Thursday, August 24, 2023

मोशी डेपोत कचऱ्यापासून वीज निर्मिती, पिंपरी चिंचवड महापालिकेचा 'वेस्ट टू एनर्जी' प्रकल्प

कचऱ्याची सुयोग्य  पद्धतीने विल्हेवाट लावून कचऱ्याचे रुपांतर विविध बाय प्रॉडक्टसमध्ये करण्यासाठी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था विविध उपक्रम राबवित आहेत. याचे चालते बोलते उदाहण आहे,  पिंपरी-चिंचवड महानगरपालिका . पिंपरी-चिंचवड महापालिकेने पिंपरीतील मोशी गावात असणाऱ्या कचरा डेपोत सुक्या कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा (वेस्ट टू एनर्जी) प्रकल्प अखेर कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज महापालिका स्वत:साठी वापरणार आहे. तसेच, दररोज ७00 टन सुक्या कचऱ्याची विल्हेवाट लागणार आहे. अशा प्रकारे वीजनिर्मिती करणाऱ्या देशातील मोजक्या महापालिकांच्या पंक्तीत पिंपरी- चिंचवड महापालिका पोहोचली आहे. पिंपरी-चिंचवड मनपाच्या ह्या  कचऱ्यापासूनच्या वीज निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन १ ऑगस्ट २०२३ रोजी मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. 

पिंपरीतील मोशी गावातील कचरा डेपोची निर्मिती १९९१ मध्ये करण्यात आली. जवळ जवळ ८१  एकर जागेत पिंपरी-चिंचवड मनपाचा हा कचरा डेपो पसरलेला आहे. पिंपरी-चिंचवडच्या  संपूर्ण शहराचा कचरा येथे आणून टाकला जातो.  जवळ जवळ संपूर्ण शहराचा कचरा या डेपोत येत असल्यामुळे येथे  त्यामुळे डेपोत कचऱ्याचे डोंगर तयार झाले आहेत. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. सध्या दररोज १ हजार १०० टन कचरा जमा होत आहे. त्यात ओला कचरा ३०० टन तर, सुका कचरा ७०० व इतर कचरा १०० टन असतो. ओल्या कचऱ्यापासून खत तयार केले जात आहे. प्लास्टिक कचऱ्यापासून इंधन तयार केले जाते. कचऱ्याचे अनेक वर्षांपासूनचे ढीग बायोमॉयनिंगद्वारे हटविले जात आहेत. याचेच पुढचे पाऊल म्हणजे 

शुद्ध स्वरूपातील सुक्या कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला.

मोशीत कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प तयार करण्याची मुदत १८ महिने होती. मात्र, कोरोना महामारीमुळे परदेशातून यंत्रसामुग्री आणण्यास विलंब झाल्याने प्रकल्पाचे काम रखडले होते. कोरोना नंतर या  प्रकल्पाने वेग पकडला. प्रकल्पाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. जुलै (२०२३ )महिन्याच्या सुरुवातीपासून घेण्यात येत असलेल्या प्राथमिक चाचणीत १.०७ मेगा वॅट वीजनिर्मिती केली जात आहे. टप्प्याटप्प्याने वीजनिर्मिती वाढविण्यात येणार आहे. संपूर्ण प्रकल्प लवकरच कार्यान्वित केला जाणार आहे. प्रकल्पात तयार होणारी वीज महावितरणला देण्यासाठी महावितरण कंपनीसोबत चर्चा सुरू आहे. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. 

कसा  आहे प्रकल्प

वेस्ट टू एनर्जी प्रकल्पास  १२ एप्रिल २०१८  ला मंजुरी देण्यात आली. डिजाईन, बिल्ट, ऑपरेट अॅण्ड ट्रॉन्सपोर्ट' (डीबीओटी) या तत्त्वावर हा प्रकल्प अन्टोरी लारा एन्व्हायरो व ए. जी. एन्व्हायरो कंपनी या दोन कंपन्या चालविणार आहेत. प्रकल्पाचा एकूण खर्च २०८ कोटी ३६ लाख असून, देखभाल, दुरुस्ती व संचालन संबंधित ठेकेदार कंपनी २१ वर्षे करणार आहे. त्यासाठी कंपनी दररोज १ हजार टन क्षमतेचा मटेरिअल रिकव्हरी फॅसिलिटी (एमआरएफ) प्रकल्प चालविणार आहे. प्रकल्प उभारण्यासाठी पालिकेने कंपनीस ५०  कोटींचे आर्थिक सहाय दिले आहे. प्रकल्पासाठी जागेचे भाडे म्हणून पालिका वर्षाला १ रुपया नाममात्र भाडे घेणार आहे. प्रकल्पात शुद्ध स्वरूपातील ४०० टन सुक्या कचऱ्यापासून दररोज १४ मेगावॅट वीजनिर्मिती केली जाणार आहे. त्यातील १३.८० मेगावॅट वीज पालिका ५ रुपये प्रती युनिट या दराने २१ वर्षे विकत घेणार आहे. ती वीज पालिकेकडून निगडी, सेक्टर क्रमांक २३ येथील जलशुद्धीकरण केंद्र, सांडपाणी शुद्धीकरण केंद्र आदी ठिकाणी वापरली जाणार आहे. उर्वरित शिल्लक वीज कंपनी प्रकल्प चालविण्यासाठी वापरणार आहे.

केवळ 5 रुपये प्रती युनिट वीज मिळाल्याने महापालिकेच्या वीजबिलात सुमारे ३५ ते ४० टक्के बचत होणार आहे. तसेच, ७०० टन सुक्या कचऱ्याची दररोज विल्हेवाट लागणार आहे. परिणामी, कचरा समस्या कमी होण्यास सहाय होणार आहे.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x 

No comments:

Post a Comment

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...