Saturday, October 28, 2023

स्वच्छ आणि शुद्ध हवेसाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रयत्न

वाढत्या प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता वारंवार खालावत चालली आहे. सध्या मुंबई आणि उपनगरातील  हवा अत्यंत वाईट असल्याची नोंद झाली आहे. यंदा फेब्रुवारीमध्ये जगातील सर्वात प्रदूषित शहरांमध्ये मुंबईची गणना झाली. त्यानंतर पावसाळ्यात हवेचा दर्जा काहीसा सुधारला. मात्र, मोसमी पावसाने मुंबईचा निरोप घेताच पुन्हा एकदा मुंबईच्या हवेत प्रदूषके साचून राहू लागली आहेत. देशातील प्रदूषित शहर अशीच ख्याती असलेल्या दिल्लीपेक्षाही मुंबईतील प्रदूषणाचे प्रमाण अधिक आहे. मुंबई आणि इतर उपनगरांमध्ये अशी परिस्थिती असतानाच राज्यातील काही महत्त्वाच्या शहरातही परिस्थिती काही वेगळी नाही. त्यामुळे स्वच्छ आणि शुद्ध हवेसाठी नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी कशोशीने प्रयत्न सुरु केले आहेत, त्याचाच घेतलेला हा आढावा... 

शहरात प्रदूषित हवा आणि धूळ का निर्माण होते ?

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून मुंबईतील प्रदूषणाचे प्रमाण वाढत असल्याचे विविध संस्थांनी सादर केलेल्या अहवालांतून दिसते. दरवर्षी साधारणपणे थंडीची चाहूल लागताच मुंबईच्या हवेचा दर्जाही ढासळू लागतो. गेल्या वर्षी (२०२२) डिसेंबर, यंदा जानेवारी, फेब्रुवारीमध्ये मुंबईच्या हवेची स्थिती वाईट झाली ती अगदी मार्च अखेरपर्यंत होती. पावसाळ्यानंतर मुंबईतील वाऱ्यांची स्थिती बदलते, वेग मंदावतो. त्यामुळे हवेत साचलेली धूळ, प्रदूषके यांचा निचरा होत नाही. बाष्पामुळे धुलीकण हवेतच तरंगत राहतात. या नैसर्गिक कारणांबरोबच अनेक मानवनिर्मित कारणेही मुंबईच्या प्रदूषणात भर घालत आहेत. पायाभूत सुविधा, रहिवासी व  व्यावसायिक संकुले, नवे प्रकल्प यांची बांधकामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. त्यातून उडणारी धूळ हवेचा दर्जा ढासळण्यास कारणीभूत ठरत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांकडून नोंदवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे वाहनांतून बाहेर पडणाऱ्या धुरांमध्ये अति-अतिसूक्ष्म काजळीसारखे कण असतात. हे कण एकत्र येऊन वातावरणातील प्रदूषण वाढविण्यास कारणीभूत ठरतात. नुकत्याच 'सरस' या पर्यावरण संस्थेने जाहीर केलेल्या अहवालात मुंबईची हवा प्रदूषित असल्याचे जाहीर केले. 

ठराविक कालावधीत हवेतील प्रदूषकांचे प्रमाण किती त्यानुसार हवेचा गुणवत्ता निर्देशांक निश्चित केला जातो. राष्ट्रीय वातावरणीय वायू गुणवत्ता मानकानुसार एक्यूआयची स्थिती ०-१०० असल्यास ठीक, १०१-२०० असल्यास सामान्य, २०१-३०० वाईट, ३०२-४०० अत्यंत वाईट, ४०० पेक्षा जास्त असल्यास धोक्याची पातळी ओलांडलेली असून चिंताजनक परिस्थिती असते.

स्वच्छ आणि शुद्ध हवेसाठी मुंबई महापालिकेचे प्रयत्न : 

२०२३-२४ च्या मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात हवा प्रदूषण रोखण्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. यात स्वच्छ हवेसाठी मुंबई महापालिका पाच ट्राफिक जंक्शनवर एअर प्युरिफायर बसवणार असून हे प्युरिफायर हवेची गुणवत्ता तपासणार आहेत. सक्शन मशीनच्या साहाय्याने हवा शोषून शुद्ध करून ती पुन्हा वातावरणात सोडण्यात येणार आहे. 'मुंबई क्लीन एअर क्वालिटी प्रोग्रॅम' अंतर्गत हा उपक्रम राबवण्यात येत आहे.  

मुंबई महापालिकेने कठोर उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. ही कठोर उपाय योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. या उपाय योजनेनुसार बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी १५ दिवसांत स्प्रिंक्लर आणि महिनाभरात स्मॉग गन लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही उपकरणे लावली नाहीत तर मुंबई महापालिका विकासकाला जागच्या जागी 'स्टॉप वर्क' नोटीस बजावणार आहे. महापालिकेतर्फे विशेष नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

काय आहे नियमावली 

  • एक एकर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रात बांधकाम असलेल्या जागेच्या अवतीभोवती किमान ३५ फूट उंचीचे लोखंडी / पत्र्यांचे आच्छादन असावे. 
  • त्या शिवाय संपूर्ण बांधकाम क्षेत्र ज्यूट किंवा हिरव्या कपड्याने झाकलेले असावे. 
  • क्ष प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी स्प्रिंक्लर असावेत. 
  • धूळ उडू नये यासाठी दिवसातून किमान ४ ते ५ वेळा पाण्याची फवारणी करावी.
  • रस्त्यांवरील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी ॲंटी स्मॉग मशीन लावावीत. 
  • प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी स्वतंत्र वायू गुणवत्ता निर्देशांक मोजणारी यंत्रणा बसवावी. 
  • बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या मनुष्यबळाच्या संरक्षणासाठी मास्क, चष्मा इत्यादी संरक्षण साहित्य दिले जावे. 
  • डेब्रिज वाहतूक करणारे वाहन झाकलेले असावे. 
  • डेब्रिज ने-आण करताना प्रत्येक खेपेच्या वेळी तुषार फवारणी करावी. प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावावेत.

महापालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांतर्गत (वॉर्ड) येणाऱ्या बांधकाम ठिकाणांची पाहणी करण्यासाठी तातडीने विशेष पथके स्थापन करण्यात येणार आहेत. प्रत्येक विभागात दोन ते सहा पथके तयार करण्याच्या सूचना देण्यात येतील. पथकात दोन अभियंते, एक पोलीस, एक क्लीन-अप मार्शल असेल आणि त्यांचा प्रमुख एक पालिका अधिकारी असेल. या पथकाला एक वाहनही देण्यात येईल. पथकांनी बांधकामांच्या ठिकाणी अचानक भेट देऊन थेट  चित्रीकरण करावे आणि उपाययोजनांमध्ये कमतरता आढळून आल्यास तिथेच नोटीस बजावून अशी बांधकामे रोखावीत किंवा बांधकामाचे क्षेत्र सील करण्याची कारवाई करावी, असे पालिकेने नियमावलीत म्हटले आहे.  मुंबईतील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिकेने उघड्यावर कचरा जाळण्यास बंदी घातली आहे. या सोबतच नवी नियमावली देखील जारी केली असून याचे उल्लंघन केल्यास आता घेत कारवाई केली जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६ हजार बांधकाम प्रकल्पांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.  देवनार आणि कांजूरमार्ग येथील दोन लँडफिलमध्ये कचऱ्याचे वर्गीकरण करून यातील धोकादायक आणि प्रदूषणाला हानिकारक ठरणारा कचरा वेगळा करण्यात येणार आहे. या साठी लवकरच प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.विशेषतः कचरा डंपिंग ग्राउंड आणि कचरा जाळण्याची संभाव्य ठिकानावर कचरा उघड्यावर जाळण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

शहर स्वच्छ कृती आराखड्याच्या माध्यमातून नवी मुंबई शहर स्वच्छ होतेय.. 

 केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शुध्द हवा कार्यक्रमाची नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने नवी मुंबई शहर स्वच्छ हवा कृती आराखडा तयार करण्यात आला असून त्या अनुषंगाने कृतीशील पावले उचलण्यात आहेत. त्याकरिता विविध उपक्रम राबविले जात असून पर्यावरणपूरक उपाययोजनांव्दारे हवा गुणवत्तावाढीसाठी प्रत्यक्ष कार्यवाही करण्यात येत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शहर स्वच्छ हवा कृती आराखडयाच्या अनुषंगाने हवेतील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी रस्ते नियमीतपणे धुणे, त्यासाठी पुनर्प्रक्रियाकृत पाणी वापरुन पिण्याच्या पाण्याची बचत करणे, मुख्य रहदारीच्या चौकातील कारंजे नियमीत सुरु ठेवणे व त्यातही पुनर्प्रक्रियाकृत पाण्याचा वापर करणे, फ्लेमिंगो पाँईंट्सचे संवर्धन करणे. धुलीकण प्रदूषण करणा-या आरएमसी प्लान्टवर कारवाई करणे अशा विविध प्रकारे वायू प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

या पुढील कालावधीत स्वच्छ हवा कृती आराखड्यांतर्गत जास्त प्रमाणात धूळ निर्माण होते अशा ठिकाणी वॉटर स्प्रिंकलर सिस्टिमचा वापर करण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्यात यावीत असे निश्चित करण्यात आले. एमआयडीसी क्षेत्रातील सुरू असलेल्या कामांच्या ठिकाणी धूळ प्रतिबंधक उपायोजना राबविणेबाबत संबंधितांना एमआयडीसी मार्फत सूचना देण्यात याव्यात असे निश्चित करण्यात आले. नवी मुंबई विमानतळाचे काम गतीमानतेने सुरु असुन त्याठिकाणी मोठया प्रमाणात निर्माण होणा-या धूळीचा प्रतिकुल परिणाम व अतिरिक्त ताण शहरातील हवेवर पडत असून याबाबत सिडको प्रशासनाशी उच्च पातळीवर चर्चा करण्यात यावी व हवा प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक  त्या उपाययोजना प्रभावी रितीने व्यापक स्वरुपात राबविण्याचे काम त्यांच्याकडून करवून घ्यावे असे ठरविण्यात आले. महापालिका क्षेत्रात सुरु असलेल्या इमारती व इतर बांधकामाच्या ठिकाणीही प्रदूषण प्रतिबंधक उपाययोजना काटेकोरपणे राबविण्यात याव्यात याकडे विभाग कार्यालय स्तरावरुन बारकाईने  लक्ष देण्यात येत आहे.  

नवी मुंबई महानगरपालिकेने दोन धूळ आटोक्यात आणणारी वाहने खरेदी केली आहेत जी धुळीच्या कणांचा बंदोबस्त करण्यासाठी पाण्याचे सूक्ष्म धुके म्हणून विखुरतील. नवी मुंबई महापालिकेची लवकरच आणखी दोन वाहने जोडण्याची योजना आहे, ज्याचा ताफा दुसऱ्या टप्प्यात सहा पर्यंत वाढेल. विविध भागात धूळ रोखणे आणि कमी करणे यावर लक्ष केंद्रित केले आहे. 

पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा कार्यान्वित 

वाढते शहरीकरण आणि औद्योगिकरणामुळे हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत चालल्याने हवा शुद्ध होण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण विभागाने पुढाकार घेतला आहे. शहराच्या विविध भागांत हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा एअर बिन प्युरिफायर बसविण्यात येणार आहे. त्यानुसार वाकडमधील कस्पटे वस्तीमध्ये प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसविली आहे.

महापालिकेच्या वतीने पिंपरी चौकात जानेवारी महिन्यात शहरातील हवेची गुणवत्ता दर्शविण्यासाठी कृत्रिम फुफ्फुसे बसविली होती. ती महिनाभरातच काळी पडली होती. त्यातून शहराची गुणवत्ता किती ढासळत आहे, हे सिद्ध झाले होते. हवेमध्ये प्रदूषक कणांची पातळी वाढली. त्यामुळे महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या वतीने शहरातील महत्त्वाच्या चौकात हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसविण्यात आली  आहे. त्यानुसार वाकडमधील कस्पटे वस्तीमध्ये यंत्रणा बसविली असून लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे.

तसेच महापालिकेतर्फे रस्त्यांसाठी ८ विद्युत स्वीपिंग मशीन खरेदी करण्यात येणार आहेत. जेणेकरून रस्त्यावर साचणारी धुळे आटोक्यात आणणे शक्य होईल. तसेच महापालिकेतर्फे रस्ते धुण्यासाठी दोन वाहने खरेदी करण्यात आली आहेत. 

विशेष म्हणजे जास्त प्रमाणात वाहतूककोंडी होणाऱ्या चौकात महापालिकेतर्फे १३ कारंजे बसवण्यात येणार आहेत.

हवेचा दर्जा ढासळलेला असताना नागरिकांनी काय काळजी घ्यावी ?

प्रदूषणामुळे श्वसन आणि त्वचेशी संबंधित आजार वाढत आहेत. श्वसन विकारात दमा, क्षयरोग, न्युमोनिया, फुप्फुसे कर्करोग, श्वसन नलिकेला सूज, दम लागणे असे विकार, तर त्वचेची अ‍ॅलर्जी, त्वचा कोरडी राहणे, फाटणे, लाल होणे, खाज येणे अशा समस्यांचे प्रमाण वाढते आहे. ताप येणे, डोळे दुखणे, घसा दुखणे आदी आजार उद्भवत आहेत. सकाळी आणि सायंकाळी धुरक्याचे प्रमाण जास्त असते. अशा वेळी घराबाहेर पडणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. थंड पेये प्राशन, तेलकट खाणे वर्ज्य करावे. लहान मुले, वयोवृद्ध यांच्यासाठी हे वातावरण धोकादायक असल्याने त्यांनी विशेष काळजी घ्यावी. बाहेर पडताना मुखपट्टी वापरावी.

वाढते शहरीकरण आणि औद्योगिकरणामुळे हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत चालल्याने हवा शुद्ध होण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण विभागाने पुढाकार घेतला आहे. शहराच्या विविध भागांत हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा एअर बिन प्युरिफायर बसविण्यात येणार आहे. त्यानुसार वाकडमधील कस्पटे वस्तीमध्ये प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसविली आहे.

महापालिकेच्या वतीने पिंपरी चौकात जानेवारी महिन्यात शहरातील हवेची गुणवत्ता दर्शविण्यासाठी कृत्रिम फुफ्फुसे बसविली होती. ती महिनाभरातच काळी पडली होती. त्यातून शहराची गुणवत्ता किती ढासळत आहे, हे सिद्ध झाले होते. हवेमध्ये प्रदूषक कणांची पातळी वाढली. त्यामुळे महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या वतीने शहरातील महत्त्वाच्या चौकात हवा प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसविण्यात आली  आहे. त्यानुसार वाकडमधील कस्पटे वस्तीमध्ये यंत्रणा बसविली असून लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे.

तसेच महापालिकेतर्फे रस्त्यांसाठी ८ विद्युत स्वीपिंग मशीन खरेदी करण्यात येणार आहेत. जेणेकरून रस्त्यावर साचणारी धुळे आटोक्यात आणणे शक्य होईल. तसेच महापालिकेतर्फे रस्ते धुण्यासाठी दोन वाहने खरेदी करण्यात आली आहेत. 

विशेष म्हणजे जास्त प्रमाणात वाहतूककोंडी होणाऱ्या चौकात महापालिकेतर्फे १३ कारंजे बसवण्यात येणार आहेत.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

No comments:

Post a Comment

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...