Friday, March 31, 2023

कचरा वर्गीकरणासाठी प्रयत्न महत्त्वाचे

केंद्र सरकारने स्वच्छ सर्वेक्षण मोहीम हाती घेतल्यानंतर सर्वत्र कचरा वर्गीकरणाची सुरुवात झाली. विविध शहरातील महानगर पालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती विविध उपक्रम राबवून नागरीकांकडून कचरा वर्गीकरण करवून घेतात. सुरुवातीला उत्साहाने कचरा वर्गीकरण करणाऱ्यांचा उत्साह कालांतराने कमी होते. मग कचरा वर्गीकरणाकडे नागरिकांचे दुर्लक्ष होते. शहरातील कचरा हा डम्पिंग ग्राऊंडवर गोळा केला जातो. एप्रिल-मेमध्ये उन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्यात रासायनिक बदल घडून आगी लागण्याचे प्रकार घडतात.  नागरीकांना कचरा विलगीकरणाची सवय लागावी तसेच डम्पिंग ग्राउंडवरच्या कचऱ्याचा सकारात्मक उपयोग व्हावा यासाठी मीरा-भाईंदर मनपा दोन  उपक्रम राबवित आहे.  त्या उपक्रमांविषयी माहीत करून घेण्यासाठी हा ब्लॉग वाचावाच लागेल... 

सुमारे ४५० ते ५०० टन कचरा मिरा-भाईंदर पालिका हद्दीत दररोज निर्माण होतो. सफाई कर्मचाऱ्यांच्या मदतीने कचरा गोळा करून उत्तनच्या धावगी डोंगरावर उभारलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पात टाकला जातो. या कचरा प्रक्रिया प्रकल्पात ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत, तर सुक्या कचऱ्यापासून आरडीएफ (रेफ्युज डेरिव्हेटिव्ह फ्युएल) तयार केले जाते. त्यासाठी ओला व सुका कचरा वेगवेगळा करून देणे अपेक्षित आहे. पण नागरीकांकडून तसे होताना दिसत नाही. कचऱ्याचे वर्गीकरण न करता नागरीक घरगुती कचरा  सफाई कर्मचाऱ्यांकडे सोपवितात.  

प्रकल्पात मिश्र स्वरूपातील कचरा प्राप्त झाल्यामुळे  त्यावर प्रक्रिया करण्यात अडथळा येतो. या पार्श्वभूमीवर, मीरा-भाईंदर महानगर पालिका  नागरिकांना  कचरा वर्गीकरणाची सवय लागावी यासाठी एक उपाययोजना अवलंबविणार आहे. पालिका प्रत्येक घरावर आता बारकोड लावणार आहे. बारकोड स्कॅन केल्यावरच सफाई कर्मचारी कचरा  घेणार. या उपाययोजनेमुळे ज्या घरातून कचऱ्याचे वर्गीकरण न करता  तो तसाच सफाई कर्मचाऱ्यांकडे सोपविला जातो ते  घर सापडणार. त्या घरात स्वतः सफाई कर्मचारी कचरा विलगीकरणाची  पद्धत समजावून सांगत नागरिकांकडून ते करून घेणार.  तसेच कचरा विलगीकरणाशी संबंधित सफाई कर्मचारी, मुकादम व स्वच्छता निरीक्षकांना सर्वप्रथम  कचरा विलगीकरणाची शात्रोक्त प्रक्रिया शिकवली जाणार. 

मीरा-भाईंदर मनपा परिसरात या मोहिमेसाठी प्रभाग १३, म्हणजेच हटकेश- घोडबंदर या भागाची निवड केलेली आहे. या भागात नागरिकांच्या घरावर बारकोड लावण्यात येणार आहेत.या घरांतून कचरा उचलताना स्वच्छता कर्मचारी हे बारकोड स्कॅन करतील आणि कचरा वर्गीकरण केलेला आहे किंवा नाही याची नोंद करतील. याद्वारे प्राप्त झालेल्या माहितीवरून, कचरा वर्गीकरण न करणाऱ्यांना नोटिसा बजावणे तसेच दंड आकारणे अशी कारवाई केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात एक विभागात ही मोहीम यशस्वी ठरल्यास, त्यानंतर संपूर्ण शहरात अंमलबजावणी केली जाणार आहे.

मीरा-भाईंदर मनपा हद्दीत डम्पिंग ग्राउंडवरचा कचरा वाढत आहे. कारण शहराच्या लोकसंख्येत गेल्या काही वर्षांपासून वाढ होत आहे. त्यामुळे शहरात दररोज तयार होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाणही वाढत आहे. त्याचा उत्तन येथील कचरा प्रकल्पावर ताण येऊ लागला आहे.आजच्या घडीला उत्तन येथील कचरा प्रक्रिया केंद्रात ५०० टन कचरा प्रक्रिया करण्यासाठी आणला जातो. शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार या प्रकल्पावर आगामी काळात भार वाढणार आहे. हा भार कमी करण्याच्या उद्देशाने ओल्या कचऱ्यापासून वीज व बायोगॅसची निर्मिती करणारे एकूण १०० टन क्षमतेचे सहा बायोमिथेनेशन प्रकल्प उभारण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. यातील तीन प्रकल्प सुरू झाले असून उर्वरित तीन प्रकल्पांचे काम अंतिम टप्प्यात आहे. याव्यतिरिक्त आणखी पाच प्रकल्प शहरात विविध ठिकाणी उभारण्याचा निर्णय पालिका प्रशासनाकडून घेण्यात आलेला आहे. 

सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये कांदा, खोडे, नारळाची करवंटी, मोसंबीच्या साली इत्यादींपासून गॅसनिर्मिती होत नाही. त्यामुळे तेथे त्यावर प्रक्रिया केली जात नाही. त्यामुळे इथेही कचरा विलगीकरणाची गरज भासणार आहे. 

मिरा-भाईंदर पालिकेचे बायोमिथेनेशन प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यन्वित झाल्यास त्यातून सुमारे साडेचारशे मेगावॉट वीजनिर्मिती होणार आहे. या विजेची विक्री मिरा-भाईंदर शहराला वीजपुरवठा करणाऱ्या अदानी कंपनीला केली जाणार आहे. ही वीज मोजण्यासाठी नेट मिटरिंग बसवण्यासाठी संबंधित विभागाकडे आवश्यक पाठपुरावा सुरू आहे.  

आजही कुटुंबातली जुनी-जाणती माणसे आवर्जून सांगतात, कचऱ्यात लक्ष्मी नांदते.  मीरा-भाईंदर मनपा हद्दीत कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून कंपोस्ट खत, आरडीएफ (रेफ्युज डेरिव्हेटिव्ह फ्युएल) आणि वीज निर्मिती केली जात आहे. त्यांच्या विक्रीतून मनपाला आर्थिक फायदाही होणार आहे. म्हणूनच कचऱ्याचा आदर करा. कचरा वर्गीकरणाची सवय लावून घ्या.  कचरा वर्गीकरणासाठी प्रयत्न करा.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

No comments:

Post a Comment

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...