Thursday, May 5, 2022

भविष्यात शहरातील वृक्षसंपदा वाढणार

तापमानात सतत होणारे वातावरणीय बदल, तापमानात होणारी वाढ लक्षात घेता शहरातील हरित संपदा वाढवणे याला शहर नियोजनात विशेष महत्त्व देण्यात आले असून महाराष्ट्रात विविध शहरात करण्यात येणारी नियोजनपूर्ण वृक्षांची लागवड भविष्यात शहरातील वृक्षसंपदा वाढवण्यास उपयोगी ठरणार आहे. 

पर्यावरण रक्षणाचे महत्त्व जागतिक पातळीवर पटवून देण्यासाठी आणि पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी शहर नियोजन, पर्यावरण विभाग, महापालिका यांच्या एकत्रित कृतीतून शहरात 'मियावाकी' जंगलांची निर्मिती करण्यात येत आहे. शहरातील कमी जागेत घनदाट जंगलांची निर्मिती हे या मियावाकी जंगलाचे गमक. एकीकडे विकास प्रकल्प राबवताना शहरातील मूळ जंगले तोडावी लागत असली तरी मियावाकी या जपानी पद्धतीने शहरात उभ्या राहणाऱ्या जंगलांमुळे भविष्यात नागरिकांना 'हरित' शहरांना मुकावे लागणार नाही, हे निश्चित. 

पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे या उद्दिष्टाने पर्यावरण विभाग, शहर नियोजन आणि महापालिका यंत्रणा एकत्रित येऊन या मियावाकी जंगलांची निर्मिती करत आहेत.  

मियावाकी जंगले कशी उभी राहतात 

जैवविविधता राखून स्थानिक झाडे जवळजवळ वृक्ष लागवड केली जाते.  मातीतून घेत असलेल्या पोषणाच्या माध्यमातून झाडांच्या वाढीसाठी परस्परपुरक वातावरण निर्माण केले जाते. वृक्षलागवड दाटीवाटीने करण्यात येत असल्याने जमीनीवर फांद्यांची आणि खाली मुळांची वाढ जलद होते. या जंगलातील वृक्ष संपदेला वणवा, चराई पासून जपले आणि पाणी घालत राहिले तर केवळ तीन वर्षात १०-१२ फुटांहून जास्त उंच वाढते आणि पाण्याच्या बाबतीत स्वयंपुर्ण होते.

नवी मुंबईत विशेष प्रयत्न 

शहर स्वच्छतेकडे विशेष लक्ष देतानाच शहराच्या हरित विकासाकडेही लक्ष केंद्रित करण्यात येत असून आता शहरातील वृक्षसंपदा वाढविण्यावर भर दिला जात आहे. शहरातील मोकळय़ा भूखंडावर वृक्ष अधिक बहरविण्यासाठी मियावाकी पद्धतीने घनदाट जंगल निर्मितीवर भर दिला जात आहे. मागील वर्षी निसर्गोद्यान कोपरखैरणे येथे ४२ हजार व गणपतशेठ तांडेल मैदान परिसरात ५ हजार अशा प्रकारे ४७ हजार देशी वृक्षरोपांची मियावाकी स्वरूपांत लागवड करण्यात आली आहे. यापुढील काळात निसर्गोद्यान, कोपरखैरणे येथे २२ हजार, ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे ८० हजार व इतरत्र १४ ठिकाणी ७० हजार अशा प्रकारे १ लाख ७२ हजार वृक्षरोपांची मियावाकी स्वरूपात लागवड करण्यात येणार आहे.

यंदा त्यासाठी वृक्ष प्राधिकरण अर्थसंकल्पात ३८ कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे. पालिका क्षेत्रात मियावाकी पद्धतीने कमी जागेत दाट घनतेची शहरी जंगले उभारण्यात येत आहेत. तसेच यावर्षी सायन-पनवेल महामार्गाच्या कडेला देशी प्रजातीच्या वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. ३९२ हून अधिक उद्याने, रस्ते दुभाजक व मोकळय़ा जागी पर्यावरणाची जोपासना केली जात आहे.

वृक्षसंपदा वाढीसाठी विविध उपक्रम

झाडांचे संरक्षण, वृक्षांच्या फांद्यांची छाटणी, पावसाळय़ात उन्मळून व तुटून पडणाऱ्या वृक्षांची विल्हेवाट लावणे याकरिता २ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

शहरातील वृक्षांचे हरितपट्टे निर्माण करण्याचा मानस असून त्याकरिता ६ कोटींची तरतूद केली आहे. याद्वारे स्थानिक प्रजातीच्या ५० हजार वृक्षांची लागवड करणे नियोजित आहे.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील खारफुटी जंगल लागवड व संवर्धन करण्याकरिता २० लाख रुपये तरतूद करण्यात आली आहे.

रोपवाटिका विकसित करण्यासाठी १ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याद्वारे २ रोपवाटिका विकसित करण्याचे नियोजित आहे. वृक्षांची गणना करण्यासाठी २ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद आहे.

शहरात जास्त क्षेत्रफळ असलेल्या आरक्षित भूखंडावर औषधी
वनस्पती उद्यान, बांबू उद्यान तसेच कॅक्टस उद्यान विकसित करण्यासाठी १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

पालघरमध्ये सर्वात मोठे मियावाकी जंगल 

नारगोळ समुद्रकिनारी असलेल्या खाजण जमिनीवर कृत्रिम वन उभारण्याच्या दृष्टीने एन्व्हायरो आणि फॉरेस्ट क्रिएटर्स फाऊंडेशन, मुंबई यांच्या मदतीने कृत्रिम वने उभारण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत तसेच वनविभागामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. साडे सात एकर ओसाड व नापीक जमिनीत कृत्रिम जंगल तयार करण्याचा हा अभिनव उपक्रम २०२० मध्ये राबवला गेला होता. गोदरेज प्रॉपर्टीज (मुंबई) यांच्या सामाजिक दायित्व निधीमधून सुमारे दोन कोटी रुपयांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आणि खाऱ्या पाण्यामुळे बाभूळ व काटेरी झाड असणाऱ्या या क्षेत्रांमध्ये ६० पेक्षा अधिक देशी, स्थानिक प्रकारची फळ-फुलं झाडे, लाकडाच्या वापरासाठी उपयोगी असणारी तसेच सावली देणारी एक लाख वीस हजारपेक्षा अधिक झाडांची विक्रमी लागवड करण्यात आली. दोन ते साडेतीन फूट उंचीचे व तीन ते चार महिने वयोमान असलेली झाडे लागवड करण्यात आली असून समुद्रकिनाऱ्यालगतची ही वनराई आगामी काळात प्रेक्षणीय ठरणार आहे.

Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Twitter: https://twitter.com/MAHA_UDD

Instagram: https://www.instagram.com/maha_udd/

Blog: https://mahaudd.blogspot.com/

YouTube https://www.youtube.com/channel/UCe9-Tq8QTPQ4h8IyXp2wbvw

 

No comments:

Post a Comment

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...