Thursday, September 14, 2023

नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम काय आहे ?

वा प्रदूषणाचे धोके सर्वांसमोर प्रकर्षाने यावेत आणि सर्व देशांनी हा धोका कमी करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, हा हेतू समोर ठेवून दरवर्षी सात सप्टेंबर दिवस जागतिक 'निळ्याशार आकाशासाठी स्वच्छ हवा' दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय झाला आहे. त्यानिमित्ताने महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या  विविध उपाय योजनांविषयीचा हा आढावा - 

हवेची गुणवत्ता उत्तम राखण्यासाठी तसेच हवाप्रदूषणाच्या दुष्परिणामांबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण होण्यासाठी त्याविरोधात कृती करण्यासाठी जगभरात संयुक्त राष्ट्रातर्फे निळ्याशार आकाशासाठी आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिन साजरा केला जातो. संपूर्ण देशाने नुकताच  ७ सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिवस साजरा केला. या दिवशी  केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल विभागाद्वारे संपूर्ण भारतात  २०२३-२४ साठी आयोजित केलेल्या 'स्वच्छ वायू सर्वेक्षण स्पर्धे'च्या पुरस्कारांचे वितरण केले.  'स्वच्छ वायू सर्वेक्षण स्पर्धे'त महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी बाझी मारली आहे.  स्वच्छ वायू सर्वेक्षणात १८७ गुण मिळवून इंदूर हे देशात पहिले, तर आग्रा हे १८६ गुण मिळवून दुसरे शहर ठरले. तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रातील ठाणे हे असून, या शहराला १८५ गुण मिळाले आहेत. नाशिक शहराने  १६० गुण मिळाले असून; त्या शहराने राज्यात चौथे तर देशात २१ वे स्थान पटकावले आहे. 

भारतातील वाढलेली प्रदूषण पातळी जगभरातील माध्यमांमध्ये आणि स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय झाल्यामुळे केंद्राने २०१९ साली देशातील पहिला राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (एनकॅप - नॅशनल क्लीन एअर पॉलिसी) सुरू केला. देशातील हवेच्या गुणवत्तेमध्ये युद्धपातळीवर सुधारणा करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट होते. यात ध्येयनिश्चिती करण्यात आली.  यामधून वाहतूक व्यवस्था, पार्किंग, वृक्षारोपण, कचऱ्याची विल्हेवाट यावर अधिक भर देण्यात आला आहे. याशिवाय उपाययोजनांबाबत जनजागृती करण्यावर भर देण्यात येत आहे. देशातील १३२ शहरांमध्ये २०१७ ची पीएम २.५ पातळी २०२४ पर्यंत २० ते ३० टक्के कमी करायची हे यापैकी एक प्रमुख ध्येय ठरविण्यात आले आहे. त्यानुसार विविध प्रयत्न केले जात आहेत. उपाय योजना राबविल्या जात आहेत. प्रत्येक राज्यातील हवेचे सर्वेक्षण करून  स्पर्धा घेत पुरस्कारांचे वितरण केले जात आहे.  

केंद्र सरकारच्या पर्यावरण, वने आणि हवामान बदल विभागाच्या वतीने 'नॅशनल क्लीन एअर पॉलिसी' अंतर्गत हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी २०२२ पासून सर्वेक्षण केले जात आहे. त्यात तीन गटांत देशभरातील वर्गवारी केली होती. २०२३ -२४ च्या या सर्वेक्षणात १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या देशभरातील शहरांनी हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केलेल्या कृतींचे मूल्यमापन  करून क्रमांक देण्यात आले. घनकचरा संकलन, रस्त्यावरील  धुळीबाबत केलेल्या उपाययोजना, बांधकाम विल्हेवाट, साहित्याची बांधकामाच्या ठिकाणी वापरण्यात येणाऱ्या सुरक्षित जाळ्या, वाहनप्रदूषण, ध्वनी प्रदूषणाची तपासणी केल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने दिलेल्या गुणानुसार शहरांना क्रमवारी दिली जाते. या क्रमवारीच्या आधारावर  केंद्रीय पर्यावरण व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये  २०२३-२४ च्या 'स्वच्छ हवा सर्वेक्षण पुरस्कारांची घोषणा केली. राज्यात ठाणे पहिल्या, मुंबई दुसऱ्या. नागपूर तिसऱ्या क्रमांकावर आहे.  तर नाशिक चौथ्या स्थानावर आहे. 


ठाणे शहर आणि स्वच्छ हवा कार्यक्रम 

पेट्रोल आणि डिझेल या इंधनावरील वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी व्हावे तसेच शहरात पर्यावरणपूरक विजेवरील वाहनांचा वापर वाढावा, यासाठी केंद्र सरकारकडून जनजागृती केली जात आहे. २०२५ पर्यंत नव्या वाहन नोंदणीत दहा टक्के हिस्सा विद्युत वाहनांचा असेल, अशा रीतीने विजेवरील वाहनाचा वापर

वाढविण्यात येणार आहे. यासाठी केंद्र, राज्य आणि पालिका प्रशासन विजेवरील वाहने खरेदी करीत आहे. याशिवाय नागरिकांनाही अशी वाहने खरेदी करण्यासाठी केंद्र, राज्य आणि पालिका प्रशासन मार्गदर्शन करीत आहे. त्याला ठाणेकरांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. शहरातील एकूण वाहन संख्येपैकी पाच टक्के वाहने विजेवर धावणारी आहेत. गेल्या आर्थिक वर्षात विजेवरील वाहनांच्या संख्येत तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे. या वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने शून्य प्रदूषणास नागरिक हातभार लावीत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. चालू वर्षामध्ये शहरामध्ये ठाणे शहराने मियावाकी पद्धतीने वृक्षलागवड करण्यावर भर देण्यात आला. तसेच यांत्रिकी पद्धतीने रस्ते साफसफाई, एकूण रस्त्यांपैकी काँक्रिट आणि मास्टिक रस्त्यांच्या प्रमाणामध्ये झालेली वाढ त्यामुळे धुळीचे प्रदूषण कमी होण्यासाठी निर्माण झालेली अनुकूल परिस्थती, शहरामध्ये मोठ्या संख्येने येत असणाऱ्या इलेक्ट्रिक बसेस आणि राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमातंर्गत प्राप्त निधीचा कालबद्ध व गुणवत्तापूर्ण विनियोग या बाबींमुळे ठाणे शहराला हा बहुमान प्राप्त झाला आहे.  अशा विविध उपाय योजनांमुळे स्वच्छ हवा स्पर्धेत १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांतून ठाणे शहराने तिसऱ्या क्रमांकाच्या शहराचा मान पटकावला आहे.  मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान व केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. रोख ५० लाख रुपये व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.


नवी मुंबई देशात ४१ व्या स्थानावर

देशातील प्रदूषित शहरांमध्ये नवी मुंबईचा समावेश होतो. नवी मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम, मोठ्या प्रमाणात सुरू असलेली बांधकामे, सायन-पनवेल महामार्ग, जेएनपीटी रोडमुळे हवेतील धूलिकणांचे प्रमाण वाढत आहे. कारखान्यांमधील धुरामुळेही हवा दूषित होत आहे. उन्हाळ्यामध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक

३०० एवढ्या धोकादायक पातळीवरही पोहोचला होता. पावसाळा सुरू झाल्यापासून हवेतील धूलिकणांचे हवेच्या गुणवत्तेचे मोजमाप प्रमाण कमी होऊ लागले आहे. एक महिना पाऊस उघडल्यामुळे काही प्रमाणात प्रदूषण पुन्हा वाढले होते. पावसामुळे प्रदूषण कमी झाले आहे. ८ सप्टेंबरला शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक ४१ वर आला आहे. ० ते ५० पर्यंत निर्देशांक उत्तम समजला जातो. पावसामुळे ही स्थिती प्राप्त करण्यात यश आले आहे.


अकोला महानगरपालिका आणि  स्वच्छ हवा दिन 

शासनाच्या निर्देशाप्रमाणे अकोला महानगरपालिकेत पहिल्यांदाच  बुधवारी  ७ सप्टेंबर २०२३ ला प्रथमच जागतिक 'निळ्याशार आकाशासाठी स्वच्छ हवा' (क्लीन एअर फॉर ब्लू स्काय) दिन साजरा केला गेला.   हवा प्रदूषणाचे धोके सर्वांसमोर प्रकर्षाने यावेत आणि सर्व देशांनी हा धोका कमी करण्यासाठी तातडीने

पावले उचलावीत, हा हेतू समोर ठेवून दरवर्षी सात सप्टेंबर दिवस जागतिक 'निळ्याशार आकाशासाठी स्वच्छ हवा' दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय झाला आहे.  यानिमित्त मनपा आयुक्त तथा प्रशासक कविता द्विवेदी या बुधवार, ७ सप्टेंबर रोजी त्यांच्या शासकीय निवासस्थान येथून पायी चालत मनपा कार्यालयात पोहोचल्या. इतर अधिकारी व कर्मचारीही पायी चालत किंवा सायकल व पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांनी कार्यालयात दाखल झाले. या दिनाचे औचित्य साधत मनपा कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पर्यावरणाच्या संरक्षणासाठी प्रयत्न करण्याची सामूहिक शपथ घेतली. वायू प्रदूषण रोखण्याच्या दिशेने आपण नेहमी प्रयत्न करावेत, असे आवाहन कविता द्विवेदी यांनी याप्रसंगी केले.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

No comments:

Post a Comment

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...