Saturday, December 23, 2023

विकासाच्या वाटेवर असलेले अंबरनाथ शहर

गाव, खेडे आणि मुंबईकरांसाठी पिकनिक स्पॉट अशी एकेकाळी ओळख असणाऱ्या अंबरनाथ, बदलापूर या दोन्ही शहरांचा नकाशा गेल्या काही वर्षांत बदलला आहे. त्यामुळे या शहरांमध्ये वेगाने विकसित होणारे गृहप्रकल्प, त्याचबरोबर राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांचे सध्या कार्यरत असलेले आणि भविष्यात होऊ घातलेले जाळे या शहरांना राज्याच्या नकाशावर महत्त्वाचे स्थान देणार आहेत. त्यामुळे चारही बाजूने या दोन्ही शहरांमध्ये विकासकामांनी वेग घेतला आहे. त्यात शहरांतर्गत आणि बाह्य भागातील महत्त्वाचे रस्ते, त्यांचे रुंदीकरण, नवीन प्रस्तावित उड्डाणपूल, चिखलोली रेल्वे स्थानकासारख्या वाहतूक पर्यायांमुळे तिसऱ्या मुंबईचे केंद्रबिंदू असलेले अंबरनाथ, बदलापूर खऱ्या अर्थाने विकासाच्या दिशेने प्रवास करत आहे. हा विकास नगर विकास विभागाच्या सातत्यपूर्ण नियोजनातून शक्य झाला आहे. नुकताच  अंबरनाथ शहराच्या विकासासाठी नगर विकास विभागाकडून निधी प्राप्त झाला आहे.

अंबरनाथ शहरातील विविध विकासकामांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरविकास विभागाकडून वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत १२१  कोटींच्या भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. सद्यःस्थितीत सुरू असलेल्या नाट्यगृह, तरण तलाव, हॉकी पॅव्हेलियन, नगरपालिका प्रशासकीय इमारतीचे उर्वरित बांधकाम, इनडोअर स्टेडियम, नगर परिषदेच्या दोन शाळांचे नव्याने बांधकाम यासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे. यातील बहुतांश कामे प्रगतिपथावर आहेत.

नगरविकास विभागाकडून देण्यात आलेल्या या निधीमुळे या विकासकामांना गती मिळणार आहे. कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या निधीच्या मंजुरीसाठी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत निधी मंजूर केला आहे.

डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकाराने आतापर्यंत अनेक विकासकामे मंजूर झाली आहेत. वाहतूक व्यवस्था, आरोग्य सुविधा, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक यांसारखे विविध विकास प्रकल्प नव्याने उभे राहत आहेत, तर बहुतांश प्रकल्प मार्गी लागून नागरिकांच्या सेवेत दाखल झाले आहेत. अंबरनाथमध्ये विविध प्रकल्पांचे काम अंतिम टप्प्यात असून या कामांच्या पूर्ततेसाठी उर्वरित निधी विहित वेळेत मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत होते. 

नाट्यगृहाच्या उभारणीसाठी वित्त आयोगाच्या माध्यमातून ३७  कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. येत्या काही महिन्यात या नाट्यगृहाचे काम मार्गी लागणार आहे. याचबरोबर अंबरनाथमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तरण तलावाची उभारणी आणि हॉकी पॅव्हेलियनची उभारणी करण्यात येत आहे यासाठी आधी ५  कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता, तर आता २८  कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अंबरनाथ पालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या उर्वरित बांधकामासाठी २७  कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. शहराच्या पश्चिम भागात नेताजी मैदान विकसित करून या ठिकाणी इनडोअर स्टेडीयमच्या उभारणी करण्यात येत आहे. याकामासाठी आधी १०  कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. यानंतर आता ३३  कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

महापालिका शाळांची उभारणी होणार

अंबरनाथ महापालिकेच्या कैलासनगर येथील शाळा क्रमांक १  (लोकल बोर्ड) आणि स्वामीनगर येथील शाळा क्रमांक ११  या दोन्ही शाळांसाठी एकत्रित नव्याने इमारत बांधण्यात येत आहे. यासाठी ९  कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शिवमंदिर परिसर विकास प्रकल्प राबविण्यासाठी अंबरनाथ महापालिकेची शिवमंदिर येथील शाळा क्र. ९  स्थलांतरित करून शिवगंगानगरमधील आरक्षण क्र. १६३  या ठिकाणी नव्याने इमारतीचे बांधकाम करण्यात येत आहे. यासाठी ९  कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे या शाळांचे रूपडे पालटणार आहे.

गृहप्रकल्पांचा विस्तार 

अंबरनाथ शहराचा विस्तार होत असल्याने शहराच्या आतील भागातही अनेक गृहप्रकल्प उभे राहत आहेत. त्यामुळे या नवीन गृहप्रकल्पांपर्यंत नागरिकांना जाण्यायेण्याची सोय व्हावी यासाठी विकास आराखड्यानुसार आणि शहरातील उर्वरित डांबरी रस्त्यांवर ४२ कोटी रुपयांच्या निधीतून १७ किलोमीटर रस्त्यांची कामे करण्यात येत आहेत. यातील अनेक रस्ते हे पूर्ण करण्यात आले आहेत. तर उर्वरित रस्त्यांची कामे प्रगतिपथावर आहेत. त्यामुळे येत्या दोन वर्षांत या सर्व रस्त्यांची कामे झाल्यास शहर डांबरी रस्ते मुक्त झालेले असेल.


 Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 



No comments:

Post a Comment

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...