Wednesday, September 25, 2024

राज्य सरकारतर्फे नव्या प्रकल्पांची भेट

मुंबई आणि पुणे शहराच्या विकासाला गती मिळणार  पीएमआरडीएच्या  ३ हजार ८३८ कोटींच्या अर्थसंकल्पास मंजूरी बदलापूर नवी मुंबई प्रवास अवघ्या २० मिनिटात

बॅकबे रिक्लेमेशन योजनेचा सुधारित विकास आराखडा नुकताच मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एमएमआरडीएच्या बैठकीत सादर करण्यात आला. त्यामध्ये समुद्रकिनारे आणि खारफुटीसारख्या नैसर्गिक वैशिष्ट्यांवर विशेष लक्ष देऊन या क्षेत्राचे निवासी आणि व्यावसायिक क्षेत्रांमध्ये विभाजन करण्यात आले आहे. याभागात पर्यटनाला चालना मिळण्यासाठी 'मरिना' पर्यटन प्रकल्पाचा समावेश असून त्यामध्ये लहान बोटी आणि नौकांसाठी खास बंदर असणार आहे. हा सुधारित प्रारूप आराखडा मंजुर करून नागरिकांच्या सूचना मागविण्यासाठी प्रसिद्ध करण्याची मान्यता देण्यात आली.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची १५८ वी बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मुंबई महानगर क्षेत्रातील दळणवळण, पायाभूत सुविधा आणि आर्थिक विकास वाढविण्याच्या प्रकल्पांना गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले. बॅकबे रिक्लेमेशन प्रारूप विकास आराखडा, बदलापूर ते विरार-अलिबाग मल्टीमोडल कॉरीडॉर प्रवेश नियंत्रित महामार्गासाठी सल्लागाराची नेमणुक आदी विषयांना यावेळी मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. एमएमआरडीएच्या माध्यमातून सुमारे अडीच लाख कोटींची विकास कामे सुरू असून ती कालमर्यादेत पूर्ण करावीत, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

राज्य सरकारने ठाणे, नवी मुंबईकरांना नव्या प्रकल्पांची भेट दिली आहे. बदलापूर- नवी मुंबई विमानतळ प्रवास अतिवेगवान आणि सुकर करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) माध्यमातून बदलापूर- नवी मुंबई विमानतळ दरम्यान प्रवेश नियंत्रण मार्ग (अॅक्सेस कंट्रोल रोड) बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २० किमीच्या मार्गासाठी १०,८३३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा मार्ग सेवेत दाखल झाल्यास बदलापूर- नवी मुंबई अंतर केवळ २० मिनिटांत पार करता येणार आहे.

बदलापूर- नवी मुंबई प्रवेश नियंत्रण मार्गाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एमएमआरडीए'च्या मान्यता देण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे हा मार्ग प्रस्तावित विरार-

अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेशी जोडला जाणार आहे. त्यामुळे नवी मुंबई- बदलापूर आणि पुढे विरार-

अलिबाग असाही अतिवेगवान प्रवास करता येणार आहे. बदलापूर, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि नवी मुंबईचा झपाट्याने विकास होत आहे. या परिसरातून येणाऱ्या-जाणाऱ्यांची, वाहनांची संख्या प्रचंड आहे. या प्रकल्पाचे काम हाती घेतल्यानंतर पाच वर्षांत मार्ग पूर्ण करण्याचे 'एमएमआरडीए'चे नियोजन आहे.

बदलापूर- नवी मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्यांना प्रचंड वाहतूक कोडींचा सामना करावा लागतो. तर बदलापूर, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथमधील अंतर्गत रस्त्यांवरही प्रचंड वाहतूक कोंडी होते. वाहतूक  कोंडीचा प्रश्न  सोडविण्यासाठी 'एमएमआरडीए'ने बदलापूर- नवीमुंबई दरम्यान २० किमीचा प्रवेश नियंत्रण मार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. 

शहराच्या अंतरभागाऐवजी बाहेरून वाहने जावीत, अंतर्गत रस्ते स्थानिकांसाठी, त्यांच्या वाहनांसाठी वापरले जावेत आणि शहरांतील अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक कोंडी दूर व्हावी यासाठी बदलापूर- नवी मुंबई प्रवेश नियंत्रण मार्ग प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. मेट्रो आणि इतर वाहतूक प्रकल्पापेक्षा प्रवेश नियंत्रण मार्ग कमी खर्चिक आणि कमी वेळात पूर्ण होणारा पर्याय आहे. त्याचबरोबर हा मार्ग तब्बल आठ पदरी असल्याने त्याचा अधिक वापर होणार आहे. त्यामुळे पुढील सहा- सात वर्षांत बदलापूर, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ शहरातील वाहतूक कोंडी दूर होणार असल्याचा दावा यानिमित्ताने त्यांनी केला आहे.

ताशी ८० किमी वेगाची मर्यादा

बदलापूर- नवी मुंबई प्रवेश नियंत्रण मार्ग 'एमएसआरडीसी'च्या विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेशी जोडला जाणार आहे. हा मार्ग नवी मुंबई विमानतळासह मुंबई- अहमदाबाद द्रुतगती महामार्ग कल्याण वर्तुळाकार रस्ता (कल्याण रिंग रोड) या प्रकल्पांशीही जोडला जाणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या, तसेच मुंबई महानगर प्रदेशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जाण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. या २० किमीच्या मार्गावर वाहनांसाठी ताशी ८० किमी वेगाची मर्यादा असणार आहे.

भारतीय राष्ट्रीय भुगतान निगम (एनपीसीआय) च्या कार्यालयाला वांद्रे कुर्ला संकुलातील जी ब्लॉकमधील भुखंड देण्यासही याबैठकीत मान्यता देण्यात आली. नीति आयोग व राज्य शासन यांनी संयुक्तरित्या मुंबई महानगर प्रदेशासाठी तयार केलेल्या आर्थिक बृहत आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाची प्रकल्प अंमलबजावणी प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

पीएमआरडीएच्या  ३ हजार ८३८ कोटींच्या अर्थसंकल्पास मंजूरी : 

अटल सेतू, मुंबई-पुणे महामार्ग मिसिंग लिंक सारख्या प्रकल्पांमुळे पुणे आणि मुंबई ही महानगरे जवळ आली आहेत. त्याचा परिणाम म्हणून पुणे परिसरात मोठ्या प्रमाणावर विकास होत आहे. विकास प्रक्रियेच्या नियोजनाची जबाबदारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची असून प्राधिकरणाने पुणे शहराची सांस्कृतिक शहर म्हणून ओळख कायम ठेऊन शहराचा विकास व्हावा, अशा सूचना मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. बैठकीत पीएमआरडीएच्या ३ हजार ८३८ कोटी ६१ लाखांच्या अर्थसंकल्पास मंजूरी देण्यात आली.

मुख्य पुणे शहर दाटीवाटीचे झाले आहे, ही परिस्थिती बदलण्यासाठी नवीन विकसित होणाऱ्या भागात मोकळ्या जागा राहतील, याची काळजी घ्या. पुण्याच्या विकासाचे नियोजन करतांना तज्ज्ञांची मदत घ्या, असे निर्देश मा. मुख्यमंत्र्यांनी दिले. पुण्यात होणाऱ्या कव्हेशन सेंटर हे जागतिक दर्जाचे होण्यासाठी नियोजन करावे, गुंठेवारी अधिनियमातील नियमितीकरणाचे शुल्क कमी करुन नागरिकांना दिलासा द्यावा, हे शुल्क भरण्यासाठी ३१ मार्च पर्यंत विशेष सवलत उपलब्ध करुन जास्तीत जास्त जमिनी नियमित करुन घ्याव्यात अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

पुणे महानगराचा प्रारुप विकास आराखडा तयार करतांना जास्तीत जास्त नागरिकांना फायदा होईल, अशा प्रकारे तयार करावा. तसेच पीएमआरडीएच्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या परवडणाऱ्या घरांच्या बांधकामाची गुणवत्ता चांगली राहिल, याची काळजी घ्यावी. घरांच्या गुणवत्तेत हयगय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. तयार असणाऱ्या एकूण ४ हजार ८८६ घरांपैकी उरलेल्या १ हजार ६२० घरांची सोडत लवकरच काढण्यात यावी. तसेच दुसऱ्या टप्प्यातील ६ हजार घरांच्या बांधकामास वेग देण्यात यावा. सोबतच या घरांचे बांधकाम करतांना उद्यान, मोकळी जागा सारख्या विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, असेही त्यांनी सांगितले.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आजच्या बैठकीत ५ कोटी ७५ लाखांचा शिलकीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावेळी पुणे महानगर प्रदेशासाठी ठाणे शहराच्या धर्तीवर आपत्ती प्रतिसाद पथकाच्या स्थापनेस आणि १० ठिकाणी नवीन अग्निशमन केंद्र निर्मितीस मान्यता देण्यात आली. ११ ठिकाणी मलनिस्सारण योजना तयार करण्यास, लोणावळा येथे टायगर व लायन्स पाँईंट येथे ग्लास स्कायवॉक तयार करण्यास या बैठकीत मंजूरी देण्यात आली.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Podcasts: https://tinyurl.com/5yrth66x  

No comments:

Post a Comment

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...