Tuesday, December 26, 2023

निसर्गाचे पुनरुज्जीवन: तळवडे येथील जैवविविधता उद्यान

पिंपरी-चिंचवड महापालिकेची स्थापना झाल्यापासून शहराचा विकास झापाट्याने होत आहे.  उद्योगनगरी असणारे पिंपरी-चिंचवड शहर नागरीकरणाच्या दिशेने  झेपावत आहे.  रस्ते, क्रीडांगणे, उद्याने, एलईडी दिव्यांची उभारणी करीत स्मार्ट होत आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक  लोकप्रिय प्रकल्प आहे.  त्या प्रकल्पांपैकी एक म्हणजे  तळवडे येथील  बायोडायव्हर्सिटी पार्क म्हणजेच जैवविविधता उद्यान.  महापालिका सीएसआर फंडच्या माध्यमातून  हा प्रकल्प नजीकच्या भविष्यात उभारणार आहे. 

सध्या पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेची एकूण १९४  सार्वजनिक उद्याने आहेत. ही उद्याने  ४७४ एकर क्षेत्रात विकसित केली गेली आहेत. त्यातील काही निवडक उद्यानात विविध थीमच्या आधारे सुशोभीकरण केले जाणार आहे. दुबईत असलेले प्रसिद्ध कारंजे, मुंबईतील मायानगरी, जगातील सात आश्चर्य या संकल्पनेवर उद्याने विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी खासगी एजन्सीचे सहाय घेण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पांमध्ये तळवडे येथील जैवविविधता उद्यानाची भर पडणार आहे. 

अनेकांना असे वाटते की, जैवविविधता ही  फक्त दूर खेड्यात, दऱ्याखोऱ्यांत अथवा घनदाट अशा जंगलांमध्येच आढळते.  पण शहरांत जैवविविधता ही जैविविधता उद्यानातून निर्माण होणार आहे. जैवविविधता उद्याने निर्माण केली, की आपोआप पक्षी किलबिल करू लागतील, फुलपाखरे भिरभिरू लागतील! आजूबाजूला अशी फुलापानांनी बहरून आलेली थोडी जरी झाडेझुडपे असतील, तर किती तरी पक्षी अगदी आनंदाने तुमच्या जवळपास घरटी बांधतील, मधमाश्या पोळं करतील. अशी जैविविधता पिंपरी-चिंचवड शहरात अनुभविण्यास मिळणार आहे.  

गेल्या २५ वर्षांत, इंद्रायणी नदीच्या काठी असलेल्या नयनरम्य नैसर्गीक पट्ट्याला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला आहे,  गुरे चरण्यापासून ते बेलगाम शहरी विकास, वृक्षतोडीचे अतिक्रमण, एकसारखी पीक पद्धती. परिणामी  या पट्ट्यातील जमिनीचा दर्जा घसरला आहे. पण आत्ता चिंता करण्याची गरज नाही. आता एक  आशेचा किरण  दिसू लागला आहे. तो आशेचा किरण आहे जैवविविधता उद्यानाचा अर्थात बायोडायव्हर्सिटी पार्कचा. इंद्रायणी नदीच्या पट्ट्यात असणाऱ्या तळवडे भागातील निकृष्ट जमिनीच्या तुकड्याचे पुनरुज्जीवन होणार आहे. 

तळवडे येथील जैवविविधता उद्यान हे ७० एकर जागेत उभे राहणार असून त्यासाठी ९६ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. पर्यटकांसाठी या उद्यानात ८ ते १० प्रकारची विविध इकोसिस्टम वर आधारीत उद्याने असतील. त्याच्या जोडीने या मुख्य जैविविविधता उद्यानात  खुले प्रेक्षागृह, जैविविविधता प्रबोधन केंद्र, ऑर्किडट्रॅम, जैवविविधतेशी संबंधीत साहित्य केंद्र, कार्यशाळा गृह,  लहान मुलांसाठी उद्यान असणारा आहे. पर्यटकांची गैरसोय होऊ नये म्हणून इथे  एक छोटे उपाहारगृह आणि प्रसाधन गृह असेल. तसेच कार आणि दुचाकी पार्किंग, सायकल आणि गोल्फ कोर्ट  ट्रॅक व स्टेशनची व्यवस्था केली जाणार आहे.   उद्यानात ६ मीटर रुंदीचे रस्ते असतील. ४ मीटर रुंदीचे पादचारी मार्ग  आणि अंतर्गत पादचारी मार्गही तयार केले जाणार आहेत. 

उद्यानात पाण्याचेही नियोजन केले जाईल. त्यासाठी  पिंपरी-चिंचवड महापालिकेने योजना आखली आहे. या योजनेनुसार जैवविविधता उद्यानात ६ किमीपर्यंत सांडपाणी प्रकिया  संयंत्र बसविले जाणार आहे. ठिबक सिंचनाची सोया केली जाणार आहार. पाणी साठविण्यासाठी पाण्याच्या उंच टाक्यांचा वावर केला जाणार आहे.  थोडक्यात या  जैविविधता उद्यानामुळे जलस्रोतांची संरक्षण,  शहरीकरण विस्ताराबरोबर वन्य परिसर संवर्धन, जमीन तसेच माती संवर्धंन, वन्य पशू-पक्षी  संवर्धन बरोबरीने हवामानाच्या स्थिरतेवरही  सकारात्मक परिणामी होणार आहे. 

२०१८ मध्ये जागतिक बँकेने एक अहवाल सादर केला होता.  याअहवालानुसार, भारतात एकूण लोकसंख्येच्या ३६ टक्के लोक वेगवेगळ्या कारणांसाठी शहरात वस्ती करतात. त्यामुळे शहरांची रचना करताना, नागरिकांना आरोग्यविषयक आणि इतर मूलभूत सोयी पुरवताना निसर्गाचे रक्षण आणि संवर्धन यांकडेही लक्ष दिले पाहिजे. मुंबई- नवी मुंबई- ठाणे- पुणे- नाशिक- नागपूरसारख्या नागरी/शहरी भागांत हिरवीगार उद्याने अत्यावश्यक आहेत, ती केवळ सौंदर्यदृष्टय़ा नव्हे तर शहरातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत. या उद्यानांद्वारे मिळणारी विनामूल्य शुद्ध हवा आणि आल्हाददायी गारवा या आरोग्यदायक सेवांमुळे अशी उद्याने म्हणजे शहराची फुप्फुसेच ठरतात. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे, यामुळे आबालवृद्धांना निसर्गाच्या समीप आणता येईल. शहरातील धकाधकीच्या दैनंदिन जीवनात निसर्गाशी एकरूप होणे, हा मन आनंदी ठेवण्याचा एक मंत्र आहे. त्यासाठी उद्यानांच्या लहान-मोठ्या जागा शहरांत गरजेच्या आहेत.  या गरजेपोटी लवकरच  पिंपरी-चिंचवड महापालिकेचे बायोडायव्हर्सिटी पार्क नजीकच्या भविष्यात उभे राहणार आहे.


 Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

No comments:

Post a Comment

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...