Saturday, December 16, 2023

मुंबई बदलतेय... भाग २

मुंबई महानगरपालिकेने स्वच्छ व सुंदर मुंबईसाठी कचरामुक्तीचे उद्दिष्ट ठेवले आहे. वाढते प्रदूषण रोखण्यासाठी स्वच्छ, सुंदर, हरित मुंबईसाठी पालिकेने व्यापक स्तरावर संपूर्ण स्वच्छता (डीप क्लिनिंग) मोहीम राबविण्याचे नियोजन केले आहे. त्‍यासाठीची प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) देखील तयार करण्‍यात आली आहे. रस्ते- पदपथ धूळमुक्त करण्याबरोबरच बेवारस वाहनांची विल्हेवाट, विनापरवाना जाहिरात फलकांवर कारवाई, सार्वजनिक प्रसाधनगृहांची स्वच्छता, उद्यान क्रीडांगणांची निगा, कर्मचारी वसाहतींची स्वच्छतेसाठी 'डीप क्लीनिंग' (संपूर्ण स्वच्छता) मोहीम राबवण्यात येत आहे. पालिकेच्या २४ वॉर्डात मुंबईभर स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेचा शुभारंभ ३ डिसेंबर २०२३ ला मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते धारावी येथे झाला. या स्वच्छता मोहिमेत लोकप्रतिनिधींसह, समाजातील ख्यातनाम व्यक्ती, उद्योजक, ज्येष्ठ नागरिक महाविद्यालयीन तरुण, शालेय विद्यार्थी, अशासकीय संस्था संघटना आदींना सहभागी केले जात असून दर शनिवारी, प्रत्येक परिमंडळात एक विभाग याप्रमाणे, सात विभागांमध्ये व्यापक स्तरावर स्वच्छता सुरु आहे.

कचरा अलगीकरणासह सार्वजनिक प्रसाधनगृहांची स्वच्छता, सार्वजनिक उद्याने – स्थानिक उद्यानांची निगा राखणे, मुलांसाठी खेळण्याची साधने असणे व ती सुस्थितीत असणे, शासकीय कर्मचारी निवासस्थाने - वसाहतींमध्ये सामूहिक स्वच्छता राबविणे, विनापरवाना जाहिरात फलकांवर कारवाई, अस्ताव्यस्त विखुरलेले केबल्सचे जंजाळ काढणे यांसह विविध उपाययोजना राबविल्या जातील. 

या मोहिमेत गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधी, सामाजिकदृष्ट्या सक्रिय नागरिकांना स्वच्छता मोहिमेबद्दल माहिती दिली जाते.   सामूहिक स्वच्छता मोहिमेला सुरुवात होण्यापूर्वी त्या भागातील सर्व रस्ते, गल्ल्या संबंधित कर्मचाऱ्यांकडून नियमित कामकाजाप्रमाणे स्वच्छ करण्यात येतात.  ज्या रस्त्यांवर धूळ साचली आहे, असे रस्‍ते फायरेक्स/डिस्लडिंग/वॉटर टँकर वापरून धुतले जातात.  त्‍यानंतर एकाच वेळी ब्रशिंग केले जाऊन या मोहिमेदरम्यान संकलित होणा-या गाळाची स्वतंत्रपणे विल्‍हेवाट लावली जाते.  उद्यान विभागातील कर्मचारी विभागातील उद्याने आणि खेळाचे मैदान स्वच्छ करण्यात येतात. कीटकनाशक विभाग परिसरात फवारणी करण्यात येते आणि संसर्गजन्‍य रोगांना प्रतिबंध करण्‍यासाठी रासायनिक औषधांचा वापर करण्यात येतो.  

मोहिमेदरम्‍यान परिसरातील सार्वजनिक प्रसाधनगृहे पूर्णपणे स्वच्छ आणि निर्जंतुक केली जातात. रस्त्यांची  स्वच्छता करणे आणि रस्त्यालगच्या भिंती सामाजिक संदेशाने रंगवल्या जातात, त्‍यासाठी कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्‍यात येते. या मोहिमेत जास्तीत जास्त लोकसहभागासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, ख्यातनाम मान्यवर, अशासकीय संस्‍था, विद्यार्थी, सामाजिक सक्रिय नागरिक तसेच सामाजिक संघटना इत्यादींना सहभागी करून घेण्‍यात येते. अनधिकृत जाहिरात फलकांवर अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत कारवाई करण्‍यात येते. विभागातील बेवारस वाहने हटवण्यासाठी वाहतूक पोलिसांची मदत घेण्‍यात येते. कानाकोप-यात साचलेला कचरा, राडारोडा हटवण्यात येतो. 

स्वच्छता मोहीम यशस्वी करण्यासाठी घनकचरा विभाग, वाहतूक विभाग, मलनिस्सारण विभाग, पर्जन्‍य जल वाहिनी विभाग हे आवश्यक अतिरिक्त वाहने आणि यंत्रणा पुरवण्यात येतात. 

मुंबईच्या स्वच्छतेसाठी दोन हजार कर्मचारी तैनात 

राज्याचे मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी मुंबईची स्वच्छता हि बाब गांभीर्याने घेत त्या दृष्टीने कार्यवाही सुरु ठेवली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई महानगरातील वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देऊन स्वच्छता कामांची पाहणी केली होती. या भेटींमध्ये  प्रमुख रस्ते आणि परिसर या ठिकाणी नित्यनेमाने होत असलेल्या स्वच्छतेप्रमाणेच इतर लहान रस्ते, गल्ली, वस्ती तसेच सार्वजनिक प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेची कार्यवाही अधिक चांगल्यारीतीने करावी, असे निर्देश मा. मुख्यमंत्र्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी  घनकचरा व्यवस्थापन विभाग, सर्व २४ प्रशासकीय विभाग कार्यालय व सर्व संबंधित विभागणी  या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील १,८००हून कर्मचारी व २०० सयंत्रांच्या सहाय्याने स्वच्छतेचे काम अहोरात्र सुरू केले आहे. 

स्वच्छ व सुंदर मुंबईसाठी मुंबई महापालिकेने स्वच्छ व सुंदर मुंबईवर  लक्ष केंद्रित केले आहे. मुंबईच्या स्वच्छतेसाठी  घनकचरा व्यवस्थापन खात्यातील १ हजार ७४८ मनुष्यबळ, त्याचप्रमाणे जेसीबी, डंपर आदी मिळून सुमारे १८६ वाहने तैनात केली आहेत. या सर्व मनुष्यबळ आणि सयंत्राच्या मदतीने लहानसहान रस्ते, गल्ल्या पदपथ, वस्ती सार्वजनिक प्रसाधनगृह यांची विशेष स्वच्छता केली जात आहे. एकंदरीत मुंबईच्या स्वच्छतेसाठी  २ हजार कर्मचारी मेहेनत घेत आहेत.

नगर विकास विभागातर्फे शहर स्तरावर मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा - २०२३ तर इतर महापालिकांमध्ये वॉर्ड स्तरावर मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड स्पर्धा २०२३ 

राज्यातील ड वर्ग महापालिका आणि सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायतीमध्ये नगर विकास विभागातर्फे शहर स्तरावर मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा - २०२३ तर इतर महापालिकांमध्ये वॉर्ड स्तरावर मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड स्पर्धा २०२३ आयोजित  करण्यात आली.  १५ डिसेंबर २०२३ पर्यंत ही स्पर्धा घेण्यात आली असून  उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महापालिका आणि नगरपरिषदांना राज्यस्तरीय पारितोषिक देण्यात येईल.

मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा २०२३ दोन स्तरावर घेण्यात आली,  प्रथम विभागस्तरावर वर्गनिहाय सर्वाधिक गुणवत्ता प्राप्त ३ शहरांची निवड करण्यात येऊन त्यांना विभागस्तरीय पारितोषिक देण्यात येईल. विभागस्तरावर वर्गनिहाय सर्वोत्तम ठरणाऱ्या शहरांमधून राज्य स्तरावर मूल्यांकन करून सर्वत्तोम तीन शहरांना राज्यस्तरीय पारितोषिक देण्यात येईल.

मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड स्पर्धा २०२३ राज्य स्तरावर घेण्यात येईल. आणि तीन सर्वोत्तम वॉर्डला राज्यस्तरीय पारितोषिक देण्यात येईल. आपल्या शहरात आणि वॉर्डमध्ये सर्वोत्तम काम करणाऱ्या महापालिका नगरपरिषदांची पारितोषकासाठी निवड करण्यात येईल.

'मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा  आणि मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड स्पर्धेचे निकष 

शहरातील मध्यवती चौक, प्रमुख रस्ते सुस्थितीत व सुशोभित करणे, प्रमुख इमारती, प्रमुख वारसा स्थळे, तलाव, जलाशये यांची देखभाल करणे, घरोघरी जाऊन १००  टक्के वर्गीकरण केलेला  कचरा संकलन करणे. शहरात प्लास्टिक बंदी अंमलबाजवणी करणे, शहरातील प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमणांवर कार्यवाही करणे. मालमत्ता कर संकलन, स्थावर  मालमत्तेच्या विनियोगाचे नियोजन करणे, सार्वजनिक वाचनालयाची उपलब्धता व व्यवस्थापन करणे, स्वच्छता कर्मचाऱ्यांना  शासकीय योजनांचा लाभ देणे, शहरातील पदपथांवर Street Furniture बसवणे आणि सौंदर्यीकरण करणे, शहराने राबवलेली नाविन्यपूर्ण योजना, सार्वजनिक प्रसाधनगृहांची उपलब्धता, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा शुद्धीकरण, मलनिस्सारण प्रकल्प, शाळा, भुयारी गटारे योजना, फेरीवाला नियोज़न अशा वेगवेगळ्या निकषांचा या स्पर्धेत  समावेश करण्यात आला होता.

मुंबईची आरोग्य सेवा 'लोककेंद्रित'

सायन रुग्णालयात सुरू असलेल्या इमारतींच्या कामाला गती द्यावी. पुढच्या भेटीत कामाची प्रगती आढळली पाहिजे, असे मा. मुख्यमंत्री यांनी काही दिवसांपूर्वी रुग्णालयाला दिलेल्या भेटी दरम्यान स्पष्ट केले.  रुग्णालयात सोयीसुविधा वाढविण्यात येत असून त्या कालमर्यादेत पूर्ण कराव्यात. रूग्णांना वेळेत आरोग्यसेवा मिळण्याबाबत रुग्णालय प्रशासनाने प्रयत्न करण्याच्या सूचनाही मा. मुख्यमंत्र्यांनी दिल्या. सायन हॉस्पीटलमध्ये २०० खाटांचा अतिदक्षता विभाग आणि एक हजार खाटांचा सर्वसाधारण कक्षाचे काम सुरू असून लवकरच ते पूर्ण होईल त्यामुळे नव्याने १२०० खाटा उपलब्ध होतील, असे त्यांनी सांगितले. 

सोनोग्राफी आणि डायलेसिस सेवा देण्यासाठी उपकरणांची वाढ करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये झिरो प्रिस्क्रीप्शन संकल्पना राबविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे जेणेकरून औषधांसाठी रुग्णांना बाहेर जावे लागणार नाही, असे मा. मुख्यमंत्री यांनी सांगितले.

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात पुरवल्या जाणाऱ्या सर्व वैद्यकीय सेवा आणि औषधांच्या पुरवठ्यासाठी झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी राबवण्याचे निर्देश मा. मुख्यमंत्री यांनी आयुक्तांना दिले आहेत. गरीब रुग्णांना मोफत आरोग्यसेवा पुरवण्यासाठी 'झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी' राबवण्याचे निर्देश देण्यात आले. अशी पॉलिसी राबवणारी मुंबई महापालिका देशातील पहिली महापालिका ठरणार आहे. त्यामुळे आरोग्यसेवा लोककेंद्रीत होणार आहे. 

रुग्ण मित्र मदत कक्ष 

मुंबई महापालिकेच्या सर्व प्रमुख व उपनगरीय रुग्णालयांमध्ये येणारे रुग्ण, तसेच त्यांच्या नातेवाईकांना माहिती व मदत पुरवण्यासाठी ‘रुग्ण मित्र’ मदत कक्ष अर्थात हेल्प डेस्क सुरू करण्यात येणार आहे. महापालिकेच्या सर्व प्रमुख रुग्णालयांमध्ये, तसेच उपनगरीय रुग्णालयांमध्ये मिळून दररोज लाखोंच्या संख्येने रुग्ण, त्यांचे नातेवाईक येतात. वैद्यकीय सेवा-सुविधा, विविध विभाग, तसेच इतरही पूरक माहिती एकाच ठिकाणी मिळाली तर रुग्णांना आणि नातेवाईकांना पर्यायाने रुग्णालय प्रशासनाला ते सोयीचे होईल, या विचारातून ‘रुग्ण मित्र’ मदत कक्ष अर्थात हेल्प डेस्क सुरू करण्यात येणार आहे. 

यामध्ये प्रामुख्याने रुग्णालयांचे प्रवेशद्वार किंवा नोंदणी कक्ष या ठिकाणी केबिन तयार करण्यात येईल. या ठिकाणी रुग्णांची मदत करण्याच्या दृष्टीने कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. प्रमुख रुग्णालयांमध्ये सकाळी तीन, दुपारी दोन व रात्री एक याप्रमाणे सत्रनिहाय कर्मचारी असतील; तर उपनगरीय रुग्णालयांमध्ये सकाळी दोन व दुपारी एक याप्रमाणे कर्मचारी उपलब्ध असतील.

महापालिकेच्या रुग्णालयांतील हेल्प डेस्कवर लॅपटॉप किंवा संगणक, तसेच दूरध्वनीची सोय असेल. रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना व्यवस्थित मदत करण्यासाठी आवश्यक ‘सॉफ्ट स्कील’ असणारे कर्मचारी नियुक्त करण्यात येतील. या कर्मचाऱ्यांचे मराठीसह इंग्रजी व हिंदी भाषेवरही प्रभुत्व असेल, तसेच त्यांना संगणकीय ज्ञान असेल. त्यासोबतच या कक्षामध्ये नोंदणी पुस्तिका, त्याचप्रमाणे सूचना पेटीची व्यवस्था करण्यात येणार आहे.

लोकाभिमुख शहर विकासासाठी असे सातत्याने प्रयत्न सुरु असून भविष्यात बदललेली मुंबई पाहणं निश्चितच सुखावणारं असेल.


 Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

No comments:

Post a Comment

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...