Monday, July 4, 2022

शहरात जंगल बहरतंय

जंगल नष्ट होऊन शहरे झाली हे खरे असले तरी आता जंगल पुन्हा शहरात दाखल होत आहेत. विविध प्रयोगातून कमी जागेत उत्तम जंगल विकसीत केले जाऊ शकते असे प्रयोग यशस्वी होऊ लागले आहेत. शहरीकरणात निसर्ग हरवला आहे ही प्रत्येकाच्या मनातील खंत या प्रयोगामुळे विसरली जाणार आहे. हे समीकरण आता नागरी जंगल (अर्बन फॉरेस्ट) संकल्पनेच्या माध्यमातून बदलत आहे. यामध्ये शहरातच भरगच्च वस्तीमध्ये मिळणाऱ्या छोट्या जागांमध्ये देखील जंगल निर्मितीचे तंत्र निर्माण होऊ लागले आहे. शहरीकरणामूळे परिसरातील जंगले नष्ट करून नागरी वस्तीचे निर्माण केले जात आहे. पण त्याही वस्तीमध्ये नैसर्गीक पध्दतीने वाढणारी जंगले निर्माण होऊ शकतात ही संकल्पना समोर आली. शहरांचा विकास करताना तो केवळ एकांगी न करता विकासामध्ये पर्यवरणालाही महत्त्व देत नगर विकास विभाग आणि राज्यातील महापालिका यांच्या एकत्रित समन्वयाने शहरी जंगल उभे राहत आहेत.

शहरातील पाच ते सहा कार उभ्या राहू शकतील एवढ्या छोट्या जागेत देखील जंगल उभारले जाउ शकते. यामध्ये गवत, झुडूपे, कमी उंचीची झाडे या सर्व प्रकारातील झाडांचा समावेश करता येतो. ही झाडे अगदी कोणतेही अंतर न ठेवता लावायची असतात. त्यानंतर किमान दोन वर्षे या झाडांची देखभाल केली की ही झाडे पुर्णपणे स्वतःची जैवविवीधता तयार करत पोषण व पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होतात. शत्रुकीटक व मित्र किटक, जीवाणू, फुलपाखरे, पक्षी या सारखे सर्व जैवीक घटक जंगलाची जैव विवीधता वाढवू लागतात. अशा प्रकारचे जंगल आता शहरातील वस्त्यामध्ये करण्याचे प्रयोग होऊ लागले आहेत. या जंगलांच्या उभारणीसाठी संधी दिली नाही तर दिल्ली शहराप्रमाणे कृत्रीम ऑक्‍सिजन सेंटर उभे करण्याची वेळ शहरात येऊ शकते हा पर्यावरण क्षेत्रातील तज्ञाचा इशारा या जंगल उभारणीचे महत्व अधोरेखित करत आहे. 

मिठी काठावर कृत्रिम जंगल 

पूर, उष्णतेचा तडाखा, वादळ आणि भूस्खलन आदी धोक्यांचा नेहमीच मुंबईला सामना करावा लागला आहे. वृक्षांचे प्रमाण कमी असल्याने दिवसेंदिवस वाढणारे शहराचे तापमान ही चिंतेची बाब आहे. यावर तोडगा म्हणून आता शहरी जंगल अर्थात ‘अर्बन फॉरेस्ट’ आणि ‘नेचर कॉन्झर्व्हन्सी’ पार्क उभारण्यात येणार आहे. त्यानुसार मिठी नदीच्या किनारी मरोळ येथे हे कृत्रिम जंगल प्रस्तावित आहे. निसर्गाचे रक्षण आणि परिसरातील उष्णतेचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न याद्वारे केला जाणार आहे. शहराच्या वाढत्या उष्णतेवर तोडगा काढण्यासाठी पाणी झिरपणाऱ्या पृष्ठभागाची वाढ आणि जैवविविधतेत वाढ व्हावी म्हणून हे कृत्रिम जंगल उभारण्यात येणार आहे.

शहरात मिनी जंगल  

मियावाकी’ हासुद्धा असाच दोन-तीन दशकापूर्वीचा जंगल निर्मितीचा प्रयोग. याचे निर्माते आणि संशोधक आहेत डॉ. अकिरा मियावाकी. वनस्पतिशास्त्रामधील आपले उच्च संशोधन हिरोशिमा विद्यापीठात पूर्ण करीत असताना त्यांनी १९६०-७० च्या दशकात जपानमधील वृक्षराजींनी समृद्ध असलेल्या जवळपास १० हजार भूभागांचा अभ्यास केला. तेव्हा त्यांच्या लक्षात आले, की मंदिर, प्रार्थनास्थळे, स्मशान आणि देवराई भागात आढळणारे हजारो वर्षांपूर्वीचे वृक्ष त्या ठिकाणाशिवाय इतर कुठेही आढळत नाहीत. त्यांची संख्याही आता मानवी हस्तक्षेपामुळे झपाट्याने कमी होत आहे. त्यांच्या असेही लक्षात आले, की जपानच्या अनेक जंगलामध्ये जपानबाहेरील वृक्षांनी अतिक्रमण करून स्थानिक वृक्षांना आणि त्या सोबत जोडलेल्या जैवविविधतेला नष्ट केले आहे. हे सर्व लक्षात आल्यावर त्यांनी स्थानिक वृक्षांचा नैसर्गिक पद्धतीने जंगल निर्मितीचा ध्यास घेतला आणि या ध्यासामधूनच त्यांच्या ‘मियावाकी’ जंगल पद्धतीचा जपानमध्ये उदय आणि प्रसारही झाला. आज महाराष्ट्रातील शहरात ही मियावाकी जंगलाची संकल्पना रूढ आली आहे. नगर विकास विभागाच्या माध्यमातून याचा मोठ्या प्रमाणात प्रसार करण्यात येत आहे. 

भारतीय प्रजातीच्या लागवडीवर भर 

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने भारतीय प्रजातीच्या लागवडीवर भर देण्यात येत आहे. स्थानिक प्रजातींचे कमी होणारे प्रमाण लक्षात घेता या प्रजातीची लागवड करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. 

No comments:

Post a Comment

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...