Saturday, April 15, 2023

मुंबईत लोकाभिमुख विकास साधण्यासाठी शासन प्रयत्नशील

शहरात वास्तव्यास असताना नागरिकांच्या प्राथमिक गरजा पूर्ण होणे आवश्यक असते. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता शहरातील शौचालये, स्वच्छतागृह नागरिकांसाठी पुरेशी असणे हे प्रशासनाचे कर्तव्यच. नागरिकांच्या या गरजेची पूर्तता करण्यासाठी मुंबई, ठाणे आणि छत्रपती संभाजीनगर शहरात विशेष प्रयत्न सुरु आहेत. 

 'स्वच्छ भारत अभियान' सुरू झाले तेव्हापासून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात शौचालयांची निर्मिती करून 'हगणदारी'मुक्त महाराष्ट्र करण्याच्या अभियानास सुरुवात झाली. त्यामुळेच दर्जेदार, सामुदायिक शौचालयांची निर्मिती करण्यासाठी विविध शहरांतील महानगरपालिका झटत आहेत. 

मुंबईत मोठ्याप्रमाणात शौचालये बांधण्याचा निर्णय आजचा नाही. 'एमएसडीपी'अंतर्गत २००५ मध्ये मुंबईत ३५ हजार शौचकुपे  बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हापासून आजपर्यंत मुंबईत मोठ्या प्रमावर शौचालयांची निर्मिती करण्यास सुरुवात झाली आहे. आता मुंबईकरांसाठी खुशखबर आहे. मुंबईत मूळ जुन्या शौचालयांची दुरुस्ती करून पुनर्बांधणी केली जाणार आहे. पालिका शौचालयांची संख्या वाढवणार आहे. दिल्लीच्या धर्तीवर महाराष्ट्रात शौचालयांची निर्मिती केली जाणार आहे.

शुद्ध पिण्याच्या पाण्याबरोबरीने स्वच्छ स्वच्छतागृहे ही देखील नागरिकांची गरज आहे. या गरजेसाठी मुंबईतील वाढत्या लोकसंख्येच्या मागणीमुळे झोपडपट्ट्या, चाळींमध्ये एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या काळात ५५९ स्वच्छतागृहे उभारण्याचा निर्णय बृहन्मुंबई मनपाच्या घनकचरा विभागातर्फे घेण्यात आलेला आहे. या स्वच्छतागृहांमध्ये मोठ्या आकाराच्या आणि  चांगल्या क्षमतेच्या सुविधा केंद्र,  स्वच्छतागृहांचाही समावेश असणार आहे. मुंबईतील २४ विभागात पालिका आणि म्हाडाने झोपडपट्ट्या, चाळींसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांची उभारणी केली आहे; पण मागच्या काही वर्षांत पालिकेच्या विभागांतील लोकसंख्या वाढत गेली. या वाढत्या लोकसंख्येसाठी मुंबई पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागांतर्गंत स्वच्छतागृहांची उभारणी करण्याच्या निर्णय झाला आहे.  या विभागाने नवीन स्वच्छतागृहे उभारण्याचा निर्णय घेतला असून ५५९ नवीन ठिकाणे शोधली आहेत. या स्वच्छतागृहांत एकूण १४ हजार शौचकुपे बांधण्यात येणार आहेत.  या स्वच्छतागृहांची ठिकाणे, त्यांचे आरेखन इत्यादींसाठी सल्लागारांचीही नियुक्ती केली होती. सध्या मुंबई आणि उपनगरात बारा सुविधा केंद्र स्वच्छतागृहे आहेत.अद्ययावत सुविधांनी परिपूर्ण असणारे पहिले स्वच्छता केंद्र फेब्रुवारी २०२२ मध्ये  धारावीत बांधण्यात आले. यामध्ये ८०० शौचालयांचा समावेश होता. या केंद्रात वॉशिंग मशिन सुविधा, आंघोळ आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध आहे. तसेच सांडपाणी प्रक्रिया सुविधा, तर ऊर्जा निर्मितीसाठी सोलार पॅनलही आहेत.  भविष्यात अशा प्रकारची अजून पाच ते सहा केंद्र उभारली जाणार आहेत. प्रत्येक विभागात किमान दोन सुविधा केंद्र स्वच्छतागृह उभारण्यात येतील.

मुंबईतील म्हाडाच्या अखत्यारित असणाऱ्या जुन्या शौचालयांची पुनर्बांधणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय  घेण्यात आलेला आहे. सध्या मुंबईत म्हाडाची एक हजारांहून अधिक जुनी शौचालये आहेत. ही सर्व शौचलये राज्य सरकारने मुंबई महापालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आली आहेत. त्यानंतर सर्व शौचालयांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. या स्ट्रक्चरल ऑडिटनंतर  शौचालयांची दुरुस्ती आणि पुनर्बांधणीची कामे सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. 

पालिकेच्या २४ प्रशासकीय विभागात झोपडपट्ट्या, चाळी, वस्त्यांमध्ये पालिकेची ३ हजार २०१ तर म्हाडाची ३ हजार ६०० शौचालये आहेत. तर रहदारी असणाऱ्या रस्त्यांवर 'पैसे द्या आणि वापरा' या तत्त्वावर ८४० शौचालये, प्रसाधनगृहे उभारली आहेत. मुंबईतील वाढत्या लोकसंख्येसाठी लॉट १२ अंतर्गत तब्बल २० हजार नवीन शौचकुपे उभारण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. 

मुंबई शहर आणि उपनगरातील मलकुंडासह मलवाहिनीची व्यवस्था आसपास असलेल्या भागातील  शौचालयांचे सर्वेक्षण येत्या काळात केले जाणार आहे. जिथे मलकुंड आवश्यक नाही, तिथे मलनिःसारण वाहिन्यांना जोडण्याचे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आवश्यक तिथे मलकुंड साफ करणे, तसेच त्यांचे बांधकाम करणे असे काम दुरुस्तीअंतर्गत हाती घेतली जाणार आहेत. आवश्यकतेप्रमाणे दुरुस्तीसह पुनर्बांधकाम केले जाणार आहे.

दिल्ली, बेंगळुरूच्या धर्तीवर महाराष्ट्रातही अत्याधुनिक स्मार्ट सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार महापालिकेला डीपीआर (सविस्तर प्रकल्प आराखडा) तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे दिल्लीच्या धर्तीवर छत्रपती संभाजीनगर शहरात स्मार्ट स्वच्छतागृहे उभारली जातील. 

'मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या संकल्पने अंतर्गत  शहरातील ७०० शौचालयांपैकी काही शौचालयांची किरकोळ तर काही शौचालयांची मोठ्या स्वरुपाची दुरुस्ती केली जाणार आहे. यामध्ये दरवाजे, खिडक्या, पाण्याच्या टाकी बसविणे, कडीकोंयडा बसविणे, विजेची सुविधा आदींसह इतर कामे यात केली जाणार आहेत.

ठाण्यात महापालिकेच्या माध्यमातून कंटेनर टॉयलेटची निर्मिती केली जाणार आहे.  त्यानुसार वागळे इस्टेट रोड नं. २२ येथे पहिले कंटेनर टॉयलेट उभारण्यात आले आहे. या ठिकाणी दोन मुतारी व तीन ते पाच सीट्स उपलब्ध असणार आहेत. त्यात विदेशी व देशी सीटसची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानुसार आता शहरातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी महामार्ग आदींसह इतर महत्वाच्या रस्त्यांवर देखील अशा स्वरुपाचे ७५ टॉयलेट उभारले जाणार आहेत.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

No comments:

Post a Comment

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...