Friday, September 22, 2023

महानगरपालिकांचे इको फ्रेंडली गणेशोत्सवासाठी प्रयत्न

ध्या संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धूम आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने गणेशोत्सव साजरा करण्यात व्यस्त आहे.  संपूर्ण राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था सुद्धा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. त्याही इको  फ्रेंडली  पद्धतीने. माझी वसुंधरा अभियान, स्वच्छ महाराष्ट्र अभियानाला साजेसा गणेशोत्सव  महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था साजरा करीत आहेत. 

मुंबई महानगर क्षेत्रातील मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, वसई- विरार, पालघर या शहरांमध्ये घरोघरी आणि मंडळांकडूनही गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो.  त्याचप्रमाणे  नाशिक, पुणे, चंद्रपूर, नागपूर या महानगरपालिका क्षेत्रांमध्येही गणेशोत्सव  धूमधडाक्यात साजरा करण्यात येतो. महापालिका या गणेशोत्सवाला इको फ्रेंडली टाच देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. 

सर्वप्रथम मुंबई महानगर पालिकेने एक सोसायटी, एक गणपती ही संकल्पना राबविण्यास पुढाकार घेतला आहे. अशी संकल्पना राबविणाऱ्या सोसायटींना आकर्षक बक्षीसे जाहीर केली आहेत. 

यंदा शाडू माती आणि पर्यावरणपूरक साहित्यांपासून गणेशमूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मुंबई  पालिकेने शाडूची माती निःशुल्क उपलब्ध करून दिली आहे. या उपक्रमांतर्गत मूर्तिकारांना यंदा ३६१ मेट्रिक टनांचे वाटण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

यातून ३० हजार मूर्ती बनविण्यात आल्या. यंदाच्या वर्षी प्रायोगिक स्तरावर शाडूची माती 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वावर देण्यातन आली असून, त्याच्या तब्बल ९ हजार २९ बॅगा वाटण्यात आल्या. निसर्गास हानी पोहोचू नये, तसेच पर्यावरणपूरक पद्धतीने विविध उत्सव आयोजित केले जावेत यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. यंदाचागणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा म्हणून पालिकेच्या वतीनेमोफत शाडूच्या मातीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात भाविक आणि मूर्तिकारांना पालिकेच्या वतीने मार्गदर्शक सूचनाही दिल्या आहेत. तसेच विसर्जनचा  रस्ताही  पालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. 

सार्वजनिक, तसेच घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्या भाविकांना शाडूच्या मातीपासून मूर्ती बनविण्याचे, तसेच घरगुती गणपती हे पर्यावरणस्नेही साहित्यांनी बनविण्याचे आवाहन मुंबई  पालिकेने यंदा अनेकदा केले आहे. त्याचबरोबर घरगुती गणपतीची उंची चार फुटांपर्यंत मर्यादित ठेवून कृत्रिम तलावांतच विसर्जन करण्याचेही आवाहन केले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनाही पर्यावरणस्नेही उत्सवासाठी आवाहन करून मूर्तीची उंची शक्य तितकी कमी ठेवत चार फुटांपर्यंतच्या उंचीची मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित करण्याचे आवाहन केले आहे.

गणेशोत्सवात नागरिकांना उपलब्ध करण्यात येणाऱ्या सोयी सुविधांवर महानगरपालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. मुंबईमधील घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या लक्षात घेऊन महानगरपालिकेने गणेशnविसर्जनासाठी कृत्रिम तलावांबरोबरच फिरत्या कृत्रिम तलावांची सुविधाही उपलब्ध यंदा २५० कृत्रिम तलाव उभारण्याची तयारी, १५ फिरते हौद करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईमध्ये दोन लाखांहून अधिक घरगुती गणपती, तर सुमारे १२ हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. घरगुती  तसेच सार्वजनीक गणेशमूर्तीचे विसर्जन हे दीड, पाच, सात, नऊ आणि अनंत चतुदर्शी दिवशी मोठ्या प्रमाणावर होत असते. नागरिकांना घराजवळ गणेश विसर्जन करता यावे, वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच नैसर्गिक स्त्रोतांमधील प्रदूषण टळावे यासाठी ठिकठिकाणी कृत्रिम तलावांची सुविधा उपलब्ध करण्यात येते.  मुंबई महानगरपालिकेने यंदा सुमारे २५० कृत्रिम तलाव उभारण्याची तयारी केली आहे. आतापर्यंत २०० कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात महानगरपालिकेला यश आले आहे. उर्वरित कृत्रिम तलाव उभारण्याबाबत जागा आणि अन्य सुविधांची चाचपणी सुरू आहे. 

करोना काळात नागरिकांना गणेश विसर्जनासाठी नैसर्गिक विसर्जनस्थळी जावे लागू नये म्हणून मुंबई महानगरपालिकेने 'विसर्जनस्थळ आपल्या दारी' ही संकल्पना अंमलात आणली होती. मोठ्या ट्रकवर पाण्याने भरलेला छोटेखानी हौद उपलब्ध करण्यात आला होता. हा ट्रक विभागात फिरत होता. इच्छुक भाविक या फिरत्या विसर्जन तलावात गणेशमूर्तीचे विसर्जन करीत होते. यंदा पुन्हा एकदा १५ फिरते कृत्रिम तलाव उपलब्ध करण्यात येणार आहेत. कृत्रिम तलावांची संख्या कमी असलेल्या भागात फिरत्या कृत्रिम तलावाची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. परिणामी, इच्छुक भाविकांना आपल्या दारी येणाऱ्या

फिरत्या कृत्रिम तलावामध्ये गणेश विसर्जन करणे शक्य होणार आहे.

विसर्जन आपल्या दारी ही योजना चंद्रपूर  महानगरपालिकेने राबविण्यास सुरुवात केली आहे.  चंद्रपूर शहर महानगरपालिकेने विसर्जन कुंड  झोन क्रमांक, झोन क्रमांक २ आणि झोन क्रमांक ३ मध्ये उपलब्ध केले आहे. हे फिरते विसर्जन कुंड' वाहन शहरात फिरून नागरिकांच्या घराजवळून श्रीमूर्ती संकलित करतील व त्यांचे विधीवत विसर्जन  करण्यात येणार आहे.  या विसर्जन  कुंडाचे अधिकृत संपर्क क्रमांक चंद्रपूर महानगर पालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध  केले आहेत. 

तलावांचे शहर अशी ओळख टिकविण्यासाठी ठाणे महापालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यात नवीन ४२ कृत्रिम तलावांची भर पडणार आहे. गृहसंकुले, नागरी वस्तीत जमिनीतखड्डा न खणता जमिनीवर म्हणजेच टाकीद्वारे हे कृत्रिम तलाव निर्माण केले करण्यात आले आहेत. यामुळे नागरिकांना घराजवळ गणेश मूर्ती विसर्जनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. मढवी हाऊस, राम मारुती रोड, महागिरी कोळीवाडा, टेंभीनाका, जेल तलाव, देवदयानगर, शिवाई नगर, कामगार हॉस्पिटल, किसन नगर बस थांबा, मॉडेला चेक नाका, रिजन्सी हाईटस आझादनगर, लोढा लक्झेरिया या ठिकाणी मूर्ती स्वीकृती केंद्राची उभारणी करण्यात आलेली आहे. 

नवी मुंबई महानगर पालिकेने  बाप्पांच्या  विसर्जनासाठी १६३ ठिकाणी विसर्जनाची सोय केलेली आहे.  महानगरपालिकेने  प्रत्येक ठिकाणी स्वयंसेवकांसह वैद्यकीय पथकांची सोय केली आहे.  महानगरपालिकेने शहरातील २२ मुख्य तलावांसोबत १४१ कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे. महानगरपालिकेने प्रत्येक विसर्जन तलावांवर चोख व्यवस्था केली आहे. भाविकांची गैरसोय होणार नाही याची  काळजी नवी मुंबई महापालिकेने घेतली आहे.  त्याचप्रमाणे नवी मुंबई महापालिकेने  सर्व विसर्जन स्थळांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत. सर्व ठिकाणी पुरेशी विद्युत व्यवस्था तसेच  जनरेटरची व्यवस्था केली आहे,. २२ मुख्य विसर्जन स्थळांवर वैद्यकीय पथके तैनात ठेवली आहेत.  मुख्य विसर्जन स्थळांवर तसेच व्यासपीठ तराफ्यांची व्यवस्थाही केलेली आहे.  ओल्या व सुक्या निर्माल्यासाठी स्वतंत्र व्यवस्था विसर्जन स्थळी ठेवण्यात आली आहे.  विसर्जन तलावांवरही चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. मुख्य तलावांवर स्वयंसेवक, अग्निशमन दलाचे कर्मचारी व सुरक्षेसाठी सर्व व्यवस्था केली आहे.

नाशिक महापालिकेने विसर्जनासाठी २७ नैसर्गिक, तर ५६ कृत्रिम तलावांची यादी जाहीर केली आहे. तसेच पीओपीच्या मूर्ती नदीपात्रात विसर्जित न करता दान करण्याचे आवाहन महापालिकेच्या पर्यावरण विभागाने केले आहे. महापालिकेकडून विसर्जनस्थळे निश्चित करण्यात आली असून  पालिकेकडून 'टँक ऑन व्हिल्स' उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे.  विसर्जन आपल्या दरीशी साधर्म्य असणारा हा उपक्रमास  दीड दिवसांच्या गणेश विसर्जनानंतरपासूनच उत्तम प्रतिसाद लाभला आहे. 

अशाप्रकारे बदलणाऱ्या शहरांना अनुरूप अशा पर्यावरण पूरक सुविधा गणेशोत्सवासाठी राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांनी  केलेल्या आहेत.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

No comments:

Post a Comment

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...