Tuesday, April 4, 2023

आमची बचत लाख मोलाची

कुणी महिलांनी मसाले बनवण्याचा व्यवसाय सुरु केलाय तर कुणी खाद्यपदार्थांचा व्यवसाय सुरु केलाय, कुणी अबोली रिक्षा हाती घेतलीय तर कुणी गृहोपयोगी वस्तूंचे सुपर मार्केट सुरु केलंय, महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील अनेक गरजू महिला स्वतःचा  व्यवसाय करत आत्मसन्मानाने जगतायत, हे शक्य झालंय दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानामुळे. या अभियानाच्या माध्यमातून स्थापन झालेल्या बचत गटामुळे. 

पूर्वी चूल आणि मूल या दोन्होत अडकलेली गरीब घरातील बाई बचत गट स्थापन केल्यामुळे घराबाहेर पडून स्वतःचा व्यवसाय उभारू शकली. तिची स्वतःची वैयक्तिक बचत होऊ लागली. कुटुंबाला हातभार लावू लागली.  

या अभियाना अंतर्गत स्वयंसहाय्यता गटातील महिलांना, त्यांच्या आवडीचा उद्योग-व्यवसाय करण्यासाठी बँकलिकेंज करून राष्ट्रीयीकृत बँकेकडून कर्ज दिलं जातं. त्याचाच अतिशय कौशल्याने वापर करून बचतगटातील सदस्य महिला जोमाने व्यवसाय सुरू करतात. 

दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानातून  बचत गटांना देण्यात येणारे कर्जासाठीचे अनुदान आता हे सामाजिक परिवर्तन घडवत आहे, याची महाराष्ट्रातील कितीतरी उदाहरणं देता येतील. 

नेमकं मार्गदर्शन मिळालं, नेमक्या व्यक्तीची वा संस्थेची साथ लाभली की आयुष्य कसं बदलून जातं ते चिपळूणमधील  'दत्तकृपा स्वयंसहाय्यता महिला बचतगटा'कडे पाहिल्यावर लगेच लक्षात येतं. अवघ्या अडीच वर्षांत या गटाने केलेली प्रगती थक्क करणारी आहे. अर्थात त्यासाठी मार्गदर्शन आणि  मदत मिळाली ती 'दीनदयाळ अंत्योदय योजने'खाली 'राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियाना'ची. अभियानाच्या अंतर्गत बचतगटाच्या सदस्य महिलांना संकल्पना प्रशिक्षण, लेखाविषयक प्रशिक्षण देण्यात आलं. तसंच त्यांना नेतृत्व, संभाषण कौशल्य, बँक व्यवहार बाबतही मार्गदर्शन करण्यात आलं. साध्या खाद्यपदार्थांच्या व्यवसायाने सुरुवात केलेल्या या बचत गटाची  उलाढाल तब्बल १३ लाखापर्यंत गेली आहे. 

असेच एक उदाहरण रत्नागिरीचे. महिलाशक्ती एकत्र आली तर काय चमत्कार घडवू शकते, ते रत्नागिरी नगर परिषदेअंतर्गत विविध महिला बचतगटांनी एकत्र येऊन सुरू केलेलं सोनचिरैया सुपर मार्केट’ पाहिल्यावर लक्षात येतं. या सुपरमार्केटची केवळ कल्पनाच महिलांची आहे असं नव्हे तर व्यवस्थापन देखील महिलांनीच केलेले आहे.  अर्थात हे सारं शक्य झालंय ते रत्नागिरी नगर परिषदेतर्फे राबवण्यात येत असलेल्या केंद्र व राज्य शासन पुरस्कृत ‘दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियाना’मुळेच!   

स्वप्न उराशी बाळगून व्यवस्थित काम केल्यास कोणत्याही क्षेत्रात आपण स्वतःला सिद्ध करू शकतो. ठाणे शहरातील अबोली रिक्षांच्या महिला चालकांसाठी हे वाक्य अतिशय समर्पक ठरतं.  पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या व्यवसायात आज अनेक महिला आत्मविश्वासाने वावरतायत. या महिला रिक्षा चालकांची संख्या दिवसेंदिवस वाढत जातेय, याचे महत्त्वाचे कारण म्हणजे दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियान. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने या अभियानांतर्गत कर्जासाठी अनुदान दिले जाते, हे समजल्यावर अनेक महिलांनी रिक्षा व्यवसाय स्वीकारला आहे. 

ठाणे शहरात रिक्षा चालवणाऱ्या ज्योत्स्ना दिवेकर सांगतात, 'माझ्या रिक्षाच्या व्यवसायामुळे आम्ही नवीन घर घेताना पतीला आर्थिक हातभार लावू शकले, याचे मला समाधान आहे. पूर्वी घरखर्चासाठी पतीच्या पैशांवर अवलंबून होती, पण आता स्वतः कमावत स्वतःची बचत करता येत असल्याने माझ्यात आत्मविश्वास निर्माण झाला आहे.'

या महिलांच्या प्रतिक्रिया दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियानाची यशस्विता नमूद करतात. या अभियानाने केवळ महिलांनाच सक्षम केलं आहे असे नाही तर बेघर निवारा केंद्र, पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर योजना या माध्यमातून अनेक निराधारांना आधार दिला आहे.

याविषयी आपण सविस्तर माहिती पुढच्या लेखात घेऊया.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

No comments:

Post a Comment

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...