Sunday, December 31, 2023

निरोप सरत्या वर्षाला, आरंभ नव्या विकासाचा


२०२३
हे वर्ष आज संपलं. उद्याची पहाट २०२४ वर्षाच्या विकासाची नवी पहाट ठरेल. सरत्या वर्षाला निरोप देत असताना महाराष्ट्रातील या वर्षाचा आढावा घेतला तर अनेक लोकोपयोगी नवीन बदल महाराष्ट्राने पाहिले. मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून शहर विकासाच्या दृष्टीने आणि लोकहिताच्या उद्देशाने विविध विकास प्रकल्पाना गती प्राप्त झाली आणि महाराष्ट्रातील सर्व सामान्य नागरिकांच्या हिताचा विकास होताना पाहायला मिळाला. गावोगावी विकास होत आहे, पण मुख्य शहरात राहणाऱ्या नागरिकांसाठी अनेक नाविन्यपूर्ण बदल घडताना दिसले. नगर विकास विभाग, शासन आणि महापालिका यांच्या समानव्यातून आणि नियोजनातून शहरं बदलताना दिसली. आरोग्य, शिक्षण, बांधकाम विकास प्रकल्प, पुनर्विकास,  शहर स्वच्छता, दळणवळण सुविधा  अशा अनेक क्षेत्रात हा बदल दिसून आला.

सर्वसामान्यांसाठी केलेल्या या विकासाचा आढावा घेऊयात आणि नवीन वर्षात नव्या विकासासाठी सज्ज होऊयात..

मुंबईप्रमाणे आता ठाणे जिल्ह्यात विविध विकास कामे सुरु झाली आहेत. कल्याणमध्ये ७०० कोटी रुपये खर्च करुन नवीन उन्नत मार्ग करण्यात येणार आहे. फक्त अडीच किलोमीटरच्या हा मार्ग आहे. या मार्गामुळे ४० मिनिटांचा प्रवास चार मिनिटांत होणार आहे.  या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. एका अर्थाने ठाणे जिल्ह्यातील प्रवाशांसाठी ही एक प्रकारची  गोड बातमी आहे.  मेट्रो, रेल्वे आणि रस्ते अशा तीन पद्धतीने   दळणवळ  आणि वाहतुकीची कोंडी सोडविण्याची  कामे  कल्याणमध्ये सुरू झाल्यामुळे त्याचा फायदा अनेक शहरांना होणार आहे. उन्नत मार्गाचा फायदा हा कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या शहरांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.  शहाडपासून कल्याणपर्यंत येण्यासाठी सध्या ४० मिनिटे लागतात. परंतु हा मार्ग पूर्ण झाल्यावर चार मिनिटांचा हा प्रवास असणार आहे. कल्याणमध्ये मेट्रो सुरू करण्यासाठी खटपट सुरू आहे. सुरु आहे. मेट्रो १२ चा डीपीआर मंजूर झाला आहे. सुमारे साडेपाच हजार कोटींचा हा प्रकल्प आहे. कल्याणमध्ये मेट्रोचा  एकूण २० किलोमीटरचा मार्ग असणार आहे. या मार्गाद्वारे पाच शहरे एकमेकांना जोडली जाणार आहे. त्यामुळे कल्याण, भिवंडी, ठाणे, नवी मुंबई, मुंबईसाठी नवीन मार्ग मिळणार असून  मुंबई आणि कल्याणला जोडणारा मिसिंग लिंक सुरू होणार आहे.

केंद्र सरकारकडून देशातील मोठ्या शहरांसाठी शहरी पूर जोखीम व्यवस्थापन योजना (अर्बन फ्लड रिस्क मॅनेजमेंट) हाती घेण्यात आलीआहे. या योजनेअंतर्गत २०२१-२०२६ या पाच वर्षांच्या कालावधीत शहरांना विशेष सहायता निधी दिला जाणार आहे. चौदाव्या आणि पंधराव्या वित्त आयोगाकडून या निधीचे वितरण होणार आहे. या निधीचा लाभ पुणे शहराला मिळणार आहे. पुण्याबरोबरच मुंबई, चेन्नई, कोलकता, बंगळूर, हैदराबाद,अहमदाबाद या सात प्रमुख शहरांसाठी २५०० कोटी रुपयांची शहरी पूर जोखीम व्यवस्थापन योजना आहे. शहरात या माध्यमातून २८६ कोटी रुपयांची कामे प्रस्तावित केली आहेत. केंद्र सरकारकडून १५ व्या वित्त आयोगातून २५० कोटी रुपये देणार आहे. केंद्र सरकारनेही या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. ही कामे पुढील पाच वर्षांत केली जाणार आहेत. त्यामुळे पुणे महानगर पालिकेद्वारे पावसाळ्यात शहरात येणारे पूर रोखण्यासाठी २१३ कोटींची कामे करण्यात येणार असून त्यासाठी चार स्वतंत्र निविदा काढण्यात येणारआहेत. पूरनियंत्रणासाठी एकूण २८३ कोटींची कामे प्रस्तावित असून त्यातील पहिल्या चार टप्प्यात २१३ कोटींची कामे करण्यात येणार आहेत.

 'अर्बन फ्लड रिस्क मॅनेजमेंट अंतर्गत पुणे शहरात पूर नियंत्रणासाठी करण्यात येणारी कामे पुढीलप्रमाणे - 

  • -  नदी, नाल्यांना सेंसर बसविणे
  • - धोकादायक ठिकाणी कॅमेरे बसविणे
  • - पावसाचे पाणी टेकड्यांवर जिरविण्यासाठी चर खोदणे, 
  • - कल्व्हर्ट बांधणे
  • -  नाल्यांचे ड्रोनद्वारे मॅपिंग करणे
  • - पावसाळी गटारांची क्षमता वाढविणे
  • - सांडपाणी व्यवस्थापन करणे
  • - नाल्यांवर गॅबियन वॉल उभारणे 

अशी कामे करण्यासाठी चार निविदा मलःनिसारण विभागातर्फे काढल्या जाणार आहेत. तर नियंत्रण कक्ष उभारण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे निविदा काढण्यात येणार आहे. हे कामे करण्यासाठी  पहिल्या टप्प्यात १४७ कोटी, दुसऱ्या टप्प्यात २३ कोटी, तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात प्रत्येकी २१-२१ कोटींची कामे करण्यास मंजुरी देण्यात आली.

वसई विरारचा पाणी प्रश्न सुटणार 

वसई-विरारकरांचा पाणी प्रश्न सोडविणाऱ्या सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत वसई-विरारला प्रतिदिन १८५ दशलक्ष लिटर पाणी सोडण्यास अखेर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सुरुवात केली आहे. वसई-विरार आणि मीरा-भाईंदर पालिका क्षेत्रातील पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर आहे. हा प्रश्न  सोडविण्यासाठी एमएमआरडीएने सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्प हाती घेतला. १३२५.७८ कोटी रुपये खर्चाच्या सूर्या प्रादेशिक पाणी प्रकल्पाचे काम २०१७ पासून हाती घेण्यात आले होते. या प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर वसई-विरारला प्रतिदिन १८५ दशलक्ष लिटर, तर मीरा-भाईंदरला प्रतिदिन २१८ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. या प्रकल्पातील वसई – विरारला प्रतिदिन १८५ दशलक्ष पाणीपुरवठा करणारा पहिला टप्पा जून २०२३ मध्ये पूर्ण झाला आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर एमएमआरडीएने पाणी सोडणे आणि वसई – विरार पालिकेने पाणी घराघरांपर्यंत पोहचविणे अपेक्षित होते. पण जूनपासून या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होऊ न शकल्यामुळे पाणीपुरवठा रखडला होता. अखेर मा. मुख्यमंत्र्यांनी लोकार्पणाची वाट न पाहता पाणी सोडावे असे आदेश दिले. त्यानुसार एमएमआरडीएने  पाणी वितरणास सुरुवात केली आहे.

विहिरींचे पुनरुज्जीवन 

ठाणे शहराचा सर्वांगीण विकास होत असून शहरातील विकासकामे वेगाने पूर्ण करण्यात येत आहेत, मुंबईतील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्याचे काम सुरू केले असून शहरातील सुशोभीकरण आणि स्वच्छतेकडे कटाक्षाने लक्ष देण्यात येत आहे. ठाणे शहरातील जुन्या विहिरींचे पुनरुज्जीवन करण्याचे काम सुरू असून त्यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय देण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे.

शहरांमधील स्थलांतरित गरीबांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाचा पहिला टप्पा येत्या मार्च २०२४ मध्ये संपणार असून शासन या अभियानाच्या दुसर्‍या टप्प्याचा  विचार करत आहे, या दुसऱ्या टप्प्यात  DAY-NULM 2.0 मध्ये शहरांमधील विविध व्यावसायिक गट म्हणजेच  बांधकाम कामगार, रिक्षाचालक आणि इतर असंघटित क्षेत्रातील कामगार यांच्यावर हा टप्पा लक्ष्य केंद्रित करेल. 

सध्या या अभियानाचा पहिला टप्पा महिलांचे स्वयं-मदत गट तयार करणे, कौशल्य-आधारित प्रशिक्षण आयोजित करणे, शहरी बेघरांसाठी निवारा उभारणे आणि रस्त्यावर विक्रेत्यांना आधार देणे यावर लक्ष केंद्रित करते. मिशनच्या दुसऱ्या टप्प्यात व्यवसायावर आधारित समान गटांचा समावेश असू शकतो.

उद्योजकता विकासाला चालना देण्यावर आणि व्यवसाय वाढीला गती देण्यावर लक्ष केंद्रित करून, २०२५  पर्यंत वाढवता येणारा तीन वर्षांचा प्रकल्प सुरुवातीच्या टप्प्यात आठ शहरांमध्ये सुरु करण्यात येईल.

फोर्ट परिसर कात टाकणार 

दक्षिण मुंबईच्या फोर्ट परिसरामध्ये 'गेट वे ऑफ इंडिया' सीएसएमटी रेल्वेस्थानक, जीपीओ, पालिका मुख्यालय, मुंबई विद्यापीठ, उच्च न्यायालय इत्यादींसारख्या हेरिटेज वास्तू आहेत. त्यामुळे या परिसराला विशेष महत्त्व आहे. या वास्तूंमुळेच या परिसरात पर्यटकांची गर्दी बघायला मिळते. जागतिक दर्जाच्या वास्तू आणि त्यांचे महत्त्व लक्षात घेऊन  फोर्ट परिसराचा मेकओव्हर होणार आहे. सुशोभीकरणाच्या माध्यमातून बृहन्मुंबई पालिकेचा ए विभाग फोर्ट परिसराचा मेकओव्हर  करणार आहे. फोर्ट परिसराची हेरिटेज वास्तू' ही  ओळख जपण्यासाठी तेथील सुशोभीकरणालाही हेरिटेज लूक देण्याचा प्रयत्न पालिका प्रशासन करत आहे. सुशोभीकरणात रस्त्यांवरील विजेचे खांब आणि इमारतींवर झगमगाट केला जाणार आहे. त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तूही हेरिटेज लूकमध्ये भर घालतील.  फोर्ट परिसराच्या मेकओव्हरचे काम  दोन टप्प्यांमध्ये काम केले जात आहे. पहिल्या टप्प्यात रस्त्यांवरील विजेचे दिवे लावले जातील. दुसऱ्या टप्प्यात हेरिटेज वास्तूंवर विद्युत रोषणाई केली जाणार आहे. डेकोरेटिव्ह हेरिटेज पोल बसवून विविध रस्त्यांवर रोषणाई केली जाणार आहे. त्यासाठी विविध प्रकारच्या पोलचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यातून हेरिटेज पोलची निवड केली गेली आहे. त्याशिवाय रस्त्यांवर कॅन्टिलिव्हर प्रकारचे एलईडी सिग्नल आणि कारंजे बसवणार असून शिल्पांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. पुढील तीन महिन्यांत सुशोभीकरणाचे काम केले जाणार आहे. त्यामुळे भविष्यात  फोर्ट परिसर कात टाकणार आहे, हे नक्की.

नवी मुंबई मेट्रोला प्रारंभ 

नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी औपचारिक उद्घाटनाची वाट न बघता तातडीने मेट्रो सेवा सुरू करण्याचे निर्देश सिडकोला दिले होते.  मेट्रोद्वारे नवी मुंबई अंतर्गत उत्तम कनेक्टिव्हिटी निर्माण होणार आहे. संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशामध्ये मेट्रो मार्गांचे जाळे निर्माण करण्याचे शासनाचे उद्दिष्ट असून नवी मुंबईमध्ये सिडकोतर्फे मेट्रोच्या अमलबजाणीचे काम प्रभावीपणे सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. 

मुंबईत भूमिगत मार्केट 

मुंबईतही दिल्लीच्या धर्तीवर येणाऱ्या भविष्यात भूमिगत मार्केट बांधण्यात येणार आहेत. दिल्लीतील पालिका बाजार या  धर्तीवर  मुंबई महापालिका भूमिगत बाजाराची संकल्पना राबविणार आहे. मुंबईतील पदपथ, रस्ते मुंबईकरांसाठी चालण्यासाठी असावेत आणि फेरीवाल्यांना व्यवसायही करता यावा हे  भूमिगत मार्केट निर्माण करण्याचे महत्त्वाचे कारण आहे. शहरातील मंडयांचाही  लवकरच कायापालट केला जाणार आहे. मंडयांच्या कायापालटाची सुरुवात  दादरमधील सिटी लाईट आणि आगर बझार पासून होणार आहे. तसा आराखडाही केला जात आहे. त्यामुळे मंडयांमध्ये असलेला मासळी बाजार,  भाजीपाला बाजार आणि  अन्नधान्य बाजाराची सुव्यवस्था लावण्यात येणार आहे. . याशिवाय तिथे विक्रीला बसणाऱ्या व्यावसायिकांना आणि विक्रेत्यांना स्वच्छतागृहासारख्या आवश्यक सुविधाही पुरविल्या जाणार आहेत. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून मार्केटमध्ये येणारा दुर्गंध कसा थोपविता येईल, याची  पडताळणी होईल. त्यानंतर तेथील इतर सुविधांसाठी आणि कायापालट करण्यासाठी तेथील व्यावसायिकांच्या पुनर्वसनाचाही आधी विचार करूनच मंडयांच्या  पुनरचनेचे काम हाती घेतले जाईल.

कोळीवाड्यांचा विकास 

मुंबई शहरात राहण्यासाठी सुयोग्य आणि शाश्वत विकासाचा बदल  घडवून आणण्यासाठी मुंबई महानगर पालिक विविध उपक्रम राबवित आहे. त्यामुळे लवकरच कोळीवाडा मच्छिमार क्षेत्र, चर्चगेट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, गेट वे ऑफ इंडिया येथे आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पर्यटनाच्या दृष्टीने विकास करणार करण्यात येण्यात आहे. याची सुरवात कोळीवाड्यांपासून होणार आहे. फिशिंग व्हिलेजच्या धर्तीवर कोळीवाड्यांचा विकास करण्यात येणार आहे. कोळीवाडा हे पर्यटनाचे केंद्र ठरावे, यासाठी शासन कटिबद्ध असून त्यांच्या विकासासाठी आगामी काळात विविध योजना आणि प्रकल्प राबविले जात आहेत.  माहीम कोळीवाडा येथील जिल्हा विकास नियोजन निधीमधून  बृहन्मुंबई महापालिकेमार्फत करण्यात येत असलेल्या विविध कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण नुकतेच करण्यात आले  आहे .  कोळी बांधवांचा व महिलांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून महिला बचत गटामार्फत चालविण्यात येणाऱ्या पहिल्या सी-फूड प्लाझाचे उदघाटन करण्यात आले. या फिशिंग व्हिलेजमध्ये सी फूड प्लाझामध्ये येणाऱ्या नागरिकांना खास कोळी फूडचा आनंद घेता यावा, यासाठी समुद्रकिनारी तंबूंची व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी नागरिकांना कोळी खाद्यपदार्थांसोबत कोळी नृत्याचाही आनंद घेता येणार आहे. कोळीवाड्यांचा विकास करण्याच्या दृष्टीने  सौंदर्यीकरणाचा प्रकल्प हाती घेतला आहे. मुंबईत सुमारे ८८ गावठाणे व ४१ कोळीवाडे आहे. त्यामुळे मूळ दुरुस्ती व डागडुजी करतानाही मुंबईकरांच्या पुनर्विकासासाठी स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली असावी, तसेच त्यांना अतिरिक्त एफएसआय देण्यात यावा, कोळीवाडे आणि गावठाणांचे सीमांकन करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. त्याप्रमाणे कोळीवाड्यांचा पुनर्विकास  होईल.

मुंबई सुशोभीकरण 

मुंबई महानगरपालिकेने सुशोभीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत विविध ठिकाणी रोषणाई, उड्डाणपुलांवर रोषणाई, उद्याने सुशोभीकरण, थीम पार्क, आदी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. बोरीवलीच्या अनिल देसल रोड येथे उद्यानासाठी आरक्षित भूखंडावर मुंबई  महानगरपालिका थीम पार्क उभारणार आहे. त्यासाठी सुमारे नऊ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, डिसेंबर २०२३ मध्ये  थीमपार्क उभारण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. १० हजार चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या भूखंडावर उभारण्यात येणाऱ्या या थीम पार्कमध्ये विद्यार्थ्यांसाठी फलोत्पादन व वनस्पतींच्या नवीन प्रजातींचा परिचय करून देणे, कंपोस्ट खत तयार करणे, आदी उपक्रम राबवले जाणार आहेत.  तसेच या पार्कची थीम  ही शैक्षणिक राहणार असून, लहान मुलांसाठी खेळणी, जॉगिंग ट्रॅकची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. पार्कमध्ये विविध प्रकारच्या औषधी वनस्पती असतील, पावसाचे पाणी साठवण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगही केले जाणार आहे. याच पाण्यातून पार्काला लागणाऱ्या पाण्याची गरज भागवली जाणार आहे. 

अंबरनाथ शहरात झोपडपट्टीमुक्तीच्या मोहिमेला वेग आला आहे. शहरातील झोपडपट्ट्या मुंबई आणि ठाण्याच्या धर्तीवर विकसीत करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची योजना राबवण्यात येणार आहे. यात प्रकाशनगर भागात सर्वप्रथम ही योजना राबवण्यात येणार आहे.अंबरनाथ शहरातील बहुतांश रहिवासी भाग चाळी आणि झोपडपट्ट्यांमध्ये विभागला आहे. या झोपडपट्ट्यांमुळे शहरात मोठे रस्ते, प्रकल्प उभारण्यात अडचणी येतात. पायाभूत सुविधा पुरवण्यातही अडचणी येत असतात. त्यामुळे या झोपडपट्ट्या हटवून त्या ठिकाणी इमारती बांधण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न झाले आहेत. गेल्या वर्षात अंबरनाथ नगरपरिषदेने शहरातील झोपडपट्टी अधिसूचीत करण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. अंबरनाथ शहरात सध्या ५२ झोपडपट्टी असून  सुमारे एक लाख लोकसंख्या या झोपडपट्ट्यांमध्ये राहते. त्यांना पुरेशा सोयी सुविधा देत त्याचा विकास करण्याच्या हेतूने शहरात नगरपरिषदेने झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

नागरिकांच्या सोयीचा विकास 

काशी, उज्जैनमधील मंदिरांप्रमाणेच मुंबादेवी परिसराचाही २०० कोटी रुपये खर्च करून विकास केला जाणार. महालक्ष्मी मंदिर येथे वाहनांसाठी मोठी पार्किंग सुविधा उपलब्ध करतानाच मंदिर दर्शनासाठी जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांचीही सुविधा उपलब्ध केली जाणार. बाणगंगा तलावाचाही विकास करताना पार्किंग सुविधा, येणाऱ्यांसाठी आसन व्यवस्था, तसेच शास्त्रीय संगीत, चहा व खाण्या-पिण्याची सुविधा देण्यात येणार आहे. या पर्यटकांच्या निवासाचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी कफ परेड, वरळी आणि माहीम कोळीवाड्यात प्रायोगिक तत्त्वावर दोन महिन्यांत उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. 

परदेशी पर्यटकांना भाडेतत्त्वावर घरे देण्याची योजना आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि कोळी महिलांच्या सक्षमीकरणासाठी कोळीवाड्यात ‘फूड कोर्ट’ही उभारण्यात येणार आहे. 

न्यूयॉर्कच्या धर्तीवर मुंबईत ज्येष्ठ नागरिकांसाठी डे केअर सेंटर म्हणजेच काळजीवाहू केंद्र उभारले जाणार आहे. या सेंटरमध्ये विविध सुविधा उपलब्ध असतील. तसेच येथून विरंगुळ्याच्या ठिकाणी नेण्यासाठी सिटी बसही उपलब्ध केली जाणार आहे. 

संपूर्ण स्वच्छता मोहीम 

मुंबई महानगरपालिकेने स्वच्छ व सुंदर मुंबईसाठी  कचरामुक्तीचे उद्दिष्ट  ठेवले आहे. वाढते प्रदूषण रोखण्यासाठी स्वच्छ, सुंदर, हरित मुंबईसाठी पालिकेने व्यापक स्तरावर संपूर्ण स्वच्छता (डीप क्लिनिंग) मोहीम राबविण्याचे नियोजन केले आहे. त्‍यासाठीची प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) देखील तयार करण्‍यात आली आहे. रस्ते- पदपथ धूळमुक्त करण्याबरोबरच बेवारस वाहनांची विल्हेवाट, विनापरवाना जाहिरात फलकांवर कारवाई, सार्वजनिक प्रसाधनगृहांची स्वच्छता, उद्यान क्रीडांगणांची निगा, कर्मचारी वसाहतींची स्वच्छतेसाठी 'डीप क्लीनिंग' (संपूर्ण स्वच्छता) मोहीम राबवण्यात येत आहे. पालिकेच्या २४ वॉर्डात मुंबईभर स्वच्छता मोहीम राबवण्यात येत  आहे. या मोहिमेचा शुभारंभ ३ डिसेंबर २०२३ ला  मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते धारावी येथे झाला.  

मुंबईची आरोग्य सेवा 'लोककेंद्रित'

सायन रुग्णालयात सुरू असलेल्या इमारतींच्या कामाला गती द्यावी. पुढच्या भेटीत कामाची प्रगती आढळली पाहिजे, असे मा. मुख्यमंत्री यांनी काही दिवसांपूर्वी रुग्णालयाला दिलेल्या भेटी दरम्यान स्पष्ट केले.  रुग्णालयात सोयीसुविधा वाढविण्यात येत असून त्या कालमर्यादेत पूर्ण कराव्यात. रूग्णांना वेळेत आरोग्यसेवा मिळण्याबाबत रुग्णालय प्रशासनाने प्रयत्न करण्याच्या सूचनाही मा. मुख्यमंत्र्यांनी दिल्या. सायन हॉस्पीटलमध्ये २०० खाटांचा अतिदक्षता विभाग आणि एक हजार खाटांचा सर्वसाधारण कक्षाचे काम सुरू असून लवकरच ते पूर्ण होईल त्यामुळे नव्याने १२०० खाटा उपलब्ध होतील, असे त्यांनी सांगितले. 

सोनोग्राफी आणि डायलेसिस सेवा देण्यासाठी उपकरणांची वाढ करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये झिरो प्रिस्क्रीप्शन संकल्पना राबविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे जेणेकरून औषधांसाठी रुग्णांना बाहेर जावे लागणार नाही, असे मा. मुख्यमंत्री यांनी सांगितले.

रुग्ण मित्र मदत कक्ष 

मुंबई महापालिकेच्या सर्व प्रमुख व उपनगरीय रुग्णालयांमध्ये येणारे रुग्ण, तसेच त्यांच्या नातेवाईकांना माहिती व मदत पुरवण्यासाठी ‘रुग्ण मित्र’ मदत कक्ष अर्थात हेल्प डेस्क सुरू करण्यात येणार आहे. महापालिकेच्या सर्व प्रमुख रुग्णालयांमध्ये, तसेच उपनगरीय रुग्णालयांमध्ये मिळून दररोज लाखोंच्या संख्येने रुग्ण, त्यांचे नातेवाईक येतात. वैद्यकीय सेवा-सुविधा, विविध विभाग, तसेच इतरही पूरक माहिती एकाच ठिकाणी मिळाली तर रुग्णांना आणि नातेवाईकांना पर्यायाने रुग्णालय प्रशासनाला ते सोयीचे होईल, या विचारातून ‘रुग्ण मित्र’ मदत कक्ष अर्थात हेल्प डेस्क सुरू करण्यात येणार आहे. 


 Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

 

No comments:

Post a Comment

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...