Saturday, December 16, 2023

मुंबई बदलतेय... भाग १

मुंबई बदलतेय.. कित्येक वर्ष  मुंबईत राहणाऱ्या सर्वसामान्य वर्गाला मुंबईचा हा बदलणारा चेहरा पाहायला मिळतोय, मुंबईत राहून आपलं स्वप्न जगणाऱ्या मुंबईकरांना त्यांच्या शहरात झपाट्याने होणारा बदल प्रकर्षाने जाणवायला लागलाय. मुंबई बदलवण्यासाठी शासन दरबारी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातायत आणि महापालिका स्तरावर त्याची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसतेय. मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकार होणाऱ्या  'सर्वसामान्यांच्या मुंबईचं ' आता खऱ्या अर्थाने नवं रूप पाहायला मिळतंय.

याचा प्रत्यय गेल्या काही वर्षात तर मुंबईकरांना वेळोवेळी आला असेल. या शहराचा चेहरामोहरा बदलत असून विविध योजना, सुविधा आणि लोकाभिमुख कामांतून मुंबई महानगराचा विकास साध्य करण्यासाठी हे सरकार प्रयत्नशील आहे.

गेल्या काही महिन्यात हि बाब प्रकर्षाने जाणवली ती, मुंबईत वाढलेल्या प्रदूषणावर शासनाने राबवलेल्या उपाययोजना, अहोरात्र होत असलेले काम, स्वच्छता मोहीम आणि सर्वसामान्यांचा विचार करून आरोग्य व्यवस्थेत घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयातून.. मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेत प्रशासनाला निर्देश दिले आणि आज मुंबईत त्याचे सकारात्मक पडसाद उमटले. याच्याविषयी माहिती देणारा हा लेख...

 वाढते प्रदूषण आणि शासन उपाययोजना

प्रदूषित शहरांपैकी लाहोर, दिल्ली, कुवेत आणि त्यानंतर मुंबई एक आहे.  ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून मुंबईच्या वातावरणात धूळीचं वलय पसरल्याचं दिसून येत होत. काही दिवसांपूर्वी जागतिकदृष्ट्या केलेल्या IQ air च्या डेटानुसार मुंबई प्रदूषणात चौथ्या क्रमांकावर दिसत होती. ऑक्टोबर महिन्यातील उन्हाचा तडाखा आणि खालावलेला हवेचा दर्जा यामुळे आजाराचं प्रमाण वाढलेलं दिसलं.  मुंबईबरोबरच महाराष्ट्रातील इतर शहरंही प्रदूषित झालेली दिसली.  प्रदूषणावर उपाययोजना करताना शासनाने केवळ वायू प्रदूषणाचा विचार न करता या सगळ्याशी संबंधित असलेल्या शहर स्वच्छता, शासकीय रुग्णालय स्वच्छता, कचरा प्रदूषण अशा सर्वच अनुषंगाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आणि गेल्या काही दिवसात प्रदूषणाचे चित्र बदलून सकारात्मक बदल शहरात दिसू लागला.

मुंबईतील हवेचा दर्जा का खालावतो आहे याचा आढावा घेण्यासाठी २० ऑक्टोबरला महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सर्व संबंधित खात्यांसह एमएमआरडीए, म्हाडा, एसआरए, एमएमआरसीएल, एमआयडीसी आदी यंत्रणा तसेच क्रेडाई, एमसीएचआय, नारेडको, पीइएटीए या विकासकांच्या विविध संघटनांच्या संयुक्त बैठकीत अनेक बाबी समोर आल्या. यात सगळ्यात महत्त्वाचं कारण समोर आले ते मुंबईत सुरू असलेली बांधकामं. सहा हजार ठिकाणी बांधकामं सुरू असून या बांधकामावेळी नियमांचं पालन होत नाही आणि  त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूलिकण हवेत पसरतात आणि हवा प्रदूषित होते असं मुंबई महापालिकेच्या सर्वेक्षणातून समोर आले. सोबतच मुंबईतील विविध वायू प्रकल्प, रिफायनरी यातूनही वायू प्रदूषण होत आहे. या विविध कारणांवर चर्चा करून मुंबई महापालिकेकडून काही सूचना देण्यात आल्या. बांधकाम करताना घ्यावयाची खबरदारी आणि नियम महापालिकेने जाहीर केले.

वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सर्व बांधकामांच्या ठिकाणी धूळ व प्रदूषण नियंत्रणासाठीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी केलीच पाहिजे, तसे न केल्यास खासगी असो किंवा शासकीय बांधकामांचे काम थांबवण्यात येईल, असा सक्त इशारा महापालिकेतर्फे देण्यात आला. यात बांधकामांच्या ठिकाणी असणाऱ्या  सूचनांसोबतच मुंबईतील वीज, ऊर्जा, गॅसविषयक मोठ्या प्रकल्पांतून होणाऱ्या वायू प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी त्यांच्याकडून कसोशीने प्रयत्न व्हावेत. शासनाने ठरवून दिलेल्या सर्व उपाययोजना त्यांनी केल्या आहेत किंवा कसे, याची फेरतपासणी करावी असे निर्देश देण्यात आले. 

या पार्श्वभूमीवर मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या काळात  उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत प्रदूषणाची समस्या आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना राबविण्याच्या सूचना मा. मुख्यमंत्री यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. मुंबईसह महानगरांमधील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका, तसेच राज्य सरकारच्या विविध यंत्रणांनी एकत्रित कार्यवाही करावी. नागरिकांना प्रदूषण रोखण्याच्या मोहिमेमध्ये सहभागी करून लोकचळवळ निर्माण झाली पाहिजे, असे या बैठकीत मा. मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

 मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत दिलेले निर्देश :

एक हजार टँकरच्या माध्यमातून पाण्याची फवारणी आणि रस्ते धुलाई

 मुंबईत विविध ठिकाणी सुरू असलेली बांधकामे, विकास प्रकल्पांची कामे यामुळे धुळीचे साम्राज्य पसरू नये म्हणून पाण्याची फवारणी करून रस्ते स्वच्छ करावीत. त्याचबरोबर साचलेली धूळ साफ करण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्याचे निर्देश मा. मुख्यमंत्र्यांनी दिले. रस्ते धुण्यासाठी टँकरची संख्या एक हजारपर्यंत वाढवावी, असे सांगतानाच मुंबईसह महानगर परिसरात ‘एमएमआरडीए’मार्फत विकास कामे सुरू आहेत, अशा बांधकाम ठिकाणांवर धूळ रोखण्यासाठी पत्रे लावतानाच ही सर्व ठिकाणे धुळमुक्त करण्याचे निर्देश मा. मुख्यमंत्र्यांनी दिले.

 मुंबईतील हवा प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महानगर पालिकेनतर्फे रस्ते आणि पदपथ पाण्याने धुवून काढले गेले. तसेच बांधकामांच्या ठिकाणी  धुळीने होणारे प्रदूषण रोखण्यासाठी स्प्रिंकलर, स्मॉग गन वापरण्याच्या सूचना केल्या गेल्या.   मुंबईतील प्रदूषणास कारणीभूत धुळीचे कण पसरु नये यासाठी रस्त्यांवर पाण्याचा मारा करण्यात येत होता.  सर्व २४ वॉर्डात ६० फुटांपेक्षा अधिक रुंदीचे रस्ते, वर्दळीचे पदपथ स्वच्छ करून ते पाण्याने धुवून काढण्याची कामे सध्या  वेगाने सुरु आहेत. सुमारे ६५० किलोमीटर लांबीचे रस्ते स्वच्छ करून धुण्यासाठी पाण्याचे टँकर, संयंत्रे, मनुष्यबळ नेमण्यात आले आहेत.  हे रस्ते धुण्यासाठी पुनर्प्रक्रिया केलेल्या तसेच स्थानिक स्त्रोतांमधील पाण्याचा वापर करण्यात येत आहे.

 बांधकामांच्या ठिकाणी स्प्रिंकलर, स्मॉग गन, यांसह  बांधकामाच्या जागी पत्रे व ताडपत्री बसवणे अशा विविध प्रकारच्या उपाययोजना राबविण्यासाठी महापालिकेने नियमावली जाहीर केल्यावर बिल्डरांना १५ दिवसांची मुदत दिली, खबरदारी म्हणून या उपाययोजना राबविण्यासाठी नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. मुंबई उपनगरातील मालाड भागात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बिल्डरांना अशा नोटीस देण्यात आल्या आहेत. तसेच महापालिका, मेट्रो, एमएमआरडीए यांच्यासह रस्ते, उड्डाणपूल, खोदकाम, अशी विविध कामे सुरू असलेल्या संबंधित २७ कंत्राटदारांनाही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

 मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनमानात व्यत्यय येऊ नये आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कमी वर्दळीच्याकालावधीत म्हणजे पहाटे ३ ते सकाळी ६ दरम्यान रस्ते धुण्याची  कामे केली जात आहेत. तर काहीविभागांमध्ये वर्दळ कमी असल्यास दुपारच्या अथवा सायंकाळच्या वेळेत ही कार्यवाही केली जात आहे. रस्ते व पदपथ धुण्याचे काम ३ ते ४ तासांत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

जिथे वाहनांची व नागरिकांची अधिक वर्दळ असते अशा रस्ते व पदपथांवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. पाणी टँकरची संख्या, टँकर फेऱ्यांची संख्या आणि पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या पुरवठ्याचा सर्वात जवळचा स्रोत यांचा समावेश तपशीलवार आराखड्यात करण्यात येत आहे. पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याचा तसेच तलाव, विहीर, कूपनलिका यामधील पाण्याचा वापर केला जात आहे.

 क्लीन-अप मार्शलची नियुक्ती

मुंबई महापालिकेच्या माध्यमातून हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी व प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी  विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. आता मुंबई महानगर पालिका प्रदूषण नियंत्रणासाठी  क्लीन-अप मार्शलची नियुक्ती करण्यात येणार असून राडारोडा, कचरा फेकणारे, प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्यांवर क्लीन-अप मार्शलची गस्त असणार आहे. प्रत्येक वॉर्डात ३० प्रमाणे ७२० क्लीन-अप मार्शलची नियुक्ती करण्यात येणार आहे.

 माती, डेब्रीज झाकून न्यावे

राज्यातील सर्व महापालिका, शहरांनी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे आणि मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करतानाच शहरातील सर्वाधिक प्रदूषण होणाऱ्या ठिकाणांवर नियंत्रण करावे. वाहनांमधून रस्त्यांवरील माती, डेब्रीज वाहून नेताना ती झाकून वाहतूक करावी. तसे न करणाऱ्या वाहनांवर वाहतूक विभागाने कारवाई करावी, असे मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले.

 वन क्षेत्र वाढवावे

राज्यातील महानगरांमध्ये नागरी वन क्षेत्र (मियावाकी) वाढविण्यासाठी महापालिकांनी पुढाकार घ्यावा. धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी स्प्रिंकलर्सचा वापर करा. हवेतील प्रदूषणावर उपाययोजना करताना संनियंत्रण करणे आवश्यक आहे. मुंबईमधील धुळीचे प्रदूषण कमी करण्यासाठी क्लाऊड सीडिंगचा प्रयोग करण्याचे निर्देश मा.  मुख्यमंत्र्यांनी दिले. प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांचा दर आठवड्याला आढावा सादर करण्याच्या सूचनाही शिंदे यांनी केल्या. या बैठकीत आयआयटीच्या तज्ज्ञांनी प्रदूषण कमी करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत माहिती दिली.

 वायू प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेतर्फे २४ प्रभागात पथके तैनात

 या प्रकल्पांच्या ठिकाणी प्रदूषण नियंत्रणासाठी असलेल्या यंत्रणांची भरारी पथकाच्या माध्यमातून तपासणी करण्यात करावी. महानगरपालिकेच्या यंत्रणेनेदेखील फेरतपासणी करून रिफायनरींच्या परिसरातील हवेच्या गुणवत्तेची खात्री करावी यासाठी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेतर्फे २४ प्रभागात पथके तैनात करण्यात आली.

पथकात दोन अभियंते, एक पोलीस, एक क्लीन-अप मार्शल असेल आणि त्यांचा प्रमुख एक पालिका अधिकारी यांचा समावेश करण्यात आला. या पथकाला एक वाहनही देण्यात आले.  पथकांनी बांधकामांच्या ठिकाणी अचानक भेट देऊन थेट  चित्रीकरण करावे आणि उपाययोजनांमध्ये कमतरता आढळून आल्यास तिथेच नोटीस बजावून अशी बांधकामे रोखावीत किंवा बांधकामाचे क्षेत्र सील करण्याची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.

 डिझेलवरील अवजड वाहनांना बंदी

डिझेलवर चालणाऱ्या आणि आठ वर्षांपेक्षा जुन्या अवजड वाहनांना मुंबईत प्रवेशासाठी बंदी घालावी, असेही मुंबई महापालिकेतर्फे तयार करण्यात आलेल्या  नियमावलीत म्हटले स्पष्ट केले.  त्याची जबाबदारी परिवहन विभागावर सोपवण्यात आली. बांधकाम साहित्य, राडारोडा ने-आण करणारी वाहने क्षमतेपेक्षा अधिक वजन वाहून नेणार नाहीत आणि वाहनांच्या चाकांची प्रत्येक खेपेनंतर व्यवस्थित स्वच्छता केली जात आहे, याची खातरजमा करण्यासाठी प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्याची सूचना पालिकेने केली.

 घनकचऱ्याची शास्त्रोक्त  विल्हेवाट

मुंबईतील वाढत्या प्रदूषणाची पातळी कमी करायची असल्यास शहरातील घनकचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याची गरज आहे. सद्य स्थितीत अस्तित्वास असलेल्या कचऱ्याचे जलदगतीने विघटन करण्यासाठी उपलब्ध असलेल्या पर्यायांचे सादरीकरण केंद्रीय नगरविकास मंत्रालयाच्या वतीने  करण्यात आले.

 या संदर्भात केंद्रीय नगर विकास आणि नागरी सुविधा मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्यासोबत दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून बैठक झाली.  यावेळी मुंबईतील क्षेपणभूमीवरील (डंपिंग ग्राऊंड) साठलेल्या कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी समिती नेमून आठवडाभरात त्याचा  कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मुंबईतील मुलुंड, कांजुरमार्ग आणि देवनार या क्षेपणभूमीवरील हजारो टन कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जलदगतीने विल्हेवाट लावली जावी, क्षेपणभूमीवरील कचऱ्याचे ढीग हटवावेत, असे मा. मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने गेल्या काही वर्षात या घनकचऱ्यापासून खत निर्मिती, वीज निर्मिती करणारे प्रकल्प सुरू करण्यात आले आहे. कांजुरमार्ग येथील वीज निर्मिती प्रकल्पासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रकल्प राबविण्यात यावा, असे मा. मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे मुंबईत उपलब्ध असणाऱ्या खारभुमीचा देखील पर्यावरणाची हानी होणार नाही याची दक्षता घेवुन सार्वजनिक कामाकरीता वापर करता येईल याबाबीकडे मा. मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

 


No comments:

Post a Comment

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...