Wednesday, July 12, 2023

वसई विरार शहराला सूर्या प्रकल्पामुळे पाणी दिलासा

मीरा-भाईंदर आणि वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील २७ गावांची तहान भागविण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) हाती घेण्यात आलेल्या सूर्या प्रादेशिक प्रकल्पातील पहिल्या टप्प्याचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून हा टप्पा कार्यान्वित होणार आहे. हा टप्पा सेवेत दाखल झाल्यास वसई-विरार पालिका क्षेत्राला १८५ एमएलडी क्षमतेने पाणी पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे पाणी टंचाईने हैराण झालेल्या वसई-विरारकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

विरार- वसई शहराच्या कक्षा दिवसेंदिवस रुंदावत असल्यामुळे लोकसंख्येतही वाढ होत आहे. वाढत्या लोकसंख्येला पाणी हवेच.  वाढत्या लोकसंख्येच्या वाढीव पाण्याची गरज भागविण्यासाठी विरार-वसई महापालिका सज्ज झाली आहे. येत्या काही  दिवसांत सूर्या धरणाचे अतिरिक्त पाणी वसई- विरार महानगरपालिका क्षेत्राला मिळणार आहे. १८५ एमएलडी पाण्यापैकी सुरुवातीला ८० एमएलडी पाणी महानगरपालिका क्षेत्राला पहिल्या टप्प्यात उपलब्ध होणार आहे.  त्या यासाठी पालिकेने ॲक्शन प्लॅन बनवला असून यामध्ये लोकसंख्येनुसार कमी पाणीपुरवठा होणाऱ्या क्षेत्राला प्राथमिक तत्त्वावर पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. २०४० मधील लोकसंख्या विचारात  घेऊन महापालिका पाण्याचे नियोजन करीत आहे.

वसई-विरार महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणारी तीन धरणे असून त्यात उसगाव, पेल्हार आणि सूर्या (धामणी) यांचा समावेश होतो. यामध्ये वसई-विरारला 'सूर्या'च्या पहिल्या प्रकल्पातून १०० एमएलडी तर दुसऱ्या योजनेतून १०० एमएलडी असा एकूण २०० एमएलडी पाणीपुरवठा होतो. तर उर्वरित एकूण ३० एमएलडी पाणीपुरवठा उसगाव आणि पेल्हार धरणातून होतो.

मात्र शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून हे पाणी अपुरे पडत आहे. शहरात १४२ एमएलडी पाण्याची तूट आहे. यामुळे अतिरिक्त पाण्याची गरज असल्याने एमएमआरडीए मार्फत १८५ एमएलडी पाण्याची योजना आखण्यात आली. त्याचे काम मागील दोन वर्षांपासून सुरू असून ते सद्यस्थितीत पूर्ण झाले वसई-विरार शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय आहे. त्यामुळे पालिकेला पाणीपुरवठा करण्यासाठी एमएमआरडीए सज्ज झाली आहे. दुसरीकडे एमएमआरडीए हे पाणी सूर्यापासून काशीद-कोपरपर्यंत आणणार आहे. यासाठी काशीद-कोपर येथे जलकुंभ तयार करण्यात आले आहे. तर काशीद - कोपरच्या पुढे वसई- विरार शहरात सर्व ठिकाणी हे पाणी पोहोचवण्यासाठीचे काम पालिकेमार्फत होणार आहे. या पाण्यापैकी ८० एमएलडी पाणी पहिल्या टप्प्यात येणार असल्याचे पालिकेने जाहीर केले होते. त्यामुळे हे पाणी शहरात वितरीत करण्यासाठी पालिका सज्ज झाली आहे

वसई- विरार महापालिकेतर्फे या पाण्याच्या वितरणासाठी नव्याने जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, मात्र ते पूर्ण न झाल्याने पालिकेच्या आधीच्याच जलवाहिन्यांमधून हा पाणीपुरवठा होणार आहे. शहरातील अनेक भागांत कमी पाणीपुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे लोकसंख्येच्या अनुषंगाने कमी घेऊन १८५ एमएलडी पाणीपुरवठा होत असलेल्या भागात प्राधान्याने हे पाणी देण्यात येणार आहे. यामध्ये विशेषतः विरार, नालासोपारा आणि इतर शहरांचा समावेश असून या भागातील सर्वेक्षणानुसार नजीकच्या भविष्यात  पाण्याचा पुरवठा नागरिकांना कारण्यात येणार आहे. 

सूर्या धरणाचे अतिरिक्त पाणी मिळाल्यावर वसई-विरार महापालिका  नव्याने नळजोडण्याही देणार आहे. वसई-विरार शहरात पाण्याची तूट असल्याने तीन वर्षांपूर्वी महानगरपालिकेने नव्याने जलवाहिन्या जोडणी देण्यास बंद केले होते. ही बंदी अजूनही कायम असून त्यामुळे जोडणीसाठी मागणी केलेल्यांचे अर्ज आजही प्रतीक्षेत आहेत. सूर्याचे अतिरिक्त पाणी आल्यानंतर नव्याने नळजोडण्या देण्यात येणार असल्याचे पालिकेने सांगितले होते. मात्र आता हे पाणी आल्यानंतर लवकरच वसई-विरार महापालिका जलवाहिन्या नव्याने देणार आहे.. यासाठी अर्ज केलेल्यांनी मालमत्ता कर भरल्याची पावती आणि अतिरिक्त जोडणी हवी असल्यास पाणीपट्टीची पावती जमा करण्याचे आवाहन महापालिकेने  केले आहे. त्यामुळे नव्याने जलवाहिन्यांसाठी प्रतीक्षा यादीमध्ये असलेल्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे.

सूर्याचे १८५ एमएलडी पाणी शहरात पोहोचविण्यासाठी, जलवाहिन्या टाकणे आणि इतर वितरण व्यवस्थेसाठी पालिकेने ६५ कोटींचा खर्च केला आहे. यासाठी पालिकेतर्फे जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. १०.५ किलोमीटरच्या जलवाहिन्या यासाठी टाकण्यात येत असून यापैकी साडेतीन किलोमीटर जलवाहिन्यांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम येत्या नोव्हेंबर २०२३ पर्यंत करण्यात येणार असून त्यानंतर पाणी शहरात वितरित करण्यात येणार आहे.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

No comments:

Post a Comment

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...