Wednesday, May 31, 2023

राज्यात ‘मेरी लाईफ, मेरा स्वच्छ शहर’ उपक्रम रिड्यूस, रियूज आणि रिसायकल संकल्पनेवर भर

केंद्र सरकारचे स्वच्छता अभियान दिवसेंदिवस लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमधून करण्याचा प्रयत्न केला जात आहे.  त्यासाठी शहरांतील विविध महानगरपालिका, नगरपरिषद तसेच नगरपंचायती  'मेरी लाईफ, मेरा स्वच्छ शहर', ही मोहीम  आणि  त्या अंतर्गत  रिड्यूस, रियूज आणि रिसायकल- 'थ्री-आर केंद्रांची सुरुवात करीत आहेत. 

"स्वच्छतेतून परोपकाराची बीजे पेरली जातात. परोपकारातून माणुसकी जपली जाते" स्वच्छता आणि  परोपकारावर महत्त्वाचे कार्य करणारे संत गाडगे बाबा यांचे महत्त्वाचे विचार महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था आचरणात आणतआहेत. याचे चालते-बोलते उदाहरण आहे ‘मेरी लाईफ, मेरा स्वच्छ शहर’ हे अभियान आणि  थ्री-आर केंद्रे. 

आपल्या प्रत्येकाच्या घरात कित्येक अशा वस्तू असतात की,  त्यांचा वापर करत नाही. वापरात नसलेल्या वस्तू  ह्या नेहमी अडगळीत पडून राहतात. तर अशा चांगल्या स्थितीतल्या; पण वापरात नसलेल्या वस्तू स्थानिक स्वराज्य संस्थांनी ठिकठिकाणच्या बेघर निवारा केंद्रांमध्ये आणण्याचे आवाहन केले होते.  त्या आवाहनाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. नागरिकांचा लाभणारा प्रतिसाद पाहता ‘मेरी लाईफ, मेरा स्वच्छ शहर’ या अभियानातंर्गत  थ्री-आर केंद्रे चालवण्यासाठी वापरात नसलेल्या पण चांगल्या स्थितीत असणाऱ्या वस्तू आणून देण्यासाठी पुन्हा एकदा विविध स्थानिक स्वराज्य संस्थांनी आवाहन केले आहे. 

थ्री-आर केंद्रांमध्ये केंद्रात जुनी पुस्तके, प्लास्टिक, कपडे, पादत्राणे आणि इतर निरुपयोगी वस्तू नागरिकांकडून गोळा करुन त्यांचा पुनर्वापर करण्यात येणार आहे.यासाठी पालिकेच्यावतीने ई-रिक्षा व घंटागाडीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे उपक्रमातंर्गत जमा केलेल्या वस्तूंची नोंद रजिस्टरमध्ये ठेवली जाणार आहे. गरजू नागरिकांनी त्यांना आवश्यक वस्तू या केंद्रातून घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच या अभियानातून टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवण्याच्या स्पर्धाही आयोजित केल्या आहेत. त्याचे प्रदर्शनही या केंद्रात भरवले जाणार आहे. विजेत्यांना आकर्षक बक्षीसे व प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

काही महापालिकांनी ‘थ्री आर’ केंद्रांद्वारे नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत.   घनकचरा व्यवस्थापनात ‘थ्री आर’ ही अत्यंत महत्वाची संकल्पना असून यामध्ये कचरा कमी करणे (Reduce), कच-याचा पुनर्वापर करणे (Reuse) व कच-यावर पुनर्प्रक्रिया करणे (Recycle) अपेक्षित आहे.  या विषयास अनुरूप कार्यवाही करीत नवी मुंबई महानगरपालिका 'रिसायकल मार्ट’ ही अत्यंत आगळीवेगळी संकल्पना ‘थ्री आर’च्या माध्यमातून राबवित आहेत. 'रिसायकल मार्ट'ला डी मार्टचा उत्तम पाठींबा मिळत आहे. 'रिसायकल मार्टमध्ये  ‘थ्री आर’ च्या अनुषंगाने यामध्ये नागरिकांनी घरातील वापरून झालेले कपडे, प्लास्टिक बॉटल्स, वस्तू व दुधाच्या पिशव्या, लेदरचे साहित्य, भांडी, वर्तमानपत्रे, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे अशा टाकाऊ वस्तू 'डी मार्ट' मध्ये आणून दिल्यास त्यावर त्यांना वस्तूंनुसार पॉईंट्सची कुपन्स दिली जाणार आहेत. त्या पॉईंट्सनुसार त्यांना तितक्या रक्कमेची सूट त्यांनी डी मार्ट मध्ये खरेदी केलेल्या नव्या सामानावर दिली जाणार आहे. याव्दारे घरातील सुक्या कच-याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी त्या वस्तू उपलब्ध करून देऊन नागरिकांकडून पर्यावरण रक्षणाला हातभार लावला जाणार आहे शिवाय त्या टाकाऊ वस्तूंच्या बदल्यात नागरिकांना पॉईंट्स स्वरूपात आर्थिक लाभही होणार आहे.

सुक्या कच-याची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावण्यासाठी ‘थ्री आर' ची संकल्पना अत्यंत मोलाची असून त्याकरिता डी मार्ट सारख्या लोकप्रिय वाणिज्य आस्थापनेने नवी मुंबई महानगरपालिकेची ‘रिसायकल मार्ट’ संकल्पना राबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अशा प्रकारचा बहुउपयोगी नाविन्यपूर्ण उपक्रम देशात बहुधा पहिल्यांदाच राबविला जात असेल.यामध्ये पर्यावरण जपणूकीसाठी हातभार आणि पॉईंट्सच्या रूपाने पैशांची बचत अशा दोन्ही बाजूने हा उपक्रम नागरिकांसाठी फायद्याचा असल्याने याचा लाभ नागरिक मोठ्या प्रमाणावर घेतील व या उपक्रमाचा उपयोग स्वच्छ सर्वेक्षणातील मानांकन उंचाविण्यासाठी होईल असा विश्वास व्यक्त केला.

तर मग रिड्यूस, रियूज आणि रिसायकल संकल्पनेवर भर देणाऱ्या ‘मेरी लाईफ, मेरा स्वच्छ शहर’ उपक्रमात सहभागी होणार ना? 


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Saturday, May 27, 2023

पालिकेचे आता 'मिशन मेरिट'

मुंबई महानगरपालिकेचे 'मिशन ॲडमिशन - ‘ एकच लक्ष्य एक लक्ष’ही मोहीम २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात विशेष लोकप्रिय झाली. मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने शाळांमधील पटसंख्येत वाढ करण्याचे ध्येय ठेवून हाती घेतली होती. पालिकेच्या शाळांमधून विद्यार्थ्यांची शिक्षण घेण्याची आवड वाढली पाहिजे, या अनुषंगाने पालिकेने आपल्या शैक्षणिक पद्धतीत आमूलाग्र बदल घडवून आणले. या शिक्षण पद्धतीला 'स्मार्ट स्कूल'ची जोड दिली.  

मिशन ॲडमिशन - एकच लक्ष्य एक लक्ष ' या विशेष मोहिमेनंतर आता 'मिशन मेरिट' हाती घेतले आहे. प्रत्येक मूल शिक्षण प्रवाहात आणण्याबरोबरच त्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी ही खास मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी तयार केलेल्या कृती

आराखड्याची अंमलबजावणी येत्या १५ जून २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून मुंबई महापालिका करणार आहे. 'मिशन मेरीट' अंतर्गत मुंबई महापालिकेच्या शैक्षणिक सेवा- सुविधांमध्ये आमूलाग्र बदल करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासोबत वेगवेगळे उपक्रम राबविले जाणार आहेत. 

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाद्वारे माटुंगा येथील 'एसआयईएस शाळेच्या  सभागृहात  'गुणवत्तापूर्ण शिक्षण' कार्यक्रम अंतर्गत चर्चासत्र संपन्न झाले. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने या चर्चासत्रात नियोजन करण्यात आले. ज्या शिक्षकांनी, मुख्याध्यापक, अधिकाऱ्यांनी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे त्यांच्या शिक्षण पद्धती, बिगर शासकीय संस्थांच्या प्रतिनिधींनी मुलांना शिक्षणात प्रवाहात आणण्यासाठी हाती घेतलेले निरनिराळे उपक्रम आणि लातूर पॅटर्न या त्रिसूत्रीच्या आधारावर 'मिशन मेरिट' राबविण्यात येणार आहे. या तीनही क्षेत्रातील जाणकारांनी मुंबई

महापालिकेच्या शिक्षण विभागातील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करून पुढील वर्षभराचे नियोजन केले आहे. खास करून 'मिशन मेरीट'साठी विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती, विविध शिष्यवृत्ती परीक्षा, पायाभूत साक्षरता व गणितीय संकल्पना इयत्तेनुसार अध्ययन निष्पत्ती आदी विषयांवर विचारमंथन करण्यासाठी उप शिक्षणाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.  हाच मुंबई महानगर पालिकेच्या शिक्षण समितीचा  कृती आराखडा आहे. हा कृती आराखडा यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून राबविण्यात येणार आहे. 

कसा असेल 'मिशन मेरीट' कृती आराखडा... 

'मिशन मेरीट'मध्ये विद्यार्थ्यांच्या बौद्धिक प्रगतीचा, शैक्षणिक गुणवत्तेचा अभ्यास करून अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालात विद्यार्थ्यांना  शिक्षण घेण्यात समस्या निर्माण झाली असल्यास त्याची कारणे, त्या समस्येवरील उपाय समिती

सादर करणार आहे. त्यानंतर, या अहवालानुसार आणखी एक सविस्तर कृती आराखडा (ॲक्शन प्लॅन) तयार करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक समितीत दहा सदस्यांचासमावेश असेल. हे सदस्य अभ्यासकरून त्यावर आठ दिवसांत उपाय व उपक्रम सुचविणार आहेत. उप शिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितींच्या अहवालावर अभ्यास करून त्यावर कृतीआराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर, यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच १५ जून २०२३ पासून या आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या मार्गी लावण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या लागणार, त्यामध्ये कोणाचा सहभाग असेल, कोणकोणते साहित्य त्यासाठी लागणार याचे सूक्ष्म नियोजन करण्यात येणार आहे.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Monday, May 22, 2023

पिंपरी चिंचवड महापालिका शाळेचा आदर्श घ्यायला हवा

आर्टिफिशियल इंटेलिजन्स ( AI ) म्हणजे कृत्रीम  बुद्धिमत्ता. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून अनेक ऍप तयार केले जात आहेत. कृत्रीम  बुद्धिमत्तेचा वापर करून जशी  दैनंदिन कामे सुरळीतपणे पूर्ण करता येतात. तशीच ऑफीसची म्हणजे विविध कार्यालयीन कामे सुरळीत पूर्ण करता येतात. आता तर कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग विविध शाळांमध्येही केला जात आहे. यात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांनी बाझी मारली आहे. 


स्मार्ट सिटीअंतर्गत विविध शहरांतील महापालिकेच्या शाळांमधून  'ई-क्लास' रूम  हा प्रकल्प राबविला जात असून, त्यात स्मार्ट इंटरॅक्टिव्ह टीव्ही, कॉम्पुटर लॅब, स्टेम लॅब, रोबोटिक्स, शाळेच्या आतील नेटवर्किंग, मल्टिमीडिया कन्टेन्ट अशा विविध साधनांचा समावेश आहे. सध्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या  ११२ शाळांमधून दोन टप्प्यात स्मार्ट इंटरॅक्टिव्ह टूल बसविण्याचे काम एप्रिल २०२१ मधेच पूर्ण करण्यात आले. शाळेच्या भिंती ह्या अधिक बोलक्या दिसण्यासाठी एकूण ४० शाळांमध्ये शैक्षणिक पेटिंगचे काम शिक्षण विभागाच्या ऑर्डरनुसार एप्रिल २०२३ मध्ये पूर्ण झाले आहे. आता पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेत  आणखी एका घटकाची भर पडणार आहे आणि ती  आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची. 

कोरोना महामारीच्या काळात रिमोट वर्क आणि डिस्टन्स एज्युकेन यासारख्या डिजिटली प्रणालीकडे खूप ऑफिस वळले.  कारण वेळ वाचतो.गावकुसातील विद्यार्थ्यांना  चांगले शिक्षण घेता यावे यासाठी शाळांनीसुद्धा  डिजिटल शिक्षणपद्धतींचा मार्ग अवलंबविला. या डिजिटल शिक्षणप्रणालीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सची बहर पडली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ११२ शाळांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड अटेन्डन्स प्रणाली आणि विद्यार्थ्यांचे इमोशन आणि वर्तन विश्लेषक करण्याचे सॉफ्टवेअर येत्या शैक्षणिक वर्षापासून राबविण्याचे आदेश पालिका प्रशासनाने दिले आहेत. यासाठी ५३०० विद्यार्थी व ५७२ शिक्षकांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

शिक्षकांचे रजिस्ट्रेशन बेनेट कोलमन आणि कंपनी लिमिटेड आणि मे. ऐडीक सोलुशन प्रा. लि. यांच्या मार्फत शिक्षण विभागाच्या आदेशाने आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे काम सुरू करण्यात आले. त्यासाठी २८ आणि २९ एप्रिल रोजी शाळेतील शिक्षकांचे ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यात आले. तसेच, १ मे रोजी प्रत्यक्ष रजिस्ट्रेशन प्रक्रिया राबविण्यात आली. विद्यार्थी आणि शिक्षक यांचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी एक मोबाइल अॅप्लिकेशन विकसित करण्यात आले  असून त्याद्वारे विद्यार्थ्यांचे नाव, इयत्ता, तुकडी, जन्म दिनांक, रक्त गट, पालकांची माहिती, पत्ता, मोबाईल नंबर आणि त्यांचा ३ वेगवेगळ्या अँगलचा फोटो अॅप्लिकेशनद्वारे घेतला गेला. प्रक्रिया पार पाडण्यासाठी शिक्षकांच्या मदतीला मे. ऐडीक सोलुशन यांनी नेमलेलया  ३५ समन्वयकांनी  वेगवेगळ्या शाळांना भेट देऊन शिक्षकांना मार्गदर्शन केले व ही प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आर्टीफिशियल इंटेलिजन्स सॉफ्टवेअर प्रणाली अंतर्गत रजिस्ट्रेशन ड्राईव्हमध्ये विद्यार्थ्यांची फोटोसह माहिती घेताना शिक्षकांना मदत केली. या प्रणालीचे काम मे महिन्यातच पूर्ण होणार असून, येत्या शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. 

आर्टीफिशियल इंटेलिजन्स या प्रणालीमध्ये एका वर्गात दोन कॅमेरे बसविण्यात आले आहेत. जे वर्गातील विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवणार आहेत. वर्गात विद्यार्थ्यांची हजेरी आणि त्याच्या वर्तणुकीवर लक्ष राहणार आहे. वर्गात विद्यार्थी खेळताना किंवा भांडताना कोणाला लागले तर सॉफ्टवेअर डिटेक्ट करणार. सॉफ्टवेअर रन होईल तेव्हा अॅनालिसिस करेल की, विद्यार्थ्याचा कोणत्या तासाला त्याचा मूड कसा होता. यामध्ये भांडण झाले तर फाईट, पडला तर फॉल डाऊन, लागले तर डेंजर असे सॉफ्टवेअर ते डिटेक्ट करणार आहे. 

आर्टीफिशियल इंटेलिजन्स'मध्ये ज्या विद्यार्थ्यांची नोंदणी राहिलेली आहे, त्या राहिलेल्या व नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची नोंदणी १४ जूननंतर करण्यात येणार आहे. आर्टीफिशियल इंटेलिजन्स हे ऍप विद्यार्थी आणि शिक्षकांमधला दुवा ठरणार आहेत. या ऍपमुळे विद्यार्थ्यांची फक्त शैक्षणीक प्रगती होणार नसून त्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होणार आहे.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Saturday, May 20, 2023

सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचतोय ‘आपला दवाखाना’

मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने मुंबईसह राज्यभरात 'बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात ७०० आपला दवाखाने सुरू केले जाणार आहेत. आतापर्यंत ४००  आपला दवाखाना सुरू करण्यात आले आहेत.  महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक  सर्वसामान्य व्यक्तीला स्वस्त दारात पण दर्जेदार आरोग्य सुविधा मिळावी यासाठी 'आपला दवाखाना' या आरोग्य योजनेचा शुभारंभ करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १९ जानेवारीला मुंबईत  २० आपला दवाखान्यांचं लोकार्पण करण्यात आलं. यापूर्वी ऑक्टोबर २०२२ मध्ये मुंबईत एकूण ५२  ठिकाणी ‘आपला दवाखाना’ अंतर्गत आरोग्य सेवा सुरू करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील सर्वसामान्यांना दर्जेदार आणि मोफत आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी नोव्हेंबर २०२२ पासून राज्यात  ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ आरोग्य योजनेला प्रारंभ झाला. या आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रात ७०० आपला दवाखाने सुरू केले जाणार आहेत. आपला दवाखानाला मिळणारा प्रतिसाद पाहता मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'बाळासाहेब ठाकरे दवाखाना' योजनेला युद्धपातळीवर गती देण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत ३१७ बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू  करण्यासाठी तयारी झाली आहे.  यात ठाणे परिमंडळात २९ आपला दवाखाना असून पुणे परिमंडळ ३०, नाशिक परिमंडळ ५२, कोल्हापूर २७, छत्रपती संभाजीनगर परिमंडळ २८, लातूर परिमंडळ ४४, अकोला परिमंडळ ५३ आणि नागपूर परिमंडळात ५४ असे ३१७ आपला दवाखाना सुरू करण्यात येणार आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून सराकरी आणि पालिका हॉस्पिटलचा भार वाढला आहे. विशेषत: झोपडपट्ट्या असलेल्या परिसरात अशा दवाखान्यांची खूप गरज आहे. त्यामुळे महापालिका हद्दीत पहिल्या आरोग्यवर्धिनी केंद्रांचे  आपला दवाखान्यात रूपांतर केले जात आहे.   मुंबई महापालिकेने सुरू केलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेच्या लाभार्थींची संख्या आठ लाखांवर पोहचली आहे. आपला दवाखान्याच्या माध्यमातून मुंबईतील नागरिकांना विविध वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत असून नागरिकांचा पैसा आणि वेळेचीही बचत होत आहे. औषधे आणि मोफत वैद्यकीय चाचण्यांच्या पर्यायामुळे मुंबईकरही सुविधांचा मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहेत. येत्या काळात मुंबईत आणखी दवाखाने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सध्या १५६ ठिकाणी ‘आपला दवाखाना’ कार्यरत आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील मिळून १५६ दवाखान्यांत आतापर्यंत ८,०१,२३३ नागरिकांनी विविध सुविधांचा लाभ घेतला आहे. पॉलिक्लिनिक व डायग्नॉस्टिक केंद्रात ३२,९१८ रुग्णांनी दंत चिकित्सा, स्त्री-रोग तज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, जनरल फिजिशियन, त्वचारोग तज्ज्ञ इत्यादी विविध तज्ज्ञांच्या उपचार सुविधेचा लाभ घेतला. ७,६८,३१५ रुग्णांनी मोफत वैद्यकीय तपासणी व औषधोपचारांचा लाभ घेतला आहे. आपला  दवाखान्यात रुग्णांच्या सेवेसाठी  एक वैद्यकीय अधिकारी, एक परिचारिका, एक फार्मसीस्ट आणि एक मदतनीस अशा चौघांची कंत्राटीपद्धतीने नियुक्ती करण्यात आली आहे. या जागांच्या भरतीसाठी पालिकेकडून जाहिरात काढण्यात येते. 

काय आहे ‘आपला दवाखाना’ योजना?

‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ ही मुंबई महानगरपालिका आणि शिंदे सरकारची नवीन आरोग्य योजना आहे. सुरुवातीला 'आपला दवाखाना’ अंतर्गत या   ठाणे आणि मुंबई शहरात आपला दवाखाना अंतर्गत आरोग्य सुविधा दिल्या गेल्या.पण आता  संपूर्ण महाराष्ट्रात 'आपला दवाखाना' आरोग्य योजना सुरू करण्याचे मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे  लक्ष्य आहे. आगामी काळात राज्यभरात असे  ७००  दवाखाने सुरू करण्यात येतील असं आश्वासन शिंदे सरकारने दिलं आहे.

मुंबईतील झोपडपट्टी परिसरात आणि राज्यातील गामीण तसंच दुर्गम भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रत्येक छोट्या आजारासाठी हॉस्पिटलमध्ये यावं लागतं. यामुळे वैद्यकीय उपचाराला उशीर होतोच शिवाय प्रवासाचा खर्च होतो आणि अनेकदा तर राहण्याची गैरसोय सुद्धा होते. दुसऱ्याबाजूला दैनंदिन रुग्णांमुळे हॉस्पिटलवरील ताण वाढतो ज्याचा थेट परिणाम अपघात विभाग, आयसीयू आणि प्रसूती विभागा अशा तात्काळ उपचार गरजेचा असलेल्या रुग्णांच्या उपचारावर होतो. खरंतर वस्त्यांमध्ये सरकारी दवाखाने सुरू करण्याची मागणी ही गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. मुंबईसह राज्यभरातील महापालिका आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची प्रचंड गर्दी दिसून येते. अगदी ताप,सर्दी अशा आजारांसाठीही रुग्णांना उपचार आणि वैद्यकीय टेस्ट करण्यासाठी घरापासून दूर हॉस्पिटल गाठावे लागते. यावर उपाय म्हणून दर २५ ते ३० हजार लोकसंसंख्येच्या वस्तीजवळ  ‘आपला दवाखाना’ असावा असं महापालिकेचं लक्ष्य आहे. तसेच आपला दवाखाना’च्या माध्यमातून हजारो मुंबईकरांना विनामूल्य आरोग्य सुविधा पुरविण्यात येत आहेत. या आरोग्य सुविधा आपल्या जवळच्या आपला दवाखान्यात सकाळपासून रात्रीपर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहे.’


'आपला दवाखाना' अंतर्गत मिळणाऱ्या आरोग्य सुविधा. 

  • या योजनेअंतर्गत साधारणपणे २५  हजार ते ३०  हजार लोकसंख्येसाठी 1 दवाखाना सुरू करण्याचं प्रशासनाचं नियोजन आहे.
  • सकाळी ७.०० ते दुपारी २. ००  आणि दुपारी ३.०० ते रात्री १०. ०० या वेळेत राज्यातील सर्व 'आपला दवाखाना'' सुरू राहतील. 
  • 'आपला दवाखाना' अंतर्गत १४७ प्रकारच्या विविध वैद्यकीय चाचण्या विनामूल्य करून मिळतात. 
  • काही ठिकाणी पोर्ट केबिनमध्ये प्राथमिक उपचारासाठी दवाखाना सुरू केला जाणार आहे.
  • पॉलिक्लिनिकमध्ये 'आपला दवाखाना' अंतर्गत वैद्यकीय तज्ज्ञांद्वारे विनामूल्य वैद्यकीय सल्ला आणि उपचार मिळत आहे 
  • 'आपला दवाखाना' मधील सीटी स्कॅन, एमआरआय, एक्स रे, इत्यादी चाचण्या  महानगरपालिकेच्या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये  केल्या जातात. 
  • कान नाक घसा तज्ज्ञ (ENT) नेत्रचिकिस्ता, स्त्री रोग तज्ज्ञ, वैद्यकीय तपासणी तज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट, त्वचारोग तज्ज्ञ, दंतशल्य चिकित्सा, बालरोग तज्ज्ञ अशा आरोग्य सुविधा पॉलिक्लिनिकच्या माध्यमातून दिल्या जात आहेत. 
  • ग्रामीण भागात प्रामुख्याने एसटी स्थानकाजवळ 'आपला दवाखाना' सुरू करण्याचं सरकारचं नियोजन आहे.
  • महापालिकेच्या उपलब्ध दवाखान्यात दुसऱ्या सत्रात (दुपार नंतर) आणि इतर ठिकाणी मोकळ्या जागेत पोर्टाकेबिनमध्ये दवाखाने सुरू केले आहेत. 

Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...