Wednesday, August 28, 2024

महापालिकेचा जाहिरात मार्गदर्शक मसुदा - २०२४

मुंबई महानगरपालिकेने  जाहिरात मार्गदर्शक मसुदा - २०२४  तयार केलेला आहे. आदर्श निवडणूक आचारसंहितेचे निकष मुंबई महापालिकेच्या जाहिरात मार्गदर्शक धोरणाच्या मसुद्यात (२०२४) समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यानुसार- 

  • सार्वजनिक ठिकाणांचा वापर प्रचाराचे बॅनर, फलक, घोषणा यासाठी करता येणार नाहीच. 
  • खासगी निवासस्थानी उमेदवाराचे जास्तीत जास्त तीन झेंडे लावता येतील. 
  • कुणाला एकापेक्षा अधिक पक्ष किंवा उमेदवाराचे झेंडे लावायचे असल्यास अशा प्रत्येक पक्षाचा एकच झेंडा लावता येईल.
  • खासगी वाहनावर जास्तीत जास्त एक फूट बाय दीड फूट आकाराचा एकच झेंडा लावता येईल. त्याची काठी तीन फुटांपेक्षा जास्त उंच नसेल. 
  • वाहनावर योग्य आकाराचे एक किंवा दोन लहान स्टीकर मात्र लावता येतील.
  • महत्त्वाचे म्हणजे रोड शो करताना वाहनावर कोणतेही बॅनर लावता येणार नाही. 
  • जास्तीत जास्त सहा फूट बाय चार फूट आकाराचे एकच बॅनर हातात पकडून नेता येईल. 
  • खासगी जागा मालकाने किंवा ताबेदाराने स्वेच्छेने परवानगी दिल्याशिवाय तेथे झेंडा-बॅनर लावता येणार नाही.


बॅनर, फलक किंवा ध्वज आदी अस्थायी  स्वरुपाच्या जाहिराती पालिकेच्या  सक्षम प्राधिकरणाच्या परवानगीविना लावल्यास पालिका कायदा तसेच राज्याच्या  मालमत्तेचे रस्त्यावरील इतर वाहनांना उपद्रव विद्रुपीकरण प्रतिबंधक कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येईल. 

प्रचार कार्यालयाच्या जागेसाठी नियम 

कार्यालयाची जागा अतिक्रमण करून उभारलेल्या मालमत्तेवर नसावी. तसेच कोणत्याही धार्मिक ठिकाणीही नसावी. रुग्णालये-शैक्षणिक संस्थांच्या जवळही प्रचार कार्यालय  नसावे. सध्या अस्तिवात असलेल्या मतदान केंद्रापासून दोनशे मीटरच्या आतसुद्धा प्रचार कार्यालय थाटता येणार नाही. प्रचार कार्यालयात पक्षाचे चिन्ह, फोटो असलेला एकच बॅनर, झेंडा लावता येईल. बॅनरचा आकार चार फुटाच्या आत असावा.

लोकप्रतिनिधींच्या छायाचित्रांनाही मनाई असणार 

एखाद्या योजना प्रकल्पाची माहिती देणाऱ्या फलकावर प्रकल्पाच्या तपशीलासह संबंधित खासदार, आमदार, नगरसेवकाचे नाव तसेच क्षेत्र यांचा उल्लेख करता येईल. मात्र या लोकप्रतिनिधींची छायाचित्रे त्यावर लावता येणार नाहीत.

गणपती, नवरात्र मंडळांसाठी विशेष नियमावली 

केवळ यंदाच्या धार्मिक उत्सवादरम्यान मंडपांमध्ये व्यापारी, राजकीय, सामाजिक जाहिरातींचे बॅनर, फलक, ध्वज लावण्यास परवानगी असेल. त्या-त्या वेळी पालिका त्यासंबंधी परिपत्रक काढणार आहे.

जाहिरात फलकांची  नियमावली 

घाटकोपरची दुर्घटना झाल्यानंतर पालिका प्रशासनाने सक्षम जाहिरात फलक धोरण तयार करण्यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समिती स्थापन केली होती. त्यामध्ये सह पोलीस आयुक्त महानगरपालिकेचे उप आयुक्त (विशेष), अनुज्ञापन अधीक्षक, (वाहतूक), डिजिटल जाहिराती रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत बंद ठेवाव्यात. पर्यावरणविषयक नामांकित तज्ज्ञ संस्थेचे एक प्रतिनिधी, आयआयटी मुंबईचे दोन तज्ज्ञ सदस्य,

आयआयटी मुंबईच्या औद्योगिक संरेखन विभागाचे एक तज्ज्ञ प्रतिनिधी यांचा समावेश होता. या समितीच्या सूचना अंतर्भूत करून सर्वसमावेशक धोरण जाहीर करण्यात आले आहे. महापालिकेने १६ वर्षे जुने जाहिरात फलक धोरण बदलून नवीन धोरण तयार केले आहे.  

या नव्या धोरणात डिजिटल जाहिरात फलकांबाबतच्या नियमावलीचाही समावेश करण्यात आला आहे. दुभाजक, पदपथ, इमारतीच्या गच्चीवर, संरक्षक भिंत, रस्त्यावरील कमानी, यावर जाहिरात फलक लावण्यास मनाई करण्यात आलीआहे. हा मसुदा मंजूर झाल्यानंतर नवीन धोरण १० वर्षांसाठी लागू करण्यात येणार आहे. जाहिरात फलकांच्या नव्या धोरणावर ऑगस्ट महिन्यापर्यंत  हरकती व सूचना नोंदवता येणार आहेत.

असे आहेत नियम

■ दोन होर्डिंगच्या मध्ये किमान ७० मीटरचे अंतर राखले जाईल. बॅक टू बॅक तसेच व्ही आकाराच्या फलकांचा त्यासाठी अपवाद केला जाईल. मुंबईत पूर्व द्रुतगती महामार्ग, पश्चिम द्रुतगती महामार्गावर, तसेच पदपथ, मार्गिका, वाहतूक बेटे येथे होर्डिंगला परवानगी दिली जाणार नाही.

■ सक्तीने ठवलेल्या खुल्या जागांवर, जसे की खेळाची मैदाने, मनोरंजन मैदाने, उद्याने येथे होर्डिंगला परवानगी दिली जाणार नाही. अशी जागा सक्तीची नसल्याचे प्रमाणित केल्यास परवानगी मिळेल.

■ वाहन तळ, सार्वजनिक खेळाची मैदाने, वारसा इमारती आदी ठिकाणी होर्डिंगला परवानगी मिळणार नाही.

■ जमिनीपासून १०० मीटर उंचीपेक्षा अधिक होर्डिंगला परवानगी मिळणार नाही.

■ महनीय व्यक्तींच्या पुतळ्यापासून ५० मीटर अंतरात होर्डिंगला परवानगी नसेल.

■ जाहिरात फलकाची लांबी, रुंदी जास्तीत जास्त ४० फूट असावी. 

■ काचेच्या तावदानावर ५० टक्क्यांपेक्षा जास्त भाग व्यापला जाऊ नये. 

■रस्त्यांवरील कमानी, रस्ते दुभाजक, पदपथ, वाहतूक बेट, उच्चदाबाच्या विद्युत वाहिन्यांखाली जाहिराती लावता येणार नाही.

■ डिजिटल जाहिरातींची प्रकाशमानता कमी असावी.

नव्या जाहिरात फलक धोरणाबाबत संबंधितांनी आपल्या लेखी हरकती व सूचना पालिका मुख्यालयात तळमजल्यावरील उपायुक्त विशेष यांच्या कार्यालयात करावा.  तसेच  दादर पश्चिमेकडील सेनापती बापट मार्गावरील सिवेज ऑपरेशन इमारतीतील परवाना अधीक्षकांच्या कार्यालयातही लेखी हरकती सादर करण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने कळवले आहे. sl.licence@mcgm.gov. in किंवा hc01. icence@mcgm. gov.in या ई-मेल पत्त्यावरही हरकती पाठवता येतील.

मुंबईप्रमाणे  नवी मुंबई महानगरपालिकेनेही शहरात अनधिकृत होर्डिंगविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने निश्चित करून दिलेल्या १२६ ठिकाणीच आता होर्डिंग लावता येणार आहेत. अनधिकृतपणे जाहिरातबाजी केल्यास दंडात्मक व गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. 

नवी मुंबई महानगरपालिकेने केलेले आवाहन

  • शहरात कुठेही बॅनर होडिंग लावून शहराच्या सौंदर्यास बाधा पोहोचवू नका. 
  • मनपाने निश्चित दिलेल्या १२६ ठिकाणीच बॅनर, होर्डिंग लावण्यात यावेत.
  • होर्डिंग लावण्यासाठी मनपाची परवानगी घ्यावी व शुल्क भरावे, होर्डिंगवर परवानगीचा स्टीकर लावावा.
  • कोणत्याही स्थितीमध्ये ४ विनापरवाना होडिंग, बॅनर लावल्यास दंडात्मक कारवाई होणार, गुन्हेही दाखल केले जातील. 

व्हॉट्सॲपवर छायाचित्र पाठवा

नागरिकांनी शहरात विनापरवाना होडिंग बॅनर निदर्शनास आल्यास तत्काळ त्याचे छायाचित्र काढून ८४२२९५५९१२ या क्रमांकावर व्हॉट्सअॅप करावे. छायाचित्र गुगल लोकेशनसह असावे, असे आवाहन केले आहे.

मराठी पाटी न लावणाऱ्या दुकानदारांवर मुंबई महापालिकेकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. २८ नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२४ या कालावधीत केलेल्या कारवाईत ९४ हजार ९०३ दुकानदारांनी अधिनियमानुसार मराठी पाट्या प्रदर्शित न केल्याचे निदर्शनास आले होते. यातील ९१ हजार ५१५ दुकानदारांनी मराठी पाट्या लावल्या.  मराठी पाट्या न लावणाऱ्या उर्वरित दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या दंडातून १ कोटी ३५ लाख ६० हजार ५०० रुपये दंड वसूल केला आहे.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x  

No comments:

Post a Comment

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...