Tuesday, July 18, 2023

मुंबईत सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार चार ठिकाणी प्रक्रिया केंद्र उभारणार

भविष्यात पाण्याची कमतरता लक्षात घेऊन सांडपाण्यावर प्रक्रिया करणे महत्त्वाचे आहे.  पिण्याव्यतिरिक्तच्या वापरासाठी पाणी उपलब्ध करून देणे हा यामागील हेतू आहे. सांडपाणी कुठेही सोडून देता येत नाही. नदी-समुद्रात ते सोडले तर प्रदूषण होईल. त्यासाठी त्या पाण्यावर प्रक्रिया करणे गरजेचे आहे. सांडपाणी प्रक्रिया करण्याच्या तीन पातळ्या आहेत. तिसऱ्या पातळीवरील प्रक्रिया केलेले पाणी आणखी चांगल्या दर्जाचे असते. शंभर लिटर पिण्याचे पाणी वापरले तर त्यातील साठ लिटर पाण्याचे रूपांतर सर्व प्रकारच्या वापरानंतर सांडपाण्यात होते. साठ लिटर पाण्यावर प्रक्रिया केली तर चाळीस ल‌टिर पाणी इतर वापरासाठी उपलब्ध होईल.

असे तज्ज्ञांचे मत आहे, आणि म्हणूनच मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात जमा होणाऱ्या सांडपाण्याचा पुनर्वापर व्हावा यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे.

शहरात नागरिकांना सुविधा पुरवताना शाश्वत पाणी व्यवस्थापन महत्त्वाचे आहे, त्यामुळे नगर नियोजनात सांडपाणी व्यवस्थापनाचे नियोजन उत्तम होणे हेच भविष्यातील उत्तम शहर निर्मितीचे उदाहरण म्हणावे लागेल. 

सागरी किनारा मार्ग प्रकल्प, तसेच समुद्रालगतच्या झोपडपट्ट्यांमधील सांडपाण्याचा विसर्ग पूर्वी समुद्रात करण्यात येत होता. मात्र, मुंबई महानगरपालिकेने आता पर्यावरणपुरकतेच्या दृष्टीने या सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुर्नवापर करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत दक्षिण मुंबईतील चार ठिकाणी प्रक्रिया केंद्रे उभारण्यात येणार असून दररोज तब्बल चार लाख ८५ हजार लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. प्रक्रिया केलेल्या पाण्याचा शौचालय आणि उद्यानांमध्ये वापर करण्यात येणार आहे.

दक्षिण मुंबईमध्ये सागरी किनारा रस्ता प्रकल्पालगतचे टाटा उद्यानाजवळील शिवाजी नगर, महालक्ष्मी मंदिराच्या दक्षिणेकडील दर्या सागर, मंदिराच्या उत्तरेकडील दर्या नगर आणि ॲनी बेजंट मार्गावरील लव्हग्रोव्ह उदंचन केंद्रासमोरील मार्केडेश्वर मंदिराचा मागल भाग या चार ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया केंद्रे उभारण्यात येणार आहेत. या परिसरातील वस्तीमधील लोकसंख्या सुमारे नऊ हजार ५०० इतकी आहे. सांडपाणी प्रक्रिया केंद्रांच्या उभारणीचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. यापैकी शिवाजी नगर येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे काम अंतिम टप्प्यात आले असून उर्वरित तीन प्रक्रिया केंद्रांचे कामही वेगाने सुरू आहे.

शिवाजी नगर येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रामध्ये प्रतिदिन ५० हजार लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करता येऊ शकेल. दर्या सागर येथील प्रक्रिया केंद्राची क्षमता ३५ हजार लिटर, तर दर्या नगर व मार्कडेश्वर मंदिरालगत उभारण्यात येणाऱ्या प्रक्रिया केंद्राची क्षमता अनुक्रमे प्रतिदिन एक लाख लिटर व तीन लाख लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची आहे. या चारही सांडपाणी प्रक्रिया केंद्रांची एकूण क्षमता प्रतिदिन चार लाख ८५ हजार लिटर इतकी असणार आहे. हा प्रकल्प स्माईल कौन्सिलच्या माध्यमातून आयआयटी मुंबईचे माजी विद्यार्थी इंद्रकांत झा यांच्या एमर्जी एन्वायरो या स्टार्टअपने विकसित केलेल्या ‘इंटीग्रेटेड वेटलॅण्ड टेक्नॉलॉजी’वर आधारित आहे.

अशी होणार सांडपाण्यावर प्रक्रिया

प्रकल्पांतर्गत संबंधित परिसरातील मलजल किंवा सांडपाणी उदंचन पंपाच्या साहाय्याने भूमिगत टाकीमध्ये साठवण्यात येते. या टाकीमध्ये चार कप्पे असतात. प्रत्येक कप्प्यांमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. दुसऱ्या स्तरात प्रक्रियेमध्ये कर्दळीसारख्या नैसर्गिक झाडांच्या मदतीने पाणी स्वच्छ करण्यात येते. विशेष म्हणजे या प्रक्रिया केंद्रांमध्ये सुरुवातीला सांडपाणी ओढणे आणि नंतर स्वच्छ पाणी सोडणे, या व्यतिरिक्त कुठेही पंप किंवा अन्य तंत्रज्ञानांचा वापर केला जात नाही.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

No comments:

Post a Comment

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...