Wednesday, September 21, 2022

स्वच्छ शहर, स्वच्छ महाराष्ट्र आता स्वच्छ महाराष्ट्र अभियान २.०

देशातील सर्व शहरातील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे याकरीता शहरांना स्वच्छतेची आणि नागरिकांना शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने २ ऑकटोबर २०१४ पासून केंद्र शासनाच्या वतीने  भारतात स्वच्छ भारत अभियानाचा प्रारंभ झाला. याच धर्तीवर राज्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) ची अंमलबजावणी सुरु झाली. 

उद्देश :

शहरातील ज्या कुटुंबांमध्ये शौचालय सुविधा नाही, अशा कुटुंबाना वैयक्तिक किंवा सार्वजनिक शौचालयांची सुविधा उपलब्ध करून राज्यातील शहरे हगणदारीमुक्त करणे तसेच घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ अंतर्गत शहरातील घनकचऱ्याचे व्यवस्थापन करून शहरे स्वच्छ करणे या दोन प्रमुख बाबींचा स्वच्छ भारत अभियानात समावेश आहे. 

महाराष्ट्र अभियानाच्या अंमलबजावणीसाठी नगर विकास विभागांतर्गत स्वतंत्र स्वच्छ महाराष्ट्र अभियान संचालनालय निर्माण करण्यात आले आहे. या अभियानाची अंमलबजावणी शहरस्तरावर नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत करण्यात येत आहे.

स्वच्छ भारत अभियानाच्या उद्देशानुसार राज्यस्तरावर हे अभियान यशस्वी करण्यासाठी नगर विकास विभागातर्फे  विशिष्ट घटकांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. 

  • उघडयावरील शौचविधी बंद करणे.
  • हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांना या कामातून मुक्त करणे.
  • नागरी घनकचरा व्यवस्थापनासाठी आधुनिक व शास्त्रोक्त पध्दतीचा अवलंब करणे.
  • स्वच्छतेच्या अनुषंगाने सवयींमध्ये बदल करणे.
  • स्वच्छते विषयी जागरूकता निर्माण करणे आणि त्याची सार्वजनिक आरोग्याशी सांगड घालणे.
  • नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांची क्षमता वाढविणे.
  • भांडवली खर्च, देखभाल यासाठी खाजगी संस्थांचा सहभाग वाढवून सुयोग्य वातावरण निर्माण करणे.
  • महाराष्ट्राचे स्वच्छता अभियानाचे धोरण
  • शहर स्तरावरील स्वच्छतेचा व्यापक आराखडा तयार करणे. 
  • खाजगी संस्थांच्या सहभागासाठी सुयोग्य वातावरण निर्माण करणे.
  • क्षमता बांधणी करणे.
  • नागरी भागातील हाताने मैला उचलणाऱ्या सर्व सफाई कामगांरांचा शोध घेवून ते काम करीत असलेल्या या कामामधून मुक्त करून त्यांचे पुनर्वसन करणे.
  • घनकचरा व्यवस्थापनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामाच्या स्थितीत सुधारणा करणे.
  • स्थलांतरीतांसाठीच्या सर्व तात्पुरत्या निवासस्थानात व शहरी बेघरांसाठीच्या निवासस्थानात शौचालयाची पुरेशी व्यवस्था करणे.
  • शहरी भागातील बांधकामांवर काम करणाऱ्या कामगारांना तेथेच तात्पुरत्या शौचालयाची सुविधा उपलब्ध करण्याचे अनिवार्य करणे.
  • सेवानिवृत्त, लहान मुली, गर्भवती व स्तनदा माता यांच्यासाठी वैयक्तीक घरगुती शौचालय बांधकामामध्ये प्राधान्य देणे.

आता स्वच्छ महाराष्ट्र अभियान २.०

स्वच्छ महाराष्ट्र नागरी २.०

 स्वच्छ भारत अभियानात सातत्य राखण्याच्या दृष्टीने व संपूर्ण नागरी भाग कचरामुक्त करण्याच्या दृष्टीने वैयक्तिक, सामुदायिक आणि सार्वजनिक शौचालयांकरिता, वापरलेले पाणी व मैला यांची प्रकिया, विल्हेवाट व पुनर्वापर करणे, सर्व प्रकारच्या घनकचऱ्याचे व्यवस्थापन करणे व जुना साठलेला कचरा व प्लास्टिक कचरा, बांधकाम कचरा यांची विल्हेवाट लावणे व व्यवस्थापन करणे यासाठी स्वच्छ भारत नागरी २.० चा प्रारंभ करण्यात आला आहे.


याच धर्तीवर महाराष्ट्रात स्वच्छ महाराष्ट्र नागरी २.० अभियान सुरु करण्यात आले आहे. 

स्वच्छ महाराष्ट्र नागरी २.० अभियान मुख्य उद्देश - 'कचरामुक्त शहर'

उद्दिष्टे 

शाश्वत घनकचरा व्यवस्थापन 

  • सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता आणि आरोग्य सुनिश्चित करण्याबरोबरच घनकचरा व्यवस्थापनाच्या १०० टक्के शास्त्रोक्त प्रक्रियेसह सर्व शहरे स्वच्छ व कचरामुक्त करणे. 
  • घनकचरा व्यवस्थापन करताना होणारे वायू प्रदूषण कमी करणे.
  • एकल वापर प्लॅस्टिकच्या वापरात टप्प्या टप्प्याने कपात करणे. 

शाश्वत स्वच्छता 

या घटकाचा उद्देश नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हागणदारीमुक्त दर्जा कायम ठेवणे हा आहे. 

शाश्वत स्वच्छता आणि वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया 

  • वापरलेले पाणी जलस्रोतांमध्ये सोडण्यापूर्वी त्यावर प्रक्रिया करणे आणि प्रक्रिया केलेल्या पाण्याचा जास्तीत जास्त पुनर्वापर करणे. 
  • भुयारी गटार आणि सेप्टिक टाक्यांमध्ये धोकादायक पद्धतीने मानवी प्रवेश बंद करण्यात यावे.
  • भुयारी गटार आणि सेप्टिक टाक्यांची संपूर्ण यांत्रिकीकृत यंत्रणेद्वारे स्वच्छता करण्यात येऊन हाताने मैला हाताळण्याच्या पद्धत पूर्णतः बंद करणे. 

 

Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Twitter: https://twitter.com/MAHA_UDD

Instagram: https://www.instagram.com/maha_udd/

Blog: https://mahaudd.blogspot.com/

YouTube: https://www.youtube.com/channel/UCe9-Tq8QTPQ4h8IyXp2wbvw

LinkedInhttps://tinyurl.com/2bpdv9sv

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x

No comments:

Post a Comment

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...