Monday, January 15, 2024

महाराष्ट्राच्या विकासाची शान ' अटल सेतू'



विनाअडथळा प्रवासासोबतच नेत्रसुखद अनुभव 

 
मुं
बई ट्रान्सहार्बर लिंकचे (Mumbai Trans Harbour Link) उद्घाटन मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत  पार पाडले आणि सलग दोन दिवस हा पूल पाहण्यास उत्सुक असणाऱ्या नागरिकांनी या प्रवासाचा आनंद लुटला. कामानिमित्त प्रवास अनेक नागरिकांनी केला असला तरी केवळ आदर्श अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा अनुभव प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नागरिकांनी या पुलाला विशेष भेट दिली. महाराष्ट्राच्या विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली.

नवी मुंबईत राहणाऱ्या आश्विनी पारकर सांगतात, मुंबई ट्रान्सहार्बर लिंक नवी मुंबईत आणि मुंबईत राहणाऱ्या नागरिकांसाठी प्रवासाचा देखणा अनुभव आहे. विनाअडथळा प्रवास आहेच पण लांब पल्ल्याचे अंतर काही मिनिटावर आणतानाच या प्रवासाचे विहंगम दृश्य भारावणारे आहे, रात्रीच्या वेळी या पुलावरून प्रवास करणे नेत्रसुखद अनुभवच.. 

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अटल सेतू खुला झाल्याने मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील अंतर आता दोन तासांवरून २०  मिनिटांवर आले आहे. शिवडीहून न्हावा शेवा अवघ्या काही मिनिटात गाठणे सुलभ होणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळालाआहे. मालवाहतूकही जलद होणार असल्याने उद्योगधंदे, व्यापाऱ्यांचाही फायदा होणार आहे. त्यामुळे हा अटल सेतू राज्याच्या विकासात मोठी भूमिका बजावणार आहे.  मुंबईला रायगडमधल्या उरण तालुक्याशी जोडण्यासाठी उभारण्यात आलेला शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतू नागरिकांसाठी  विशेष आकर्षण ठरत आहे.  या मार्गावर एकेरी प्रवासासाठी अडीचशे रुपये टोल आकारण्यात येणार आहे.  साधारण २०१८ साली प्रत्यक्ष कामास सुरुवात झालेल्या मुंबई ट्रान्सहार्बर लिंक मार्गाने महाराष्ट्राच्या विकासाला एक नवी दिशा दिली आहे. 

कसा आहे पूल? 

  • MTHL पुलाची एकूण लांबी 21.8 किमी आहे ज्यामध्ये समुद्रावरील लांबी 16.50 किमी आहे आणि जमिनीवरील भाग 5.5 किमी आहे.
  • या सी लिंकमध्ये दोन्ही बाजूला 6-लेन (3+3 लेन) महामार्ग+1 आपत्कालीन लेन आहे.
  • मुंबईतील शिवडी, शिवाजी-नगर आणि जासई, चिर्ले येथे इंटरचेंज आहेत.
  •  90 मी ते 180 मीटर लांबीचे 7 ओएसडी (ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक) स्पॅन आहेत जे भारतात प्रथमच पुलावर वापरले गेले आहेत. 
  •  या पुलावरून प्रवास करण्यासाठी 250 रुपये टोल निश्चित करण्यात आला आहे. तर रिटर्न प्रवासासाठी 375 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. 
  •  मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पुलामुळे प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटी बंदर, मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आणि मुंबई-गोवा हायवेशी वेगवान दळवळण शक्य होईल. 
  •  मुंबई-नवी मुंबईवरून पनवेल, अलिबाग, पुणे आणि गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास या मार्गामुळे सोपा होणार आहे.  इंधनाची बचत होईल. वाहतूक कोंडी कमी होईल. तसेच नवीन गुंतवणूक होऊन रोजगार वाढेल. 
  • ओपन रोड टोलिंग असलेला हा भारतातला पहिलाच रस्ता आहे. 

कसे आहेत अटल सेतूवरील टोल दर  


वाहन प्रकार

एकेरी प्रवास

परतीचा प्रवास

दैनंदिन पास

मासिक पास

कार

250 रुपये

375 रुपये

625 रुपये

12,500 रुपये

एलसीव्ही/ मिनी बस

400 रुपये

600 रुपये

1000 रुपये

20,000 रुपये

बस/ 2 एक्सल ट्रक

830 रुपये

1245 रुपये

2075 रुपये

41, 500 रुपये

एमएव्ही 3 एक्सल वाहन

905 रुपये

1360 रुपये

2265 रुपये

45, 250 रुपये

एमएव्ही 4 ते 6 एक्सल

1300 रुपये

1950 रुपये

3250 रुपये

65, 000 रुपये

मल्टीएक्सल वाहने

1580 रुपये

2370 रुपये

3950 रुपये

79, 000 रुपये


विशेष म्हणजे, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग हा चिर्ले येथून अवघ्या आठ किमी अंतरावर आहे. या नियोजनानुसार, मुंबई ट्रान्सहार्बर लिंक रोडवरून निघालेले वाहन सर्वप्रथम विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉरवर येईल. तिथून विरारच्या दिशेने प्रवास सुरू करू शकेल. पुढे प्रस्तावित वसई-मीरा भाईंदर उन्नत मार्गावरून, प्रस्तावित वर्सोवा मीरा-भाईंदर सागरी पूल आणि सध्या काम सुरू असलेला वांद्रे-वर्सोवा सेतूवर येईल. पुढे वांद्रे वरळी सीलिंकवरून पुन्हा वरळी-शिवडी कनेक्टरमार्गे मुंबई ट्रान्सहार्बर लिंक रोडला येऊन आपली मुंबईभोवतीची प्रदक्षिणा पूर्ण करू शकणार आहे. हे सर्व मार्ग सिग्नलविरहित असल्याने ही प्रदक्षिणादेखील सिग्नलविरहित रिंगरूटच्या रूपाने २०३० सालापर्यत मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल आणि महाराष्ट्रातील हा विकास खऱ्या अर्थाने इतर राज्यांसाठीहि आदर्श ठरेल, यात शंका नाही.



 Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

No comments:

Post a Comment

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...