची व्यवस्था केली जाते. त्यानुसार महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून नियोजन केले जाते. पालखी सोहळ्यामध्ये लाखो संख्येने वारकरी येत असतात. त्यांची योग्य प्रकारे काळजी महापालिकेककडून घेतली जाते. तसेच मेडिकल कॅम्प लावले जातात. त्याच धर्तीवर आता गणेशोत्सवात महापालिकेने नियोजन  केले आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून ते पाचव्या दिवसापर्यंत दररोज दोनशे फिरत्या  शौचालयांची व्यवस्था केली. गणेशोत्सवात  पाचव्या दिवसानंतर फिरत्या  शौचालयांच्या संख्येत गरजेनुसार वाढ केली. तसेच ही शौचालये स्वच्छ ठेवण्याची देखील काळजी घेण्यात आली असून त्यासाठी सेवक तैनात करण्यात आले. 

सुलभ शौचालयांसह खासगी हॉटेल चालकांना देखील त्यांची स्वच्छतागृहेसुध्दा नागरिकांसाठी खुली ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे खाद्य पदार्थांची खरेदी करावीच अशी सक्ती त्यांना करता येणार नाही. नागरिकांची संख्या बघता इतरांनीदेखील सहाकार्य करावे असे आवाहन पुणे महापालिकेने केले. 

आळंदी नगरपरिषद:  तीर्थक्षेत्रासाठी लोकप्रिय असणाऱ्या आळंदीने शहरानेही यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा वसा घेतला. याचे श्रेय आळंदी नगरपरिषदेचे आहे.आळंदी नगर परिषदमार्फत गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर पुणे - आळंदी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आले.  यंदाचा गणेश उत्सव हा पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा, यासाठी आळंदी नगर परिषदेने पुढाकार घेतला असून, 'माझी वसुंधरा अभियान ४.० अभियानांतर्गत कृत्रिम जलस्त्रोतांची निर्मिती केली.  गणेशोत्सवाच्या कालावधीत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, विषारी रंग, प्लास्टिक आणि थर्मोकोलचीसजावट इत्यादी गोष्टींचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो.हे सर्व घटक पाण्यात न विरघळणारे आणि  विषारी आहेत.  नैसर्गिक जलस्रोतांमध्ये यांचे विसर्जन केल्यानंतर त्यांचे अवशेष पाण्यात न विरघळता तसेच राहतात. परिणामी जलप्रदूषण होऊन पाण्यातील अनेक जिवांच्या अस्तित्वाला धोका निर्माणहोतो. त्यामुळे आळंदी नगर परिषद मागील काही वर्षांपासून 'मूर्तिदान' ही संकल्पना अत्यंत प्रभावीपणे राबवित असून, आळंदीकरांचा या उपक्रमाला  यंदाही पाठिंबा मिळाला.  नगरपरिषदेमार्फत केलेल्या मूर्ती संकलन केंद्रावर विधिवत आरती करून गणेश मूर्ती व्यवस्थितरीत्या जमा केल्या.  या मूर्ती पुढे पुनर्वापरासाठी सेवाभावी संस्थांकडे सुपूर्द करण्यात आल्या. या संस्थांमार्फत सर्व गणेश मूर्तीचे पावित्र्य जपत त्यांचा पुनर्वापर केला जातो. परिणामी  जलस्त्रोतांचे प्रदूषण रोखले जाऊन पर्यावरण संवर्धनास हातभार लागतो.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x  

No comments:

Post a Comment

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...