Monday, April 4, 2022

ही गोष्ट आहे स्वच्छ शहरांची, महाराष्ट्राच्या अभिमानाची !


या शहराने 'कचरा कुंडी मुक्त' शहराची संकल्पना राबवली.  सुका, ओल्या कचऱ्याचे विलगीकरण करून त्यावर प्रक्रिया केली. या कचऱ्यातून  वीज आणि विविध उत्पादने तसेच सेंद्रिय खताची निर्मिती केली, शहरात स्वच्छतेचे संदेश देणारे फलक लावून शहर सुशोभिकरणावर भर दिला, गेली काही वर्ष या शहरातील घंटागाड्यामधून एकत्रित केलेला कचरा नगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पभूमी येथे आणला जातो.  ओला कचरा बारीक करून त्याद्वारे कंपोस्ट खत तयार केले जाते.  हे खत नगरपालिकेच्या बाग-बगीचे, वृक्ष यांच्या साठी वापरले जातेच याशिवाय  चार रुपये प्रति किलो दराने त्याची विक्री केली जाते. बायोगॅस द्वारे ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून वीजनिर्मिती केली जाते. 

सुक्या कचऱ्यामध्ये प्लॅस्टिक पेपर,  रबर बॅग,  मेटल असे वर्गीकरण करून त्याची साठवण केली जाते. नगरपालिकेने सुक्या कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी खाजगी भागिदाराबरोबर करार केलाय. त्याद्वारे प्लॅस्टिक रिसायकलिंगसाठी पुढे पाठवले जाते. घंटागाडीमध्ये जमा केला जाणारा घरगुती घातक कचरा याची  विल्हेवाट यंत्राद्वारे केली जाते.  तसेच जैव वैद्यकीय कचरा याचेदेखील खाजगी भागीदारीमार्फत करार करून शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाते.

हे सगळं वाचताना तुम्हाला प्रश्न पडला असेल, या सर्व पर्यावरणपूरक कृती एका शहरात एकत्रित कृतीतून घडतात ? तर त्याचे उत्तर आहे होय! 

नगर विकास विभागाला याविषयी सांगताना अतिशय आनंद होतो, राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राची आणि नगर विकास विभागाची शान उंचावणारे हे शहर म्हणजे सांगली जिल्ह्यातील विटा शहर..  

स्वच्छ सर्वेक्षण अभियानात अभिनव उपक्रम राबवून महाराष्ट्रातील एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गटात या शहराने राष्ट्रीय पातळीवर पहिला क्रमांक पटकावला. तर लोणावळा आणि सासवड नगरपालिकेला अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळाला. 

राज्यातील शहरे हगणदारीमुक्त करणे तसेच घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ अंतर्गत शहरातील घनकचऱ्याचे व्यवस्थापन करून शहरे स्वच्छ करणे हा उद्देश साध्य करण्यासाठी नगर विकास विभागाच्या मार्गदर्शनाने महापालिका स्तरावर विविध उपक्रम राबवले जातात. 

लोणावळा शहरात ५२४ वैयक्तिक शौचालय, ३२ कम्युनिटी शौचालय, ८ सार्वजनिक शौचालय असल्याने  या शहराने ओडिएफ प्लस प्लस म्हणजेच हागणदारीमुक्त शहराचा दर्जा प्राप्त केला आहे. लोणावळ्यातील २५ घंटा गाड्यांमधून जमा होणाऱ्या ४० टन कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यावर  वैज्ञानिक पद्धतीची प्रक्रियेद्वारे कंपोस्ट खत आणि बायोगॅस निर्मिती केली जात आहे. स्वच्छतेला पूरक अशा या अनेक उपक्रमांमुळे स्वच्छ सर्वेक्षण २०२१ या वर्षात एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गटात लोणावळा शहराने भारतात दुसरा क्रमांक पटकावला. तर याच गटात सासवड नगरपरिषदेला स्वच्छ सर्वेक्षण २०२१, स्वच्छता मित्र चॅलेंज आणि कचरामुक्त शहर म्हणून राष्ट्रीय पातळीवर तिसरा क्रमांक प्राप्त झाला. 

इतर शहरांच्या तुलनेत या तीन शहरांचा आवाका लहान असला तरी महाराष्ट्राला देशात दुसरा क्रमांक मिळवून देण्यात तसेच सर्वाधिक पुरस्कार मिळवून देण्यात या शहरांचा सहभाग अतुलनीय आहे. या शहरांप्रमाणेच राज्यातील इतर शहरांनी विविध पुरस्कार प्राप्त केले. 

महाराष्ट्राला सर्वाधिक पुरस्कार 

स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये सर्वाधिक राष्ट्रीय पुरस्कार महाराष्ट्र राज्याला मिळाले आहेत.

  • वन स्टार मानांकनात महाराष्ट्रातील ५५ शहरे आहेत.
  • थ्री स्टार मानांकनात राज्यातील ६४ शहरांचा समावेश आहे. 
  • पाच स्टार मानांकनात देशातील नऊ शहरांमध्ये महाराष्ट्रातील नवी मुंबई शहराचा समावेश आहे, 
  • दहा लाख लोकसंख्येवरील शहरांमध्ये देशातील ४८ शहरांची निवड करण्यात आली होती त्यात महाराष्ट्रातील १० शहरांचा समावेश आहे. 
  • एक ते दहा लाख लोकसंख्या असलेल्या १०० शहरांमध्ये महाराष्ट्रातील २७ शहरांचा समावेश आहे. 
  • एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या १०० शहरांमध्ये महाराष्ट्रातील ५६ शहरांचा समावेश आहे. 

या उत्कृष्ट कामगिरीमुळे स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये महाराष्ट्राला राष्ट्रीय पातळीवर दुसरा क्रमांक मिळाला आहे.

लहान गाव ते मोठं शहर यांच्या स्वच्छतेविषयक वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांतून महाराष्ट्राचा हा स्वच्छतेचा प्रवास सुरु आहे. नगर विकास विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने  राज्यातील विविध महानगरपालिका, नगरपालिका यांच्याशी समन्वय साधून याचे नियोजन सुरु असते. 


स्वच्छतेचा महाराष्ट्राचा हा प्रवास असाच योग्य पद्धतीने सुरु राहावा यासाठी तुम्हा नागरिकांचा, महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदांचा सहभाग अतिशय महत्वाचा आहे.

'शहराला आपले मानूया, स्वच्छतेची वाट धरूया..'


Click the links below to visit UDD Social Media Platforms :

 Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

 Twitter: https://twitter.com/MAHA_UDD

 Instagram: https://www.instagram.com/maha_udd/

 Blog: https://mahaudd.blogspot.com/


No comments:

Post a Comment

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...