Tuesday, February 28, 2023

नवी मुंबई महानगर पालिका एक दृष्टिक्षेप (भाग-१)

राज्य शासनाने मुंबई जवळील नवीन शहरे निर्माण करण्यासाठी 'सिडको'ची स्थापना केली आहे. नवी मुंबईच्या निर्मिती आणि नियोजनात सिडकोचे महत्त्व अनन्य साधारण आहे. सिडकोने आपल्या अखत्यारीत असणाऱ्या २९ गावांना घेऊन नवी मुंबई महानगर पालिकेची निर्मिती १७ डिसेंबर १९९२ मध्ये केली. नवी मुंबईच्या रचनेची सुरुवात ही ग्रामपंचायतीपासून झालेली आहे. ग्रामपंचायतीमधून  थेट महानगरपालिकेत रुपांतरीत झालेली, नवी मुंबई ही देशातील एकमेव महानगरपालिका ठरली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून नागरीक नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने नवी मुंबईमध्ये स्थायिक होत आहेत. प्रत्येक नागरिकाला शहराविषयी अभिमान वाटेल अशा प्रकारची विकास कामे करण्यास महानगरपालिकेने प्राधान्य दिलेले आहे. 

गेल्या काही वर्षांत नवी मुंबई मनपाने कौतुकास्पद अशी उत्तुंग भरारी मारलेली आहे. राज्यातील 'पहिल्या क्रमांकाचे स्वच्छ शहर' म्हणून संपूर्ण देशात प्रथम क्रमांक मिळविण्यासाठी नवी मुंबईची वाटचाल सुरू आहे. त्याचबरोबरीने नवी मुंबई मनपाची आता निरनिराळी ओळख बनलेली आहे.  जसे की क्षेत्रफळाच्या तुलनेत सर्वाधिक उद्याने शहर,  २४ तास पाणीपुरवठा करणारी यंत्रणा, अत्याधुनिक मलनिस्सारण केंद्र, कर्जमुक्त महानगरपालिका, सर्वोत्तम नागरी सुविधा देणारे शहर... अशीच ओळख राज्य आणि केंद्र सरकारमध्ये नवी मुंबई महानगर पालिकेची बनली आहे. शहरवासीयांना सर्वोत्तम नागरी सुविधा पुरविण्यास प्राधान्य देतानाच नावीन्यपूर्ण प्रकल्पही राबविले जात आहेत. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, केंद्र शासनाचे स्वच्छ सर्वेक्षण अभियान, पाणी पुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, अत्याधुनिक मलनिस्सारण केंद्र, शास्त्रोक्त पद्धतीने घनकचरा व्यवस्थापन, दर्जेदार परिवहन व्यवस्थापन, माझी वसुंधरा अभियानामध्ये महानगरपालिकेने राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कार पटकावले आहेत. 

स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये राज्यात पहिला व देशात तिसरा क्रमांक नवी मुंबई मनपाने पटकावला आहे.  हागणदारीमुक्त शहरांच्या ओडीएफ कॅटेगरीत देशातील सर्वोच्च वॉटरप्लस मानांकन या मनपाला मिळालेले आहे. कचरामुक्त शहरांच्या कॅटेगरीमध्ये फाईव्ह स्टार मानांकित शहरही नवी मुंबई ठरलेले आहे. केंद्र सरकारच्या इंडियन स्वच्छता लीगमध्ये राष्ट्रीय स्तरावर १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या शहरांमध्ये सर्वोत्तम युवक सहभागाच्या प्रथम क्रमांकाने मनपाची गौरव करण्यात आला आहे. 

महानगरपालिकेने राबविलेले प्रकल्प देशातील इतर महानगरपालिकांसाठी पथदर्शी ठरत असून वर्षभर विविध स्थानिक स्वराज्य संस्थांची शिष्टमंडळे महानगरपालिकेस भेट देत आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यांतून नागरीक नोकरी, व्यवसायासाठी नवी मुंबईमध्ये स्थायिक होत आहेत. प्रत्येक नागरिकाला शहराविषयी अभिमान वाटेल अशा प्रकारची विकास कामे करण्यास महानगरपालिकेने प्राधान्य दिले आहे. लोकसहभागातून स्वच्छता अभियानाला चळवळीचे स्वरूप दिले जात आहे. टाकाऊमधून टिकावू शिल्प तयार केली जात आहेत. शालेय विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचा स्वच्छता अभियानामधील सहभाग वाढत आहे. 

टाकाऊमधून टिकाऊ शिल्पांची निर्मिती ही स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून केली जाते आहे. नागरिकांनाही टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनविण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. महानगरपालिकेने टाकाऊ वस्तूंपासून १४८ शिल्पे तयार केली असून ती शहराच्या महत्त्वाच्या ठिकाणी बसविण्यात आली आहेत. ती शहराच्या सौंदर्यात भर टाकत आहेत. ज्वेल्स ऑफ नवी मुंबई येथे उभी केलेली फ्लेमिंगोच्या प्रतिकृतीची बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्डमध्ये समावेश करण्यात आला आहे.

उद्यानांचे शहर ही  नवी ओळख या महानगरपालिकेने निर्माण केलेली आहे. शहरात १८२ उद्यानांचा विकास केला आहे. ११६ मोकळ्या जागांवर हिरवळ विकसित केली आहे. ११ ट्री बेल्ट विकसित केले आहेत. पामबीच रोडला लागून असलेल्या होल्डिंग ज्वेल्स ऑफ नवी मुंबई या पर्यटनस्थळामध्ये रुपांतर केले आहे. तब्बल १३७ एकर परिसरामध्ये हे पर्यटनस्थळ असून तेथे नेरुळमधील वंडर्स् पार्क, संत गाडगेबाबा उद्यान, सेंटर पार्कसह प्रत्येक विभागात उद्यानांची निर्मिती केली आहे. नेरुळमध्ये सायन्स पार्कचे कामही गतीने सुरू आहे.

अशाप्रकारे नवी मुंबई मनपाने लोकहितार्थ असणारे नाविन्यपूर्ण प्रयोग राबविले आहेत. हे सर्व प्रयोग दखल घेण्यासारखे आहेत.


Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

No comments:

Post a Comment

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...