Monday, April 18, 2022

आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या त्या अग्निशमन जवानांना मानाचा सलाम अग्निशमन सेवा सप्ताहाच्या निमित्ताने..

मायानगरी मुंबई १४ एप्रिल १९४४ हा दिवस कधीही विसरणार नाही. याच दिवशी स्‍फोटकांनी भरलेल्‍या ब्रिटीश मालवाहू जहाजाला आग लागली अन् अवघी मुंबई जीव मुठीत धरून धावत होती. काही क्षणात मृतदेहांचे खच पडले. हजारो लोक बेघर झाले. अग्‍निशमन दलाचे कितीतरी जवान मृत्‍यूमुखी पडले. आग विझवायला ना माणसं शिल्‍लक होती, ना सामुग्री. अवघ्‍या मायानगरीला हादरून सोडणा-या या स्‍फोटाची आठवण अग्निशमन दलात कायमची कोरली गेली आहे. या दुर्घटनेत हौतात्म्य आलेल्या अग्निशमन दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आठवण म्हणून तसेच अग्निशमनविषयी जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी १४ एप्रिल ते २० एप्रिल अग्निशमन सेवा सप्ताह पाळण्यात येतो. या निमित्ताने महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयाच्या वतीने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. 

ही घडलेली घटना एक अपघात होता, मात्र अनेकदा आग लागलेली समजताच स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी मोठ्या धैर्याने काम करणाऱ्या प्रत्येक अग्निशमन दलाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कायमच मानाचा सलाम.. या अग्निशमन दलाच्या समूहात आता महिलाही सामील होऊ लागल्या आहेत हे पाहताना या महिलांचा विशेष अभिमान वाटू लागतो.  

ब्रिटीश मालवाहू जहाज एसएस फोर्ट स्‍टायकीन हे कापूस, सोने, हत्‍यारे आणि १४००टन स्‍फोटके घेऊन मुंबईत आले होते. जहाजात होते १४०० टन स्‍फोटके होती असे या घटनेच्या संदर्भात लिहिलेल्या अनेक लेखात म्हटले आहे. हे जहाज गोदीत उभे असताना अचानक दोन भयंकर स्‍फोट झाले. पाहता पाहता शेजारी असलेल्‍या इतर जहाजही भडकल्‍या. झोपडपट्टीसह आजूबाजूचा परिसरही पेटला आणि १४ एप्रिल १९४४ रोजी मुंबईत अग्नितांडव झाले. तेव्हापासून केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूचनेनुसार 'अग्निशमन सेवा सप्ताह' पाळण्यात येतो. या निमित्ताने महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयाच्या वतीने हा सप्ताह विविध फायर स्टेशन येथे सुरु आहे. 

मुंबई गोदीतील ज्या ठिकाणी हा भीषण स्फोट झाला त्या ठिकाणी उभारलेल्या स्मृतिस्तंभाला हौतात्म्य आलेल्या अग्निशमनच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात येते. या सप्ताहात द महाराष्ट्र फायर सर्व्हिसेस पर्सोनेल वेल्फेअर असोसिएअशनला देणगी देऊन अग्निशमन सेवेतील अधिकारी व कर्मचारी यांच्या कुटुंबियांसाठी कल्याण निधी उभारण्यात येतो.

केंद्रीय गृह मंत्रालयाकडून अग्निशमन सेवा सप्ताह २०२२ साठी या वर्षी 'शिका अग्निसुरक्षितता', 'वाढवा उत्पादकता', 'अग्नी सुरक्षा सिंखे, उत्पादकता बढाये', 'Learn Fire Safety, Increase Productivity' हे घोषवाक्य देण्यात आले आहे.  

या सप्ताहाच्या निमित्ताने ५ वी ते ९ वी च्या विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय चित्रकला व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात येते. प्रत्येक शाळेतून निबंधाच्या निवडक प्रवेशिका मागवून समितीच्या माध्यमातून त्यांचे प्रशिक्षण करण्यात येते तर चित्रकलेच्या प्रवेशिकांचे कलाविषयक संस्थेकडून परीक्षण करून सप्ताहाच्या अंतिम दिवशी विजेत्यांना पारितोषिक देण्यात येते. या सप्ताहाच्या निमित्ताने सिडको अग्निशमन सेवा, खारघर अग्निशमन केंद्र येथे फायर अँड पब्लिक बिल्डिंग ड्रिल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तसेच नियमित अग्निशमन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी टॅक्टिकल मेडलि ड्रिल व इंडिविद्युल लॅडर ड्रिल स्पर्धा बोरिवली अग्निशमन दलात आयोजित करण्यात आली होती. 

सोसायट्यांमध्ये अग्निसुरक्षिततेविषयी जागरूकता करण्यासाठी प्रयत्न 

मुंबई अग्निशमन दलाच्या वतीने या सप्ताहाच्या निमित्ताने मुंबईतील सोसायट्यांमध्ये  अग्निसुरक्षिततेविषयी जागरूकता निर्माण करण्यात येत आहे. चेंबूर फायर स्टेशन्स येथे १६ एप्रिल ते १७ एप्रिल २०२२ या कालावधीत अग्नी सुरक्षेसाठी लागणारी यंत्र प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत. याशिवाय आग कशी लागते, आगीवर नियंत्रण कसे आणावे ?, अग्निशमन दलाला संपर्क कसा करावा? आग लागू नये म्हणून काय खबरदारी घेण्यासाठी काय करावे याची इत्तनभूत माहिती घेण्यासाठी आपल्या नजीकच्या फायर स्टेशनला भेट देण्यासाठी विविध भित्तीपत्रके आणि समाज माध्यमातून जागरूकता करण्यात येत आहे. 

 Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

Twitter: https://twitter.com/MAHA_UDD

Instagram: https://www.instagram.com/maha_udd/

Blog: https://mahaudd.blogspot.com/

YouTube https://www.youtube.com/channel/UCe9-Tq8QTPQ4h8IyXp2wbvw

No comments:

Post a Comment

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...