Tuesday, October 31, 2023

पिंपरी चिॅचवड महापालिका शाळांचे शिक्षण बदलतेय, नाविन्यपूर्ण उपक्रमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण

हापालिका शाळांच्या शैक्षणिक कक्षा रुंदावत  आहेत. त्याचे चालते-बोलते उदाहरण आहे, पिंपरी चिॅचवड महापालिकांच्या शाळा. मुलांना शिक्षणाचे गोडी लागावी ततसेच विद्यार्थ्यांची शैक्षणिक गळती थांबावी यासाठी महापालिका नावीन्यपूर्ण उपक्रमांचे भरवत आहे.   करिअर मार्गदर्शन देण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना तणाव आणि दडपणांचा सामना करण्यास मदत करण्यासाठी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने  आपल्या नागरी शाळांसाठी समुपदेशकांची नियुक्ती केली आहे.  प्राथमिक शाळांमध्ये क्रीडा आणि कला शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी शाळांमध्ये वर्ग ग्रंथालयांच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. शाळांमधून वेगवेगळ्या शैक्षणिक उपक्रमांची अंमलबजावणी सक्षमपणे होण्यासाठी ११ प्राथमिक आणि ६ माध्यमिक शाळांमध्ये तंत्रस्नेही, होतकरू, कार्यमग्न शिक्षकांची  निवड करण्यात आली आहे. अभ्यासाव्यतिरिक्त विद्यार्थ्याच्या इतर कला गुणांना वाव मिळण्यासाठी प्रत्येक शनिवारी दप्तराविना शाळा हा उपक्रम भरवला जात आहे. ताज्या शालेय शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जिल्हास्तरावर गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांसाठी  भारतदर्शन सहलीचे आयोज करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी  मनपाच्या रुग्णालयाकडून आरोग्य तपासणी केली आते आहे. एकंदरीत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण तसेच शैक्षणीक विकासासाठी प्रयत्नशील आहे. पिंपरी-चिंचवड मधील  महापालिका शाळांचा दर्जा बदलण्यासाठी  पिंपरी-चिंचवड महापालिका करीत असलेल्या विविध  उपक्रमांविषयी  थोडे विस्ताराने पुढे दिले आहे. यातील काही उपक्रम हे शाळांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आहेत. तर काही उपक्रम हे  शाळांच्या प्रशासकीय बाबी व भौतिक सुविधांच्या सुधारण्यासाठी केलेले आहेत.    

डाटा एंट्री ऑपरेटर यांची नियुक्ती :  एकीकडे पालिकेचा शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी विविध उपक्रम राबवत आहे. मात्र, सध्या शिक्षकांना शासन, पालिकेला विविध अहवाल पाठविणे, संच मान्यतेसाठी विद्यार्थ्यांचा डाटा ऑनलाइन भरणे, वैद्यकीय तपासणीची माहिती भरणे, क्रीडा विषय माहिती ठेवणे यासह विद्यार्थ्यांचा सर्व डाटा जतन करणे, संगणकावर एक्‍सेल शीटमध्ये माहिती भरणे यासह विविध कामे करावी लागत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकविण्याऐवजी प्रशासकीय आणि इतर कामकाजात शिक्षकांचा जास्त वेळ जात आहे. यामुळे शिक्षकांचे मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे. याचा परिणाम थेट विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत आहे. त्यामुळे महापालिकेच्या शिक्षण विभागाने सर्व शाळांसाठी १०५ डाटा एन्ट्री ऑपरेटर कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमांच्या एकूण १०५ प्राथमिक, तर १८ माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये ४२ हजारपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थीसंख्या मोठी असताना महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकांची संख्या कमी आहे. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी पालिकेने सुमारे अडीचशे कंत्राटी शिक्षकांची भरती केली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रत्येक प्राथमिक शाळेसाठी डेटा एन्ट्री ऑपरेटर नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे. 

प्राथमिक शाळांमध्ये क्रीडा शिक्षक व कला शिक्षक नेमणूक : महापालिकेच्या सर्व शाळा स्मार्टकरण्याकडे  पालिका प्रशासनाची कल आहे. याच वेळी विद्यार्थ्यांच्या कला-क्रीडा या गुणांनाही वाव मिळणे गरजेचे आहे.  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमधून गोरगरिब विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.  त्यांना  जास्तीचे पैसे  भरून  कला-क्रीडा आदी शिक्षण घेणे जमत नाही. त्यामुळे  पिंपरी-चिंचवड महापालिकैच्या शाळांमधून ३२ प्राथमिक शाळांसाठी प्रायोगिक तत्वावर कला शिक्षक व क्रीडा शिक्षक नेमले जाणार आहेत. या शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया सध्या सुरू आहे.

समुपदेशकांची नियुक्ती :   पिंपरी चिंचवड  महापालिकेच्या १०५ प्राथमिक व१८ माध्यमिक शाळांमध्ये जवळपास ४५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हे विद्यार्थी हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आहेत. अशा विद्यार्थ्यांना आजूबाजूचे वातावरण, घरातील समस्या याचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवर होतो. त्यामुळे त्यांची मानसिकता स्थिर राहत नाही. एखादा विद्यार्थी सर्वसामान्य मुलांपेक्षा वेगळा वागत असेल तर त्याला कोणत्या अडचणी आहेत, हे जाणून घेणे आवश्यक असते.  तर अशाप्रकारे विद्यार्थ्यांच्या कौटुंबीक प्रतिकूल परिस्थितीचा विचार करत त्यांना मानसशास्त्रीय समुपदेशनाचा लाभ देण्याच्या उद्देशाने सुरुवातीला महापालिकेच्या १०५  'शाळांमध्ये हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे त्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे.  ५ शाळांसाठी  १ समुपदेशक या प्रमाणात २१ समुपदेशकांची नियुक्ती प्रक्रिया सुरू आहे. हे समुपदेशक बाल मानसशास्त्र, मानसोपचार आणि समाजशास्त्रातील तज्ञ आहेत आणि त्यांनी पूर्वी शाळा आणि इतर संस्थांमधील मुलांसाठी समुपदेशक म्हणून बाल कल्याण कार्यात सक्रिय सहभाग घेतला आहे.

वर्ग ग्रंथालय :   शालेय विद्यार्थ्यांमध्ये साक्षरतेला चालना देण्यासाठी आणि वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने १०५ पैकी ५० प्राथमिक शाळांमध्ये वर्ग ग्रंथालये उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी पिंपळे गुरव प्राथमिक शाळा क्रमांक ५४ येथे पहिल्या वर्ग ग्रंथालयांचे अनावरण  नुकतेच करण्यात आले. तुलिका, नॅशनल बुक ट्रस्ट, तसेच पराग इनिशिएटिव्ह (टाटा ट्रस्ट), रूम टू रीड आणि आकांक्षा फाउंडेशन यांसारख्या संस्थांनी या ग्रंथालयांसाठी पुस्तकांची निवड बारकाईने केली आहे. उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी, एक धोरणात्मक ग्रंथालय अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. यामध्ये पन्नास शाळांमधील प्रत्येकी एका शिक्षकाला सहभागी करण्यात आले. या शिक्षकांना त्यांच्या संबंधित शालेय संस्थांमध्ये ‘लायब्ररी चॅम्पियन’ होण्यासाठी प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. तसेच दर आठवड्याला नवनवीन वाचन पद्धती अवलंबण्यात येतील. पद्धतीद्वारे शैक्षणिक परिणामांचे विश्लेषण करण्यात येणार आहे.  ५० प्राथमिक शाळांमध्ये वर्ग ग्रंथालय निर्मितीची प्रक्रिया चालू आहे.  वर्ग ग्रंथालयांसाठी एकूण १ लाख ३८ हजार पुस्तके मागविण्यात आली आहेत. ज्ञानाचा हा खजिना ठेवण्यासाठी वर्गांमध्ये ६७७ कपाटांची सोय करण्यात येणार आहे. ही वर्गातील ग्रंथालये विद्यार्थ्यांमध्ये केवळ वाचनाची आवडच वाढवणार नाहीत तर सुदृढ, सक्षम तरुण पिढी निर्माण करण्यासाठी प्रोत्साहनही देणार आहेत. 

कोर टीम  : शाळेत वेगवेगळ्या शैक्षणिक उपक्रमांची अंमलबजावणी सक्षमपणे होण्यासाठी ११ प्राथमिक व ६ माध्यमिक तंत्रस्नेही, होतकरू, कार्यमग्न शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. या शिक्षकांना अदवितीय आणि यशस्वी शैक्षणिक पद्धतींचे अनुभव देण्यासाठी सहयाद्री शाळा खेड व ज्ञान प्रबोधिनी निगडी येथे अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. तसेच १ नोव्हेंबर ते ४ नोव्हेंबर २०२३ पर्यन्त दिल्ली येथील शाळांच्या अभ्यास दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे.

दफ्तर विना उपक्रम : पिंपरी चिंचवड  महापालिकेच्या शाळांमधून प्रत्येक शनिवारी दप्तराराविना शाळा भरते. पिंपरी-चिंचवड महापालिकेने सर्व १२८ शाळांमध्ये दर शनिवारी ‘दप्तराविना शाळा’ हा उपक्रम सुरू केला आहे. या नावीन्यपूर्ण उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या खांद्यावरचा भार हलका झाला आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये आता गीत, कविता, गायन, प्रश्नमंजूषा, शाब्दिक खेळ, पाककला, चित्रकला, मैदानी खेळ असे विविध उपक्रम घेण्यात येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कलात्मकतेला, तसेच पर्यावरणपूरकतेला प्रोत्साहन मिळत आहे.

दप्तराविना शाळा : विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी अशा उपक्रमांना प्रोत्साहन दिल्यास त्यांची शाळा उपस्थितीची गोडी वाढेल आणि आठवड्याभराच्या शारीरिक, मानसिक त्रासातून मुक्तता मिळेल, असा या उपक्रमाचा उद्देश आहे. ‘दप्तराविना शाळा’ उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची कल्पकता तर वाढलीच आहे; पण त्यांच्या कौशल्यालाही वाव मिळाला आहे. पालक आणि शिक्षकांनीही या अग्रेसर विचारसरणीचे कौतुक केले आहे. या उपक्रमाने विद्यार्थ्यांना जड दप्तरांच्या शारीरिक ओझ्यापासून मुक्ती तर मिळालीच आहे;  पण त्यांचा मानसिक भारही हलका केला आहे. जिज्ञासा आणि जीवनकौशल्ये यावर भर देऊन महापालिका शाळा खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना शाळेच्या वेशीपलीकडे सतत विकसित होत असलेल्या धावपळीच्या जगात हा उपक्रम पाऊल ठेवण्यास नक्कीच मदत करणार. 

भारत दर्शन सहल आयोजन :   महापालिका शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यावर भर दिला जात आहे. पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परिक्षांमध्ये राज्य स्तरावर किंवा गुणवत्ता यादीत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भारतदर्शन अभ्यास दौरा आयोजित केला जाणार आहे. त्यासाठीचा येण्या-जाण्यासह राहण्याचा खर्च महापालिका करेल. या अंतर्गत भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो), संरक्षण संशोधन व विकास संस्था (डीआरडीओ) अशा महत्त्वाच्या संस्थांसह भारतातील विविध स्थळांची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाईल. जिल्हास्तरावर कला, संस्कृती, इतिहास, संग्रहालय, विज्ञान व संशोधन विषयक स्थळांची माहिती होण्यासाठी दरवर्षी अभ्यासदौरा आयोजित केला जाणार आहे.  यंदा राज्य शालेय शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जिल्हास्तरावर गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना साऊथ रूट येथील ऐतिहासिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक स्थळांना भेटीचे आयोजन दि. १९ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर २०२३  असे केले आहे.

'जल्लोष शिक्षणाचा' : पिंपरी चिंचवड महानगरपालिका - शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी महानगरपालिकेच्या शाळेंच्या प्रयत्नांना सन्मानित करण्याच्या दृष्टीकोनातून 'जल्लोष शिक्षणाचा' उपक्रम सुरू केला आहे. गेल्या वर्षी २०२२ मध्ये , ८ शाळा प्रभाग विजेत्या म्हणून निवडल्या गेल्या होत्या आणि या ८ शाळेंपैकी पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची एक शाळा  सर्वोत्कृष्ट शाळा म्हणून ओळखली गेली होती. दोन दिवस चालणाऱ्याया उपक्रमात विद्यार्थ्यांना विज्ञानावर आधारीत कला सादरीकरणाची संधीही मिळाली होती. जल्लोष शिक्षणाचा अंतर्गत  शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक गुणात्मक, नावीन्यपूर्ण विचारवाढीसाठी विद्यार्थी व शाळा स्तरावर स्पर्धा घेतल्या जातात.  थोडक्यात  'जल्लोष शिक्षणाचा' मध्ये  स्पर्धा व शिक्षणोत्सवाचे आयोजन केले जाते. 

जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ : राज्यातील पहिले संतपीठ पिंपरी-चिंचवडमध्ये उभारण्यात आले. अल्पावधीतच संतपीठाचा लौकीक आंतरराष्ट्रीय पातळीवर झाला आहे. सीबीएसई बोर्डाच्या माध्यमातून इंग्रजी भाषेत दिल्या जाणाऱ्या शिक्षणाबरोबरच संत साहित्याचे शिक्षण देऊन भारतीय संस्कृती व परंपरेची शिकवणे देणे हे संतपीठाचे वैशिष्टय आहे. इयत्ता ज्युनियर केजी ते सातवी पर्यंत एकूण १२५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेच्या वेळापत्रकामध्ये शैक्षणिक विषयांसह संत साहित्य, तबला वादन, पखवाज वादन, श्लोक, अभंग, स्त्रोत, हरिपाठ पठण, संगीत, नृत्य हे विषय मुलांना शिकवले जातात. भारतभर कार्य केलेल्या अनेक संतांच्या जयंतीचे तसेच पुण्यतिथीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याची माहिती दिली जाते. जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ शाळेला सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन देणारी सर्वोत्कृष्ठ शाळा पुरस्कार जाहीर झाला आहे

गुणवत्ता सुधार प्रशिक्षण :  क्वॉलिटी कंट्रोल ऑफ इंडिया यांच्यासोबत तीन वर्षांसाठी करारनामा केला आहे. यामध्ये विद्यार्थी व शिक्षकांचे मूल्यांकन १०० टक्के केले जाते. . त्यानंतर निकालातील त्रूटी लक्षात घेऊन शैक्षणिक गुणवत्ता सुधारणा करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. 

प्रकल्प व्यवस्थापन ः शिक्षक, मुख्याध्यापक, सीएसआर अंतर्गत राबविले जाणारे विविध प्रकल्प यांच्यात समन्वय साधणे, माहिती आधारित नियोजन करणे, शाळांमध्ये विविध उपक्रमांचे मूल्यांकन करणे, नविन प्रस्ताव तयार करणे, शिक्षण विषयक पद्धतीमध्ये सुधारणा करणे. बालवाडी व शाळांची गुणवत्ता वाढीस मदत करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन उपक्रम राबविला जातो. त्यासाठी शिक्षण विभागात दोन व क्षेत्रीय स्तरावर पाच असे मनुष्यबळ उपलब्ध करून दिले  जाते. 

डी. बी. टी. (Direct Benefit Transfer) - १ली - ४थी च्या विद्यार्थ्यांसाठी रु.३५००/- व ५वी १० वी च्या विदयार्थ्यांसाठी रु.३७००/- याप्रमाणे ४१,६६० पालकांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे.

शाळांकरिता सारथी तक्रार पोर्टलची अंमलबजावणी - शाळांमधील भौतिक सुविधा, तांत्रिक बाबी इ. विषयक तक्रारींचे निवारण वेळेत करण्यासाठी सारथी पोर्टलद्वारे तक्रार नोंदवण्याची सोय करण्यात आली आहे. दि.०१/०३/२०२३ ते दि. १२/१०/२०२३ या कालावधीत एकूण २४० तक्रारी प्राप्त झाल्या, त्यापैकी २०४ तक्रारींचे निवारण झाले आहे. 

भौतिक सुविधा अद्ययावत करणे व वॉटर फिल्ट सुविधा देणे - गेल्या वर्षी  २०२२ मध्ये ३७ प्राथमिक शाळांमध्ये भौतिक सुविधा अद्ययावत करण्याचे काम सुरू केले होते. या वर्षी ६८ प्राथमिक शाळांमध्ये भौतिक सुविधा निर्माण करण्याचे काम सुरू होणार आहे. मनपाच्या सर्व शाळांतील इमारतीमध्ये वॉटर फिल्टर उपलब्ध करून दिले जाणार आहेत. 

ज्ञानमेव शक्ति: मनपा शाळांसाठी एक सारखे नाव असावे याकरिता पी.सी. एम.सी. पब्लिक स्कूल हे नाव आणि "ज्ञानमेव शक्ति:" असे ब्रीदवाक्य निश्चित करण्यात आले आहे.

ऑनलाइन शिक्षक बदली - उपशिक्षकांची ऑनलाइन बदली प्रक्रिया पूर्ण झाली आहे. बाला प्रकल्प व AIप्रकल्पापैकी  ४० शाळांमध्ये बाला प्रकल्प पूर्ण झाला आहे. त्यासाठी १,२३,००० स्क्वे. मी. क्षेत्रात काम करणेत आले आहे.

मनपा तर्फे विद्यार्थी आरोग्य तपासणी - सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणीसाठी मनपाच्या रुग्णालयांकडून करण्यात येईल. ही तपासणी  स्मार्ट हेल्थकेअर अंतर्गत  शैक्षणिक वर्षात जुलै, ऑगस्ट आणि डिसेंबर, जानेवारी या महिन्यांत सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. त्यासाठी वेळापत्रक तयार केले असून शारीरिक दोष असलेल्या विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार केले जातात. 

अशाप्रकारे पिंपरी-चिंचवड महापालिका  आपल्या शाळांमधून विद्यार्थ्याचे भवितव्य उज्जवल करण्यासाठी प्रयत्नशील आहे.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

No comments:

Post a Comment

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...