Friday, October 13, 2023

महापालिकांची हरित उत्सव प्रेरणा...

माझी  वसुंधरा अभियान अंतर्गत प्रत्येक उत्सव हा  कसा ;हरित उस्तव' होईल  यासाठी  राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था विशेष प्रयत्नशील आहेत.  त्यासाठी विविध प्रकारे जनजागृतीचे केली जात आहे. माझी वसुंधरा अभियान ४. 0” अंतर्गत गणेशोत्सव तसेच नवरात्रोत्सवात जमा होणाऱ्या निर्माल्यातून खतनिर्मिती करण्याकडे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा विशेष कल आहे. 

मुंबईतील श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून यंदाही विविध सोयी-सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. दहा दिवसांच्या कालावधीत श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी मुंबई महापालिकेकडून विशेष तयारी करण्यात आली होती.  मुंबईत गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या कालावधीत पार पडलेल्या गणेशोत्सवात६९  नैसर्गिक आणि २००  कृत्रिम तलावांच्या ठिकाणी हार, फुले, दुर्वा आदी मिळून एकूण ५०० मेट्रिक टन इतके निर्माल्य जमा झाले आहे. महापालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांमध्ये असणा-या सेंद्रीय खतनिर्मिती प्रकल्पांमध्ये हे निर्माल्य हलविण्यात आले आहे. मुंबईतील २४७ नैसर्गिक आणि कृत्रिम तलावाच्या ठिकाणी मिळून३७१ निर्माल्य कलश ठेवण्यात आले होते. तसेच ९८ वाहनांचा वापर करून हे निर्माल्य खतनिर्मितीसाठी पाठवण्यात आले. निर्माल्यापासून खतनिर्मिती करण्याच्या प्रक्रियेस सुरूवातही झाली आहे. पुढील साधारपणे एका महिन्याच्या कालावधीत ह्या सर्व निर्माल्याचे रूपांतर सेंद्रिय खतामध्ये होईल. तयार होणारे हे सेंद्रीय खत महानगरपालिका उद्यानांमध्ये खत म्हणून वापरण्यात येणार आहे, 

गेली १२ वर्षे  ठाणे महापालिका  गणेशोत्सव काळातील निर्माल्यव्यवस्थापन करीत आहे. यंदा दीड दिवसाच्या गणपतीत १० टनांहून अधिक निर्माल्य संकलित करण्यात आले आहे. या निर्माल्यावर प्रक्रिया करून ते सेंद्रिय खत निर्मितीस पाठविले गेला तेच.  तसेच निर्माल्यातील अविघटनशील घटकांचे वर्गीकरण करून ते पुनर्प्रक्रियेसाठी वेगळे काढले आहेत, या वर्षी प्लास्टिक, थर्मोकोल अशा अविघटनशील घटकांचे निर्माल्यातील प्रमाण   लक्षणीयरित्या कमी झाले असून केवळ ४ टक्केच म्हणजे ४०० किलोच अजैविक कचरा आढळला. गेल्या १२ वर्षांच्या सातत्यपूर्ण जनजागृती, कृतीरूप कार्यक्रमांमुळे हे शक्य झाले आहे. दीड दिवसांच्या गणपतीसोबत पाच, सात आणि दहा दिवसांच्या गणपतीच्या विजर्सनाच्यावेळीही ३०  निर्माल्य संकलित करण्यात आले. 

वसई-विरार शहर महापालिकेतर्फे 'इको गणेशा २०२३ ' या संकल्पनेअंतर्गत पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले . त्याअनुषंगाने विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आले.  गेल्या वर्षी म्हणजे २०२२ मध्ये निर्माल्यापासून खतनिर्मिती करण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर, यंदाच्या गणेशोत्सवातही निर्माल्यापासून खतनिर्मिती करण्याची प्रक्रिया पालिकेकडून सुरू करण्यात आली आहे. यासाठी आठ महिला बचत गटांना काम देण्यात आले आहे.

वसई-विरार शहरात विसर्जनादरम्यान मोठ्या प्रमाणात हारफुले, केळीचे खांब आदींचे निर्माल्य तयार होत असते. हे निर्माल्य तलाव, समुद्र, नदी, खाड्यांमध्ये टाकून दिले जाते. त्यामुळे पाणी प्रदूषित होते. हे टाळण्यासाठी या निर्माल्याचे संकलन करून खतनिर्मिती करण्याची संकल्पना आयुक्त अनिलकुमार पवार यांनी मांडली होती. त्यानुसार शहरात ५८ ठिकाणी १०५ कृत्रिम तलाव उभारण्यात आले. या कृत्रिम तलावाच्या ठिकाणी निर्माल्य संकलित केले गेले आहे. . या निर्माल्यापासून महिला बचत गटांतर्फे नैसर्गिकरित्या खतनिर्मिती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यंदा आठ महिला बचत गटांमार्फत हे काम सुरू करण्यात आले आहे. प्रभाग समिती 'ए' (बोळींज) आणि प्रभाग समिती 'सी' (चंदनसार) यामध्ये निर्माल्यापासून खतनिर्मितीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मनू तलाव नानभाट, शंकर मंदिर तलाव, वटार भोंगाळे तलाव, साई यशवंती मंदिर, रानपाडा तलाव, राम मंदिर, रानाळे तलाव मनवेलपाडा, बर्फेश्वर तलाव अशा ठिकाणी खतनिर्मिती केली जाणार आहे. 

२०२२ मध्ये वसई-विरार महापालिकेने बचत गटांना खतनिर्मितीसाठी दिले होते. यामध्ये उमादेवी महिला बचत गट, केजीएन महिला बचत गट, नजराणा महिला बचत गट, एकविरा बचत गट अशा चार गटांचा सामावेश होता. या निर्माल्यामधील अनावश्यक घटक बाजूला करून उरलेल्या हारफुलांवर प्रक्रिया करून तीन हजार ४०० किलो खताची निर्मिती केली. त्यामुळे यंदाचे आठ महिला बचत गट निर्माल्यापासून किती किलो खताची निर्मिती करतात. याकडे लक्ष लागले आहे. 

उल्हासनगर महापालिकेने गणेशोत्सवांदरम्यान  ओला आणि सुका अशा निर्माल्याचे वर्गीकरण करून ७ मेट्रिक टन निर्माल्यावर हिराघाट येथील बोट क्लबमध्ये कम्पोस्टिंग करण्यात येत आहे. त्यातून ६ महिन्यांत सेंद्रिय खताची निर्मिती होणार आहे.निर्माल्यातून तयार होणाऱ्या खताचा वापर शहरामधील सर्व उद्याने, प्रभाग समिती कार्यालय आवारातील झाडे आणि रस्त्याच्या दुभाजकामधील झाडांसाठी केला जाणार आहे. जेणेंकरून  या झाडांच्या मुळांना बळकटी मिळणार असून ते जास्त प्रमाणात टिकाऊ होतील.

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेनेही निर्माल्य संकल मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेद्वारे दिवसाला २१ हजार किलो निर्माल्य जमा झाले आहे. या निर्माल्यावर खतनिर्मितीस सुरुवात केली आहे. 

गणेशोत्सवात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने विविध उपक्रम राबविले होते. विसर्जन तलावांवर निर्माल्य संकलन व त्याची वाहतूक करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी केली केली होती. दहा दिवसामध्ये ५८.७९ टन निर्माल्य संकलीत झाले असून त्यामधून तुर्भेमध्ये खतनिर्मीती केली

जाणार आहे.  निर्माल्यामध्ये फुले, दुर्वा, पुष्पमाळा, शमी, फळांच्या साली यांचा समावेश आहे. याशिवाय सामाजिक संस्थांच्या माध्यमातून तीन ठिकाणी खतनिर्मीती करण्यात येणार आहे.

पुणे शहरात  गणेशोत्सव काळात  गणेशोत्सवाची सुरुवात ते  अनंतचतुर्दशीच्या काळात प्रतिदिवशी    १ लाख ३५ हजार ११२ किलो निर्माल्य घनकचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचार्‍यांनी गोळा केले आहे. या निर्माल्यावर प्रक्रिया करून महापालिका त्यापासून खत निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. 

“माझी वसुंधरा अभियान ४. 0” अंतर्गत समस्त आळंदी पंचक्रोशीत यंदाचा गणेश उत्सव हा पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा यासाठी गणेश मुर्त्यांचे विसर्जन नदी पत्रात न करता नगरपरिषदेच्या मूर्ती संकलन केंद्रावर मूर्ती दान करावे या नगरपरिषदेच्या आवाहनास आळंदीकरांनी  उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. यामुळे साधारणपणे १०,०००  गणेश मुर्त्या व ७ टन निर्माल्याचे संकलन आळंदी नगरपरिषदने केले आहे. 

नागपूर महानगर पालिकेने गणेशोत्सवात यंदा सार्वजनिक गणेश मंडळ तसेच घराघरातून पावणेदोनशे टन निर्माल्य गोळा केले. गेल्या  वर्षीच्या तुलनेत यंदा निर्माल्यात वाढ झाली असून भांडेवाडी येथे या निर्माल्यातून २५ ते ३० टन गांडूळ खत तयार करण्यात येणार असून त्याचा वापर मनपा व नासुप्रच्या उद्यानांमध्ये केला जाणार आहे.

यंदा नागपूर महापालिकेने दहाही झोनमधून निर्माल्य संकलनासाठी रथ तयार केला होता. याशिवाय कृत्रिम विसर्जन टॅंकजवळही निर्माल्य कलश बनविले होते. दहाही झोन तसेच कोराडी येथील विसर्जन टॅंकजवळील निर्माल्य कलशातून १७८.२ टन निर्माल्य गोळा करण्यात आले. निर्माल्य संकलनासाठी प्रत्येक झोनमध्ये पाच-पाच निर्माल्य रथाची व्यवस्था महापालिकेने केली होती. याशिवाय प्रत्येकी दोन वाहने अतिरिक्त ठेवण्यात आली होती.

सार्वजनिक गणेश मंडळाचे निर्माल्य गोळा करण्यासाठी निर्माल्य रथची सुविधा नागपूर महापालिकेने केली होती.   याशिवाय नागरिकांनाही त्यांच्या घरातील निर्माल्य सार्वजनिक गणेश मंडळाच्या निर्माल्य कलशमध्ये टाकण्याचे आवाहन करण्यात आले होते. लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली, नेहरूनगर झोनमधून निर्माल्य संकलनाची जबाबदारी एजी एन्व्हायरो कंपनीकडे होती तर गांधीबाग, सतरंजीपुरा, लकडगंज, आशीनगर व मंगळवारी झोनमधील निर्माल्य संकलनाची जबाबदारी बीव्हीजी या कंपनीकडे होती. 

अशाप्रकारे माझी वसुंधरा अभियान ४. 0”  राज्यभरातील विविध स्थानिक स्वराज्य संस्था निर्माल्यापासून खात निर्मितीचे प्रकल्प राबवित आहेत; ते नक्कीच कौतुकास्पद आहे.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

No comments:

Post a Comment

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...