Monday, April 11, 2022

महिलांसाठी शहरं

संयुक्त राष्ट्र संघाच्या 'शाश्वत शहरं आणि समाज' या ११ व्या उद्दिष्टामध्ये शहरी नियोजन व व्यवस्थापनात सहभागात्मक आणि सर्वसमावेशक पद्धतीने सुधारणा करून शहरे सुरक्षित व राहण्यायोग्य करावीत असे नमूद करण्यात आले आहे. या वैशिष्ट्याचा बारकाईने विचार केल्यास शहर नियोजनातील अनेक बाबींचा उलगडा होतो. सर्वसमावेशक म्हणजेच लिंगभाव केंद्रस्थानी ठेवून शहरांचा विकास साध्य करणे ही काळाची गरज आहे. 

(Observer Research Foundation) ORF या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या एका लेखात म्हटले आहे, "लिंगभाव केंद्रस्थानी ठेवून पायाभूत सेवासुविधांची, मोकळ्या जागांची आखणी करणे गरजेचे आहे. असा सर्वसमावेशक आराखडा धोरणातच समाविष्ट केला पाहिजे. त्यासाठी लिंगभावाला अनुसरून निर्णयप्रक्रिया राबवणे गरजेचे आहे." याचाच अर्थ असा की, शहरांच्या विकासाचे नियोजन करताना लिंगभावाला विशेष महत्त्व देत महिलांना पूरक असलेला विकास साधणे आवश्यक आहे. हा विकास साध्य करण्यासाठी नगर विकास विभाग महाराष्ट्र शासनाकडून विविध प्रयत्न सुरु असले तरी दिवसेंदिवस वाढणाऱ्या लोकसंख्येचा विचार करता महिलापूरक विकासात आणखी भर घालण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येत आहेत. 

राज्यातील महापालिका, नगरपरिषद आणि नगर पंचायत यांच्या एकूण महसुलातील पाच टक्के रक्कम महिला व बालकल्याणाच्या योजनांसाठी खर्च करण्याचे आदेश नगर विकास विभागाकडून देण्यात आले आहेत. नगर विकास विभागाकडून सर्वसमावेशक विकासासाठी नुकताच घेतलेला महत्त्वपूर्ण निर्णय म्हणावा लागेल.

महिला केंद्रित विकास साधताना 'बेटी बचाव, बेटी पढाव', आरोग्य संवर्धन, स्वयंरोजगार, कौशल्य विकास, क्रीडा, आधार योजना, पर्यावरण संवर्धन अशा घटकांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

'बेटी बचाव, बेटी पढाव'

मुलगी जन्माला आल्यावर तिच्या सर्वांगीण विकासासाठी आर्थिक मदत करणे, मुलींकरिता शिष्यवृत्ती योजना राबवणे, मुलींच्या शाळा गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी उपस्थिती भत्ता देणे, गुणवत्ता  वाढीसाठी योजना हाती घेणे, विधवा, निराधार महिलांच्या विवाहाकरिता अर्थसहाय्य देणे, वाचनालय अभ्यासिका सुरु करणे. मुली व महिलांना स्पर्धा परीक्षेसाठी अर्थसहाय्य करणे, 

आरोग्यविषयक जागृती 

अत्याधुनिक स्वच्छतागृह बांधणे, दुरुस्ती करणे, दुर्धर आजार असलेल्या महिलांना अर्थसहाय्य, स्वच्छतागृहात सॅनिटरी पॅडची व्यवस्था, योग-प्रशिक्षण वर्ग, वैद्यकीय शिबिरे आयोजित करणे, शिबिरामध्ये गंभीर आजार आढळून आल्यास उपचारासाठी आर्थिक सहाय्य करणे. आशा एड्स नियंत्रण कार्यक्रम, जननी-शिशु सुरक्षा कार्यक्रम राबवणे अशा अनेक सुविधांचा समावेश आहे.

स्वयंरोजगार कार्यक्रम 

स्वयंरोजगारच्या माध्यमातून नोंदणीकृत बचत गटांना अनुदान देणे, महिलांनी तयार केलेल्या वस्तुंना कायमस्वरूपी विक्री केंद्र उपलब्ध करून देणे, बचत गटांना अनुदान देणे,  विद्युत दुचाकी, रिक्षा यांना अर्थसहाय्य पुरवणे, ब्युटी पार्लर, विमा एजंट, रिसेप्शनिस्ट, लघुलेखक, सेल्सगर्ल, परिचारिका प्रशिक्षण, फिजिओथेरपिस्ट, महिला, मुलींना व्यावसायिक प्रशिक्षण देणे, शोभिवंत, औषधी झाडांची लागवड व विक्री योजना हाती घेणे, अनैतिक व्यापारातून बाहेर पडू इच्छिणाऱ्या महिला, मुली यांच्या करिता रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून पुनर्वसन योजना राबवणे. 

क्रीडा सुविधा 

महिला, मुलींच्या क्रीडा कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन, गुणवत्ता प्राप्त खेळाडूंना शिष्यवृत्ती देणे, स्वरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण देणे, 

आधार योजनेच्या माध्यमातून उदरनिर्वाहासाठी अर्थसहाय्य अशा योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

शहरातील बालकांसाठी...

बाल कल्याणकारी योजना राबवताना मुलांकरिता पोषक आहार पुरवणे, पाळणाघर चालवणाऱ्या अशासकीय अर्थसहाय्य्य पुरवणे, शहरी भागातील अतितीव्र कुपोषित बालकांकरिता विशेष आहार पुरवठा करणे, त्यांच्यासाठी पोषण पुनर्वसन केंद्र, बाल उपचार केंद्र स्थापन करणे अशा अनेक योजनांचा समावेश या तरतुदीनुसार करण्यात येणार आहे. याशिवाय ०-५ वर्षाच्या मुलांकरिता डे केअर सेंटर बांधणे, पाळणाघर चालवणाऱ्या अशासकीय संस्थांना अर्थसहाय्य करणे, झोपडपट्टी आणि बांधकाम क्षेत्रातील बालकांचे विनामूल्य लसीकरण करणे, कोरोनाकाळात एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या अनाथ बालकांकरिता अर्थसहाय्य करणे अशा योजनांचा समावेश करण्यात आला आहे.

वाढणारी लोकसंख्या आणि त्यातील महिलांचे प्रमाण पाहता महाराष्ट्राचा विकास महिलांना केंद्रस्थानी ठेवून करायच्या अशा उपाययोजना खऱ्या अर्थाने सुरु झाल्या असून भविष्यात शहरांचा विकास महिलाकेंद्रित असलेल्या  एका वेगळ्या समीकरणात पहायला मिळेल हे निश्चित.


 Facebook:  https://www.facebook.com/MAHAUDD

 Twitter: https://twitter.com/MAHA_UDD

 Instagram: https://www.instagram.com/maha_udd/

 Blog: https://mahaudd.blogspot.com/

YouTube https://www.youtube.com/channel/UCe9-Tq8QTPQ4h8IyXp2wbvw

 

No comments:

Post a Comment

मुंबई मेट्रो - ३ : शहरी वाहतुकीचा नवा पर्याय कुलाबा -वांद्रे-सीप्झ लाइन अर्थात अॅक्वा लाइन नागरिकांसाठी सुखद पर्याय

मुं बई ही भारताची आर्थिक राजधानी असण्याबरोबरच ते स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षांचं शहरही आहे. मुंबईची लोकसंख्या वाढतेय. नागरीकरण झपाट्याने होते...